गोबी — २ : गोबीइडी मत्स्यकुलातील सर्व माशांना गोबी हे नाव दिले जाते. या कुलात पुष्कळ वंश आहेत पण त्यांपैकी १७-१८ मुख्य आहेत. या वंशांत पुष्कळ जाती आहेत. उत्तर ध्रुववृत्त आणि दक्षिण ध्रुववृत्त यांच्या

गोबी माशाची एक जाती (गोबियस रूदेन्‌स्पाराय)

बाहेर असणाऱ्या सर्व समुद्रांच्या किनाऱ्यालगत गोबी मासे आढळतात. जगाच्या सर्व भागांतील गोड्या पाण्यात देखील त्यांच्या जाती आढळतात.

सर्वसाधारणपणे हे मासे २–१० सेंमी. लांब असतात काहींची लांबी २५ सेंमी. पर्यंतही असते. सगळ्यांत मोठी जाती ईलिओट्रिस मार्मोरेटा  जवळजवळ ९० सेंमी. लांब असून सयाम, बोर्निओ व सुमात्रामधील नद्यांत आढळते आणि सगळ्यांत लहान जाती मिस्टिक्थिस लुझॉनेन्सिस  ही १२–१४ मिमी. लांब असून फिलिपीन्स बेटांत सापडते. या माशांचे डोके थोडेफार दबलेले असून शरीर बुटके व जाड किंवा लांबट आणि सडपातळ असते. डोळे मोठे, बटबटीत, नेत्रकोटरातून (डोळ्याच्या खाचेतून) पुढे आलेले व डोक्याच्या माथ्याजवळ असतात. पृष्ठपक्ष (हालचाल करण्यास किंवा तोल सांभळण्यास उपयोगी पडणाऱ्या आणि पृष्ठभागी असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या, पर) दोन असतात. श्रोणिपक्ष (ढुंगणाच्या भागावरील पक्ष) संयुक्त असून त्यांच्या एकीकरणाने एक प्रकारचे चूषी बिंब (चिकटणारी तबकडी) तयार होते आणि त्याच्या योगाने गोबी खडकाला चिकटतो. शरीर चक्राभ (गोलसर) अथवा कंकताभ (फणीसारख्या) शल्कांनी (खवल्यांनी) झाकलेले असते अथवा शल्क मुळीच नसतात. पार्श्वरेखा नसते. मुख मध्यम किंवा मोठे असते.

या माशांचा प्रजोत्पादनाचा मोसम दीर्घकालिक असतो. मादीचा ताबा मिळविण्याकरिता नरांमध्ये लढाया होतात. मादी दगडांच्या खालच्या बाजूला अंडी चिकटविते अथवा शिंपेत वा समुद्रतृणांत तयार केलेल्या ओबडधोबड घरट्यात अंडी घालते. नर अंड्यांचे रक्षण करतो. 

ॲफिया  हा एक असामान्य गोबी मासा आहे. याचे शरीर पारदर्शक असून तो इतर गोबींप्रमाणे समुद्रकिनाऱ्याजवळ न राहता किनाऱ्यापासून पुष्कळ दूर समुद्राच्या पृष्ठाजवळ पोहत असतो. कॅलिफोर्नियात आढळणारी या माशांची एक जाती, चिंगाट्यांनी तयार केलेल्या बिळात राहत असल्यामुळे पूर्णपणे आंधळी असते. उष्ण प्रदेशात राहणाऱ्या पुष्कळ गोबी माशांना विचित्र सवय असते. काही स्पंजांच्या शरीरात, काही शिंपांच्या आत, तर काही मोठ्या माशांच्या क्लोमगुहांत (कल्ल्यांच्या गुहांत) राहतात. 

पहा : निवटी. 

यार्दी, ह. व्यं.