गोविंद नारायण माडगावकरमाडगावकर, गोविंद नारायण : (१८१५–१५ मार्च १८६५) अव्वल इंग्रजी कालखंडातील प्रसिद्ध लेखक. जन्म गोव्यातील पेरी ह्या गावचा. मराठी व इंग्रजी शिक्षण मुंबईच्या ‘फ्री जनरल असेंब्ली’ ह्या शाळेत. वडिलांच्या निधनामुळे शिक्षण अर्धवट सोडून ह्याच शाळेत शिक्षकाची नोकरी त्यांनी पतकरली. उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या शिष्यांत दादोबा पांडुरंग, डॉ. भाऊ दाजी, वि.ना. मंडलिक ह्यां साऱख्या नामवंतांचा समावेश आहे.

माडगावकरांनी विपुल लेखन केले. त्यांत व्यवहारोपयोगी, नीतिपर व शास्त्रीय ग्रंथांचा समावेश आहे. शुचिर्भूतपणा (१८४९), ऋणनिषेधक बोध (१८५०), हिंदु लोकांच्या रीति सुधारण्याविषयी बोध (१८५१), सृष्टींतील चमत्कार (१८५३), दारूपासून अनर्थ (१८५५), उद्‌भिज्जन्य पदार्थ (१८५६), लोखंडी सडकांचे चमत्कार (१८५८), व्यवहारोपयोगी नाटक (१८५९) ही त्यांच्या काही ग्रंथांची नावे. मुंबईचे वर्णन (१८६३) हे मुंबईचा इतिहास सांगणारे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मुंबईच्या तत्कालीन सामाजिक आणि संस्थात्मक जीवनाची उपयुक्त माहिती ह्या ग्रंथात आढळते. माडगावकरांची बहुश्रुतता, त्यांचे परिश्रम, बोलकी आणि रंगतदार शब्दचित्रे उभी करणारी त्यांची ताजी, टवटवीत भाषाशैली इ. गुणांमुळे हा ग्रंथ सरस आहे. अव्वल इंग्रजीतील स्वतंत्रपणे लिहिलेला इतिहासविषयक ग्रंथ म्हणूनही ह्या पुस्तकाचे महत्त्व आहे.

जोशी, सु. दा.