फाटक, नरहर रघुनाथ : (१५ एप्रिल १८८३ – २१ डिसेंबर १९७९). नामवंत पत्रकार आणि प्राध्यापक, मराठी संतसाहित्याचे चिकित्सक, इतिहाससंशोधक आणि चरित्रकार. भोर ह्या एके काळच्या संस्थानातील जांभळी ह्या गावी त्याचा जन्म झाला. शिक्षण भोर, पुणे, अजमेर, इंदूर आणि अलाहाबाद ह्या ठिकाणी झाले. १९१७ साली अलाहाबाद विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए. झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. ‘सत्यान्वेषी’ आणि ‘फरिश्ता’ ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीचा ठसा उमटविला. १९३५ -३७ ह्या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. ह्याच कॉलेजातून १९५७ साली ते सेवानिवृत्त झाले.

नरहर रघुनाथ फाटकइतिहासाचार्य राजवाडे ह्यांच्यामुळे फाटक हे इतिहाससंशोधनाकडे ओढले गेले होते. मराठी भाषा-साहित्याच्या व्यासंगाबरोबरच संस्कृत, इंग्रजी, हिंदी ह्या भाषांतील साहित्याचा त्यांनी रसिक व आस्थेवाईक दृष्टिकोणातून परिचय करून घेतलेला होता. त्यामुळे त्यांचे मराठीचे अध्यापन एकांगी आणि एकारलेले असे न होता त्याला एक स्वाभाविक अशी बहुसंदर्भशीलता प्राप्त झालेली होती. केवळ पाठ्यपुस्तकांवर भर न देता त्यांच्या अनुषंगाने विविध विषयांचा परामर्श घेऊन आपल्या विद्यार्थ्याना स्वतंत्रपणे विचार करावयास प्रवृत्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

मराठी संताच्या वाङ्‍मयाचे आणि कार्याचे सामाजिक-ऐतिहासिक दृष्टिकोणांतून त्यांनी केलेले विश्लेषण आणि समालोचनही महत्त्वाचे आहे. सामाजिक- सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्याचे एक साधन म्हणून फाटक साहित्याकडे पाहत. त्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण वाङ्‍मयदृष्टी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (१९४८), श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०), ज्ञानेश्वर : वाङ्मय आणि कार्य (१९५२), रामदास : वाङ्मय आणि कार्य (१९५२) ह्यांसारख्या त्यांच्या ग्रंथांतून प्रत्ययास येते. मराठ्यांचा इतिहास हाही त्यांच्या व्यासंगाचा आणि चिकित्सेचा एक विषय. मराठेशाहीचा अभ्यास (१९५०) आणि अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी (१९५८) हे त्यांचे दोन प्रसिद्ध इतिहासग्रंथ होत.

लो. बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या निधनानंतर थोड्याच अवधीत न. चिं. केळकर ह्यांनी विस्तृत प्रमाणात टिळकांचे चरित्र प्रसिद्ध केले. त्याच्यातील अनेक घटना आणि व्यक्तिविषयक निर्देश कसे चुकीचे आहेत हे विविधज्ञानविस्तार ह्या मासिकात अनेक परीक्षणात्मक लेखांक लिहून त्यांनी प्रकाशात आणले. ह्या महत्वाच्या लेखनामुळे फाटकांकडे महाराष्ट्रातील सुशिक्षितांचे लक्ष एक महत्त्वाचा चिकित्सक म्हणून प्रथमच वेधले गेले. फाटकांची मते कित्येकदा परंपरागत तसेच बहुमान्य विचारांना धक्का देणारी असत. मुसलमानांच्या आक्रमणाविरूद्ध समाजाला एकत्र करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, हे मत ते आग्रहाने मांडीत पण तज्ज्ञ मंडळीकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. समर्थांनी वापरलेल्या ‘राजकारण’ ह्या शब्दाचा अर्थ ‘पॉलिटिक्स’ किंवा ‘राजनीती’ असा नसून युक्ती, शहाणपण, चातुर्य, तीक्ष्ण बुद्धी असे त्याचे अर्थ समर्थाना अभिप्रेत आहेत, अशी त्यांची धारणा होती. १८५७ चे बंड हे स्वातंत्र्ययुद्ध नसून एक ‘शिपाईगर्दी’ होती हे फाटकांचे मत अत्यंत वादग्रस्त ठरले त्याबद्दल त्यांना कठोर टीकाही सहन करावी लागली. पुणे जाळणाऱ्या यशवंतराव होळकरांची एक नवी, उजळ प्रतिमा फाटकांनी त्याचे चरित्र लिहून पुढे आणली. आपल्या विचारांच्या आणि निष्कर्षाच्या समर्थनार्थ अटीतटीचे वाद त्यांनी केले.

भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक ह्यांसारख्या महाराष्ट्रीय नेत्यांची चरित्रे लिहून त्यांच्या कार्याची मीमांसही फाटक ह्यांनी केलेली आहे. आदर्श भारत सेवक (१९६७) ह्या नावाने त्यांनी लिहिलेल्या गोपाळकृष्ण गोखले ह्यांच्या चरित्र्याला १९७० मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ह्यांशिवाय मुंबई शहराचा इतिहास त्यांनी लिहावयास घेतला होता ते काम त्यांच्याकडून पूर्ण होत आले होते.

भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ अशा विविध संस्थांशी सदस्य वा पदाधिकारी ह्या नात्याने त्यांचा संबंध आला होता. १९४७ साली हैदराबाद येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मुंबई येथे ते निधन पावले.

ग्रामोपाध्ये, गं. ब.