नाट्यशास्त्र : उपलब्ध नाट्यविषयक वाङ्‌मयात भरताचे नाट्यशास्त्र हाच प्राचीनतम ग्रंथ ठरतो परंतु पाणिनीच्या अष्टाघ्यायीतील शिलाली व कृशाश्व यांच्या नटसूत्रांचा उल्लेख (पा. ४·३·११०, १११), सीताबेंगा गुहेत सापडलेले खोदीव उघडे नाट्यगृह (ब्‍लॉशच्या मते इ. स. पू. तिसरे शतक), खुद्द नाट्यशास्त्रात आढळणारे सूत्ररूप गद्य आणि आनुवंश्य श्लोक इ. गोष्टी नाट्याची, नाट्यप्रयोगाची फार पूर्वीची परंपरा सुचवितात. ग्रंथकर्ता भरत व नाट्यशास्त्राच्या संहितेचे मूळ रूप यांविषयी निश्चित काही सांगता येत नाही, हे खरे पण नटांना व नाट्यप्रयोगाला मार्गदर्शक अशी तत्त्वे, संग्राहक श्लोक या प्राचीन परंपरेत असले पाहिजेत. हे पाहता नाट्यशास्त्रातील काही भाग इ. स. पू. सहाव्या शतकाइतका प्राचीन असण्याचा संभव आहे. या माहितीत वेळोवेळी भर पडत जाऊन आजचे नाट्यशास्त्र तयार झाले असावे. पाणिनीनंतर आणि कालिदासाच्या पूर्वी, साधारणपणे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात, हा ग्रंथ बऱ्याच अंशी आजच्या स्वरूपात असावा. भरताचे कार्य बहुधा नाट्यसंग्रहकाचे असावे. त्याचा देव-मानवांचा उभयसंबंध लाक्षणिक म्हटला पाहिजे. दैवी अधिष्ठान देऊन एखाद्या ग्रंथाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची जी प्राचीन भारतीय पद्धती आहे, तिचेच हे उदाहरण.

नाट्यशास्त्राचे छत्तीस अध्याय असून एकूण श्लोकसंख्या सु. सहा हजार आहे. एकंदर रचनेत तत्त्वे संगृहीत करण्यासाठी किंवा मनावर ठसविण्यासाठी मधूनमधून आनुवंश्य श्लोक आणि आर्या आलेल्या आहेत. काही भाग गद्यामध्ये आहे. या ग्रंथात नाट्यविषयक सर्व गोष्टींचे तपशीलावर विवेचन आहे. सूत्र, भाष्य, संग्रह, कारिका आणि निरुक्त अशी विवेचनाची पद्धती आहे. ग्रंथाचे एकंदर स्वरूप पाहून अभ्यासकांनी नाट्यशास्त्राचे तीन सलग भाग पाडले आहेत: (१) नाट्य, नाट्यतंत्र आणि नाटकप्रकार यांचे विवेचन करणारे अध्याय ६ते २७ यांत पुढे नटवर्गात प्रचलित असलेले श्लोक व आर्या यांची भर पडली (२) संगीताचे विवेचन करणारे अध्याय २८ ते ३४ (३) अखेरच्या संस्करणात जोडलेले अध्याय १ ते ५ व ३६. हा क्रम बहुंताशी संयुक्तिक आहे. पहिला आणि शेवटचा अध्याय उपक्रम-उपसंहारासारखे सरळ दिसतात आणि ते मागून जोडले असले पाहिजेत, हे उघड आहे. थोडी शंका येती ती दुसऱ्या व पाचव्या अध्यायाबद्दल. भरताच्या विवेचनात सैद्धान्तिक आणि वाङ्‌मयीन तत्त्वप्रतिपादन आणि अभिनयकला यांच्या जोडीने प्रयोगतंत्रालाही महत्त्व आहे. तेव्हा रंगमंच व नाट्यगृह (अध्याय २) व प्रयोगारंभीचा पूर्वरंग (अध्याय ५) हे विषय अखेरच्या संस्करणात जोडले गेले, असे मानणे जरा कठीण आहे. एक खरे, की नाट्यशास्त्राची रचना एका वेळी आणि एकाच हाती झाल्याचे दिसत नाही.

नाट्यशास्त्रातील विषयांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : सुखदुःखसमन्वित लोकस्वभावाचे अभिनयातून दर्शन म्हणजे नाट्य, अशी भरताची कल्पना आहे. ‘लोकवृत्तानुकरण’ ते हेच. हे अनुकरण विविध भावांनी उपपन्न असून नाना अवस्थांच्या रूपाचे असते. या अवस्थांतून प्रतीत होणारे भाव समूहालंबनाने ज्या एका अर्थाला रसिकाप्रत संक्रांत करतात व आस्वाद्य बनवितात त्या अर्थाला ‘रस’ अशी संज्ञा आहे. म्हणून नाट्याला ‘रसप्रयोग’ असेही म्हणण्यात येते. नाट्यामध्ये कविगत भाव पात्रांच्या द्वारे रसिकांप्रत अभिनीत होऊन आस्वाद्य बनतो. या संपूर्ण व्यापाराचे विवेचन करताना रस, भाव, अभिनय, धर्मी, वृत्ती व प्रवृत्ती हा क्रम स्वीकारला आहे (नाट्यशास्त्र, ६– १०). रसविवेचनाचा प्रारंभ सहाव्या अध्यायात ‘विभावानुभावव्यभिचारिसंयोगाद्रसनिष्पत्तिः।’ या प्रसिद्ध सूत्राने होतो. त्यानंतर स्थायी, संचारी आणि सात्त्विक मिळून ४९ भाव आंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य असा चतुर्विध अभिनय लोक आणि नाट्य अशा द्विविध धर्मी कैशिकी, सात्त्वती, आरभटी आणि भारती अशा चतुर्विध वृत्ती आवंती, दाक्षिणात्या, पांचाली आणि औड्रमागधी अशा तेवढ्याच प्रवृत्ती आणि दैवी व मानुषी अशा दोन प्रकारच्या सिद्धी या क्रमाने ६ ते २७ अध्यायांतील विवेचन संपते. वाचिकाभिनयाच्या संदर्भात अध्याय १४ ते १८ यांत छंदोविधान, लक्षण, अलंकार, गुण, दोष, काकुस्वर, पाठ्य आणि नाटक–प्रकरणादी दहा रूपके यांचे विवेचन आले असून हा भाग उत्तरकालीन काव्यचर्चेचा उपजीव्य बनला आहे.

अध्याय २८ ते ३४ यांत नाट्याला आवश्यक अशा संगीताचे, स्वर, ताल, गान आणि वाद्ये (‘आतोद्य’) यांचे पूर्ण विवेचन आहे. ३५ वा अध्याय परिशिष्टरूप असून कोणत्या भूमिका कशा रंगवाव्या हे त्यांत सांगितले आहे.

प्रयोगाच्या दृष्टीने दुसऱ्या अध्यायात रंगमंच आणि नाट्यमंडप, तिसऱ्यात रंगपूजन, चौथ्यात अंगहार, करण आणि रेचक व पाचव्यात नांदीसहित पूर्वरंग यांचे वर्णन आहे.

पहिल्या अध्यायात नाट्याची दैवी उत्पत्ती, प्रयोजन व उद्दिष्टे सांगितली आहेत. नाट्य हे त्रिवर्गाचे  साधन असून त्याचे धारण आणि प्रयोग करणारे जितश्रम, विदग्ध, कुशल आणि प्रगल्भ असले पाहिजेत, असे भरताचे म्हणणे आहे. याकडे दुर्लक्ष केले तर नाट्याची आणि नटांची कशी हानी होते, हे नटशापाच्या आख्यायिकेच्या द्वारे शेवटच्या अध्यायात सांगितले आहे. ग्रंथ संपविताना भरताने ‘नाट्य हे ईश्वरोपासनेचे साधन आहे नाट्योपासना निष्ठापूर्वक केली तर ईश्वर जेवढा प्रसन्न होईल तेवढा तो गंधमालादिकांनी होणार नाही’ अशा आशयाचे उद्‌गार काढले आहेत.

धर्मसूत्रे आणि स्मृतिग्रंथ यांवरून दिसते की, नाट्यकला आणि नटवर्ग यांना सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. भरताने नाट्याचा त्रिवर्गाशी संबंध जोडून त्याला धर्माचरणाच्या पातळीवर नेऊन ठेविले. नाट्यकलेला ईश्वरोपासनेचे स्वरूप देऊन आणि नाट्यवेद हा सार्ववर्णिक वेद आहे असे सांगून नाटककार, नट आणि नाट्यकला यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली, हा या ग्रंथाचा आगळा विशेष. नटांच्या दृष्टीने नाट्यकला हा त्यांचा धर्मच होय. तीच त्यांची ईश्वरोपासना. नाट्यशास्त्र म्हणजे नटांच्या धर्मानुष्ठानाचा आश्रय, असे अभिनवगुप्तही म्हणतो.

नाट्याची उत्पत्ती ‘क्रीडनीयक’ म्हणून झाली, असे भरताने म्हटले आहे. नाट्य हे करमणुकीचे साधन तर खरेच. नाट्यप्रयोगातील नेपथ्यादिकांचे रम्य स्वरूप, अभिनयाचे सौंदर्य, काव्य आणि संगीत इ. विशेष मनोरंजन करून आनंद देणारे आहेतच पण आनंदाबरोबर नाट्याच्या द्वारे लोकशिक्षण, उन्नत आचार-विचारांचे दर्शन, जीवनात धीर, दिलासा आणि विश्रांती यांची प्राप्तीही भरताला अभिप्रेत आहे. (नाट्यशास्त्र १·१०९–११६). याचा अर्थ असा, की करमणुकीच्या जोडीने सामाजिक प्रबोधन हेही नाट्याचे उद्दिष्ट होय.

नाट्यशास्त्रातील विवेचन जेवढे सर्वस्पर्शी, तेवढेच मूलग्राही असून त्यात दिसून येणारी ग्रंथकर्त्याची शास्त्रीय बैठक आणि प्रतिभेची झेप एतद्‌विषयक दुसऱ्या कोणत्याही ग्रंथांत दिसून येत नाही, असा अभ्यासकांचा निर्वाळा आहे.

नाट्यशास्त्रावर अनेक टीका झाल्या. त्यांत अभिनवगुप्ताची अभिनवभारती किंवा नाट्यवेदविवृत्ति अतिशय प्रसिद्ध व महत्त्वाची आहे. भरतानंतर नाट्यशास्त्रावर बरेच ग्रंथ झाले. त्यांत धनंजयाचे दशरूपक, विद्यानाथाचा प्रतापरुद्रीय आणि विश्वनाथाचे साहित्यदर्पण हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

देशपांडे, ग. त्र्यं.