फ्रेंच सोमालीलँड  ( जिबूती प्रजासत्ताक )  : आफ्रिकेच्या ईशान्य किनाऱ्यावरील ही फ्रेंच वसाहत  १९७७  मध्ये स्वतंत्र झाली. सांप्रत जिबूती प्रजासत्ताक या नावाने एक स्वतंत्र देश म्हणून याची गणना होते .  क्षेत्रफळ  २३ , ०००  चौ . किमी .  लोकसंख्या  २ , ४२ , ०००  ( १९७८  अंदाज ).  याच्या वायव्येस ,  पश्चिमेस व नै ॠत्येस इ थिओपिया  आग्नेयी स सोमाली प्रजासत्ताक हे देश व पूर्वेस एडनचे आखात आहे .  ⇨ जिबूती  ( लोकसंख्या  १ , २० , ०००  – १९७६  अंदाज )  हे राजधानीचे शहर व महत्त्वाचे बंदरही आहे .  देशातील निम्मी लोकसंख्या याच शहरात आहे .  यूरोप व मध्य – पूर्वेतील तेलक्षेत्र यांदरम्यान सुएझ कालव् याद्वारे होणाऱ्या वाहतुकीच्या महत्त्वाच्या मार्गावर तांबडा समुद्र व एडनचे आखात यांच्या सांध्याजवळ वसलेला हा देश अगदी मोक्याच्या जागी असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व  प्राप्त झाले आहे .

  

  भूवर्णन : आकाराने जवळजवळ भा रतातील मिझोराम या केंद्रशासित प्रदेशाएवढ्या असलेल्या या देशातील सु . ९०  टक्के प्रदेश वाळवंटी ,  रूक्ष व ओसाड आहे .  देशाच्या उत्तर भागात मुसा आली ही डोंगररांग असून  २ , ०६३  मी . उंचीचे मुसा आली हे सर्वोच्च शिखर आहे .  याशिवाय एडनच्या आखाताचा भाग असलेल्या ताजूरा आखाताच्या उत्तर किनाऱ्यालगत माब्ला व गूडा हे छोटे डोंगर आहेत .  या प्रदेशात ज्वालामुखीजन्य पठारे , लहान तुरळक मैदाने असून फार थोड्या लहान नद्या व खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत .  देशातील थोड्याच नद्या बारमहा वाहतात .  बहुतेक प्रवाह एडनच्या आखातास अथवा अंर्तभागातील सरोवराला मिळतात. आलोल, आसाल आणि आबे ही सरोवरे असून त्यांपैकी आलोल व आसाल ही दोन समुद्रसपाटीच्याही खाली आहेत.

  हवामान : जगातील जास्त तपमानाच्या प्रदेशांपैकी हा एक समजला जातो. वर्षातील बहुतेक काळ येथील हवामान अत्यंत उष्ण असते. जिबूती शहराचे हवामान आर्द्रयुक्त असून सरासरी तपमान ३०° से. असते, तर ते कधीकधी ५२ ° से.पर्यंतही वाढते. देशाच्या अंतर्गत भागात हवामान कोरडे असून तपमानही जास्त असते. नोव्हेंबर ते एप्रिल यांदरम्यानचा कालावधीच सापेक्षतः थंड असतो. देशातील पर्जन्याचे प्रमाणही फारच कमी व अपुरे असून ते किनारी प्रदेशांत सरासरी ३९ सेंमी., तर उंच डोंगराळ प्रदेशात सरासरी ५२ सेंमी.पर्यंत असते.

 जास्त तपमान व अपुरा पाऊस यांमुळे या प्रदेशात नैसर्गिक वनसंपत्तीही फारच थोडी आढळते. फक्त माब्ला व गूडा डोंगरउतारांवरच कायम स्वरूपाच्या वनस्पतींची छोटी जंगले आहेत. बाकीच्या बहुतेक प्रदेशात काटेरी व खुरट्या वनस्पती, झुडपे इ. आढळतात. या खुरट्या वनस्पतींवर येथील भटक्या जमाती पशुपालन व्यवसाय करतात. देशात वनसंपत्तीची कमतरता असल्याने प्राणिविशेषही फारसे नाहीत. सोमाली प्रजासत्ताक व इथिओपिया यांमध्ये आढळणारे तरस, कोल्हा, हरिण, कुरंग इ. प्राणीच अल्प प्रमाणात येथेही आढळतात.

  

  इतिहास : पूर्वी अरबांच्या अंमलाखाली असलेल्या या प्रदेशात १८६२ मध्ये येथील आफार (दानाकील) या अरब टोळीच्या प्रमुखांशी करार करून फ्रेंचांनी प्रथम प्रवेश मिळवीला. सुएझ कालवा वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या सुमारास (१८६९) ओबोक विभागात अनेक फ्रेंच कंपन्या स्थापन झाल्या. हळूहळू त्यांचा विस्तार दक्षिणेकडे वाढत गेला. दानाकील आणि ईसा या स्थानिक अरब जमातींच्या नेत्यांशी फ्रेंचांनी १८८४-८५ मध्ये आणखी काही करार केले. १८८८ मध्ये जिबूती शहराची स्थापना होऊन १८९२ मध्ये या प्रदेशाची राजधानी बनले. ग्रेट ब्रिटन, इटली व इथिओपिया यांच्याशी झालेल्या करारान्वये या प्रदेशाच्या सरहद्दी १८८८ ते १९०१ या काळात निश्‍चित करण्यात आल्या. १८९६ पासून हा प्रदेश ‘फ्रेंच सोमालीलँड’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्यानंतर १८९७ मध्ये इथिओपियाशी आर्थिक करार करून जिबूती ते इथिओपियातील अदिस अबाबापर्यंत ७८४ किमी. लांबीचा लोहमार्ग बांधण्यात आला (१९१७). त्यामुळे जिबूती बंदराचे महत्व वाढले. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात एरिट्रीया व सोमालिया यांचा काही भाग इटलीने पादाक्रांत केला व १९३६ मध्ये इथिओपियाला आपले मांडलिकत्व पत्करावयास लावले. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने या प्रदेशातील व्यापार खूपच खालावला. १९४५ मध्ये ही वसाहत फ्रेंचांचा सागरपार प्रांत म्हणून जाहीर करण्यात आली. दोन दशकांनंतर १९६७ मध्ये सार्वत्रिक मतदान होऊन या प्रांताला ‘ फ्रेंच टेरिटरी आफार्झ अँड ईसास’ हे नाव देण्यात आले. या नंतरच्या काळात या प्रदेशाचे इथिओपिया व सोमाली प्रजासत्ताकाशी संबंध सुधारले. मात्र ईसा व आफार या तेथील स्थानिक जमातींमध्ये सत्तास्पर्धा चालू होती. जिबूती बेदराच्या परिसरात ईसांची संख्या जास्त असल्याने स्थानिक राजकारणात त्यांचे वर्चस्व असे. १९६० च्या सुमारास अल्पसंख्यांक आफारांना फायदेशीर ठरेल, असे धोरण फ्रेंच सरकारने अवलंबिल्याने या प्रदेशात बराच तणाव निर्माण झाला. परिणामतः फ्रेंच सरकारला या प्रदेशाकडे अधिक लक्ष देणे भाग पडले. अली अरेफ बाउऱ्हान या उपराष्ट्राध्यक्षाने आपल्या अधिकारांचा वापर करून आफारांना अनुकूल असा मतदारसंघ निर्माण केला. या संघर्षातून स्वातंत्र्याची मागणी सुरू झाली व १९६७ च्या सुमारास या  चळवळीला काहीसे हिंसक वळण लागले. १९७५ मध्ये या चळवळीचा जोर वाढून अली अरेफ एकाकी पडला कारण त्याचा तेरा सहकाऱ्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला. याच काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे संयुक्त राष्ट्रांत जिबूतीच्या स्वातंत्र्याविषयी बोलणी सुरू होती. या संदर्भात बैठकीही झाल्या होत्या. जुलै १९७६ मध्ये अली अरेफने दुसऱ्या बैठकीतील स्वातंत्र्याविषयीच्या निर्णयाला विरोध करून आपल्या पदाचा राजीनामा दिला. अखेर मार्च १९७७ मध्ये पॅरिस येथे झालेल्या बैठकीत स्वातंत्र्याचा व तात्काळ नव्या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला व मे १९७७ मध्ये तो समंत झाला. ८ मे १९७७ रोजी सार्वत्रिक निवडणुका होऊन ६५ प्रतिनिधींची लोकसभा अस्तित्वात आली. तीत ३३ ईसा, ३० आफार आणि २ अरब असे पक्षीय बलाबल होते. देशातील सर्व पक्षांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकत्र येण्याची प्रतिज्ञा केली. २४ जून रोजी हसन गाउलेड ॲप्टिडॉन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व २७ जून १९७७ रोजी जिबूतीला स्वातंत्र्य मिळाले. जुलैमध्ये गाउलेडने अहमद दिनी अहमदची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. या नवीन राज्यापुढे आफार व ईसा या दोन प्रबळ जमातींमधील समतोल सत्तावाटपाची मुख्य समस्या होती. या दृष्टीने केलेले प्रयत्न आफारांचे समाधान करू शकले नाही. त्यांनी शेजारच्या सोमाली प्रजासत्ताकाला अनुकूल असणाऱ्या सरकारी धोरणाविरुद्ध उठाव केला. त्यामुळे डिसेंबर १९७७ मध्ये ६०० आफारांना अटक करण्यात आली या घटनेमुळे अहमद दिनीने व इतर चार आफार जमातींच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. फेब्रुवारी १९७८ मध्ये नवीन मंत्रीमंडळ बनविताना आफार व ईसा या जमातींचे बलाबल सारखे राखण्यात आले व कामिल हा पंतप्रधान झाला. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षाने कामिल मंत्रिमंडळ बरखास्त केले ऑक्टोबरमध्ये तिसरे मंत्रिमंडळ अधिकारावर येऊन बार्कत गाउरात हामादाऊ हा तिसरा पंतप्रधान झाला.


  राज्यव्यवस्था : १९७७ साली देशाचे संविधान तयार करण्याचे काम संसदेकडे (चेंबर ऑफ डेप्युटिज) सोचविण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष हा देशाचा प्रमुख असून पंतप्रधान व त्याचे चौदा मंत्री (१९७७) मिळून मंत्रिमंडळ असते. संसदेचे ६५ सभासद असून ते सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष हा लोकनिर्वाचित असतो व मंत्रिमंडळ त्याला जबाबदार असते. २० सप्टेंबर १९७७ रोजी जिबूती प्रजासत्ताकाला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्व देण्यात आले. हा देश अरब लीगचाही सभासद आहे.

  न्यायव्यवस्था : स्वातंत्र्यानंतर या देशाच्या न्यायव्यवस्थेत संपूर्ण बदल करण्यात आला असून ती मुस्लिम कायद्यावर आधारलेली आहे. देशात ‘सुप्रीम कोर्ट ऑफ अपील’ व ‘कोर्ट’ ही दोन मुख्य न्यायालये असून सुप्रीम कोर्ट ऑफ अपील हे फौजदारी खटले व कोर्ट हे दिवाणी दावे चालविते. यांशिवाय रूढिप्राप्त विधीची ‘क्कादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यायाधीशाकडून अंमलबजावणी होते.

 स्वातंत्र्यापूर्वीपासूनच या देशात फार थोडे सैन्यबळ आहे. १९७८ मध्ये देशात ४,४०० फ्रेंच सैनिक होते. देशाच्या संरक्षक दलाचे जिबूती हेच केंद्र आहे.

  आर्थिक स्थिती : देशाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे जिबूती बंदरातून चालणारा व्यापार व त्याच्याशी निगडित उद्योगधंद्यांवरच अवलंबून आहे. इथिओपिया आपल्या आयात-निर्यात व्यापारासाठी याच बंदराचा उपयोग करतो. अरब-इझ्राएल युद्धामुळे १९६७ ते १९७५ या काळात सुएझ कालवा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचा जिबूती बंदरावर अनिष्ट परिणाम झाला व या प्रदेशाची आर्थिक स्थिती ढासळली. त्यामुळे हे बंदर शेजारील सोमाली प्रजासत्ताक तसेच सौदी अरेबिया इ. देशांतील बंदरांइतकी प्रगती करू शकले नाही. देशातील बराचसा भाग वाळवंटी असल्याने लागवडीस योग्य अशी फारशी सुपीक जमीन उपलब्ध नाही. आंबिली मरूद्यानासाठी व इतर काही भागांत खजूर, फळे व पालेभाज्या यांचे उत्पादनही होते. बहुतेक अन्नधन्य आयात करावे लागते.

 या देशातील बहुतेक लोक ग्रामीण भागातील व भटके असून ते पशुपालनाचा व्यवसाय करतात. दूध, थोड्या प्रमाणात लोणी, गुरांची कातडी व मांस यांचा व्यापार करून ते उपजीविका करतात. देशात १९७७ मध्ये अंदाजे १८,००० गुरे ६,८३,००० शेळ्या-मेंढ्या ३,००० गाढवे २५,००० उंट इतके पशुधन होते. त्याच वर्षी ३,००० मे. टन मांस व ४९० मे. टन शेळ्यांच्या कातडीचे उत्पादन झाले. या उद्योगांशिवाय देशाच्या किनारपट्टीवर व आसाल, आलोल सरोवरांतून मीठ उत्पादन केले जाते, तसेच सागरी मासेमारीही केली जाते. १९७६ साली २५८ मे. टन मासे पकडण्यात आले. जंगलांतूनही थोडेफार उत्पन्न मिळते. १९७०-७६ पर्यंत प्रतिवर्षी लाकूड उत्पादन सु. २३,००० घ. मी. होते.

 देश स्वयंपूर्ण नसल्याने आयात मालावरच तो बराचसा अवलंबून आहे. आयात मालात कापड, कोळसा, सिमेंट व इतर दैनिक गरजेच्या वस्तू यांचा प्रामुख्याने समावेश असतो. निर्यातीत कातडीचे प्रमाण जास्त असते.

  चलन : देशात १७ मार्च १९४९ पासून जिबूती फ्रँक हे चलन वापरात  असून १, २, ५, १०, २०, ५०, व १०० अशी जिबूती फ्रँकची नाणी आणि ५०० १,००० ५,००० अशा जिबूती फ्रँकच्या नोटा प्रचलित आहेत. जानेवारी १९७९ मध्ये १ स्टर्लिंग पौंड = ३२७·१५ जिबूती फ्रँक व १ अमेरिकी डॉलर = १६३·६७ जिबूती फ्रँक असा विनिमय दर होता. देशात एक मध्यवर्ती बँक व इतर चार बँका असून सु. दहा यूरोपियन विमाकंपन्या होत्या.

  खनिजसंपत्ती : या देशात शेती उत्पनप्रमाणेच खनिज उत्पन्नही अत्यल्प प्रमाणात मिळते. मीठ हे येथील मुख्य खनिज परंतु त्याचे उत्पादन १९६० पूर्वीच बंद करण्यात आले. लोह, तांबे यांची धातुके अभ्रक, जमुनिया, गंधक इ. खनिजे अगदी थोड्या प्रमाणात सापडतात.

  वाहतूक व संदेशवहन : जिबूतीमध्ये एकूण सु. २,००० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी जवळजवळ निम्मे फक्त कोरड्या मोसमातच वापरात येतात. १९७८ मध्ये देशातील १,६५० किमी. लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी ७५ किमी. लांबीचे पक्के रस्ते होते. एकच रेल्वेमार्ग मीटरमापी असून तो जिबूतीपासून इथिओपीयातील अदिस अबाबापर्यंत गेलला आहे. याची जिबूती प्रजासत्ताकातील लांबी १०७ किमी. आहे. जिबूती येथे आंतराष्ट्रीय विमानतळ असून तेथून मॅलॅगॅसी, इथिओपीया, पूर्व आफ्रिका, ईजिप्त, फ्रान्स इत्यादींशी विमान वाहतूक चालते. त्याशिवाय देशांतर्गत वाहतुकीसाठी इतर सहा विमानतळ आहेत. जिबूती हे एकच महत्वाचे बंदर असून तेथूनच देशाचा सर्व व्यापार चालतो.

 देशात १९७५ मध्ये एकूण ३,३९९ दूरध्वनी होते. जिबूती येथे एक नमोवणी केंद्र असून तेथून फ्रेंच, आकार व अरबी भाषांमधून रोज १७ तास ध्वनिक्षेपण केले जाते. येथील दूरचित्रवाणी केंद्रामधून रोज ५ तास कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. १९७७ मध्ये ३०,००० रेडिओ व १०,००० दूरचित्रवाणी संच होते.


  लोक व समाजजीवन : देशातील बहुतेक लोक मुस्लिम आहेत. रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथीय लोक फार कमी आहेत. एकूण लोकसंख्यापैकी ३० टक्के लोक भटके आहेत. आफार व ईसा या दोन प्रमुख वांशिक अरब जमाती असून आफारांची वस्ती प्रामुख्याने इथिओपियाला लागून असलेल्या उत्तर व पश्‍चिम भागांत तर ईसांची वस्ती सोमाली प्रजासत्ताकाच्या सीमेजवळील दक्षिण भागांत आढळते. १९७६ मध्ये या प्रदेशात ७०,००० आफार ईसा व सोमाली मिळून ८०,००० इतर अरब १२,००० यूरोपियन १५,००० अन्य देशीय ४०,००० लोक होते.

  शिक्षण : स्वातंत्र्यानंतर या देशाच्या सरकारने शिक्षणावर खूपच भर दिल असला, तरी देशात सक्तीचे शिक्षण नाही. १९७६ मध्ये देशात २७ प्राथमिक शाळांत (२१ सार्वजनिक व ६ खाजगी) ६,१२० विद्यार्थी ४ माध्यमिक शाळांत व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या आठ संस्थांमध्ये एकूण २,००० प्रशिक्षार्थी होते. येथील शाळा सरकार व ख्रिस्ती मिशनरी यांच्यामार्फत चालविल्या जातात.

  आरोग्य : जिबूती येथे ‘पेल्टर हॉस्पिटल’ हे ५७७ खाटांची सोय असलेले मोठे रुग्णालय आहे. याशिवाय १२० खाटांचे सैनिकी रुग्णालय (१९७१) व सात दवाखानेही आहेत. इतरत्र असलेल्या चार दवाखान्यांत आणि पाच अपंगाालयांत मिळून १४० खाटांची सोय आहे.

 देशातील सांस्कृतिक जीवन जिबूती ह्या राजधानीपुरतेच मर्यादित असून तेही अल्प नियतकालिकांचे प्रकाशन, काही सार्वजनिक वाचनालये, शैक्षणिक चित्रपट दाखविण्याच्या सोयी यांनी सीमित झाले आहे. देशात १९७५ मध्ये एकूण ४ चित्रपटगृहे होती व त्यांत एकूण ५,८०० प्रेक्षकांची सोय होती. जिबूती येथून एक साप्ताहिक, एक पाक्षिक व एक मासिक प्रसिद्ध होते (१९७७). ‘अरबी’ व ‘फ्रेंच’ ह्या देशाच्या अधिकृत भाषा होत.

  

  महत्वाची स्थळे : जिबूतीला राजधानी व बंदर म्हणून दुहेरी महत्त्व आहे. अदिस अबाबाहून येणाऱ्या रेल्वेमार्गाचे हे अंतिम स्थानक असून येथे सागरी मीठ उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. हे शहर उंटांची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. या प्रमुख शहराशिवाय देशात दीकील, आली साब्ये, ताजूरा व ओबोक ही शहरे महत्वाची आहेत. दीकिल जिबूतीच्या नैर्ॠत्येस सु. ८९ किमी.वर असून त्याचा परिसर मेंढपाळीसाठी प्रसिद्ध आहे. आली साब्ये हे गिरिस्थान देशाच्या आग्नेय भागात, जिबूतीच्या नैर्ॠत्येस ७२ किमी. अंतरावर इथिओपियाकडे जाणारा रेल्वेमार्ग व हमरस्ता यांवर वसले आहे. देशाच्या पूर्व किनारपट्टीतील ताजूरा आखातावरील ताजूरा हे बंदर बाराव्या शतकापासून प्रसिद्ध आहे. हे जिबूतीच्या वायव्येस ३५ किमी.वर असून येथे मासेमारी व गुरांच्या पैदाशीचा व्यवसाय चालतो. हे शहर पूर्वी उंटांच्या काफिला-मार्गावरील महत्त्वाचे केंद्र होते. ओबोक हे ताजूरा आखातावरील बंदर जिबूतीच्या ईशान्येस सु. ४२ किमी. आहे. याच्या परिसरात गरम पाण्याचे झरे आहेत. येथे मासेमारीचाही व्यवसाय चालतो. हे शहर प्रथम १८६२ मध्ये फ्रेंचांनी घेतले. जिबूती शहर राजधानी होईपर्यंत ओबोक हे फ्रेच सोमालीलँडचे मुख्य ठिकाण होते (१८८४ – ९२).

  

  पर्यटन : पर्यटन व्यवसाय वाढावा या दृष्टीने देशातील शासनसंस्था प्रयत्नशील आहे. किनारी प्रदेशात जलविहाराच्या सोयी निर्माण करणे, तसेच वाळवंटी प्रदेशातील मरूद्यानाचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकारने योजना आखल्या आहेत. १९७८ साली र्प्यटकांसाठी बांधलेल्या अतिथिगृहांतून १७० खोल्यांची सोय करण्यात आलेली आहे.

 या छोट्या राष्ट्रापुढील समस्या मात्र बिकट आहेत. लागवडयोग्य जमीन कमी असल्यामुळे व मूळच्या लोकांमध्ये शेती करण्याची प्रवृत्ती नसल्याने अन्नधान्य व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी त्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागते. त्याचप्रमाणे या देशाचे व्यापारी हितसंबंध जिबूती शहराशी निगडित असल्याने शेजारील देशांशी सामंजस्य राखणे आवश्यक आहे. ते शक्य झाले नाही, तर देशाच्या अस्तित्वासच धोका निर्माण होण्याची भीती आहे. म्हणूनच  स्वयंपूर्णता साधणे व त्यासाठी योग्य ती उपाययोजना वेळीच करणे, देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. (चित्रपत्र).

  

 चौंडे, मा. ल. फडके, वि. शं.

  


 फ्रेंच सोमालीलँड