प्रक्रियावादी मानसशास्त्र : (फंक्शनल सायकॉलॉजी). एक मानसशास्त्रीय संप्रदाय. १८७९ मध्ये, एक स्वतंत्र विज्ञान या नात्याने मानसशास्त्राचा उदय झाल्यानंतर, या शास्त्राचा अभ्यासविषय म्हणून कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा, अभ्यासासाठी कोणती पद्धती अवलंबावी व मानसशास्त्रीय अभ्यासाचे प्रयोजन काय असावे, या प्रश्नांवर मतभिन्नता निर्माण झाली व ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९२०) यांच्या भूमिकेपेक्षा व्यापक अशी भूमिका अनेक मानसशास्त्रज्ञांनी घेतल्यामुळे प्रक्रियावादी मानसशास्त्र अस्तित्वात आले, विकास पावले.

व्हुंट यांनी मानसशास्त्राचे उद्दिष्ट चेतन अथवा जाणीवयुक्त अनुभवाच्या पृथक्‌ पृथक्‌ घटकांच्या प्रयोगनिष्ठ अभ्यासापुरतेच मर्यादित ठेवले होते. साहजिकच व्हुंट यांनी अंतर्निरीक्षण हीच मानसशास्त्रीय अभ्यासाची पद्धती ठरविली होती. व्हुंट यांचे विद्यार्थी ⇨ ई. बी. टिचनर (१८६७-१९२७) यांनी या विचारसरणीचा निष्ठेने पुरस्कार केला व वर्तनाचा अभ्यास, व्यक्तिभिन्नतेचा अभ्यास, मानसशास्त्र व्यवहारोपयोगी बनवण्याचे प्रयत्‍न इत्यादींना विरोध दर्शविला.

व्हुंटप्रणीत मानसशास्त्र संकुचित आणि असमाधानकारक वाटू लागण्यास अनेक गोष्टी कारणीभूत झाल्या. ⇨चार्ल्‌स डार्विन (१८०९-१८८२) यांच्या उत्क्रांतिवादामुळे (१८५९) मानवाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. विविध जातींच्या प्राणिवर्तनाचा अभ्यासही १८७० ते १९०० या दरम्यान होऊ लागलेला होता. उत्क्रांतिसिद्धांतामुळे जीवशास्त्रीय तसेच विकासलक्षी दृष्टिकोन उदयास आले व माणसाचा वंशदाय, जन्मपूर्व व जन्मोत्तर विकास, त्या विकासाशी पारिसरिक घटकांचा असलेला संबंध, वंशदायभिन्नतेचा व परिसरभिन्नतेचा व्यक्तिभिन्नतेशी संबंध, व्यक्तिभिन्नतेचे मापन करण्याची व त्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या बनवण्याची शक्यता यांसारखे प्रश्न पुढे येऊ लागले होते. शिवाय जे. एम्‌. शार्को (१८२५-९३), प्येअर झाने (१८५९-१९४७), लाय बाल्ट, बर्नहाईम (१८४०-१९०९), योझेफ ब्रॉइयर (१८४२-१९२५), सिग्मंड फ्रॉइड (१८५६-१९३९) या मानसचिकित्सकांनी जाणिवेपलीकडील अबोध मनःक्षेत्राचे अस्तित्त्वही सिद्ध केलेले होते. अशा या वातावरणात जे. एम्‌. कॅटेल (१८६०-१९४४), ग्रॅनव्हिल स्टॅनली हॉल (१८४४-१९२४), सी. एच्‌. जड, ओस्वाल्ट क्यूल्पे (१८६२-१९१६), सी. ई. स्पीअरमन (१८६३-१९४५) ह्या व्हुंटच्या विद्यार्थ्यांनी तसेच ई. एल्‌. थॉर्नडाईक (१८७४-१९४९) व जे. बी. वॉटसन (१८७८- ) यांसारख्या इतरांनी चालविलेल्या संशोधनाचा परिणाम म्हणून १९०० ते १९२५ या काळात एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन पुढे आला. एक प्रकारची चळवळच अस्तित्वात आली. तिला प्रक्रियावाद (फंक्शनॅलिझम) ही संज्ञा प्राप्त झाली. कारण ‘फंक्शन’ हा शब्द (१) ‘प्रोसेस’ (प्रक्रिया) तसेच (२) प्रक्रियेवर अवलंबून असणारा परिणाम (इफेक्ट) वा तिच्यायोगे शक्य होणारी गोष्ट या दोन अर्थांनी वापरला जातो. प्रागतिक विचारसरणीचे मानसशास्त्रज्ञ असे प्रतिपादन करू लागले होते, की अवधान, संवेदन, स्मरण, कल्पना, विचार इत्यादींकडे मानसिक प्रक्रिया या नात्याने पाहिले पाहिजे, त्यांच्यामुळे व्यक्तीला परिसराशी मुकाबला करणे व अनुकूलन साधणे कसे शक्य होते हे स्पष्ट केले पाहिजे व त्या प्रक्रियांची फलदायकता वाढवण्याचे प्रयत्‍न केले पाहिजेत. या प्रतिपादनास अनुसरून प्रक्रियावादी मानसशास्त्रज्ञांनी पुढील तीन गोष्टींवर भर दिला : (१) व्यक्तीकडून कोणकोणत्या शारीरिक व मानसिक क्रिया होत असतात आणि त्या कोणत्या कारणांमुळे – का – (व्हाय), तसेच कोणत्या तऱ्हेने-कशा-(हाऊ) घडून येत असतात, हे अभ्यासणे (२) ह्या विविध मानसिक प्रक्रियांचे जीवनदृष्ट्या प्रयोजन काय असते त्या किमर्थ घडत असतात व त्यांच्याशी वांशदायिक तसेच पारिसरिक घटक कसे संबंधित असतात ते अभ्यासणे आणि (३) केवळ चेतन अनुभवाचे घटक एवढाच मानसशास्त्राचा अभ्यासविषय नसल्यामुळे अंतर्निरीक्षणाखेरीज इतरही पद्धतींचा अवलंब करणे.

प्रक्रियावादी मानसशास्त्राच्या उदयास ⇨विल्यम जेम्स (१८४२-१९१०) यांच्या लेखनाचाही हातभार लागला. जेम्स यांनी असे प्रतिपादन केले, की ‘चेतना (कॉन्शसनेस) ही मेंदूतील प्रक्रियांची आनुषंगिक निष्पत्ती (एपिफिनॉमेनन) नसून जीवनरक्षणार्थ उपयोगी पडणारा तो कारणिक घटक होय.’ या विचारसरणीने प्रभावित झालेले फलप्रामाण्यवादाचे पुरस्कर्ते ⇨ जॉन ड्यूई (१८५९-१९५२) यांनी असे प्रतिपादन केले, की प्रत्येक मनोव्यापारास व कृतीस काहीएक ‘अर्थ’ असतो, त्यांचे काहीएक कार्य असते, गरजा साध्य करून घेण्याची व्यक्तीची ती साधने असतात व असे असल्याने मानसशास्त्र हे शिक्षणादी क्षेत्रांत व्यवहारोपयोगी ठरले पाहिजे. जे. आर्‌. एंजेल (१८६९-१९४९) यांनीही जीवशास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारून असे म्हटले, की जटिल अशा परिसराशी अनुकूलन शक्य व्हावे म्हणूनच विविध प्रकारचे मनोव्यापार अस्तित्वात आले. प्रक्रियावाद ही संज्ञा प्रथम १८९८ मध्ये वापरण्यात आली ती ड्यूई व एंजेल यांच्या प्रतिपादनास अनुलक्षूनच. प्रक्रियावादी व जीवशास्त्रीय दृष्टिकोनांचे यूरोपमधील पुरस्कर्ते एद्‌वार क्लापारेद (१८७३-१९४०), डेव्हिड काट्झ (१८८४-१९५३) व एडगर रूबिन (१८८६ – ) हे होत.

प्रक्रियावादी मानसशास्त्राने प्राण्यांचे वर्तन, मनुष्याचे मनोव्यापार, मनोविकृती वगैरे भिन्नभिन्न विषयांच्या अभ्यासास चालना दिली, भिन्नभिन्न सिद्धांतांना अवसर ठेवला आणि नवनव्या अभ्यासपद्धती स्वीकारल्या. आपण एका विशिष्ट सिद्धांताशी बांधिलकी असलेल्या संप्रदायाचे आहोत, असे प्रक्रियावाद्यांनी कधीच मानले नाही. मानसशास्त्रात प्रक्रियावादी दृष्टिकोन बहुतांशी रुजला गेलेला असल्याने प्रक्रियावाद ही आता एक चळवळ म्हणून राहिलेली नाही.

संदर्भ : 1. Boring, E. G. History of Experimental Psychology, New York, 1950.

2. Woodworth, R. S. Sheehan, M. E. Contemporary Schools of Psychology, New York, 1964.

अकोलकर, व. वि.