आ. १. सुरंगी : नर (उजवीकडील) व मादी माशीपकड्या : माश्या व इतर कीटक हे भक्ष्य असलेल्या या पक्ष्यांच्या १५ जाती भारतात आढळतात. यांपैकी काही कायम रहिवासी आहेत. काही हिवाळी पाहुणे म्हणून बाहेरून भारतात येतात. तर काही भारतातून हिवाळी पाहुणे म्हणून दुसऱ्या देशांत जातात. काही जाती भारतात सगळीकडे आढळणाऱ्या आहेत, पण काही विवक्षित भागातच आढळतात. यांपैकी महत्त्वाच्या आणि सगळीकडे आढळणाऱ्या दोन जातींचे वर्णन येथे दिले 

आहे. भारतातील माशीपकड्यांच्या बहुतेक जातींचा समावेश मसिकॅपिडी या पक्षिकुलात केलेला आहे.

सुरंगी : या माशीपकड्याचे शास्त्रीय नाव टर्प्सिकोन पॅरॅडायसी असे आहे. भारतात जवळ जवळ सगळीकडे आणि हिमालयात. १,५२५ मी. उंचीपर्यंत हा आढळतो. काही भागात विशेषतः दक्षिण भारतात राहणारे सुरंगी स्थलांतर करून हिवाळ्यात श्रीलंका, अंदमान व निकोबारमध्ये जातात. पण बाकीचे भारतातच राहतात.

सुरंगी हा एक सुंदर पक्षी असून दाट झाडी, जंगले व बागांमध्ये तो असतो. पुष्कळदा मनुष्यवस्तीच्या आसपासच्या आंबराईत व बगीच्यात तो दिसून येतो. हा पूर्णपणे वृक्षवासी असल्यामुळे जमिनीवर उतरत नाही. अतिशय चपळ असल्यामुळे झाडाच्या फांद्यांवर याच्या सारख्या हालचाली चालू असतात. याचे आकारमान बुलबुलाएवढे असते. नराचे डोके, त्याच्या वरचा तुरा व मान तकतकीत निळसर काळ्या रंगाची असतात. शेपटीसकट सगळे शरीर रूपेरी पांढऱ्या रंगाचे असते. पाठीवर अस्पष्ट व पंखांवर जाड काळ्या रेषा असतात. शेपटीच्या मधली दोन पिसे बारीक चपट्या फितीसारखी व पुष्कळ लांब (सु. २५ सेंमी) असतात. मादीचे डोके, तुरा व मान निळसर काळ्या रंगाचीच असते. तिच्या शरीराची वरची बाजू, पंख व शेपटी तकतकीत तांबूस रंगाची असते. तिच्या शेपटीतील मधली दोन पिसे लांब नसतात. शरीराची खालची बाजू पांढरी असून तिच्यात करड्या रंगाची झाक असते. वयाने लहान असलेल्या नरांचा रंग मादीच्या रंगासारखाच असतो. त्यांच्या शेपटीतील मधली दोन पिसे लांब असतात.

माश्या, मच्छरे व इतर उडणारे किडे हे याचे भक्ष्य होय. हे किडे उडत असतानाच त्यांना पकडून तो खातो. या किड्यांचा पाठलाग करताना होणाऱ्या याच्या डौलदार हालचाली व याचे चातुर्य अतिशय आकर्षक असते. हा गाणारा पक्षी नाही. याचा आवाज काहीसा खरखरणारा व कर्कश असतो. परंतु प्रियाराधनाच्या वेळी आणि प्रजोत्पादनाच्या काळात तो गोड व मंजुळ स्वर काढतो.

यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत असतो. पण स्थानिक परिस्थितीप्रमाणे तो थोडा पुढेमागे होतो. बारीक गवत व तंतू घट्ट विणून वाटीच्या आकाराचे घरटे तो झाडाच्या फांदीवर बांधतो. त्याला बाहेरच्या बाजूने कोळिष्टकाचा दाट थर लावलेला असतो. घरटे जमिनीपासून साधारणपणे १·५  मी. ते १२ मी. उंचीवर असते. मादी दर खेपेस ३–५ अंडी घालते. ती फिकट गुलाबी रंगाची असून त्यांच्यावर तांबूस ऊदी रंगाची ठिपके असतात. घरटे बांधणे, अंडी उबविणे, पिल्लांना खाऊ घालणे आणि त्यांची जोपासना करणे ही सर्व कामे नर व मादी दोघेही करतात. पण या कामाचा जास्त भार मादीवरच पडतो.

नर्तक : या माशीपकड्याचे शास्त्रीय नाव ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस असे आहे. मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात, महाराष्ट्र व दक्षिण  भारतात हा पक्षी आढळतो. डोंगराळ भागात सु. १,८३० मी .उंची पर्यंत हा दिसून येतो.

आ. २. नर्तक

हा एक गोजिरवाणा, सदा आनंदी वृत्तीचा व अतिशय चपळ पक्षी आहे. तो जंगलात, दाट झाडीत, बांगांमध्ये, इतकेच नव्हे तर गावातील झाडाझुडपांमधून आढळतो. फांदीच्या टोकाजवळ बसणे याला विशेष आवडते. सामान्यतः चिमणीएवढा हा पक्षी असतो. पण त्यांची शेपटी मात्र लांब असते. याचे शरीर तपकीरी रंगाचे असते. पोटाचा रंग पांढरा असतो. भुवया ठळक व पांढऱ्या रंगाच्या असतात. छातीवर पांढरे ठिपके असतात. शेपटीतील मधली दोन पिसे पूर्णपणे तपकीरी रंगाची असतात. पण तिच्यातील बाकीच्या पिसांची टोके पांढरी असतात. शेपटी बहुदा उभारलेली व तिची पिसे पंख्यासारखी पसरलेली असतात. पंख लोंबकळते असतात. हा पक्षी क्षणभरही स्वस्थ बसत नाही. शेपटी पसरून या फांदीवर त्या फांदीवर सारखा नाचत असतो. त्याच्या या सवयीवरून त्याला नर्तक हे नाव मिळालेले आहे, हे उघड आहे. काही ठिकाणी याला नाचरा पक्षी म्हणतात. यांची नेहमी जोडपी असतात. 

सुरंगी प्रमाणेच हा उडत असलेल्या माश्या, मच्छरे व इतर किडे पकडून खातो. चक चक असा एक प्रकारचा कर्कश आवाज तो काढतो. पण फांद्यावरून नाचत असताना पुष्कळदा तो एक प्रकारचा सुरेल व गोड आवाज काढीत असतो. 

यांच्या प्रजोत्पादनाचा काळ मार्चपासून ऑगस्टपर्यंत असतो. घरटे झाडाच्या फांद्याच्या दुबेळक्यात, जमिनीपासून सु. २·५ मी. उंचीवर असते. घरटे बांधण्याकरिता सुरंगी जे पदार्थ उपयोगात आणतो त्याच प्रकारचे पदार्थ वापरून नर्तक आपले सुंदर वाटीसारखे घरटे तयार करतो. ते बाहेरून कोळिष्टकाने मढविलेले  असते. मादी दर खेपेस तीन अंडी घालते. ती गुलाबी रंगाची असून त्यात पिवळसर छटा असते. घरटे बांधणे, अंडी उबविणे, पिल्लांना भरविणे वगैरे सर्व कामे नर व मादी दोघेही करतात. 

कर्वे, ज. नी.