दलबेक्को रेनातो : (२२ फेब्रुवारी १९१४ –  ). अमेरिकन विषाणुशास्त्रज्ञ. ⇨ हॉवर्ड टेमिन  आणि ⇨ डेव्हिड बॉल्टिमोर  या दोन शास्त्रज्ञांबरोबर १९७५ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक त्यांना विभागून मिळाले.

दलबेक्को यांचा जन्म कांतानझारो (इटली) येथे झाला. तूरिन विश्वविद्यालयाची पदवी मिळविल्यानंतर १९४०—४६ पर्यंत त्याच विद्यापीठात ते विकृतिविज्ञानाचे साहाय्यक प्राध्यापक होते. १९४७ मध्ये ते प्रायोगिक भ्रूणविज्ञानाचे प्राध्यापक होते. त्याच वर्षी त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले. तेथे ते १९४७—४९ पर्यंत इंडियाना विद्यापीठाच्या सूक्ष्मजंतुशास्त्र विभागात संशोधन साहाय्यक व त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये १९४९—५२ पर्यंत वरिष्ठ फेलो होते. त्याच संस्थेत १९५२—६३ पर्यंत ते प्रथम साहाय्यक प्राध्यापक व नंतर प्राध्यापक झाले.

इंडियाना विद्यापीठात असताना एस्. ई. लूर्या या नोबेल पारितोषिक विजेत्यांबरोबर सूक्ष्मजंतूंवरील अतिसूक्ष्म विषाणूंचा (व्हायरसांचा) अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये असताना त्यांनी ‘प्लेक टेक्निक’या नावाने ओळखले जाणारे डीएनए विषाणू [ज्याची जननिक म्हणजे आनुवंशिक सामग्री डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल असते असा विषाणू⟶  न्यूक्लिइक अम्ले]मोजण्याचे जलद तंत्र शोधून काढले. त्यानंतर लवकरच आरएनए (रिबोन्यूक्लिइक अम्ल) विषाणू मोजण्याचे तंत्रही सापडले. १९६३ मध्ये ते कॅलिफोर्नियातील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजिकल स्टडिज या संस्थेमध्ये वरिष्ठ फेलो म्हणून काम करू लागले. तेथे त्यांनी विषाणुशास्त्राचा अभ्यास करण्याकरिता प्रयोगशाळा स्थापन केली. या प्रयोगशाळेत काही मदतनिसांच्या बरोबर त्यांनी विषाणुजन्य कर्करोगाच्या संशोधनास उपयुक्त अशी परीक्षा–नलिका पद्धत तयार केली. पहिल्या उपयुक्त उत्परिवर्तनक्षम (आनुवंशिक लक्षणांत एकाएकी बदल होण्याची क्षमता असणाऱ्या) विषाणूमुळे होणाऱ्या अर्बुदाचे (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीचे) उत्पादन त्यांनी केले. त्यानंतर प्रमुख विषाणूंच्या आनुवंशिकीय विश्लेषणास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी स्वतः आरएनए अर्बुद विषाणूवर संशोधन कधीच केले नाही, मात्र त्यांनी डीएनए विषाणूवर आपले लक्ष केंद्रित केले होते.

टेमिन यांनी दलबेक्को यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पदवीसाठी संशोधन केले होते (१९५५–५९) व साल्क इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत दलबेक्को असताना बॉल्टिमोरही तेथेच काम करीत होते. तथापि टेमिन, बॉल्टिमोर व दलबेक्को यांनी एकत्र येऊन संशोधन केलेले नव्हते. दलबेक्को यांच्या संशोधनामुळे इतर दोघांच्या संशोधनाचा पाया घातला गेला. टेमिन यांनी आपले लक्ष आरएनए विषाणूवर केंद्रित केले होते, तर बॉल्टिमोर यांनी बालपक्षाघाताच्या (पोलिओच्या) विषाणूंच्या विश्लेषणास प्रारंभ केला होता. बॉल्टिमोर यांनी आरएनए विषाणूंच्या कणातून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त संयुग) शोधून काढले. टेमिन यांचे संशोधन याच दिशेने चालू होते. या एंझाइमामुळे आरएनए अर्बुद–विषाणू आपल्या डीएनए प्रतिकृती स्वतःच निर्माण करू शकतात, असा त्यांचा सिद्धांत होता.

या तिघांच्या स्वतंत्र संशोधनामुळे अर्बुद विषाणुशास्त्रात फार मोलाची भर घातली गेली. अर्बुद–विषाणू व कोशिकांमधील (पेशींमधील) जननिक सामग्री यांमधील अन्योन्यक्रियेवर यामुळे नवा प्रकाश पडला. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.

इ. स. १९५१ नंतर दलबेक्को यांनी आपले सर्व लक्ष प्राण्यांच्या विषाणुशास्त्राकडे केंद्रित केले होते. त्यांनी विषाणुशास्त्रात परिमाणात्मक पद्धतींचा उपयोग केल्याने पुढील प्रगतीचा मार्ग सुलभ झाला. प्राण्यांच्या कित्येक कर्करोगांना अर्बुद–विषाणू कारणीभूत असल्याचे त्यांनी प्रस्थापित केले आहे. यामुळे मानवी कर्करोगालाही विषाणू कारणीभूत असतात की काय, हे तपासून पाहण्याच्या दृष्टीने पार्श्वभूमी तयार झाली आहे. सप्टेंबर १९७२ पासून ते इंपीरिअल कॅन्सर रिसर्च फंड लॅबोरेटरी, लंडन येथे काम करीत आहे. त्यांना ग्लासगो विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट (१९७०), येल विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स पदवी (१९६८), अर्लिक पारितोषिक इ. अनेक मानसन्मान मिळाले आहेत.

ठाकूर, अ. ना.