दांडेकर, गोपाल नीलकंठ : (८ जूलै १९१६– ). मराठी कादंबरीकार व कथा, चरित्रे, लघुनिबंध इ. अनेक साहित्यप्रकार हाताळणारे सव्यसाची लेखक. जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याचा. शिक्षण परतवाडा आणि नागपूर येथे इंग्रजी चौथीपर्यंत. वयाच्या तेराव्या वर्षीच दांडेकरांनी घर सोडले. राष्ट्रीय आंदोलनात काही काळ भाग घेतला. आंदोलन संपल्यानंतर इतस्ततः भ्रमण करीत असता संत गाडगेमहाराजांच्या प्रभावाखाली ते आले. बाबांचे शिष्य व अनुयायी या नात्याने खेडोपाडी कीर्तनाद्वारा प्रचारकार्य केले. या कीर्तन–प्रवचनांतूनच संतसाहित्याची, विशेषतः ज्ञानेश्वरीची, विशेष गोडी निर्माण होऊन ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी ते आळंदीस आले पण भागानगरच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे या अध्ययनात खंड पडला. काही काळ या सत्याग्रहामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. सुटकेनंतर पुन्हा ते अध्ययनाकडे वळले.

ज्ञानेश्वरीच्या अधिक आकलनासाठी व वेदान्ताचा संस्कृतमधून परिचय करून घेण्यासाठी धुळ्यास श्रीधरशास्त्री पाठकांकडे ते गेले. काही काळ अध्ययन झाल्यानंतर शास्त्रीजींच्या सांगीवरूनच नर्मदेची पायी परीक्रमा करण्यास त्यांनी आरंभ केला. सात–आठ महिन्यांनंतर आजारीपणामुळे हा उपक्रम त्यांना मध्येच सोडावा लागला. तथापि नर्मदा नदीनेही आपल्यावर काही संस्कार केले आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे. पुढे पुनश्च ते श्रीधरशास्त्री पाठकांकडे अध्ययनासाठी गेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात त्यांना रस उत्पन्न झाल्यामुळे चार वर्षे संघकार्य केले. घरी परतल्यावर आमचे राष्ट्रगुरू ह्या नावाने रामदास, श्रीकृष्ण आणि मनू यांची चरित्रे त्यांनी लिहिली पुढे या प्रकारची इतर संतांची छोटीछोटी चरित्रेही त्यांनी लिहिली १९४६ मध्ये पंडित सातवळेकरांच्या आमंत्रणावरून ते औंधास गेले. पुरूषार्थ (मराठी) व वैदिक धर्म (हिंदी) या नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. गांधीवधानंतर पुरूषार्थ मासिकाचे कार्यालय औंधहून हलल्यामुळे दांडेकरांनी औंध सोडले. तेव्हापासून गेली अनेक वर्षे ते तळेगाव (दाभाडे) येथे वास्तव्य करून आहेत. लेखन हाच त्यांचा उद्योग आहे. १९४५ मध्ये नामजोशी घराण्यातील विमल नामजोशी ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

दांडेकरांनी लिहिलेल्या एकूण पुस्तकांची संख्या शंभरांहून अधिक भरेल. त्यात धर्म, संस्कृती, पुराण, इतिहास इ. विविध विषयांवरील आणि कथा, कादंबरी, चरित्र इ. साहित्यप्रकारांतील लेखन आढळते. दांडेकरांना शिवकालीन किल्लेकोट पाहण्याचा आणि छायाचित्रणाचा विलक्षण छंद आहे. त्यांतूनच त्यांचे दुर्गदर्शन हे पुस्तक लिहिले गेले. दुर्गदर्शनाबरोबरच त्यांनी महाराष्ट्रदर्शनही घडविले आहे. आपल्या शिवप्रेमातून कादंबरीच्या रूपाने शिवकालाचे व शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. बया दार उघड, हरहर महादेव, दर्याभवानी, झुंजारमाची, हे तो श्रीची इच्छा हे कादंबरीपंचक या मालेतील आहे. कादंबरीलेखनापेक्षा संस्कृतिचित्रणावर दांडेकरांचा येथे कटाक्ष आहे. दांडेकरांनी जगन्नाथपंडिताच्या आणि गीतगोविंदकार जयदेवाच्या प्रणयजीवनावरही कादंबरीलेखन केलेले आहे (जगन्नाथपंडितपद्मा) . उडोनी हंस चालला (१९६२) व अजून नाही जागे गोकुळ (१९६३) या त्यांच्या नल–दमयंती व श्रीकृष्ण–कुब्जा यांच्या जीवनावर आधारलेल्या आणखी दोन कादंबऱ्या. बिंदूची कथा (१९४७) या कादंबरीने त्यांच्या कादंबरीलेखनाला प्रारंभ झाला त्यांच्या शितू (१९५५), पडघवली (१९५६), कुणा एकाची भ्रमणगाथा (१९५७), माचीवरला बुधा (१९५८), मृण्मयी (१९७०) आणि मोगरा फुलला (१९७५) या कादंबऱ्या कलात्मक दृष्टीने विशेष महत्त्वाच्या. पवनाकाठचा धोंडी, पूर्णामायची लेकरं, शितू, पडघवली आणि माचीवरला बुधा या त्यांच्या प्रादेशिक कादंबऱ्या. कुणा एकाची भ्रमणगाथा ही नर्मदेच्या परिक्रमेवर आधारलेली कादंबरी तिच्यातील कलात्मक चित्रणामुळे शरदबाबूंच्या लेखनसौंदर्याची आठवण करून देणारी ठरली आहे. मृण्मयीमोगरा फुलला या दोन्ही कादंबऱ्या ज्ञानेश्वरांशी संबंधित आहेत. मोगरा फुलला ही कादंबरी ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आणि तत्कालीन संस्कृतीवर आधारलेली आहे, तर मृण्मयीत ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा संवेदनशील व्यक्तीच्या भावजीवनावर किती खोल आणि समुन्नत ठसा उमटू शकतो, याचे चित्रण आले आहे. दांडेकरांच्या शैलीतील सारी काव्यात्मता व अध्यात्मप्रवणता येथे प्रकर्षाने अवतरली आहे.

दांडेकरांच्या कादंबरीलेखनात आम्ही भगीरथाचे पुत्र (१९५९) या कादंबरीचा अगदी वेगळा व आवर्जून उल्लेख करावयास हवा. भाक्रा–नानगल धरणाची योजना व बांधणी हा या कादंबरीचा विषय. स्वातंत्र्योत्तर काळातील नवे रचनात्मक कार्य व आव्हाने यांवर भर देणारे या प्रकारचे कादंबरीलेखन अन्य कोणी केल्याचे आढळत नाही.

दांडेकरांनी संत गाडगेमहाराजांचे चरित्र (१९७६) लिहिले आहे. स्मरणगाथा (१९७६) हे त्यांचे आत्मचरित्र. गाडगेमहाराजांच्या सहवासामुळे व आत्मनिवेदनातील प्रांजळपणामुळे त्यांचे हे चरित्र व आत्मचरित्रलेखन लक्षणीय ठरले आहे. स्मरणगाथेस १९७६ ची उत्कृष्ट मराठी साहित्यकृती म्हणून पारितोषिक देऊन साहित्य अकादेमीने गौरविले आहे (१९७६).

लेखन–वाचन व भ्रमण हाच दांडेकरांचा छंद आहे. स्वैर मनस्वी भ्रमंतीतून व निसर्गाच्या सहवासातून मिळविलेले विविध जीवनानुभव ते रसाळपणे मांडतात. त्यांचे मन वर्तमानापेक्षा भूतकालीन संस्कृतिविशेषांत अधिक रमते त्यांवर भाष्य करते. भारतीय वेदान्ताचे आणि संतसाहित्याचे संस्कार त्यांच्या लेखणीवाणीवर दृढपणे उमटलेले आहेत ग्रामजीवन व ग्रामसंस्कृती यांचेही त्यांनी स्वानुभवयुक्त सूक्ष्म अवलोकन केलेले आहे. अनुभवाला अभ्यासाची जोड असल्यामुळे त्यांचे लेखन प्रत्ययपूर्ण होते.

द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘साहित्यवाचस्पती’ ह्या पदवीने त्यांचा गौरव केला (१९६५). तळेगाव–दाभाडे नगरपालिकेतर्फे त्यांना ‘नगरभूषण’ म्हणून गौरविण्यात आले. १९७६ मध्ये वाई नगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कुलकर्णी, गो. म.