चौशिंगा हरणांच्या जातीचा चार शिंगे असलेला हा प्राणी गो-कुलातील टेट्रासेरस  वंशाचा आहे. याचे शास्त्रीय नाव टेट्रासेरस क्वाड्रिकार्निस  असे आहे. टेट्रासेरस  वंशात एवढी एकच जाती आहे. याचे चौशिंगा हे नाव इंग्रजी भाषेत देखील रूढ झालेले आहे. हिमालयाच्या दक्षिणेस, मलबार किनारा सोडून, हा सगळीकडे आढळतो. डोंगराळ जंगलात राहणारा हा प्राणी दाट जंगलात अथवा अरण्यात मात्र राहत नाही. ज्या ठिकाणी गवत उंच वाढलेले असते, अशी जागा याला विशेष पसंत पडते. कारण संकटाच्या वेळी त्याला उंच गवतात दडून बसता येते. गवत हे याचे एकमेव खाद्य होय. याला वरचेवर पाणी प्यावे लागत असल्यामुळे पाण्यापासून तो फार दूर जात नाही.

चौशिंगा

डोक्यासकट याच्या शरीराची लांबी सु. एक मी., शेपटीची लांबी १२-१३ सेंमी. आणि खांद्याजवळ उंची सु. ६५ सेंमी. असते. अंगावरील केस जाडेभरडे व आखूड असून त्यांचा रंग तांबूस तपकिरी असतो वयस्कर नराचा रंग पिवळसर असतो खालची बाजू पांढरी असते. प्रत्येक पायाच्या पुढच्या बाजूवर काळा पट्टा असतो. नराला चार (दोन जोड्या) शिंगे असतात मादीला ती मुळीच नसतात. शिंगे आखूड व गुळगुळीत असतात मागच्या जोडीतील शिंगे ८—१० सेमी. आणि पुढच्या जोडीतील २-३ सेमी. लांब असतात. गो-कुलात चार शिंगे असणारा हा एकमेव प्राणी आहे. यांचे एक असामान्य लक्षण म्हणजे नर आणि मादी या दोहोंच्याही मागच्या पायांच्या खोट्या (अधांतरी असलेल्या) खुरांच्यामध्ये गंध ग्रंथी (ज्यांच्या स्रावाला वास येतो अशा ग्रंथी) असतात. या समूहातील इतर प्राण्यांमध्ये त्या नसतात.

चौशिंगे संघचारी नसतात. ते एकएकटे वा जोडीजोडीने असतात. हा प्राणी अतिशय चपळ पण भित्रा आहे.

पावसाळा हा याच्या समागमाचा काळ होय. सुमारे १८३ दिवसांच्या गर्भावधीनंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मादी १—३ पिल्लांना जन्म देते. पिल्ले सहज माणसाळतात.

भट, नलिनी