रेडिओ संदेशवहन प्रणाली :विद्युत् चुंबकीय तरंगांचा प्रेषण माध्यम म्हणून वापर करून दोन अथवा अधिक ठिकाणांमध्ये परस्परांशी संदेशवहन करण्यासाठी तयार केलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या प्रणाली (उदा., दूरध्वनी, दूरचित्रवाणी, सागरी वा वैमानिकीय मार्गनिर्देशन).

 

इतिहास : एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मायकेल फॅराडे यांनी विद्युत् प्रवाहामुळे स्थानिक चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि हा प्रवाह थांबविला वा बदलला, तर या क्षेत्रातील ऊर्जा विद्युत् मंडलात परत जाते, असे दाखविले. ⇨जेम्स क्लार्क मॅक्सवेल या ब्रिटिश भौतिकीविज्ञांनी १८६४ मध्ये विद्युत् व चुंबकीय क्षेत्रांसंबंधीची समीकरणे [⟶ मॅक्सवेल विद्युत् चुंबकीय समीकरणे] मांडून गणितीय रीत्या असे सिद्ध केले की, विद्युत् विक्षोभ ज्या ठिकाणी उत्पन्न होतो तेथून बऱ्‍याच अंतरापर्यंत त्याचा परिणाम घडून येऊ शकतो आणि त्यांनी असे भाकीत केले की, उद्गमापासून विद्युत् चुंबकीय ऊर्जा प्रकाशाच्या वेगाइतक्या वेगाने बहिर्दिशेस तरंगरूपाने अवकाशात प्रसारित होऊ शकेल. मॅक्सवेल यांच्या या सिद्धांतामुळे रेडिओ संदेशवहनाचा पाया घातला, असे म्हणावयास हरकत नाही. मॅक्सवेल यांनी भाकीत केले त्या वेळी विद्युत् चुंबकीय तरंगांचे अवकाशात प्रसारण करण्यासाठी वा त्यांचे त्यातील अभिज्ञान करण्यासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) कोणतेही साधन माहीत नव्हते. १८८८ च्या सुमारास ⇨हाइन्रिख हर्ट्‌झ  या जर्मन भौतिकीविज्ञांनी मॅक्सवेल यांच्या सिद्धांताची चाचणी घेतली व त्यांचे भाकीत थोड्या अंतराकरिता (सु. १·५ मी.) तरी खरे असल्याचे दाखवून दिले. याकरिता त्यांनी एका धातूच्या अन्वस्तीय [⟶ अन्वस्त] आरशाच्या नामिस्थानी एक ठिणगी फट (जिच्यात ठिणगी पडू शकेल अशी अल्प फट ठेवलेल्या दोन विद्युत् संवाहकांची रचना) बसविली. याच फटीच्या रेषेत सु. १·५ मी. अंतरावर दुसऱ्‍या एका अन्वस्तीय आरशाच्या नामिस्थानी दुसऱ्‍या ठिणगी फटीला जोडलेले तारेचे कडे ठेवलेले होते. पहिल्या फटीमधून जाणाऱ्‍या ठिणगीमुळे कड्यातील दुसऱ्‍या फटीमधून जाणारी ठिणगी निर्माण होते, असे हर्ट्‌झ यांनी दाखविले. हे तरंग सरळ रेषेत जातात व आरशामुळे ज्याप्रमाणे प्रकाश तरंग परावर्तित होतात त्याचप्रमाणे हे तरंग धातूच्या पत्र्यामुळे परावर्तित होतात असेही त्यांनी दाखविले. रशियन भौतिकीविज्ञ ए. एस्. पपॉव्ह यांनी हर्ट्‌झ यांच्या प्रायोगिक मंडलांमध्ये काही सुधारणा करून प्रेषक मंडलापासून सु. ८० मी. अंतरापर्यंत विद्युत् चुंबकीय तरंगांचे अभिज्ञापन करून दाखविले.

मॉर्केझे गूल्येल्मो मार्कोनी या इटालियन भौतिकीविज्ञांनी हर्ट्‌झ यांचे प्रयोग पुन्हा करून पाहिले आणि शेवटी त्यांना ९ मी. अंतरावर द्वितीयक ठिणग्या मिळविण्यात यश लाभले. आपल्या प्रयोगात त्यांनी प्राथमिक ठिणगी फटीची एक बाजू एका उंचावलेल्या तारेला (म्हणजे परिणामी आकाशकाला, अँटेनाला) जोडली व दुसरी बाजू जमिनीला जोडली. अशाच प्रकारची व्यवस्था ग्रहण स्थानी द्वितीयक फटीपाशी केलेली होती. प्रारंभी इटलीत व पुढे इंग्लंडमध्ये प्रयोग करून प्रेषक व ग्राही यांतील अंतर क्रमाक्रमाने २७५ मी., मग ३ किमी., त्यानंतर इंग्लिश खाडीपार सु. ५० किमी. आणि शेवटी १९०१ मध्ये अटलांटिक महासागरापार सु. ३,२०० किमी. असे वाढविण्यात मार्कोनी यांना यश मिळाले. या अंतराकरिता त्यांनी द्वितीयक ठिणगी शोधकाच्या जागी ‘ससंजक’ (कोहेरर) नावाची प्रयुक्ती वापरली. ही प्रयुक्ती एद्‌वार ब्रांली या फ्रेंच अभियंत्यांनी १८९० मध्ये शोधून काढली होती. तीत लोहकणयुक्त नलिका असून तिच्या टोकांना रेडिओ-कंप्रता दाब (संदेशवहनासाठी उपयुक्त अशी दर सेकंदाला असणारी कंपन संख्या म्हणजे कंप्रता असलेला विद्युत् दाब) लावला असता लोहकणांचे ससंजन (संमीलन) होई. लोहकणांच्या ससंजनामुळे एका साहाय्यक विद्युत् शक्तिपुरवठ्यापासून मिळणाऱ्‍या प्रवाहाद्वारे मॉर्स संकेतांचे पुनरूत्पादन करणारे ⇨अभिचालित्र चालविले जाई. लोहकण अलग करण्यासाठी व पुढच्या रेडिओ-कंप्रता संकेताला प्रतिसाद देण्यासाठी तयार करण्याकरिता ससंजकाला नियमितपणे चापटी मारणे आवश्यक असे. अशा प्रकारे मार्कोनी यांनी हर्ट्‌झ यांच्या प्रयोगांचा सुधारित उपयोग प्रत्यक्ष संदेशवहनासाठी करून दाखविला व तेव्हापासून रेडिओ संदेशवहन प्रणालींच्या वापरास प्रारंभ झाला, असे म्हणता येईल. सर जगदीशचंद्र बोस यांनी मॅक्सवेल व हर्ट्‌झ यांच्या कार्याचा विस्तार करण्यात व मार्कोनी यांच्याशी समकालीन प्रयोगकार्य करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. त्यांनी ससंजकात काही सुधारणाही केल्या.

यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे तप्त तंतुयुक्त विद्युत् दिव्याच्या निर्वात आवरणात धन विद्युत् दाब असलेले विद्युत् अग्र बसविले, तर ते प्रवाह वाहून नेऊ शकते, हा शोध होय [⟶ एडिसन परिणाम]. अशा दिव्याचा धन विद्युत् अग्राजवळचा भाग काळा पडतो असे टॉमस एडिसन यांना आढळले. सर जे. ए. फ्लेमिंग या ब्रिटीश अभियंत्यांनी या आविष्काराचा अभ्यास करून १९०४ मध्ये धन अवपात (कल) असलेले विद्युत् अग्र (धनाग्र) व तप्त तंतू यांतील एकदिशीय प्रवाह परिणामाचा शोध लावला (फक्त तप्त तंतूकडून घनाग्राकडे इलेक्ट्रॉन वाहतात). या प्रयुक्तीला फ्लेमिंग यांनी डायोड (द्विप्रस्थ) असे नाव दिले कारण तीत दोन विद्युत् अग्रे (धनाग्र व तप्त तंतू) असतात [⟶ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति]. जर द्विप्रस्थाला प्रत्यावर्ती (मूल्य आणि दिशा वारंवार उलटसुलट बदलणारा) विद्युत् प्रवाह लावला, तर प्रवाहाच्या तरंगांचे फक्त धन अर्धांश त्यातून जातात म्हणजे प्रवाहाचे एकदिशीकरण (प्रत्यवर्ती प्रवाहाचे एकदिश प्रवाहात रूपांतरण) होते, असेही दिसून आले. रेडिओ-कंप्रता संकेतांच्या अभिज्ञानासाठीही द्विप्रस्थाचा उपयोग करता येतो. कारण तो रेडिओ-कंप्रता तरंगाच्या अर्धांशाचे दमन करतो व त्यामुळे प्रेषित मॉर्स संकेतांचा चालू व बंद स्थितीनुसार स्पंदयुक्त एकदिश प्रवाह निर्माण होतो. फ्लेमिंग यांचा शोध ही विवर्धक नलिकेच्या दिशेने पहिली पायरी होती व या नलिकेमुळे विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात रेडिओ संदेशवहनात मोठी क्रांती घडून आली.

फ्लेमिंग यांनी आपल्या कार्यामुळे निर्माण झालेल्या शक्यतांचे महत्त्व जाणले नाही. १९०६ मध्ये अमेरिकन संशाधक ली डी फॉरेस्ट यांना द्विप्रस्थातील इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी तप्त तंतू व धन अवपात असलेले धनाग्र (किंवा पट्टीका) यांच्या मधे बारीक तारांची एक जाळी (जालकाग्र) बसविण्याची कल्पना सुचली. डी फॉरेस्ट यांनी आपल्या शोधाला ऑडिऑन असे नाव दिले (पुढे या प्रयुक्तीला ट्रायोड–त्रिप्रस्थ–असे नाव मिळाले). या योजनेद्वारे त्यांना जालकाग्रावरील विद्युत् दाबामधील अल्पशा बदलाद्वारे पट्टीकेवरील विद्युत् दाबात मोठा बदल करणे शक्य होऊ लागले. हा शोध फार महत्त्वाचा होता कारण त्यामुळे आकाशकाने ग्रहण केलेला रेडिओकंप्रता संकेत ग्राहीतील ⇨शोधकाला देण्यापूर्वी तो विवर्धित करणे शक्य होऊ लागले. अशा प्रकारे पूर्वीपेक्षा खूपच दुर्बल असलेले संकेत उपयोगात आणता येऊ लागले.


विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांतील महत्त्वाच्या विकासांत डी फॉरेस्ट यांनी १९१२ मध्ये त्यांच्या ऑडिऑन नलिकेच्या आंदोलक गुणधर्माच्या लावलेल्या शोधाचा अंतर्भाव होतो. या शोधामुळे ठिणगी प्रेषकाची जागा पुष्कळच अधिक शुद्ध व सापेक्षतः स्थिर कंप्रता असलेले रेडिओ तरंग निर्माण करू शकणाऱ्‍या इलेक्ट्रॉनीय नलिका आंदोलकाने [⟶ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] घेतली. १९१४ सालापावेतो जहाजे व जमिनीवरील केंद्रे यांच्यातील रेडिओ संदेशवहन ही नित्याची बाब झालेली होती. त्याच वर्षी एका विमानातून पहिला हवेतून-जमिनीकडे असा रेडिओ संपर्क साधला गेला. १९१८ मध्ये वेल्समधील कर्नारव्हन येथील मार्कोनी दीर्घ-तरंग केंद्राने पाठविलेला रेडिओ तारायंत्र संदेश १७,७०० किमी. अंतरावर ऑस्ट्रेलियात पोहोचला.

प्रारंभीच्या प्रयोगांवरूनच रेडिओद्वारे मानवी वाणी प्रेषित करता येईल, असे दिसून आले होते परंतु याचे खरे सार्थ प्रात्यक्षिक १९१५ मध्ये अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीने व्हर्जिनियातील आर्लिंग्टन व फ्रान्समधील पॅरिस यांच्या दरम्यान पश्चिमेकडून पूर्वेकडे अटलांटिक महासागरापार वाणी संकेत यशस्वीपणे प्रेषित करून दाखविले. एक वर्षानंतर इंग्लंडमधील ब्रुकलँड्स विमानतळाजवळ उडत असलेल्या विमानाला रेडिओ दूरध्वनी संदेश पाठविण्यात आला.

इ. स. १९२० नंतरच्या काळात यूरोप, उत्तर अमेरिका व आशिया येथील संशोधन कार्यामुळे रेडिओ संदेशवहनात अपूर्व प्रगती झाली. इलेक्ट्रॉन (किंवा निर्वात) नलिकेच्या व नंतर १९४८ मधील ट्रँझिस्टराच्या शोधामुळे लक्षणीय विकास होणे शक्य झाले. रेडिओच्या प्रारंभीच्या काळात आणि दुसऱ्‍या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत रेडिओ ग्राहीमध्ये रोधक, घारित्रे, प्रवर्तक (या घटकांच्या स्पष्टीकरणासाठी ‘विद्युत् मंडल’ ही नोंद पहावी) व इलेक्ट्रॉन नलिका हे घटक रंगीत निरोधकयुक्त तारांनी एकत्र जोडलेले असत. उत्पादन व दोष शोधणे सुलभ व्हावे म्हणून मंडलातील विशिष्ट तारजोडणीला विशिष्ट रंग (उदा., इलेक्ट्रॉन नलिकेतील तंतूंसाठी काळा, जालकाग्राकरिता हिरवा) ठरविणारी संहिता जगभर अंगीकारण्यात आलेली होती. पुढे जुळणीचा वेग वाढविण्यासाठी तारा योग्य लांबीच्या कापून त्या एकत्रित जुडग्यात बांधण्यात येऊ लागल्या. मुख्य घटक परस्परांना जोडण्यासाठी प्लग व सॉकेट यांचा उपयोग करण्यात आला. १९४० नंतरच्या दशकात विकसित झालेल्या ⇨मुद्रित मंडलांमुळे हाताने जोडणी करण्याचे बरेचसे काम संपुष्टात आले व उत्पादन खर्चात लक्षणीय बचत होऊ लागली. मुद्रित मंडलातील तारकामात घटकांचे आकारमान व स्थान लक्षात घेऊन मंडलाची योजना आखली जाते आणि जोडणी निरोधक तक्त्यावर बंधित केलेल्या सोयीस्कर आकार दिलेल्या तांब्याच्या पट्टीने वा पत्राने केली जाते. या तंत्राचा विस्तार म्हणजे मुद्रित घटक होय. यात रोधक, धारित्रे व कमी मूल्याचे प्रवर्तक हे मुद्रण प्रक्रियेचेच भाग बनले.

ट्रँझिस्टराच्या विकासामुळे मुद्रित मंडलातील इलेक्ट्रॉन नलिका हा एक मोठा घटक काढून टाकणे शक्य झाले व अशा मंडलांचा विनियोग करणे अधिक सुलभ झाले. त्यापुढील विकासाची परिणती १९६० नंतरच्या दशकात संकलिक मंडलाच्या [⟶ सूक्ष्मीकरण, इलेक्ट्रॉनीय मंडलांचे] उत्पादनात झाली. या प्रकारची अतिशय आटोपशीर मंडले विवर्धन व स्विचिंग (विद्युत् मंडलातील संबंधने जोडणे, तोडणे वा बदलणे) यांसारख्या बहुविध क्रिया करू शकतात.

 

संदेशवहन प्रणालीचे सर्वसाधारण स्वरूप : संदेशवहन प्रणालींमध्ये प्रेषित करावयाचे संकेत बहुतांशी श्राव्य कंप्रतेचे (मानवी कान ज्यांना संवेदनशील असतात अशा म्हणजे १५ ते २०,००० हर्ट्‌झ कंप्रतेचे) असतात. त्यांच्या मूळ स्वरूपात त्यांचे सरळ प्रेषण करणे शक्य होत नाही. विद्युत् चुंबकीय तरंग अवकाशात प्रेषित करण्याची क्षमता (व प्रेषण अंतराचा पल्ला)

संकेताच्या कंप्रतेवर अवलंबून असतो. संकेताची कंप्रता आ. १. रेडीओ संदेशवहन प्रणालीचे मूलभूत तत्व

जशी वाढत जाते त्या प्रमाणात या क्षमतेत (व पल्ल्यात) त्वरेने वाढ होत असते. त्यामुळे प्रेषणक्रियेकरिता सामान्यपणे रेडिओ कंप्रतेच्या तरंगाचा वाहक तरंग म्हणून उपयोग केला जातो. वाहक तरंगाचे कोणत्या तरी प्रकारे श्राव्य संकेताद्वारे विरूपण करून म्हणजे या दोहोंचे मिश्रण करून संकेताचे प्रेषण केले जाते. या प्रक्रियेकरिता मुख्यत्वेकरून तीन महत्त्वाच्या पद्धती उपलब्ध आहेत : (१) परमप्रसर-विरूपण पद्धती, (२) कंप्रता-विरूपण पद्धती व (३) स्पंद-विरूपण पद्धती [⟶ विरूपण]. ऐतिहासिक दृष्ट्या पाहता पहिली पद्धत प्रथम उपयोगात आणली गेली व आजदेखील हिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. श्राव्य संकेताचे काही मर्यादित संख्येच्या रेडिओ केंद्रांपासून व सर्व दूरचित्रवाणी केंद्रांपासून कंप्रता-विरूपण पद्धतीद्वारे प्रेषण केले जाते. अवकाशयानाबरोबर संपर्क साधण्याकरिता किंवा त्यापासून येणाऱ्‍या माहितीचे प्रेषण करण्याकरिता स्पंद-विरूपण पद्धत वापरली जाते. आधुनिक दूरध्वनी प्रणालीमध्ये सुद्धा या पद्धतीचा अंकीय स्वरूपात वापर वाढत्या प्रमाणात होऊ लागला आहे, कारण या पद्धतीची संकेत हाताळण्याची क्षमता सर्वांत अधिक आहे.

रेडिओ संदेशवहन प्रणालीचे मूलभूत तत्त्व आ. १ मध्ये स्थूलरूपाने दाखविले आहे. यातील प्रेषक प्रणालीमध्ये मूळ संकेत व वाहक तरंग यांचे एकत्रीकरण करून विरूपित वाहक तरंग तयार केला जातो व त्याचे विवर्धन करून तो आकाशकाला पुरविला जातो. आकाशकात वाहणाऱ्‍या प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहामुळे विद्युत् चुंबकीय तरंगांचे अवकाशात प्रसारण होते. ग्राही प्रणालीमध्ये ग्राही आकाशकाच्या व मेलक मंडलांच्या साहाय्याने प्रेषक आकाशकाकडून येणारे तरंग ग्रहण केले जातात व मूळचा विरूपित वाहक तरंग सूक्ष्म स्वरूपात मिळविला जातो. त्याचे प्रथम विवर्धन केले जाते व नंतर शोधकाच्या साहाय्याने विरूपित वाहक तरंगापासून मूळ संकेत वेगळा केला जातो. [⟶ रेडिओ प्रेषक रेडिओ ग्राही].


सुरुवातीला अशा प्रणालींचा वापर समुद्रातील जहाजांवर किनाऱ्‍यावरून तारायंत्र संकेत पाठविण्यासाठी केला जाऊ लागला. यासाठी ५०० किलोहर्ट्‌झपर्यंतच्या कंप्रतेचा वाहक तरंग वापरीत असत. १९१० पर्यंत अशा प्रकारच्या संदेशवहन प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. त्यानंतरच्या काळात अधिक उच्च कंप्रतेच्या विद्युत् चुंबकीय तरंगांसंबंधी संशोधन होऊन त्यांचा वापर महासागरात दूर अंतरावर असलेल्या जहाजांशी किंवा परदेशाशी तारायंत्र व दूरध्वनी संदेशवहन करण्यासाठी, देशी व विदेशी रेडिओ प्रेषणासाठी, दूरचित्रवाणी प्रेषणासाठी व इतर अनेक प्रकारच्या बिनतारी संदेशवहनासाठी होऊ लागला. १९६० नंतरच्या काळात उपग्रहांद्वारे संदेशवहन करण्यासाठी सूक्ष्मतरंग रेडिओ प्रणालीचा वापर करण्यात येऊ लागला.

रेडिओ-कंप्रता वर्णपट यदृच्छया अतिनीच कंप्रतांपासून ते परमोच्च कंप्रतांपर्यंत अनेक पट्ट्यांत विभागला आहे. या वर्णपटाचे निरनिराळे विभाग आंतरराष्ट्रीय करारानुसार तारायंत्र, दुरध्वनी संभाषण, दूरमापन, रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषण यांसारख्या प्रणालीकरिता वाटून दिलेले आहेत. रेडिओ-कंप्रता वर्णपटाची ही वाटणी कोष्टकात दर्शविली आहे.

विरूपित रेडिओ-कंप्रता संकेताने व्यापलेल्या कंप्रता कक्षेला रेडिओ-कंप्रता पट्टारूंदी म्हणतात. रेडिओ-कंप्रता संकेताने वाहिलेल्या अवगमाशी (माहितीशी) संबंधित अशी विशिष्ट पट्टारूंदी असते आणि रेडिओ-कंप्रता वाहक तरंगाच्या परिवाहाची (संदेशवहन मार्गाची रूंदी किमान अवगम पट्टारूंदीइतकी मोठी असावी लागते. नेहमीच्या परमप्रसर-विरूपण प्रेषणासाठी रेडिओ-कंप्रता पट्टारूंदी अवगम-कंप्रता पट्टारूंदीच्या दुप्पट असावी लागते. विरूपणाच्या इतर पद्धती वापरल्यास ही पट्टारूदी पुष्कळच मोठी असावी लागते. दूरमुद्रक (टेलिप्रिंटर) व टेलेक्स कामाकरिता लहान पट्टारूंदी (साधारणपणे २०० हर्ट्‌झच्या सुमाराची) पुरेशी होते व ती अवगम संकेत बनविणाऱ्‍या स्पंदांच्या महत्तम वेगावर अवलंबून असते. दूरध्वनी संभाषणाच्या बाबतीत उच्च सुबोधता आवश्यक असते पण स्वाभाविकता (उच्च- तद्रूपता) फारशी महत्त्वाची नसते. मानवी वाणीचे मुख्य घटक साधारणपणे ३०० ते ३,५०० हर्ट्‌झ यांच्या दरम्यान असतात,

रेडिओ-कंप्रता वर्णपटाचा निरनिराळ्या प्रणालींसाठी होणारा उपयोग

कंप्रता पट्टा 

कंप्रता 

उपयोग 

अतिनीच कंप्रता 

  

काल संकेत, प्रमाणभूत कंप्रता. 

 

३० किलोहर्ट्‌झ

 

नीच कंप्रता

 

स्थिर, सागरी चल, मार्गनिर्देशक, रेडिओ प्रेषण.

 

३०० किलोहर्ट्‌झ

 

मध्यम कंप्रता

 

भूमी, सागरी चल, रेडिओ प्रेषण.

 

३ मेगॅहर्ट्‌झ

 

उच्च कंप्रता (लघुतरंग)

 

स्थिर, चल, सागरी व वैमानिकीय, चल, रेडियो प्रेषण, हौशी. निकीय चल, रेडिओ प्रेषण,  हौशी.     

 

३० मेगॅहर्ट्‌झ

 

अति-उच्च कंप्रता

 

स्थिर, चल, सागरी व वैमानिकय चल, हौशी, रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषण, रेडिओ मार्ग निर्देशन.    निकीय, चल, हौशी, रेडिओ व दूरचित्रवाणी                                                              प्रेषण, रेडिओ मार्ग- निर्देशन.        

 

३०० मेगॅहर्ट्‌झ

 

अत्यधिक-उच्च कंप्रता

 

चल, स्थिर, सागरी व वैमानिकीय चल, हौशी, दूरचित्रवाणी प्रेषण, रेडिओस्थाननिश्चिती व मार्गनिर्देशन, वातावरणवैज्ञानिक व अवकाश संदेशवहन.

 

३ गिगॅहर्ट्‌झ

 

परमोच्च कंप्रता

 

स्थिर, चल, रेडिओ स्थाननिश्चिती व मार्गनिर्देशन, अवकाश व उपग्रह संदेशवहन.

३० गिगॅहर्ट्‌झ

 

  

[१-१०० गिगॅहर्ट्‌झ कंप्रता असलेल्या तरंगांना सूक्ष्मतरंग म्हणतात.]   

        

असे चाचण्यांवरून दिसून आले आणि यामुळे रेडिओ वाहित दूरध्वनी परिवाहांची पट्टारूंदी सामान्यतः चार किलोहर्ट्‌झच्या आसपास असते. उपयोगात आणलेली अवगम पट्टारूंदी जितकी लहान असेल, तितके दिलेल्या वाहक पट्टारूंदीत अधिक वाणी परिवाह वाहून नेले जातील व परिणामी प्रणाली आर्थिक दृष्ट्या अधिक काटकसरीची होईल.

 

प्रणालींचे वर्गीकरण : सर्व प्रकारच्या रेडिओ संदेशवहन प्रणालींचे कार्य आ. १. मध्ये दर्शविल्याप्रमाणे चालत असले, तरी संकेताच्या स्वरुपानुसार प्रमालींमध्ये तांत्रिक दृष्ट्या पुष्कळ भिन्नता असते म्हणून संकेताच्या मूळ स्वरुपानुसार अशा प्रणालींचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येते : (१) रेडिऔ तारायंत्र प्रणाली, (२) रेडिओ दूरध्वनी प्रणाली व रेडिओ प्रेषण प्रणाली, (३) रेडिओ दूरमापन प्रणाली (४) दूरचित्रवाणी प्रणाली. संकेताचा प्रकार कोणताही असला, तरी वाहक तरंग कंप्रतेनुसारही प्रणालीमध्ये तांत्रिक दृष्ट्या पुष्कळ भिन्नता असू शकते. त्याचप्रमाणे उपग्रहाचा वापर प्रणालीमध्ये केल्यास तांत्रिक दृष्ट्या ती सर्वस्वी भिन्न प्रणाली समजावी लागेल म्हणून संकेताच्या स्वरूपाचा विचार न करता सूक्ष्मतरंग संदेशवहन प्रणाली व उपग्रह संदेशवहन प्रणाली यांचा विशिष्ट प्रणाली म्हणून स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. याशिवाय प्रणालीमध्ये तिच्या उपयोगाच्या क्षेत्रानुसार काही वैशिष्ट्ये असतात. म्हणून उपयोगाच्या क्षेत्रानुसार पद्धतीनुसार सागरी रेडिओ, वैमानिकीय रेडिओ, सैनिकी रेडिओ, चल (फिरता) रेडिओ, हौशी रेडिओ (खाजगी व्यक्तींमध्ये फुरसतीच्या वेळचा छंद म्हणून द्विमार्गी रेडिओ संदेशवहनासाठी वापरण्यात येणारी प्रणाली) असेही या प्रणालींचे वर्गीकरण काही वेळा करण्यात येते. संकेताचा प्रकार सूक्ष्मतरंगाचा व उपग्रहांचा प्रणालीमध्ये वापर आणि प्रणालीच्या उपयोगाचे क्षेत्र या सर्व दृष्टींनी निरनिराळ्या प्रणालीच्या वैशिष्ट्यांचा विचार केला आहे.


रेडिओ तारायंत्र प्रणाली : या प्रणालीमध्ये मूळ संकेत विद्युत् स्पंदांच्या स्वरूपात असून स्पंदमालिकेतील स्पंदांचा विशिष्ट क्रम, संख्या, कालमान व ध्रुवता (वहन दिशा) या गोष्टींना अनुसरून स्पंदगटांना सांकेतिक अर्थ दिलेला असतो अगर दूरमुद्रक यंत्राच्या वा स्वयंचलित तारायंत्राच्या संदर्भात विशिष्ट कार्य नियुक्त केलेले असते. आ. १ मधील प्रणालीत वाहक तरंगाच्या विरूपणासाठी अशा प्रकारचा विद्युत् स्पंद संकेत वापरला जातो. अशा प्रणालीत परमप्रसरविरूपणाचा वा कंप्रताविरूपणाचा वापर केला जातो. परमप्रसर−विरूपण वापरल्यास विरूपण क्रियेला ‘चालू बंद’ क्रिया असे म्हणतात व कंप्रता विरूपण वापरल्यास ‘कंप्रताबदल क्रिया’ म्हणतात. कंप्रता बदल क्रियेत वाहक तरंगाची कंप्रता स्पंदाच्या ध्रुवतेनुसार ± ४०० हर्ट्‌झने कमी अगर जास्त केली जाते. एकाच प्रेषकाच्या साहाय्याने अनेक तारायंत्र परिवाह उपलब्ध करण्यासाठी प्रणालीमध्ये निरनिराळ्या कंप्रतांच्या अनेक उपवाहक तरंगांचा वापर करता येतो. प्रत्येक उपवाहकाचे चालू बंद पद्धतीने अगर कंप्रता बदल पद्धतीने विरूपण करून अशा अनेक उपवाहकांनी एकाच वेळी मुख्य वाहक तरंगाचे परमप्रसर विरूपण केले जाते. उपवाहकांची कंप्रता श्राव्य पट्‌ट्यातील उच्च कंप्रता असते. एकाच वेळी निरनिराळ्या कंप्रतांचे उपवाहक वापरून अनेक परिवाह उपलब्ध करण्याच्या या पद्धतीला कंप्रता विविधसंकेतभर (किंवा कंप्रता बहुदली) पद्धती अशी संज्ञा आहे. अशा प्रकारच्या प्रणालीमध्ये मुख्य वाहक तरंगाचे परमप्रसर विरूपण करून एक उपपट्टा प्रेषण [⟶ रेडिओ प्रेषक] केले जाते. अशा प्रणालीमध्ये मुख्य वाहक कंप्रता लघुतरंग पट्‌ट्यातील असते व प्रेषकाची शक्ती संदेशवहनाच्या अंतरानुसार १ ते ४० किलोवॉट या मर्यादेत असते.

संकेत ग्रहण करण्यासाठी परासंकरण प्रकारची रेडिओ ग्राही वापरतात [⟶ रेडिओ ग्राही]. लघुतरंग पट्ट्यातील तरंगांचे ⇨आयनांबराद्वारे प्रसारण होताना ग्राह्य तरंगांची तीव्रता कमी जास्त होत असते म्हणून विश्वासार्ह संकेतग्रहण करता येण्यासाठी ‘कंप्रता व्यावर्तन’ किंवा ‘अवकाश व्यावर्तन’ वापरावे लागते. कंप्रता व्यावर्तनासाठी तोच तारायंत्र संकेत दोन निरनिराळ्या कंप्रतांवर प्रेषित केला जातो. अवकाश आ. २. आधुनिक रेडिओ तारायंत्र प्रणालीव्यावर्तन पद्धतीत एकाच कंप्रतेवरील संकेत सु. ३०० मी. अंतरावर बसविलेल्या दोन आकाशकांद्वारे ग्रहण केला जातो. दोन्ही व्यावर्तन पद्धतींत दोन स्वतंत्र मेलक मंडले असलेला एकच ग्राही वापरून संकेताचे ग्रहण केले जाते परंतु एका इलेक्ट्रॉनीय द्वार मंडलाच्या [⟶ इलेक्ट्रॉनीय स्विच मंडले] साहाय्याने दोन व आकाशकांच्या प्रदान संकेतांपैकी अधिक तीव्रतेच्या संकेताची निवड केली जाते. दूर अंतरावरील संदेशवहनासाठी रेडिओ तारायंत्र प्रणालीमध्ये संकेताच्या प्रेषणाकरिता व ग्रहणाकरिता निरनिराळ्या प्रकारच्या दिशिक आकाशकांचा (इतर दिशांपेक्षा काही विशिष्ट दिशांत रेडिओ तरंगांचे परिणामकारकपणे प्रसारण वा ग्रहण करणाऱ्या आकाशकांचा) वापर करता येतो परंतु समभुज चौकोनी आकाशकाचा वापर अशा प्रणाली मध्ये अधिक प्रमाणात करण्यात येतो.

आधुनिक काळात रूढ झालेल्या रेडिओ तारायंत्र प्रणालीमध्ये दर मिनिटास ६६ शब्द स्पंद सांकेतिक भाषेत रूपांतरित करणाऱ्या दूरमुद्रक यंत्रांचा वापर करण्यात येतो. अशा प्रणालीमध्ये कंप्रता विविधसंकेत भरण पद्धती किंवा काल विविध संकेतभरण पद्धती (क्रमागत काल अंतरालांचा निरनिराळ्या संकेतांसाठी उपयोग करून समाईक मार्गावरून दोन अगर अधिक संकेत प्रेषित करण्याची पद्धती) वापरून एकापेक्षा अधिक परिवाहांची योजना करता येते. दोन अगर चार परिवाहयुक्त काल विविधसंकेतभरण यंत्रणेबरोबर दोष दुरुस्ती मंडलांचा वापर केलेल्या प्रणालीचा उपयोग हल्ली बऱ्याच प्रमाणातकेला जातो. दोष दुरुस्ती मंडलांमुळे अशा प्रणालीमध्ये ग्रहण केलेल्या संकेताची अचूकता समाधानकारक असते. आ. २ मध्ये अशा प्रणालीची कार्यपद्धती दाखविली आहे.

रेडिओ दूरध्वनी प्रणाली : आ. १ मध्ये दाखविलेल्या प्रणालीमध्ये विरूपणासाठी वापरावयाचा संकेत श्राव्य कंप्रता संकेत असेल, तर ती प्रणाली रेडिओ दूरध्वनी प्रणाली म्हणून वापरता येते. रेडिओ संदेशवहन प्रणालीचा वापर प्रथम तारायंत्र पद्धतीने संदेशवहन करण्यासाठी करण्यात येऊ लागला. त्यानंतर १९०४–१४ या कालखंडात रेडिओ प्रणालीचा वापर दूरध्वनी संदेशवहनासाठी करण्याचे प्रयोग अमेरिकेतील व यूरोपातील अनेक शास्त्रज्ञांनी केले. मार्कोनी हे त्यांपैकी एक होते. १९१४ मध्ये दीर्घ तरंगांचा वापर करून मार्कोनी यांनी आर्यलंडमधून सिसिली बेटाजवळच्या जहाजांबरोबर दूरध्वनीने संदेशवहन करण्यात यश मिळविले. त्यानंतर १९१५ मध्ये अमेरिकेतील आर्लिंग्टन (व्हर्जिनिया) येथून पॅरिस व होनोलूलूशी दीर्घ तरंगाचा वापर करून रेडिओ दूरध्वनी संदेशवहन यशस्वीपणे करण्यात आले परंतु ते प्रायोगिक स्वरूपातील होते.


इ. स. १९२७ पासून मात्र अशा प्रणालीचा वापर व्यापारी पद्धतीने दूरध्वनी संदेशवहन करण्यासाठी होऊ लागला. प्रचंड विस्तार असलेल्या देशांमध्ये अंतर्गत दूरध्वनी संदेशवहनासाठी व विशेषतः महासागरापलीकडील देशांशी दूरध्वनी संदेशवहन करण्यासाठी अशा प्रणालीचा वापर १९६० पर्यंत सार्वत्रिकपणे सुरू झाला. मात्र अशा सर्व प्रणालींसाठी ३ ते ३० मेगॅहर्ट्‌झ या लघुतरंग पट्‌ट्याचा वापर आता करण्यात येतो. प्रेषणासाठी २ ते ८० किलोवॉट शक्तीचे प्रेषक वापरण्यात येतात व संकेत ग्रहणासाठी परासंकरण प्रकारच्या ग्राहींचा वापर करण्यात येतो. निरनिराळ्या प्रकारचे दिशिक आकाशक अशा प्रणालीसाठी वापरता येतात परंतु प्रेषणासाठी व संकेत ग्रहणासाठी समभुज चौकोनी आकाशक अधिक सुलभतेने वापरता येतात. त्याचप्रमाणे ग्राह्य लघुतरंग संकेतांची तीव्रता कमीजास्त होत असल्यामुळे व्यावर्तन यंत्रणा वापरणे जरूरीचे असते.

अशा प्रत्येक प्रणालीमध्ये सामान्यतः चार दूरध्वनी परिवाहांची योजना केलेली असते व प्रत्येक परिवाहासाठी ३,००० हर्ट्‌झ रुंदीचा कंप्रता पट्टा दिलेला असतो. रेडिओ कंप्रता पट्‌ट्यांच्या आंतरराष्ट्रीय वाटप व्यवस्थेनुसार दूरध्वनी संदेशवहनासाठी उपलब्ध असलेला कंप्रता पट्टा मर्यादित असल्यामुळे अशा प्रणालींच्या संख्येवर मर्यादा पडते.

सुरुवातीच्या काळात अशा प्रणालीमध्ये साध्या परमप्रसर विरूपणाची योजना केलेली असे परंतु अलीकडे सामान्यतः एक उपपट्टा प्रेषण पद्धतीचा वापर करण्यात येतो. आयनांबराच्या अवस्थेमध्ये दिवसाच्या वेळेनुसार, वर्षातील ऋतूनुसार व सौरडाग आवर्तनामधील [ ⟶ सूर्य] परिस्थितीनुसार बदल होत असतो. त्यामुळे अशा प्रणालीसाठी वापरावयाची कंप्रता वेळोवेळी बदलावी लागते म्हणून कोणत्याही एका प्रणालीसाठी लघुतरंग पट्‌ट्यातील कमीत कमी पाच निरनिराळ्या मूल्यांच्या कंप्रता नेमून दिलेल्या असतात.

इ. स. १९६० नंतरच्या काळात अशा प्रणालीसाठी स्पंद सांकेतिक विरूपण पद्धतीचा वापर करण्यात येऊ लागला आहे. या पद्धतीमध्ये प्रत्येक परिवाहाकरिता अधिक रुंद कंप्रता पट्टा लागतो परंतु गोंगाट व व्यतिकरण यांमुळे दूरध्वनी संकेतात येणारा व्यत्यय या पद्धतीत जवळजवळ संपूर्णपणे टाळता येतो. बहुपरिवाह प्रेषणासाठी निरनिराळ्या परिवाहांतील स्पंद विशिष्ट क्रमाने स्पंदमालिकेत मिसळले जातात.

परदेशांशी संदेशवहन करण्यासाठी ज्या प्रणाली वापरतात त्यांच्यामध्ये दूरध्वनी संभाषणातील गुप्तता राखण्यासाठी सामान्यतः विशेष प्रकारची यंत्रणा वापरलेली असते. अशा प्रकारच्या यंत्रणेमध्ये संभाषण संकेतातील ध्वनी कंप्रता घटकांची विशिष्ट प्रकारे सरमिसळ करण्यात येते. यांसाठी प्रथम २५० हर्ट्‌झ ते ३,००० हर्ट्‌झ या कंप्रता पट्‌ट्याचे प्रत्येकी ५५० हर्ट्‌झ रुंदीचे पाच भाग करण्यात येतात व या पाच विभागांतील कंप्रता घटकांची प्रेषणापूर्वी संकरण पद्धतीने अदलाबदल केली जाते. ग्राही यंत्रणेमध्ये संकरण पद्धतीने याउलट प्रक्रिया करून सर्व कंप्रता घटक मूळ संकेतात होते तसे एकत्र केले जातात. प्रत्येक परिवाहात अशा प्रकारची कंप्रता सरमिसळ प्रक्रिया स्वतंत्रपणे केली जाते. याच्या जोडीला काही प्रणालींमध्ये ५५० हर्ट्‌झ रुंदीच्या प्रत्येक उपपट्‌ट्यातील कंप्रता घटकांची संकरण पद्धतीने उलटापालटही केली जाते. यामुळे संकेताची गुप्तता अधिक चांगल्या तऱ्हेने राखता येते. साध्या रेडिओ ग्राहीने एखाद्या तिऱ्हाइत व्यक्तीने अशा प्रकारचा कंप्रता सरमिसळ व कंप्रताची उलटापालट केलेला संकेत ग्रहण केल्यास ग्राहीतून मिळणाऱ्या प्रदान ध्वनिसंकेतांतून काहीही अर्थबोध होऊ शकत नाही.

ग्राहीच्या शोधक विभागातून एकाच वेळी चार परिवाहांचे प्रदान संकेत मिळतात. हे संकेत प्रत्येकी ३,००० हर्ट्‌झ रुंदीच्या परंतु निरनिराळ्या कंप्रता पट्‌ट्यांमध्ये सामाविलेले असतात. विद्युत छानकांच्या (गाळण्यांच्या) साहाय्याने प्रत्येक परिवाहातील संकेत वेगळे करण्यात येतात व नेहमीच्या दूरध्वनी यंत्रणेमार्फत इच्छित स्थळी पाठविले जातात. रेडिओ प्रेषकाला वाहक तरंगाच्या विरूपणासाठी पुरवावयाचे संकेतही अशाच पद्धतीने नेहमीच्या दूरध्वनी यंत्रणेमार्फत पुरविले जातात.

 

रेडिओ दूरमापन प्रणाली : एक किंवा अनेक भौतिकीय राशींचे मापन करण्यासाठी त्या राशींचे योग्य त्या ⇨ऊर्जापरिवर्तकाच्या साहाय्याने विद्युत् संकेतात रूपांतर करणे, तो विद्युत् संकेत रेडिओ संदेशवहन प्रणालीचा वापर करून दूर अंतरावर पोहोचविणे व तेथे त्या संकेताचे योग्य प्रकारे संदर्शन करून (शब्द, संख्या वा रेखाचित्र या स्वरूपात उदा., रडारच्या वा संगणकाच्या पडद्यावर माहिती दर्शवून) मूळ राशीचे मापन करणे हे या प्रणालीचे कार्य होय. यासाठी वापरावयाची रेडिओ प्रणाली आ. १ मध्ये दाखविलेल्या प्रणाली प्रमाणेच असते. एक किंवा अनेक ऊर्जापरिवर्तकांपासून मिळालेले विद्युत् संकेत वाहक तरंगाच्या विरूपणासाठी वापरले जातात व इच्छित स्थळी रेडिओ ग्राहीच्या साहाय्याने त्यांचे ग्रहण केले जाते.

रेडिओ दूरमापन प्रणालीमध्ये सामान्यपणे पुढील सामग्रीचा अंतर्भाव केलेला असतो : (१) मापन प्रयुक्ती किंवा ऊर्जापरिवर्तक, (२) मापनाच्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणाजवळ असणारी प्रदत्त (माहिती) संस्करण सामग्री, (३) संस्कारित माहिती इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी रेडिओ संदेशवहन प्रणाली, (४) ग्रहण केंद्रामध्ये मापन क्रियेमध्ये मिळालेले संकेत मूळ स्वरूपात मिळण्यासाठी प्रदत्त पुनःसंस्करण सामग्री, (५) संदर्शन प्रयुक्ती ⇨ऋण किरण नलिका, ध्वनिक्षेपक किंवा फीतमुद्रक. क्र. २ व ४ मध्ये निर्देशित केलेली सामग्री ही दूरमापन प्रणालीमधील खास वैशिष्ट्यपूर्ण सामग्री होय.

कार्यक्षम दूरमापन प्रणालीच्या अभिकल्पामध्ये (आराखड्यामध्ये) प्रदत्त संस्करण सामग्रीची अशा तऱ्हेने योजना करावी लागते की, अनेक (उदा., ३०) निरनिराळ्या मापन प्रयुक्तींपासून मिळालेले प्रदान संकेत योग्य रीतीने एकत्र करून सर्वांचा मिळून संकलित विद्युत् संकेत तयार होईल व हा संकलित विद्युत् संकेत रेडिओ संदेशवहन प्रणालीच्या साहाय्याने दूरच्या इच्छित स्थळी पाठविल्यास त्यामुळे मापन केलेल्या राशींची मूल्ये इच्छित स्थळी पोहोचविली जातील. संदेशवहन सामग्री व परिवाहाची क्षमता यांचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर होण्यासाठी काल व कंप्रता-विविधसंकेतभरण या दोन्ही तंत्रांचा एकत्र वापर करावा लागतो. इलेक्ट्रॉनीय दूरमापन प्रणालीचे हे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल.

काल-विविधसंकेतभरण पद्धतीमध्ये विशिष्ट कालखंडाची विभागणी करून अनेक संकेत विशिष्ट क्रमाने त्या कालखंडात सामावून घेतलेले असतात. कोणताही भौतिकीय संकेत निरनिराळ्या कंप्रतांच्या अनेक ज्या वक्रीय (त्रिकोणमितीतील ‘ज्या’ फलनाच्या आलेखाप्रमाणे ज्यांचे आलेख आहेत अशा) संकेतांच्या मिश्रणाने बनलेला असतो आणि संदेशवहन उपपत्तीमधील प्रतिदर्शन (नमुना घेण्यासंबंधीच्या) प्रमेयानुसार कोणत्याही संकेतामधील संपूर्ण अवगमाचे प्रतिनिधित्व त्या संकेताच्या ठराविक कालावधीने घेतलेल्या प्रतिदर्शांनी (नमुन्यांनी) करता येते. मात्र यासाठी त्या संकेतामधील जास्तीत जास्त घटक कंप्रतेच्या दुप्पट संख्येइतके किंवा त्यापेक्षा अधिक संख्येइतके प्रतिदर्श घेतले पाहिजेत. म्हणून काल-विविधसंकेतभरण यशस्वीपणे साध्य करण्यासाठी संकेतसमुच्चयांपैकी प्रत्येक संकेताचे ठराविक कालावधीने प्रतिदर्श घ्यावे लागतात. एकाच वेळी एकाच संदेशवहन प्रणालीमधून २० निरनिराळ्या मापन प्रयुक्तींपासून मिळालेले संकेत प्रेषित करावयाचे असतील व प्रतिदर्शन प्रमेयानुसार प्रत्येक संकेताचे प्रतिदर्शन दर सेकंदामध्ये १० वेळा करणे जरूर असेल, प्रदत्त संस्करण यंत्रणेच्या साहाय्याने प्रत्येक संकेताचे क्रमशः/२००  से. इतक्या कालावधीत प्रतिदर्शन करावे लागेल. /२०० χ २० = / १० से. इतक्या कालावधीनंतर त्याच क्रमाने पुन्हा त्या २० संकेतांचे प्रत्येकी दुसरे प्रतिदर्शन केले जाईल. अशा तऱ्हेने तयार होणाऱ्या प्रतिदर्श मालिकेत सर्व २० भौतिकीय मापनांमधील अवगम अंतर्भूत असेल, असे निरनिराळ्या २० संकेतांचे काल-प्रतिदर्शन इलेक्ट्रॉनीय द्वार मंडलाच्या साहाय्याने करता येते.


कंप्रता-विविधसंकेतभरण पद्धतीनेही एकाच संदेशवहन प्रणालीमधून एकाच वेळी अनेक मापन प्रयुक्तींपासून मिळालेल्या निरनिराळ्या संकेतांचे प्रेषण करता येते. यासाठी प्रत्येक प्रयुक्तीमधून मिळणाऱ्या संकेतासाठी एका स्वतंत्र उपवाहक तरंगाची योजना करावी लागते किंवा प्रत्येक संकेतासाठी प्रणालीच्या कंप्रतापट्‌ट्यांपैकी स्वतंत्र उपपट्टा नियोजित करावा लागतो. अशा पद्धतीचे विरूपण इलेक्ट्रॉनीय मंडलाच्या साहाय्याने संस्करण पद्धती वापरून साध्य करता येते.

इष्ट स्थळी अशा मिश्र संकेतांचे परासंकरण पद्धतीच्या ग्राहीने ग्रहण केले जाते व ग्राहीच्या प्रदान संकेतावर ग्रहण केंद्रामधील इलेक्ट्रॉनीय प्रदत्त संस्करण यंत्रणेच्या साहाय्याने अनुरूप प्रक्रिया करून मूळचे निरनिराळे संकेत एकमेकांपासून अलग केले जातात व असा प्रत्येक संकेत योग्य त्या संदर्शन प्रयुक्तीला अगर मुद्रण उपकरणाला पुरविला जातो. अलीकडील काळात असे संकेत अंकीय संगणकाला पुरवून त्याच्या साहाय्याने योग्य त्या स्वयंचलित नियंत्रण क्रिया केल्या जातात अगर या संकेतांचे आवश्यक ते पृथःक्करण अगर अर्थबोधन केले जाते.

अत्यंत कार्यक्षम रेडिओ दूरमापन प्रणालीमुळे अवकाशयानांसंबंधीचे अनेक प्रश्न सुलभ झाले आहेत. निर्मनुष्य व मानवसहित अवकाशयानातील अनेक भौतिकीय राशींचे मापन करून संबंधित संकेत पृथ्वीवरील केंद्राकडे पाठविण्यासाठी अशा प्रणालीचा वापर अत्यावश्यक असतो. अवकाशयानांचे नियंत्रण करण्यासाठी व त्यांचे नियोजित कार्य यशस्वीपणे पार पाडण्यास अशा भौतिकीय राशींची मूल्ये पृथ्वीवरील केंद्राना सातत्याने कळत राहणे अत्यावश्यक असते. अणुशक्ती उद्‌गमांचे नियंत्रण, विषारी द्रव्यांचे उत्पादन इ. मानवी जीवितास धोका असलेल्या परिस्थितीतही रेडिओ दूरमापन प्रणालीचा उपयोग करण्यात येतो. [⟶ दूरमापन].

रेडिओ प्रेषण प्रणाली : मूलतः रेडिओ प्रेषण (किंवा प्रक्षेपण) प्रणाली व रेडिओ दूरध्वनी प्रणाली सारख्याच असतात परंतु प्रेषण प्रणालीचा उद्देश एका विशिष्ट ठिकाणी संभाषण संकेत पोहोचविणे हा नसून करमणुकीचे, निरनिराळ्या प्रकारची लोकोपयोगी माहिती देणारे व शिक्षणविषयक कार्यक्रम एकाच वेळी असंख्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे हा असतो. या उद्दिष्टामधील फरकामुळे व श्राव्य संकेताच्या वेगळेपणामुळे या प्रणालीमध्ये बराच फरक करावा लागतो. मूलभुत प्रणाली आ. १ मध्ये दर्शविलेल्या प्रणालीसारखीच असली, तरी संकेत निर्मितीपासून संकेत प्रेषकाला पुरवीपर्यंत वापरावयाच्या यंत्रणेमध्ये व साधनसामग्रीमध्ये पुष्कळच भिन्नता असते. रेडिओ दूरध्वनी प्रणालीमध्ये प्रेषकाला विरूपणासाठी पुरविलेला संकेत नेहमीच्या दूरध्वनी केंद्राकडूनच योग्य त्या संस्करण प्रक्रियेनंतर मिळतो. प्रेषण प्रणालीमध्ये मात्र संकेतनिर्मितीपासून प्रत्यक्ष प्रेषकाला तो पुरविण्यापर्यंत स्वतंत्र यंत्रणा असावी लागते. दूरध्वनी प्रणालीमध्ये फक्त संभाषण संकेत इच्छित स्थळी पोहोचवावयाचे असतात. त्यामुळे प्रत्येक दूरध्वनी परिवाहासाठी ३,००० हर्ट्‌झ रुंदीचा कंप्रतापट्टा पुरेसा असतो व एक उपपट्टा प्रेषण पद्धतीचा अवलंब करून एकाच प्रेषकामधून चार निरनिराळ्या परिवाहांद्वारे एकाच वेळी चार निरनिराळ्या संभाषणांचे प्रेषण करता येते. रेडिओ प्रेषण प्रणालीमध्ये योग्य त्या गुणवत्तेने कार्यक्रमाचे प्रेषण करणे जरूर असल्यामुळे एका प्रेषकामध्ये १० किलोहर्ट्‌झ कंप्रतापट्टा असलेल्या एकाच परिवाहाची सोय करता येते. त्याचप्रमाणे सामान्य माणसाला सहजतेने केंद्राचे मेलन करता येणे जरूर असल्यामुळे व ग्राहीची किंमत मर्यादित ठेवणे जरूर असल्यामुळे एक उपपट्टा प्रेषण न वापरता, परमप्रसर-विरूपण वापरल्यास दोन्ही उपपट्‌ट्यांचे प्रेषण करावे लागते. याला पर्याय म्हणून काही रेडिओ प्रेषण प्रणालीमध्ये कंप्रता-विरूपणाचाही वापर करण्यात येतो. प्रेषण प्रणालीमध्ये आवश्यकतेनुसार मध्येम तरंग पट्‌ट्यातील, लघुतरंग पट्‌ट्यातील किंवा कंप्रता-विरूपण पद्धती वापरल्यास अति-उच्च कंप्रतापट्‌ट्यातील कंप्रता वाहक तरंगासाठी निवडता येते. एखाद्या किंवा अनेक भूप्रदेशांतील सर्व लोकांना प्रेषित कार्यक्रमाचे ग्रहण करता यावे हे उद्दिष्ट असल्यामुळे प्रेषण प्रणालीमध्ये दिशिक गुणधर्माचे आकाशक वापरीत नाहीत किंवा काही वेळा प्रेषकाच्या विशिष्ट बाजूला असलेल्या भूप्रदेशातील लोकांसाठी कार्यक्रमांचे नियोजन केले असेल, तर मर्यादित प्रमाणात दिशिक गुणधर्म असलेल्या आकाशक प्रणालीचा वापर केला जातो परंतु रेडिओ दूरध्वनी प्रणालीप्रमाणे विशिष्ट ठिकाणाकडे जाणाऱ्या विद्युत् चुंबकीय तरंगांच्या अरुंद शलाका निर्माण करणाऱ्या आकाशक प्रणासली मात्र वापरीत नाहीत.

एकाच वेळी असंख्य सामान्य लोकांकडून प्रेषित कार्यक्रम ग्रहण केले जावयाचे असल्याने सुलभ मेलन यंत्रणा असलेले व माफक किंमत असलेले परासंकरण पद्धतीचे असंख्य रेडिओ ग्राही एकाच वेळी प्रेषण प्रणालीच्या ग्रहण बाजूला वापरले जातात. लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या ग्राहींमध्ये निरनिराळ्या कंप्रतापट्‌ट्यांमधील असंख्य केंद्रांपैकी कोणत्याही केंद्रांचे संकेत ग्रहण करता येण्याची योजना केलेली असते.

प्रेषकाच्या व आकाशकाच्या रचनेतील वैशिष्ट्येनुसार रेडिओ प्रेषण प्रणालींचे वर्गीकरण तीन प्रकारांमध्ये करता येईल : (१) मध्यम तरंग पट्‌ट्यांतील प्रणाली. अशा प्रणालींचा वापर प्रेषण केंद्राभोवतीच्या सु. १५० किमी. अंतरापर्यंतच्या परिसरासाठी केला जातो (२) लघुतरंग पट्‌ट्यांतील प्रणाली. अशा प्रणालींचा वापर दूर अंतरावरील देशांतर्गत किंवा विदेशी प्रेषणासाठी केला जातो (३) कंप्रता-विरूपण प्रेषण प्रणाली. अशा प्रणालींचा वापरही सु. १५० किमी. अंतरापर्यंतच्या परिसरासाठी केला जातो. या शिवाय रेडिओ प्रेषणाच्या सुरुवातीच्या काळात दीर्घ तरंग पट्‌ट्यांतील प्रणाली दूर अंतरापर्यंतप्रेषण करण्यासाठी वापरल्या जात असत. अशा प्रणाली अनेक यूरोपीय देशांत अजूनही वापरात आहेत परंतु या प्रणालींसाठी अवाढव्य आकारमानाचे व महागडे आकाशक वापरावे लागतात व त्यांची विद्युत् कार्यक्षमता फार कमी असते म्हणून अशा प्रणालींचा वापर आता नव्याने केला जात नाही. दूर अंतरावरील प्रेषणाचे कार्य आता लघुतरंग प्रणाली वापरून अधिक चांगल्या तऱ्हेने केले जाते.

कोणत्याही रेडिओ प्रेषण प्रणालीचे दोन मुख्य विभाग पुढील प्रकारे करता येतील : (१) श्राव्य संकेताच्या उगमापासून प्रेषक आकाशकापर्यंतची यंत्रणा : यामध्ये कलागृह (कार्यक्रमनिर्मिती गृह), ध्वनिग्राहक व संबंधित पूर्वविवर्धक, मिश्रक व ध्वनी तीव्रता नियंत्रक यंत्रणा, मुख्य नियंत्रण कक्ष, नियंत्रण कक्षापासून प्रेषकापर्यंत किंवा एकाच वेळी देशव्यापी रेडिओ प्रेषण जाळ्यातील अनेक केंद्रांपर्यंत कार्यक्रम संकेत पोहोचविण्यासाठी दूरध्वनी केबल किंवा सूक्ष्मतरंग दुवा, रेडिओ प्रेषक व प्रेषक आकाशक यांचा अंतर्भाव होतो (२) घरोघरी असलेले ग्राही आकाशक व रेडिओ ग्राही. (या विभागांचे तपशीलवार वर्णन ‘रेडिओ प्रेषण’ या नोंदीत दिलेले आहे). 


काही देशांमध्ये एकच कार्यक्रम देशभर निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेल्या अनेक प्रेषण केंद्रांकडून प्रेषित करता येण्यासाठी अशी सर्व केंद्रे एकमेकांशी जोडलेली असतात. अशा प्रकारच्या विस्तारित प्रणालीला रेडिओ जाळे अशी संज्ञा आहे. अशा जाळ्यामधील निरनिराळी केंद्रे काही कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रेषित करतात, तर काही राष्ट्रीय महत्त्वाचे व देशातील सर्वांना आवडणारे कार्यक्रम एकत्रितपणे प्रेषित करतात.

प्रेषकाची शक्ती १०० वॉट (स्थानिक केंद्रासाठी) पासून १,००० किलोवॉटपर्यंत असते. आकाशकाची योजना निरनिराळ्या कंप्रता पट्‌ट्यांमध्ये निरनिराळी असते. मध्यम तरंग पट्‌ट्यातील केंद्रांसाठी/ते १ तरंगलांबी इतक्या उंचीचे मनोरे, तर लघुतरंग पट्‌ट्यातीलकेंद्रांसाठी क्षैतिजदिशेतील निरनिराळ्या प्रकारचे आकाशक किंवा तशाच प्रकारच्या आकाशकांचा व्यूह सामान्यपणे वापरला जातो.

वरील प्रकारच्या बहुतेक प्रणालींमध्ये प्ररमप्रसर विरूपणाचा वापर केला जातो परंतु काही देशांमध्ये कंप्रता विरूपण रेडिओ प्रणालींचा वापर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. कंप्रता विरूपण प्रणालींमध्ये व्यत्ययाचे प्रमाण फारच कमी होते व उत्तम तदरूपता साध्य करता येते. आ. ३. दूरचित्रवाणी प्रणालीत्यामुळे श्राव्य कार्यक्रमाची गुणवत्ता फार चांगली राहते परंतु या प्रणाली फक्त अति उच्च कंप्रता पट्‌ट्यामध्येच वापरता येतात व या प्रणालींनी प्रेषित केलेले कार्यक्रम १५० किमी. अंतरापर्यंतच ग्रहण करता येतात कारण अति उच्च कंप्रता तरंग आयनांबरातून परावर्तित होत नाहीत. या प्रणालींमध्ये आकाशकाचे आकारमान व किंमत पुष्कळच कमी असते.

रेडिओ प्रेषण प्रणालीचा ग्रहण विभाग म्हणजे त्या प्रणालीचा प्रभाव क्षेत्रामधील घरोघरी असलेले ग्राही आकाशक व परासंकरण प्रकारचे करण्यासाठी विशेष प्रकारचा रेडिओ ग्राही असावा लागतो. काही रेडिओ ग्राहींमध्ये कंप्रता विरूपण व परमप्रसर विरूपण या दोन्ही प्रकारच्या प्रणालींच्या कार्यक्रमांचे ग्रहण करण्याची सोय केलेली असते. अशा रेडिओ ग्राहींची यंत्रणा अधिक गुंतागुंतीची असून त्यांना किंमत बरीच जास्त पडते. [⟶ रेडिओ प्रेषण].

 

दूरचित्रवाणी प्रणाली : ही प्रणाली थोडी निराळी प्रकारची रेडिओ संदेशवहन प्रणालीच असल्यामुळे आ. १ ने या प्रणालीचे मूलभूत कार्य दर्शविता येईल परंतु या प्रणालीत खरे म्हणजे दृक् प्रेषण प्रणाली व ध्वनी प्रेषण प्रणाली अशा दोन प्रणाली एकत्रितपणे कार्य करीत असतात. प्रणालीच्या प्रेषण बाजूला दोन स्वतंत्रपणे कार्य करणारे प्रेषक यासाठी वापरलेले असतात परंतु प्रेषण विभागातील इतर उपविभाग मात्र दृक् प्रेषण व ध्वनी प्रेषण या दोन्हीकरिता एकत्रितपणे कार्य करीत असतात. असे उपविभाग म्हणजे कलागृह, मुख्य नियंत्रण कक्ष व आकाशक किंवा आकाशक व्यूह हे होत.

दूरचित्रवाणी प्रणालीमधील ध्वनी विभाग म्हणजे कंप्रता-विरूपणाचा वापर केलेली रेडिओ प्रेषण प्रणालीच असते. दूरचित्रवाणीच्या ग्राहीमध्ये मात्र शोधक टप्प्यापर्यंत दृकसंकेत व ध्वनी संकेत या दोन्ही संकेतांचे संस्करण एकत्रित रित्या केले जाते. या टप्प्यानंतर या दोन्ही प्रकारचे संकेत एकमेकांपासून अलग केले जातात व त्यापुढील संस्करण दूरचित्रवाणी संचाच्या दृक् विभागात व ध्वनी विभागात स्वतंत्रपणे केले जाते. दृक् संकेत शेवटी चित्रनलिकेला पुरविले जातात व ध्वनी संकेत ध्वनिक्षेपकाला पुरविले जातात.

दृक् संदेशवहन व ध्वनी संदेशवहन या दोन्हींची व्यवस्था या प्रणालीत असल्यामुळे आ. १ मध्ये सुधारणा करून आ. ३ मध्ये दूरचित्रवाणी प्रणाली दर्शविली आहे.

प्रत्यक्ष चित्रणासाठी एकापेक्षा अधिक दूरचित्रवाणी कॅमेरे, चित्रपटाच्या प्रेषणासाठी प्रक्षेपक व स्वतंत्र दूरचित्रवाणी कॅमेरा आणि दृक् फीतमुद्रक या सुविधा पुरविलेल्या असतात. दृक् विरूपकाला व ध्वनी विरूपकाला दूर अंतरावरून (कलागृहाच्या बाहेर चाललेल्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणापासून) येणारे संकेत पुरविण्याची सोयही केलेली असते. दृक् प्रेषक व ध्वनी प्रेषक या दोहोंमधून तयार झालेले विरूपित व विवर्धित संकेत एकाच आकाशक व्यूहामधून विद्युत् चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात प्रेषित केले जातात.

या प्रणालीची दुसरी बाजू म्हणजे घराघरांतून बसविलेले दूरचित्रवाणी ग्राही होत. या प्रणालीला विशिष्ट भूप्रदेशांतील असंख्य घरांतील ग्राहींना दृक् व ध्वनी संकेत पुरवावयाचे असल्यामुळे सर्वदिशीय प्रेषक आकाशक वापरावा लागतो. ग्राही आकाशक मात्र दिशीय गुणधर्मांचा असावा लागतो. ग्रहणस्थळी तरंगांची तीव्रता पुरेशी असली, तर सर्वदिशीय आकाशकही चालतो.

या प्रणालीसाठी ५·५ मेगॅहर्ट्‌झ रुंदीचा कंप्रतापट्टा आवश्यक असतो. त्यामुळे प्रेषणासाठी अतिउच्च कंप्रतेचा किंवा अत्यधिक उच्च कंप्रतेचा वाहक तरंग वापरणे आवश्यक असते व म्हणून या कंप्रतेचा प्रेषणपल्ला सु. १०० किमी.पेक्षा जास्त असत नाही. दृक् संकेत परमप्रसर-विरूपण वापरून व ध्वनी संकेत कंप्रता-विरूपण प्रेषित करण्याची प्रथा बहुतेक सर्व देशांत आहे. काही ठिकाणी ध्वनी संकेतासाठीही परमप्रसर-विरूपण वापरतात. [⟶ दूरचित्रवाणी रेडिओ प्रेषण].


अनुचित्र प्रेषण प्रणाली : (फॅक्स). रेखाचित्र, छायाचित्रे, हस्तलिखित वा मुद्रित मजकूर रेडिओ तरंगाच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी या प्रणालीचा उपयोग करतात. वर्तमानपत्रे वा नियतकालिके यांच्या एका ठीकाणच्या मूळ प्रतीवरून दुसऱ्या ठिकाणी त्याच्या प्रती या प्रणालीच्या साहाय्याने छापता येतात. क्रमवीक्षण करून मिळणाऱ्या संकेतांच्या प्रेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या या प्रकारच्या नमुनेदार प्रणालीत १,५००–२,३०० हर्ट्‌झ असा कंप्रताबदल-विरूपित रेडिओ प्रेषकाने प्रेषित करण्यात येतात. ग्रहणस्थानी संकरण ग्राहीने हे संकेत ग्रहण करून चित्रमुद्रित करण्यासाठी त्यांवर अधिक प्रक्रिया करण्यात येतात. [⟶ अनुचित्र प्रेषण].

 

सागरी रेडिओ : सागरावर संचार करणाऱ्या जहाजांमध्ये परस्परांशी किंवा सागरावरील जहाज व किनाऱ्यावरील केंद्र यांच्यामध्ये परस्परांशी संदेशवहन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणाली व जहाजांच्या मार्गनिर्देशनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणाली यांचा अंतर्भाव सागरी रेडिओ प्रणालींमध्ये करतात. या संदेशवहनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणाली इतर कोणत्याही रेडिओ प्रणालींप्रमाणेच असतात. तारायंत्र प्रणाली व दूरध्वनी प्रणाली या दोहोंचा वापर यासाठी केला जातो. १९२६ सालापर्यंत मात्र तारायंत्र प्रणालीचाच वापर केला जात असे १९३० पर्यंत सागरी प्रणालीसाठी फक्त दीर्घ तरंगांचा वापर केला जात असे परंतु त्यानंतर लघुतरंगांचा सार्वत्रिक वापर अशा प्रणालीमध्ये सुरू झाला तेव्हापासून समुद्रावरील जहाजांबरोबर व्यापारी पद्धतीने संदेशवहनही सुरू झाले व त्याचा उपयोग वृत्तसंस्था, सैन्यदले यांनीही करून घेतला. त्याचप्रमाणे संकटकाळी जहाजांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठीही अशा संदेशवहनाचा अतिशय उपयोग होतो. संकटकाळी जहाजावरून तारायंत्र प्रणालीच्या साहाय्याने नेमून दिलेल्या विशिष्ट कंप्रतेवर दिला जाणारा SOS हा संदेश सर्वपरिचित आहे.

सागरी मार्गनिर्देशनासाठी रेडिओ प्रणालींचा वापर थोड्याशा निराळ्या पद्धतीने करण्यात येतो. जहाजांची संभाव्य टक्कर टाळणे, सागरावरील जहाजांचे स्थान निश्चित करणे व जहाजाच्या बंदरातील प्रवेशाच्या वेळी बंदरातील सर्व जहाजांची स्थिती प्रवेशेच्छू जहाजाच्या अधिकाऱ्यास कळविणे यांसाठी निरनिराळ्या प्रणालींचा वापर करण्यात येतो.

टक्कर टाळण्यासाठी प्रत्येक जहाजावर रडार प्रणाली बसविलेली असते. अलीकडील काळात सागरावरील जहाजांचे आकारमान, संख्या व वेग यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे रडार संगणक संयुक्त प्रणालींचा वापर आवश्यक झाला आहे. महाप्रचंड तेलवाहू जहाजांवर व विशेष प्रकारचे कार्य करणाऱ्या काही जहाजांवर अशा संयुक्त प्रणाली बसविलेल्या असतात.

स्थाननिश्चितीकरिता वापरण्यात येणाऱ्या प्रणालींचे तीन प्रकार आहेत : (१) ८० किमी. पेक्षा अधिक अंतरावरील स्थाननिश्चितीकरिता वापरावयाच्या प्रणाली, (२) ५ किमी. ते ८० किमी. यांच्या दरम्यानच्या अंतरावरील स्थाननिश्चितीकरिता वापरावयाच्या प्रणाली, (३) ५ किमी. पेक्षा कमी अंतरावरील स्थाननिश्चितीकरिता वापरावयाच्या प्रणाली. ८० किमी. पेक्षा अधिक अंतरासाठी १% अचूकतेने स्थाननिश्चिती करणे जरूर असते व १५ मिनिटे इतका वेळ यासाठी लागला तरी चालतो. याकरिता ‘लोरान’ प्रणाली व जहाजावर वसविलेली दिशाशोधक यंत्रणा यांचा वापर करण्यात येतो. किनाऱ्यावरील रेडिओ शलाकेचा दिशाशोधनासाठी करण्यात येतो. जहाज किनाऱ्याकडे किंवा बंदराकडे येत असताना किंवा किनारी जहाजवाहतुकीसाठी ५ ते ८० किमी. या मर्यादेतील स्थाननिश्चिती करावी लागते. अशा परिस्थितीत १८०–८०० मी. इतक्या अचूकतेने व/ते ५ मिनिटांच्या अवधीत स्थाननिश्चिती करावी लागते. किनाऱ्यावरील रेडिओ शलाकांच्या साहाय्याने कार्य करणारी जहाजावरील दिशाशोधक यंत्रणा, जहाजावरील रडार व मार्गनिर्देशक साधनांची जागा, इतर धोक्याच्या जागा व किनाऱ्याची वैशिष्ट्ये ध्यानात येण्यासाठी रडारच्या साहाय्याने कार्य करणारी इलेक्ट्रॉनीय यंत्रणा यांचा वापर यासाठी करण्यात येतो. याच प्रणालीचा वापर ५ किमी. पेक्षा कमी अंतरावरील स्थाननिश्चितीकरिता म्हणजेच जहाज बंदरात प्रवेश करताना करता येतो. मात्र स्थाननिश्चितीची अचूकता सु. ५० मी. पर्यंत असावी लागते आणि स्थान व बंदरातील प्रवेशमार्गाची निश्चिती विनाविलंब करावी लागते.

बंदरातील जहाजांच्या नियंत्रणासाठीही रेडिओ प्रणालींचा वापर करण्यात येतो. यासाठी प्रामुख्याने किनाऱ्यावर वसविलेली अधिक अचूकपणे कार्य करणारी रडार यंत्रणा वापरण्यात येते. रडार शलाका विरूपित करून श्राव्य संकेतही जहाजाकडे पाठविले जातात. रडार प्रणालीमधील ऋण किरण नलिकेच्या पडद्यावरील चित्र दूरचित्र प्रेषण पद्धतीने प्रेषित करून कोणत्याही जहाजावरील दूरचित्र संचाच्या पडद्यावर बंदरातील सर्व जहाजांची स्थिती चित्ररूपाने उपलब्ध करण्याची व्यवस्था अलीकडे जगातील काही बंदरांमध्ये करण्यात आली आहे परंतु अशा प्रणालींचा वापर अद्याप सार्वत्रिक झालेला नाही.

महाप्रचंड जहाजांच्या वाहतूक नियंत्रणासाठी उपग्रह रेडिओ संदेशवहन प्रणालींच्या वापर करण्याच्या योजना आखण्यात आलेल्या आहेत. व्यापारी पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या जहाजांना मच्छीमारीसाठी योग्य स्थळांची शोधाशोध करावी न लागता योग्य ठिकाणी मच्छीमारीसाठी जाता यावे यासाठीही उपग्रह रेडिओ प्रणालींचा वापर करण्याची ही योजना आहे. अशा प्रकारच्या प्रणालींसाठी एल् पट्‌ट्यातील (३९० – १,५५० मेगॅहर्ट्‌झ पट्‌ट्यातील) कंप्रता नेमून देण्यात आल्या आहेत. यासाठी अमेरिकेच्या मॅरिसॅट, यूरोपियन स्पेस एजन्सीचा मॅरॉट्स व संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल मॅरिटाइम कन्सल्टेटिव्ह ऑर्गनायझेशनचा इमारसॅट असे तीन भूस्थिर (पृथ्वीभोवतील प्रदक्षिणेचा काल पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाच्या आवर्तकालाइतका म्हणजे २४ तास असलेले) उपग्रह सागरी वाहतूक नियंत्रणाच्या कार्यासाठी सोडण्याची योजना आहे. १९८०–९० या कालखंडात सागरी वाहतुकीचे नियंत्रण या उपग्रहांद्वारे रेडिओ प्रणालीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागेल [⟶ मार्गनिर्देशन रडार].

 

वैमानिकीय रेडिओ : विमान वाहतुकीच्या संदर्भात रेडिओ प्रणालींचा वापर तीन निरनिराळ्या उद्दिष्टांसाठी करण्यात येतो : (१) आकाशातील निरनिराळ्या विमानांमध्ये परस्परांशी आणि विमान व विमानतळ यांच्यामध्ये परस्पर संदेशवहन करण्यासाठी, (२) मार्गनिर्देशनासाठी आणि (३) विमानतळावरील विमानांच्या वाहतूक नियंत्रणासाठी.

संदेशवहनासाठी पूर्वी रेडिओ तारायंत्र प्रणालीचा वापर केला जात असे परंतु आता या प्रणालींचा वापर थांबविण्यात आला असून अति उच्च कंप्रता पट्‌ट्यातील कंप्रता वापरून रेडिओ दूरध्वनी प्रणालींचा उपयोग यासाठी करण्यात येतो. वर निर्देश केलेल्या तीनही प्रकारच्या प्रणालींसाठी विमानामध्ये वापरावयाच्या साधनसामग्रीच्या व आकाशकांच्या बाबतीत अपुरी जागा, विजेवर चालणाऱ्या इतर यंत्रांमुळे निर्माण होणारा व्यत्यय व विद्युत् पुरवठ्यांतील अस्थिरता यांमुळे मर्यादा पडतात. शिवाय सर्व प्रणाली खंड न पडता चालू राहणे आवश्यक असल्यामुळे एकाच वेळी व स्वतंत्रपणे अनेक परिवाह कार्यप्रवण ठेवावे लागतात आणि त्यामुळे प्रत्येक प्रणालीसाठी एकापेक्षा अधिक प्रेषकांची व ग्राहींची योजना करावी लागते.


विमानांच्या मार्गनिर्देशनासाठी रेडिओ प्रणालीचा वापर करण्यास प्रथम अमेरिकेने १९२० च्या सुमारास सुरुवात झाली. १९३५ मध्ये यूरोपात व अमेरिकेत विमान अवतरणासाठी रेडिओ उपकरण प्रणालींचा वापर सुरू झाला. या प्रणाली अति उच्च कंप्रता पट्‌ट्यात कार्य करीत असत. १९३६ पासून रेडिओ दिकसूचकाचा वापर दिशाशोधनासाठी करण्यात येऊ लागला व १९३८ पासून रेडिओ उच्चतामापकाचा वापर होऊ लागला. अमेरिकेमध्ये १९४० पासून सुधारित उपकरण अवतरण प्रणालीचा वापर सुरू झाला व युद्धोत्तर काळात या प्रणालीचा वापर सर्व विमानतळांवर करण्यात येऊ लागला.

विमानवाहतूक व्यवस्थेमध्ये मार्गनिर्देशनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेडिओ प्रणाली सामान्यपणे चार प्रकारात मोडतात : (१) विमान विमानतळापासून दूर अंतरावर व मार्गस्थ असताना त्याच्या मार्गनिर्देशनासाठी वापरावयाच्या प्रणाली : यासाठी आवश्यक असणारे जमिनीवरील प्रेषक परस्परांपासून ३०० किमी. पेक्षा अधिक अंतरावर असतात. डेक्ट्रा, लोरान, नव्हाऱ्हो वगैरे प्रणालींचा यांमध्ये अंतर्भाव होतो. यांशिवाय विमानात बसविलेल्या स्पंद रडारचा व डॉप्लर रडारचाही [⟶ रडार] मार्गनिर्देशनासाठी उपयोग केला जातो. (२) विमानतळापासून मर्यादित अंतरापर्यंत विमान असताना मार्गनिर्देशनासाठी वापरावयाच्या प्रणाली : यासाठी जमिनीवर परस्परांपासून ३०० किमी. पेक्षा कमी अंतरावर प्रेषक बसविलेले असतात. विमानवाहतूक नियंत्रक प्रणालीचा व टाकान प्रणालीचा (वैमानिकास आपले नेमके स्थान जाणून घेण्यास मदत करणाऱ्या प्रणालीचा) वापर या विभागात करतात. या प्रणालीच्या बरोबरच संगणकाचा वापर वाहतूक नियंत्रणासाठी आता केला जातो. १९५० पर्यंत रेडिओ परास प्रणाली या विभागात वापरीत असत परंतु आता ती कालबाह्य झाली आहे. (३) विमानतळाच्या परिसरात विमान प्रवेश करीत असताना व अवतरण करीत असताना मार्गनिर्देशनासाठी वापरावयाच्या प्रणाली : यासाठी वापरावयाचे रेडिओ प्रेषक विमानतळापासून सु. १०० किमी. पर्यंतच्या परिसरात असतात. उपकरण अवतरण प्रणाली, अचूक प्रवेश रडार, विमानात बसविलेला भूपृष्ठभाग स्थितिदर्शक इ. प्रणालींचा व उपकरणांचा वापर या विभागात केला जातो. (४) प्रत्यक्ष विमानतळ विभाग : विमानतळावर उतरलेली विमाने व विमानतळावर धावणारी इतर वाहने यांच्याशी नियंत्रण मनोऱ्यामधून सातत्याने रेडिओ संपर्क साधला जातो. अति उच्च कंप्रता पट्‌ट्यामधील ठराविक कंप्रतेवर कार्य करणारी रेडिओ दूरध्वनी प्रणाली यासाठी वापरतात.

वरील विविध प्रणालींशिवाय देशातील आणि परदेशांतील इतर विमानतळांशी रेडिओ तारायंत्र प्रणालींच्या साहाय्याने सतत संपर्क ठेवला जातो व विमानवाहतुकीसंबंधी व हवामानविषयक माहितीची देवाणघेवाण केली जाते. यासाठी दूरमुद्रण परिवाह राखून ठेवलेले असतात.

वैमानिकीय मार्गनिर्देशनासाठी उपग्रहाद्वारे कार्य करणाऱ्या रेडिओ संदेशवहन प्रणालींचा उपयोग करण्याच्या योजना आखण्यात आलेल्या असून १९८०–९० या दशकात अशा प्रणालींचा वापर यासाठी होऊ लागेल. [⟶ मार्गनिर्देशन].

 

चल रेडिओ : रेडिओ प्रेषक व रेडिओ ग्राही यांपैकी एक किंवा दोन्ही यंत्रणा वाहनांमध्ये बसविलेल्या असून चालत्या वाहनामधून संदेशवहन चालू ठेवता येण्याची व्यवस्था असलेली रेडिओ प्रणाली. फक्त जमिनीवर धावणाऱ्या वाहनांशी संबंधित असलेल्या प्रणालींबाबत ‘चल रेडिओ’ ही संज्ञा वापरली जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांमधील डिट्रॉइट (मिशिगन) या शहरातील पोलीस खात्याने १९२२ मध्ये अशा प्रणालीचा वापर करण्यास प्रथम सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जगातील बहुतेक सर्व देशांत अनेक क्षेत्रांमध्ये अशा प्रकारच्या प्रणालींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला.

चल रेडिओ प्रणाली म्हणजे रेडिओ दूरध्वनी प्रणालीच असते. सुरुवातीला अशा प्रणालींमध्ये मुख्य प्रेषण केंद्रामधून संकेत प्रेषण केले जात असे व एक किंवा अनेक फिरत्या वाहनांत बसविलेल्या रेडिओ ग्राहींकडून संकेत ग्रहण केला जात असे. हे संदेशवहन त्यामुळे फक्त एकमार्गी होऊ शकत असे. सध्या वापरात असलेल्या प्रणालींमध्ये एक मुख्य केंद्र असतेच परंतु कित्येक वाहनातही प्रेषक ग्राही (रेडिओ प्रेषक व ग्राही यांचा संयोग करून तयार केलेले एकत्रित संच ट्रान्सिव्हर) बसविलेले असतात व त्यामुळे द्विमार्गी संदेशवहन करता येते. अशा प्रत्येक प्रणालीसाठी विशिष्ट कंप्रता नेमून दिलेली असते व त्या कंप्रतेला मेलन करून प्रणालीमधील प्रत्येक ग्राही सर्वकाळ चालू ठेवावी लागते.

चल रेडिओ प्रणालींमध्ये सुरुवातील परमप्रसर विरूपणाचा वापर केला जात असे. संदेशवहनासाठी मध्यम कंप्रता पट्‌ट्यातील कंप्रतेचा वापर केला जाई परंतु कंप्रता विरूपण प्रणालीच्या गोंगाट व व्यत्यय यांचे दमन करण्याच्या गुणधर्मामुळे आता चल रेडिओ प्रणालींमध्ये कंप्रता विरूपणाचा वापर सर्वत्र सुरू झाला आहे. अशा प्रणालींमध्ये अरुंद पट्टा कंप्रता विरूपणाचा वापर करण्यात येत असून ± १५ किलोहर्ट्‌झ कंप्रता विचलनाची योजना असते. १९५० नंतर यूरोप आणि अमेरिकेतील शहरांत चल रेडिओसाठी नेमून दिलेले कंप्रता पट्टे अपुरे पडू लागले व त्यामुळे तेथे कंप्रता विचलनाची मर्यादा काही कंप्रता पट्‌ट्यांमध्ये ± ५ किलोहर्ट्‌झ इतकी कमी करण्यात आली. चल रेडिओच्या अशा प्रत्येक परिवाहासाठी फक्त १५ किलोहर्ट्‌झ रुंदीचा कंप्रता पट्टा नेमून दिला जातो परंतु अजून बऱ्याच देशांत व भारतातही ± १५ किलोहर्ट्‌झ कंप्रता विचलनाचा वापर केलेल्या प्रणाली वापरात आहेत.

चल रेडिओसाठी ३०–५०, १५२–१७४, ४०६–४२०, ४५०–४७० व ८०६–९४७ मेगॅहर्ट्‌झ या कंप्रता पट्‌ट्यांपैकी ठराविक परिवाह नेमून दिलेले आहेत. अशा प्रणालींमध्ये एक मुख्य केंद्र व अनेक चल उपकेंद्रे असतात तेव्हा मुख्य केंद्रातील प्रेषकाची शक्ती संदेशवहनाच्या अपेक्षित पल्ल्यानुसार १०० वॉटपासून २५० वॉटपर्यंत ठेवण्यात येते. चल प्रेषकांची शक्ती १० ते ३० वॉट या मर्यादेत असते. हातात बाळगावयाचे प्रेषक ग्राही संचही उपलब्ध असून त्यांची शक्ती २·५–५·० वॉट या मर्यादेत असते. वाहनाबरोबर उदग्र आकाशक वापरावे लागतात. त्यामुळे चल प्रणालीमध्ये उदग्र ध्रुवणाच्या तरंगांचा वापर नेहमीच केला जातो. चल रेडिओ प्रणालींचा पल्ला जास्तीत जास्त ८० किमी. पर्यंत असतो. [⟶ रेडिओ प्रेषक].

 

कोशीय चल रेडिओ : या पद्धतीत प्रेषणाचे कार्यक्षेत्र अनेक कोशांत विभागले जाते. प्रत्येक कोशाच्या मध्यभागी एक आधार प्रेषण केंद्र असते. त्याची प्रेषण व्याप्ती १५ ते १६ किमी. त्रिज्येच्या वर्तुळाकार क्षेत्राएवढी असते. प्रत्येक केंद्राला वेगळी कंप्रता दिलेली असते परंतु जर कोशकेंद्रांतील अंतर बरेच असेल, तर अशा अनेक केंद्रांना एकच कंप्रता दिलेली असते. या पद्धतीमुळे ज्या भागात चल केंद्रांची बरीच गर्दी असेल अशा सर्व केंद्रांतील संदेशवहनाचे कार्य अधिक सुलभपणे हाताळता येते.

प्रेषणाचे कार्यक्षेत्र वाढवावयाचे असेल, तर अस्तित्वात असलेल्या कोशांच्या बाहेर नवीन कोशकेंद्रे निर्माण करतात. एखाद्या कोशातील चल केंद्रांची संख्या वाढली, तर अशा कोशांचे अनेक उपकोशांत विभाजन करून प्रत्येक उपकोश आधार केंद्राला वेगळी कंप्रता नेमून दिली जाते. या पद्धतीत जमिनीवरील दूरध्वनी यंत्रणा व चल रेडिओ केंद्र यांच्यातील संदेशवहन संगणकाच्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.


उपयोग : पोलीस दले, अग्निशामक दले, महामार्ग दुरुस्ती दले, वीज पुरवठा दुरुस्ती दले, दूरध्वनी दुरुस्ती दले, नैसर्गिक वायू व पेट्रोल वाहक नळांची दुरुस्ती करणारी दले, वनरक्षक दले, मालवाहतूक करणारी वाहने, आगगाड्या, शहरांतील वाहतूक व्यवस्था, भाडोत्री मोटारगाड्या (टॅक्सी) यांच्याकडून चल रेडिओचा वापर केला जातो. यांशिवाय शहरातील निरनिराळ्या सेवा संस्था, वृत्त संस्था, संकटकाळी मदत करणाऱ्या संघटना यांच्याकडूनही यूरोप व अमेरिकेतील मोठ्या शहरांत चल रेडिओ प्रणालींचा वापर केला जातो. प्रचंड व्यापारी शेते व साखर कारखान्यांशी निगडति असलेली शेतीवाडी येथे काम करणाऱ्या व दूर अंतरावर विखुरलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर संपर्क ठेवण्यासाठी सुद्धा या प्रणालींचा वापर अलीकडे करण्यात येऊ लागला आहे. युद्ध आघाडीवर व सैनिकी तळावर तर सर्व प्रकारच्या कामांत सुसूत्रता राखण्यासाठी व टेहेळणी तळावर तर सर्व प्रकारच्या कामांत सुसूत्रता राखण्यासाठी वे टेहेळणी कार्याचे नियंत्रण करण्यासाठी या प्रणाली अतिशय उपयुक्त ठरतात. पाश्चात्य देशांत वैयक्तिक पातळीवर संदेशवहन करण्यासाठीही अलीकडे अशा प्रणालींचा वापर सुरू झाला आहे.

चल रेडिओ प्रणालीमधील चल प्रेषक व ग्राही यांसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा विजेरीमधून विद्युत् पुरवठ्यापासून घेता येतो. ट्रँझिस्टरसारख्या घन अवस्था प्रयुक्तींमुळे चल रेडिओ सामग्रीचे वजन, आकारमान व विद्युत् शक्तीची गरज यांमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे चल रेडिओ प्रणालीचा वापर अधिक सुलभपणे करता येतो. या प्रणालीचा प्रसार वाढण्यास ही परिस्थिती उपकारक ठरली आहे.

पोलीस खात्यामध्ये अलीकडील काळात चल रेडिओ प्रणालीबरोबर संलग्नपणे संगणकाचा वापर करण्यात येतो. तीच्या संकलनासाठी अशा संलग्न प्रणाली अतिशय उपयुक्त ठरतात.

 

हौशी रेडिओ : (हॅम रेडिओ). खाजगी व्यक्तींकडून परस्परांशी छंद म्हणून केले जाणारे रेडिओ संदेशवहन. यासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये हौशी रेडिओची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे : हौशी व्यक्तींकडून चालविली जाणारी तंत्रविषयक स्वयं प्रशिक्षण, परस्परांशी संदेशवहन व तांत्रिक संशोधन या गोष्टींशी संबंधित सेवा. अर्थार्जनाचा हेतू न ठेवता केवळ वैयक्तिक उद्देशाने ज्याला रेडिओसंबंधीच्या तंत्रामध्ये रस आहे अशा व्यक्तीला येथे ‘हौशी’ म्हणून संबोधले आहे. या हौशी व्यक्तींमुळे रेडिओ तंत्रामध्ये काही महत्त्वाचे शोध (उदा., एस्. व्हेरिअन यांनी सूक्ष्मतरंग निर्मितीकरिता क्लायस्ट्रॉन प्रयुक्तीचा लावलेला शोध) तर लागेलच पण आणीबाणीच्या व महत्त्वाच्या वेळी देशाच्या संरक्षण कार्याकरिता यामुळे अनेक स्वयंशिक्षित तंत्रज्ञ व संदेशवहन चालक उपलब्ध झाले. प्रारंभीच्या म्हणजे १९१०–२० या काळात रेडिओ प्रेषण अशा हौशी व्यक्तींमार्फतच करण्यात येत होते. हौशी रेडिओ प्रणाली म्हणजे द्विमार्गी रेडिओ तारायंत्र व दूरध्वनी प्रणाली असते. प्रत्येक हौशी केंद्रामध्ये रेडिओ प्रेषक व रेडिओ ग्राही असून मॉर्स चावीने तारायंत्र संदेशवहन करण्याची यंत्रणा व असे संकेत ग्रहण करण्याची सोय अनुक्रमे प्रेषक व ग्राही यांच्यामध्ये उपलब्ध असते. सामान्यपणे या हौशी व्यक्ती परस्परांशी ओळख करून घेऊन हवामान, कुटुंब, शाळा, व्यवसाय, खेळ व क्रीडा, तांत्रिक विषय वगैरे विषयांसंबंधी रेडिओ प्रणालींद्वारे अनौपचारिक गप्पा मारतात.

हौशी रेडिओ केंद्र चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो. असा परवाना भारत सरकारच्या दूरसंचरण मंत्रालयातील बिनतारी संदेशवहन सल्लागार यांच्या कार्यालयाकडून दिला जातो. प्रत्येक रेडिओ हौशी व्यक्तीला एक संपर्क संकेत नेमून दिला जातो. दुसऱ्या रेडिओ हौशी व्यक्तीशी संपर्क साधताना या संपर्क संकेताने सुरुवात करावी लागते. परवाना मिळविण्यासाठी कमीत कमी दर मिनिटास पाच शब्द इतक्या वेगाने मॉर्स संकेतन करता येणे व रेडिओसंबंधीचे मूलभूत तांत्रिक ज्ञान आणि रेडिओ संदेशवहनविषयक नियमांची माहिती असणे आवश्यक असते. प्रेषकाच्या शक्तीसंबंधी परवान्यामध्ये मर्यादा नमूद करण्यात येते. संदेशवहनाच्या कोणत्या पद्धती वापरता येतील याचाही उल्लेख परवान्यामध्ये असतो. सामान्यतः तारायंत्र व परमप्रसर विरूपित दूरध्वनी संदेशवहन करता येते. अमेरिकेमध्ये कंप्रताविरूपित दूरध्वनी संदेशवहन, एक पट्टा दूरध्वनी संदेशवहन, रेडिओ दूरमुद्रक संदेशवहन, ⇨अनुचित्र प्रेषण, दूरचित्रवाणी प्रेषण व स्पंद संदेशवहन यांनाही परवानगी असते. तेथे रेडिओ हौशींसाठी स्वतंत्र संदेशवहन उपग्रहांची (उदा., ऑस्कर उपग्रह मालिका) सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे उपग्रह संदेशवहनविषयक प्रयोगही रेडिओ हौशींना करता येतात.

रेडिओ हौशींना विशिष्ट प्रकारची मान्यताप्राप्त साधनसामग्री वापरली पाहिजे असे बंधन नसते. ते स्वतः हवी ती साधनसामग्री (प्रेषक, ग्राही, आकाशक इ.) तयार करू शकतात बाजारांतून सुट्या भागांचा ‘तयार संच’ घेऊन साधनसामग्री संकलित करू शकतात किंवा संपूर्ण तयार साधनसामग्री वापरू शकतात. मात्र प्रेषित केलेल्या संकेतांची गुणवत्ता विशिष्ट दर्जाची असली पाहिजे, असे बंधन पाळावे लागते.

मध्यम कंप्रता व उच्च कंप्रता पट्‌ट्यांतील पुढील विशिष्ट पट्टे हौशी रेडिओसाठी राखून ठेवण्यात आले आहेत : १·८–२·०, ३·५–४·०, ७·०– ७·३, १४·०–१४·३५, २१·०–२१·४५, २८·०–२९·७ मेगॅहर्ट्‌झ. यांशिवाय पाश्चात्य देशांत अति उच्च कंप्रता पट्‌ट्यापासून सूक्ष्मतरंग पट्‌ट्यापर्यंत ठराविक कंप्रता पट्टे हौशी रेडिओसाठी राखून ठेवलेले आहेत.

रेडिओ हौशी व्यक्ती अडचणींच्या वेळी व संकटकाळी मदत मिळविण्यासाठी महत्त्वाचे कार्य करू शकतात. युद्धकाळात मात्र बहुतेक सर्व देशांत हौशी रेडिओ परवाने रद्द करण्यात येतात व साधन सामग्री सरकारकडून ताब्यात घेतली जाते.

 

सैनिकी रेडिओ : पहिल्या महायुद्धात नाविक लढायांखेरीज रेडिओ प्रणालींचा फारसा उपयोग करण्यात आला नाही. मात्र युद्धाच्या अखेरच्या काळात तोफखाने ओळखून काढणाऱ्या काही विमानांवर रेडिओ प्रेषक बसविण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात सैनिकी रेडिओ संदेशवहनाचा फार मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. रणगाड्यांसारखे आघाडीवरील चल विभाग व मुख्य ठाणे यांच्यात सतत संपर्क साधण्यासाठी रेडिओ संदेशवहनाचा उपयोग करण्यात आला. मध्येच पकडले जाण्याची शक्यता असलेल्या सर्व सैनिकीसंदेशांचे सामान्यतः संकेतन करतात मात्र काही विशिष्ट परिस्थितींत वाणी संदेश तसेच पाठवितात. सैनिकी कामासाठी सर्व रेडिओ कंप्रता पट्टे वापरात आणले जाणे शक्य असते. दुसऱ्या महायुद्धात दीर्घ अंतरावरील संदेशवहन पूर्णपणे लघुतरंगांमार्फत करण्यात येत असे. आता उपग्रहांच्या विकासामुळे अधिक विश्वसनीय व अचूक अशा सूक्ष्मतरंग संदेशवहन प्रणाली उपलब्ध झालेल्या आहेत. सैनिकी रेडिओ संदेशवहनातील मुख्य अडचण म्हणजे शत्रूकडून त्यात व्यतिकरण व अडथळे होण्याची शक्यता असते. अतिशय दिशिक आकाशक प्रणाली, विविध शोधक तंत्रे इत्यादींचे वापर केल्यास ही अडचण कमी होण्यास मदत होते.

विमानांना मार्गदर्शन करणे, तोफांचे नेम धरणे, क्षेपणास्त्रांचे दूरवर्ती नियंत्रण, रडार व उपग्रह निरीक्षणांद्वारे शत्रूच्या हालचालींची टेहळणी वगैरे कामांतही रेडिओ प्रणालींचा महत्त्वाचा उपयोग होतो. [⟶ संदेशवहन, सैनिकी].


 रेडिओ सूचना प्रणाली : (रेडिओ पेजिंग). डॉक्टर, विक्रेते, वार्ताहर, क्षेत्रीय अभियंते यांसारख्या व्यक्तींशी जरूरीच्या वेळी संपर्क साधण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येते. अशा व्यक्ती त्यांच्या दूरध्वनीपासून दूर असतील, तेव्हा त्यांच्या खिशात एक इशारा देणारी छोटी प्रयुक्ती ठेवलेली असते आणि ती दूरवर्ती नियंत्रणाने कार्यान्वित करून त्यांची जरूरी असल्याची सूचना त्यांना देता येते. रुग्णालयातील कक्षांच्या भिंतींमध्ये किंवा छतामध्ये बसविलेल्या तारांद्वारे प्रवर्तनाने डॉक्टरांच्या खिशातील प्रयुक्ती कार्यान्वित करण्यात येते. या व्यवस्थेत एकमार्गी निवडक संदेशवहनाची सोय केलेली असते. अशा व्यवस्थेच्या वर्गणीदार व्यक्तीशी संपर्क साधल्यावर ती व्यक्ती पूर्वनिर्धारित क्रिया (उदा., जवळात जवळच्या दूरध्वनींवरून तिच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधणे) करते. यात वापरण्यात येणारी कंप्रता श्राव्य वा नीच रेडिओ मर्यादेतील असू शकते आणि ग्राही निवडलेली सूचक कंप्रता ग्रहण करेल अशा प्रकारे काटेकोरपणे मेलित केलेला असतो. ही प्रणाली मर्यादित क्षेत्रातच उपयोगात आणता येते आणि ती मोठ्या क्षेत्रात वापरावयाची झाल्यास सामान्यतः वाणी संदेशवहन आवश्यक होते व त्याकरिता अति-उच्च वा अत्याधिक-उच्च कंप्रता पट्ट्यांतील वाहक कंप्रता-परमप्रसर वा कंप्रता-विरूपण करून वापरावी लागते. जर ‘मुख्य कार्यालयात परत या’ अथवा ‘जवळात जवळच्या दूरध्वनीद्वारे मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा’ एवढीच सूचना द्यावयाची असल्यास साधी गजरवजा सूचना वापरता येते व ती कितीही व्यक्तींच्या निवडीसाठी उपयोगात आणता येते.

नागरिक पट्टा रेडिओ : यात व्यवसायविषयक वा व्यक्तिगत संदेशवहनासाठी किंवा दूरवर्ती नियंत्रणासाठी १५ ते २५ किमी. कक्षेत वापरावयाच्या रेडिओ प्रणालींचा अंतर्भाव होतो. वाणी संदेशवहन व दूरवर्ती नियंत्रण (उदा., मोटार गॅरेजची दारे उघडण्यासाठी) यांकरिता २७ मेकॅहर्ट्‌झच्या व ४६५ मेगॅहर्ट्‌झच्या जवळपासच्या कंप्रतांचे परिवाह आणि विमानाच्या प्रतिकृतींच्या नियंत्रणासाठी ७५ मेगॅहर्ट्‌झवर केंद्रित झालेला पट्टा उपलब्ध आहेत. अमर्याद स्थानिक व्यतिकरण टाळण्यासाठी अमेरिकेत या प्रणालींवर कडक अटी घालण्यात आलेल्या आहेत. प्रेषकाची शक्ती व आकाशकाची उंची यांच्या कमाल मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. फक्त जर समाधानकारक दूरध्वनी सेवा उपलब्ध नसेल, तरच व्यक्तीगत बोलाव्यांना (उदा., दूरच्या मुक्काम स्थळापासून अगर आणीबाणी असल्यास) परवानगी आहे पण संभाषणाची कमाल वेळ पाच मिनिटे इतकी मर्यादित ठेवण्यात आलेली आहे.

दूरवर्ती नियंत्रण रेडिओ प्रणाली : कित्येक परिस्थितींत नियंत्रक व सूचक संकेत तारेद्वारे पाठविता येत नाहीत. उदा., जहाजाची प्रतिकृती, अपुऱ्या प्रकाशामुळे केवळ उपकरणांच्या मदतीने उतरणारे विमान किंवा कक्षेत सोडण्यात येणारे अवकाशयान यांसारख्या गतिमान वस्तूंचे नियंत्रण. या परिस्थितीत रेडिओ नियंत्रण उपयोगात आणता येते. नियंत्रणासाठी संहिताबद्ध संकेत वाहक कंप्रतेच्या विरूपणाकरिता वापरण्यात येतात व गतिमान वस्तूवर या कंप्रतेला कायमचा मेलित केलेला ग्राही बसविलेला असतो. नियंत्रण हे जहाज प्रतिकृतीवरील विद्युत् चलित्र (मोटर) चालू वा बंद करणारे अभिचलित्र चालविण्यासाठी साध्या चालू बंद संकेताच्या स्वरूपात असते किंवा स्वयंचलितपणे वा अपुऱ्या प्रकाशात उतरणाऱ्या विमानाची उंची, दिगंश, उन्नतांश व वेग नियंत्रित करणारी संहिताबद्ध संकेत मालिका या स्वरूपात असू शकते. [⟶ दूरवर्ती नियंत्रण प्रणाली].

पहा : आकाशक उपग्रह संदेशवहन तारायंत्रविद्या दूरचित्रवाणी दूरध्वनिविद्या रेडिओ ग्राही रेडिओ प्रेषक रेडिओ प्रेषण विरूपण सूक्ष्मतरंग.

संदर्भ : 1. Anderson, E. W. The Principles of Navigation, London, 1966.

    2. Carlson, A. B. Communication Systems, New York, 1975.

    3. Carr, J. J. Elements of Electronic Communications, Reston, Va., 1978.

    4. Filpowsky, R. F. Muehldorf, E. I. Space Communications Systems, Englewood Cliffs, N. J. 1965.

   5. Fraser, W. Telecommunications, London 1967.

   6. Gatland, K. W. Ed., Telecommunications Satellites, Englewood Cliffs, 1964.

   7. Gupta, M. L. Electronic and Radio Engineering, Delhi, 1969.

   8. Jaffe, L. Communications in Space, New York, 1966.

   9. Martin, J. Telecommunications and the Computer, Englewood Cliffs, N. J., 1976.

  10. Radio Society of Great Britain, Radio Communication Handbook, London, 1968.

  11. Rajan, M. S. The Telecom Story, New Delhi, 1978.

  12. Ryder, J. D. Electronic Fundamentals and pplications, Englewood Cliffs, N. J., 1975.

  13. Sheingold, A. Fundamentals of Radio Communications, New Delhi, 1961.

  14. Shrader, R. L. Electronics Communications, 1980.

  15. Terman, F. E. Electronic and Radio Engineering, Tokyo, 1955.

जोशी, के. ल. भदे, व. ग.