ज्यूलियन दिनसंख्या : कालगणना सोपी जावी आणि तिच्यात सातत्य राहावे, म्हणून कोणत्याही मध्यरात्री अगर मध्यान्ही मोजण्यास सुरुवात करावयाची, तोपर्यंत शून्य दिवस झाले असे समजावयाचे व तेथून सतत मोजत रहावयाचे असे मानतात. भारतीय पद्धतीत दिवसांच्या अशा संख्येला अहर्गण किंवा युगभगण म्हणतात, तर यूरोपीय ज्योतिषशास्त्रात ज्यूलियन दिनसंख्या म्हणतात. याचा वापर फक्त ज्योतिषशास्त्रातच होतो, इतरत्र नाही.

फ्रेंच कालगणनाशास्त्रज्ञ जोझेप स्कॅलिजर (१५४०–१६०९) यांनी ही पद्धत १५८२ मध्ये प्रचारात आणली. २८ वर्षांचे सौरचक्र, १९ वर्षांचे चांद्रचक्र आणि १५ वर्षांचे करचक्र यांचा समन्वय साधून ही चक्रे एकदा एकत्र सुरू झाल्यापासून २८X१९X१५ = ७,९८० वर्षांनी एकदम पुन्हा सुरू होतील, या कल्पनेने या ७,९८० वर्षांच्या

कालावधीला स्कॅलिजर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ज्यूलियन (पीरियड) कालचक्र (युग) असे नाव दिले. दर १५ वर्षांनी कर आकारणीसाठी प्राप्तीची मोजदाद व खानेसुमारी करावी, अशी चौथ्या शतकातील रोमन राजांची पद्धत होती. या १५ वर्षांच्या कालावधीला करचक्र (Indiction Cycle) म्हणत. १ जानेवारी ख्रिस्तपूर्व ४७१३ या दिवशी ग्रिनिचच्या माध्य सौरकालाप्रमाणे मध्यान्ही बरोबर १२ वाजल्यापासून ज्यूलियन दिनसंख्या मोजावयाची असे स्कॅलिजर यांनी ठरविले. ज्यूलियन दिवस मध्यान्हीच सुरू होतो, कारण रात्री केव्हाही घेतलेले वेध एकाच दिवशी नोंदविता येतात. नेहमीची दिवस, महिना व वर्ष ही कालगणनापद्धती घेतली, तर गणित करणे जिकिरीचे होते. म्हणून सतत वरील दिवसापासून दिनसंख्या मोजत रहावी असे ठरले. त्याप्रमाणे १ जानेवारी १९६५ रोजी ग्रिनिचच्या वेळेप्रमाणे दुपारी १२ वाजेपर्यंत दिनसंख्या २४,३८,७६२ झाली होती. 

या पद्धतीप्रमाणे कोणतीही घटना ज्यूलियन दिवसांत सांगणे सोपे जाते. बऱ्याच कालावधीने दोन खगोलीय घटना (उदा., ताऱ्यांच्या तेजस्वितेत होणारा बदल, ग्रहणचक्र इ.) घडल्या, तर त्यांमधील कालांतर ज्यूलियन दिनसंख्यांच्या साध्या वजाबाकीने चटकन दाखविता येते. हे कालांतर कालगणनेच्या कोणत्याही पद्धतीवर अवलंबून नसते. सूक्ष्म गणितासाठी दशांश अपूर्णांकात सुद्धा दिवस काढतात. अमेरिकन व नाविक पंचांगांत ही दिनसंख्या दिलेली असते. 

फडके, ना. ह.