पुनर्वसु : भारतीय नक्षत्रमालिकेतील सातवे नक्षत्र. यातील पहिले तीन चरण मिथुन व चवथा चरण कर्क राशीत येतो. यामध्ये मिथुमेचा आल्फा व बीटा हे तारे असून पैकी आल्फा योग तारा मानतात. दोन्ही सारख्याच प्रतीचे [→प्रत] असल्याने त्यांना जुळी भावंडे (कॅस्टर व पोलक्स) म्हणतात. यांसंबंधी ग्रीक पुराणकथा आहे. काहींच्या मते लघुलुब्धकाचा आल्फा (प्रश्वा) व बीटा हेही पुनर्वसूतच मोडतात. ही जोडी दक्षिणेस आहे. दोन्ही जोड्यांच्यामध्ये मोकळी जागा आहे या जागेतून सूर्य, चंद्र व ग्रह गेलेले दिसतात, म्हणून पुनर्वसूला आकाशाचे महाद्वार म्हणतात. या ताऱ्यांची माहिती पुढे दिली आहे. (१) प्लव (पोलक्स), बीटा जेमिनोरम : विषुवांश ७ ता. ४२ मि. ८·१ से., क्रांती + २८ १२·५ प्रत १·२ अंतर सु. ३५ प्रकाशवर्षे, हा सूर्याला सर्वांत जवळचा महातारा असून सूर्याच्या ३२ पट तेजस्वी, युग्मतारा सहचर प्रत १४ [→ ज्योतिषशास्त्रीय सह निर्देशक पद्धति]. (२) कश (कॅस्टर), आल्फा जेमिनोरम : विषुवांश ७ ता. ३१ मि. १७ से., क्रांती + ३२ १५”·१ प्रत १·५, अंतर सु. ४७ प्रकाशवर्षे, हे तारकायुग्म असून यांतील प्रत्येक घटक द्वित्त आहे. (३) बीटा कॅनिस मायनॉरिस : विषुवांश ७ ता. २४ मि. १९·८ से., क्रांती + ८२३’ ४४”·४, प्रत. ३. (४) प्रश्वा (प्रॉसियान), आल्फा कॅनिस मायनॉरिस : हा तारा सु ११·४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे [→प्रश्वा]. या नक्षत्राची देवता अदिती व आकृती घर मानतात फेब्रुवारीच्या शेवटी हे रात्री ९ च्या सुमारास डोक्यावर येते.

पहा : नक्षत्र. 

ठाकूर, अ.ना.