बारानी, रोबेर्ट : (२२ एप्रिल १८७६- ८ एप्रिल १९३६). ऑस्ट्रो-स्वीडिश वैद्य व कर्णतज्ञ. अंतर्कर्णातील श्रोतृकुहर [⟶ कान] या अवयवाचे शरीरक्रियाविज्ञान व विकृतिविज्ञान यांविषयीच्या संशोधनाबद्दल त्यांना १९१४ चे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

बारानी यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. तेथील विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी १९०० मध्ये एम्.डी.पदवी मिळविली. पुढील दोन वर्षे इतर ठिकाणच्या रुग्णालयांतून काम केल्यानंतर ते व्हिएन्नास परतले व तेथील विद्यापीठाच्या रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात काम करू लागले. १९०३-११ या काळात त्यांनी आडाम पोलिट्झर यांच्या कर्णरोग रुग्णालयात साहाय्यक म्हणून काम केले. १९०९ मध्ये व्हिएन्ना विद्यापीठात कर्णरोगांचे अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पहिल्या महायुद्धात त्यांनी वैद्य म्हणून काम केले व रशियाने त्यांना कैद केले होते. त्यानंतर १९१७ साली स्वीडनमधील अप्साला विद्यापीठात त्यांनी कर्णविज्ञान शाखेच्या प्रमुख पदावर नेमणूक झाली व पुढे त्यांनी स्वीडिश राष्ट्रीयत्व स्वीकारले. अप्साला विद्यापीठाच्या कर्णनासा-कंठविज्ञान (कान, नाक व घसा यांच्या विकृतींचे विज्ञान) विभागाचे ते प्रमुख होते आणि या विषयाचे जागतिक कीर्तीचे तज्ञ म्हणून ओळखले जात होते. कानातील श्रोतृकुहर उपकरणाच्या कार्यासंबंधी, विशेषेकरून त्याच्या शरीरसंतुलनासंबंधी, त्यांनी संशोधन केले. निमस्तिष्काच्या [⟶ तंत्रिका तंत्र] कार्यासंबंधीही त्यांनी संशोधन केले. एक-कर्णीय बहिरेपणाच्या निदानाची पद्धत त्यांनी शोधून काढली. तिला ‘बारानी लक्षण’ अथवा ‘बारानी ऊष्मद्रव परीक्षा’ म्हणतात. या परीक्षेकरिता बाह्यकर्णात विशिष्ट तापमानाचे पाणी सोडतात. ४२ से. तापमानाचे पाणी रोग असलेल्या बाह्यकर्णात सोडल्यास नेत्रदोल [⟶ नेत्रवैद्यक ] आढळत नाही. निरोगी कर्णत असा द्रव सोडल्यास त्याच बाजूच्या डोळ्यात नेत्रदोल होतो.

नोबेल पारितोषिकाशिवाय त्यांना ग्रोनिंगेन विद्यापीठाचे गीयो पारितोषिक (१९१४) आणि स्वीडिश मेडिकल सोसायटीचे पदक (१९२५) हे बहुमान मिळाले होते. त्यांच्या विषयावर त्यांनी काही ग्रंथ लिहिले व त्यांपैकी काहींची इंग्रजी शीर्षके पुढीलप्रमाणे आहेत : फिजिऑलॉजी ॲड पॅथॉलॉजी ऑफ सेमिसर्क्युलर कॅनाल्स (१९१०), फंक्शनल टेस्टिंग ऑफ द व्हेस्टिब्युलर ॲपरॅटस(१९१२) आणि ए न्यू मेथड ऑफ रॅडिकल ऑपरेशन फॉर क्रोनिक इअर सुप्युरेशन (१९२२). विमानचालकांच्या श्रवणेंद्रियाची चाचणी घेण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट खुर्चीला बारानी यांचे नाव देण्यात आले आहे. ते अप्साला येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.