पटकी : (कॉलरा). जठरांत्र मार्गातील (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणाऱ्या अन्नमार्गातील) अन्न किंवा पाणी यांमधून व्हिब्रिओ कॉलेरी  नावाच्या सूक्ष्मजंतूच्या संक्रामणापासून (संसर्गापासून) होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या रोगास पटकी म्हणतात. या रोगाला महामारी, विषूचिका, जरीमरी इ. नावेही आहेत. हे सूक्ष्मजंतू सूक्ष्मदर्शकाखाली स्वल्पविरामासारखे दिसतात म्हणून त्यांना कॉमा व्हिब्रिओ किंवा कॉमा बॅसिलस असेही म्हणतात. त्यांचे निरनिराळे प्रकार असून ते इनाबा, ओगावा, हिकोजिमा व एल टॉल या विशेष नावांनी ओळखले जातात.

हजारो वर्षांंपूर्वीपासून हा रोग मानवाला अधून मधून पछाडीत आला असावा. जुन्या संस्कृत वाङ्मयातून पटकीसारख्या साथीच्या रोगाची वर्णने आढळतात. भारतातील मोठ्या नद्यांच्या काठच्या प्रदेशातून हा रोग शतकानुशतके स्थानिक स्वरूपात अस्तित्वात आहे. पाश्चिमात्य देशांतून एकोणिसाव्या शतकापर्यंत अज्ञात असलेल्या या रोगाचा १८१७ ते १९२३ या काळात जगद्‌व्यापी साथीच्या स्वरूपात सहा वेळा तिकडे प्रादुर्भाव झाला. १९५८–७२ या काळात सातवी जगद्‌व्यापी साथ पसरली. या वेळी एल टॉल प्रकारचे सूक्ष्मजंतू कारणीभूत असल्याचे समजले. इंडोनेशियातील सूलावेसी (सेलेबीझ) बेटावर ही साथ सुरू होऊन अतिपूर्व भारत, मध्यपूर्व आफ्रिका व यूरोपातही ही साथ पसरली होती. दळणवळणाच्या वाढत्या सोयी विशेषेकरून आधुनिक हवाई वाहतूक या रोगाच्या साथीच्या वाढीस मदत करतात. पौर्वात्य देशांतून चीन हा एकमेव प्रदेश असा आहे की, जिथे कॉलरा बहुतकरून आढळत नाही, कारण चिनी लोक उकळलेले पाणी पितात, गरम चहा पितात आणि ताजा गरम भात खातात.

महाराष्ट्रात पटकी झालेल्या रुग्णांची संख्या, मृत्यू व प्रतिबंधक लस टोचलेल्या व्यक्तींची संख्या यांची १९६८ ते १९७२ या काळातील आकडेवारी खाली दिली आहे.

वर्ष 

लागण 

मृत्यू 

प्रतिबंधक लस टोचलेल्याव्यक्तींंची संख्या 

१९६८ 

३,०९१ 

३४० 

३९,३९,९०५ 

१९६९ 

७,३७३ 

८४२ 

१,०५,७१,४०५ 

१९७० 

३,२०८ 

२६७ 

५४,०८,४३३ 

१९७१ 

१,९५३ 

१९२ 

५७,४१,२७१ 

१९७२ 

२,००७ 

१९३ 

६५,१०,१८४ 

सूक्ष्मजंतू : व्हिब्रिओ कॉलेरी हा सूक्ष्मस्वल्पविरामाच्या आकाराचा चलनशील (हालचाल करणारा) सूक्ष्मजंतू असून तो ग्रॅमरंजक अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून न राहणारा) असतो. आंत्रमार्गात (आतड्यातील मार्गात) त्याचे प्रजनन होते परंतु श्लेष्मकलास्तराच्या (बुळबुळीत पातळ अस्तराच्या) उपकला कोशिकांच्या (पेशींच्या) थरापेक्षा खोलवर तो शिरत नाही. सबंध आंत्रमार्गात हे जंतू असतात आणि त्यांचे सर्वांत जास्त प्रमाण लघ्वांत्रात (लहान आतड्यात) असते. हे जंतू क्षारकीय (अल्कलाइन) परिसरात वाढतात आणि ते अंतर्विष व विशिष्ट एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) तयार करतात. यांपैकी म्युसिनेज नावाचे एंझाइम उपकला कोशिका मोठ्या प्रमाणात झडण्यास (अपपर्णन) कारणीभूत होते. अंतर्विषामुळे द्रवांची आणि विद्युत् विच्छेद्य (विद्युत् प्रवाहामुळे ज्यांच्या रेणूचे तुकडे पडतात अशा) पदार्थाची पारगम्यता वाढते. परिणामी रक्तप्रवाहातील हे पदार्थ आंत्र अवकाशिकेत (आतिल पोकळीत) उतरतात. झडलेल्या कोशिकांचे पुंजके, श्लेष्म्याचे (बुळबुळीत द्रव्याचे) थर, असंख्य व्हिब्रिओ व पाणी यांच्या मिश्रणापासून व पित्ताचा अभाव या कारणामुळे रोग्याला धुतल्या तांदळाच्या पाण्यासारख्या उलट्या व जुलाब होतात. तासाला एक लिटर याप्रमाणे मलविसर्जनातून शरीरातील द्रव निघून केल्यामुळे भयंकर निर्जलीकरण होते.

प्रसार : पटकीचे सूक्ष्मजंतू निसर्गात फक्त मानवातच रोगोत्पादक आहेत. ते इतर प्राण्यांत उदा., पशूंमध्ये वाढूनही त्यांना रोग होत नाही. मानवी शरीरात ते लघ्वांत्रात भरमसाठ वाढले, तरी रक्तप्रवाहात कधीही सापडत नाहीत. रोगलक्षणे नाहीशी झाल्यापासून ७-१० दिवसांतच रोग्याच्या मलातही ते सापडत नाहीत. म्हणजेच इतर रोगांप्रमाणे उदा., आंत्रज्वर (टायफॉइड) या रोगामध्ये रोगवाहक नसतात. फक्त रोगाचा प्रभाव असतानाच असंख्य सूक्ष्मजंतू रोग्याच्या मलातून बाहेर पडत असतात. काहीसे घाणेरडे पाणी आणि दमट कपडे यांमध्ये ते काही दिवसच जिवंत राहू शकतात. स्वच्छ पाण्यात ते फार दिवस जगू शकत नाहीत, तसेच उष्णता व अम्ले त्यांचा नाश करतात.

रोगाचा फैलाव रोग्याच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यामुळे होतो. असे दूषित पाणी अन्नपदार्थ किंवा दूध, फळे, भाज्या आदींवर शिंपडल्यास रोगाचा फैलाव होतो. रोग्याच्या विष्ठेशी किंवा वांतीशी प्रत्यक्ष संपर्क आला असता योग्य काळजी न घेतल्यास रोग होतो. पुष्कळ वेळा माशी रोगवाहक बनून रोगाच्या फैलावास कारणीभूत होते. गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांजवळील काही भागातून पटकी स्थानिक स्वरूपात अधूनमधून उद्‌भवते. बंगालमध्ये मे ते जुलै या महिन्यांत पावसाळ्याच्या सुरुवातीस बहुधा पटकी उद्‌भवते. काही भागांतून एकदा पटकी झाली की, वरील कारणांच्या जोडीस अस्वच्छता, मलमूत्रविसर्जनाची गैरव्यवस्था, दाट वस्ती, दारिद्र्य  इत्यादींची जोड मिळाल्यास ती वारंवार उद्‌भवत राहते.

एल टॉर प्रकारचे व्हिब्रिओ मात्र रोग बरा झाल्यानंतरही रोग्याच्या मलातून काही आठवडे किंवा महिनेही सापडतात म्हणजे या प्रकारात मानवी रोगवाहक असतात. फिलिपीन्समधील एक व्यक्ती आठ वर्षे अधूनमधून हे सूक्ष्मजंतू आपल्या विष्ठेतून टाकत असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारचे निरोगी रोगवाहक रोगाच्या जगद्‌व्यापी साथीस कारणीभूत असतात.

लक्षणे : रोगाचा परिपाक काल (सूक्ष्मजंतू शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) केवळ काही तास ते पाच दिवसांपर्यंतचा असून त्याची सुरुवात वेदना किंवा मुरडारहित एकाएकीच होणाऱ्या अतिसारापासून होते. अनियंत्रित सौम्य जुलाबातून प्रथम असेल तेवढा मल बाहेर पडतो आणि लगेचच मोठमोठाले धुतल्या तांदळाच्या पाण्यासारखे जुलाब आणि वांत्या सुरू होतात. उलट्या व जुलाब श्रमरहित जवळजवळ आपोआप होत राहतात आणि त्यावर नियंत्रण करणे अशक्य असते. कधीकधी जुलाब एवढे जोरदार असतात की, नळ संपूर्ण उघडल्याप्रमाणे धो धो वाहतात. या कारणामुळे  रोग्याच्या आजूबाजूच्या सर्वच वस्तू सूक्ष्मजंतूंनी दूषित होतात आणि जवळपासच्या माणसांना किंवा शुश्रुषा करणाऱ्यांना नेहमी संक्रामणाचा धोका असतो. शरीरातील द्रव कमी झाल्यामुळे निर्जलीकरण होते. त्वचेची प्रत्यास्थता (लवचिकपणा) कमी होऊन खालील ऊतकावर (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहावर) ती ताणल्यासारखी दिसते. डोळे खोल जाऊन गालफडे स्पष्ट दिसू लागतात. ओठ व जीभ कोरडी पडतात. भयंकर तहान लागते व आवाज घोगरा होतो. रोगी पूर्ण शुद्धीवर असतो, परंतु तो चिंताग्रस्त व अस्वस्थ होतो. निर्जलीकरण जसे चालू राहते तसा रक्तदाब कमी होतो. पोटऱ्यांतून व पाठीतून वेदनायुक्त असह्य गोळे येतात. ते वारंवार, जोरदार व अल्प काळ टिकणारे असतात. रोग्याचे तापमान प्राकृतिक (सर्वसामान्य) तापमानापेक्षा कमीच राहते. हातपाय थंडगार पडतात. मूत्रोत्सर्जन कमी कमी होत जाते. निर्जलीकरणाबरोबरच रक्ताची सांद्रता वाढत जाते. इलाज न केल्यास रोगी तीन ते पाच दिवसांत निर्जलीकरण व रुधिराभिसरणजन्य निपातामुले दगावतो.


कधीकधी रोगी संपूर्ण बरा होतो आणि त्याचे जुलाब बंद होताच त्याचा धोकाही टळतो. बऱ्या होणाऱ्या रोग्याचा रक्तदाब वाढू लागतो. त्याची नाडी सुधारते, त्वचारंग पालटतो, शारीरिक तापमान वाढू लागते.

रोगी सुधारताच तो लवकरच पूर्ववत दिसू लागतो. चेहऱ्यावर तजेला येतो, गाल फुगीर दिसतात व त्वचा पूर्ववत होते. रोग्याचे फलानुमान किती वेळानंतर बाहेरून जल पुन्हा नीलेतून शरीरात घालण्यास सुरुवात केली यावर अवलंबून असते. जल आणी विद्युत् विच्छेद्य पदार्थ जेवढे लवकर शरीरात देण्यात येतील तेवढा धोका कमी होतो. इलाज न केलेल्या रोग्यांत मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते, तर इलाज केलेल्यांत ते १–५% असते.

वर वर्णन केलेली लक्षणे सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या रोगात दिसतात. अतिसौम्य प्रकारच्या रोगात दोन–चार साधेच जुलाब होतात व निर्जलीकरण न होता लवकर बरे वाटू लागते. या प्रकाराल ‘शुष्क पटकी’ (कॉलरा सिक्का) म्हणतात. १२ वर्षांखालील मुलांतील रोगामध्ये मृत्यूचे प्रमाण १५–१७% असते.

चिकित्सा : तात्काळ इलाजांमध्ये शरीरातून निघून गेलेल्या जल आणि विद्युत् विच्छेद्यांची जागा परत व ताबडतोब भरून काढणे महत्त्वाचे असते. रोग्याचा चेहरा, नाडी, रक्तदाब, जुलाब व उलट्यांचे प्रमाण, लघवीचे प्रमाण यांवरून किती विद्युत् विच्छेद्यमिश्रित द्रव द्यावा लागेल याचा अंदाज करता येतो. सर्वसाधारणपणे २० लिटर वा त्याहून जास्त द्रव नीला अंतःक्षेपणाने द्यावा लागतो. टेट्रासायक्लीन किंवा फुराझोलिडीन यांसारखी औषधे तोंडाने देऊन पचल्यास व ती तीन दिवस दिल्याने नीलेतून द्यावयाच्या द्रवाचे प्रमाण कमी करता येते. ही औषधे आतड्यातील सूक्ष्मजंतूंना मारून त्यांची क्रियाशीलता नष्ट करतात. पटकीच्या रोग्याच्या नीला आकुंचित झाल्यामुळे लवकर सापडत नाहीत आणि म्हणून पुष्कळ वेळा नीलावेध शस्त्रक्रिया करावी लागते. रोग्याला अम्लरक्तता [रक्ताचे pH मूल्य कमी होणे ⟶ पीएच मूल्य] होते म्हणून रक्ताइतकीच संहती (द्रवातील प्रमाण) असलेला दोन लिटर लवण विद्राव दिल्यास एक लिटर समसंहतीचा सोडियम लॅक्टेटाचा विद्राव देतात. प्रत्येक लिटरमध्ये सोडियम क्लोराइड ५ ग्रॅ., सोडियम बायकार्बोनेट ४ ग्रॅ. आणि पोटॅशियम क्लोराइड १ ग्रॅ. या मिश्रणापासून बनविलेला लवण विद्राव उपयुक्त ठरलेला आहे. या विद्रावास ‘डाक्का-विद्राव ५-४-१’ असेही म्हणतात. कारण शरीरातून निघून गेलेले पोटॅशियमही परत भरणे जरूर असते. शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम असते म्हणून ते पाणी पिणे उपयुक्त ठरते. मोठ्या प्रमाणावर नीलेतून द्रव दिला जात असताना फुप्फुसशोथासारखे (फुप्फुसातील ऊतकांत मोठ्या प्रमाणावर द्रव साचून सूज  येण्यासारखे) उपद्रव होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे लागते. उलट्या थांबताच तोंडाने शक्य तेवढा द्रव द्यावा. शक्य असल्यास रबरी जठर नलिका काही तासांपर्यंत तशीच ठेवून तीमधून द्रव देता येतो. काही तज्ञांच्या मताप्रमाणे फक्त तोंडाने किंवा नासा-जठर नळीतूनच द्रवनाश भरून काढणे शक्य असून त्यात नीलेतून इलाज करण्यापेक्षा अत्यल्प धोका असतो.

प्रतिबंधात्मक इलाजांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक उपायांचा समावेश होतो. वैयक्तिक उपयांमध्ये अपचन टाळणे महत्त्वाचे असते. अपचनामुळे जठररसातील अम्लाची कमतरात उद्‌भवण्याचा संभव असतो. अम्ल पटकीच्या जंतूना मारक असते. कच्ची किंवा अतिपक्व झालेली फळे, कोणतेही कुजके-नासके अन्नपदार्थ टाळावे व शिजविलेले ताजे अन्न खावे. प्रवासात चहासारखे गरम पेय, लिंबूसरबत, शहाळ्याचे  पाणी, ताक किंवा दही हे पदार्थ घ्यावेत. तर आइसक्रीम वगैरे सर्व थंड पदार्थ टाळावेत. पिण्याचे व इतर पाणी उकळलेले असावे. प्रतिकॉलरा लस (कॉलरा सूक्ष्मजंतूपासून बनविलेले व्हॅक्सीन) टोचून घेणे विशेषेकरून साथीच्या प्रदेशात हितावह असते. ही लस ०·५ मिलि. पहिली मात्रा आणि ७ ते १० दिवसांनंतर १ मिलि. दुसरी मात्रा या पद्धतीने टोचतात. पहिल्या मात्रेनंतर सहाव्या दिवसापासून ते सहा महिनेपर्यंत प्रतिरक्षा मिळते. पटकीने कायम घर केलेल्या प्रदेशात दर सहा महिन्यांनी १ मिलि. मात्रा अनुवर्धक (प्रतिरक्षा टिकण्यासाठी नंतर दिलेली) म्हणून देतात.

काही देशांनी पिण्याच्या पाण्याची योग्यती काळजी, मलमूत्र विसर्जनाच्या अद्ययावत पद्धती व परदेशस्थ प्रवासी येतात त्या ठिकाणांवर सक्त देखरेख या उपायांचा अवलंब करून पटकीचा प्रादुर्भाव होऊ दिलेला नाही. भारतात बहुतेक सर्व राज्यांतून पटकी हा अधिसूचनीय (आरोग्याधिकाऱ्यास कळविण्याची सक्ती असलेला) रोग ठरविण्यात आला आहे. त्यामुळे साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. शक्य तेथे रोग्याचे अलगीकरण, त्याच्या मलमूत्राची योग्य ती विल्हेवाट लावणे, पिण्याच्या पाण्याचे क्लोरिनीकरण, अन्नपदार्थांचा माश्या, धुरळा वगैरेंपासून बचाव, माश्यांच्या नियंत्रणाकरिता डीडीटीचा उपयोग इ. उपाय साथीच्या वेळी आवश्यक असतात. मेळे, जत्रा, यात्रा अशा ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष काळची घ्यावी लागते. असा ठिकाणी प्रतिकॉलरा लस टोचणे, मलमूत्र विसर्जनाच्या सोयी, पिण्याच्या पाण्याची सोय या गोष्टींकडे  विशेष लक्ष पुरवावे लागते.

आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे पटकी हा ⇨ विलग्नवास (क्वारंटाइन) सक्तीचा असलेला रोग असून परिपाक काल पाच दिवसांचा धरला जातो. प्रत्येक देशाच्या आरोग्याधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांप्रमाणे वागण्याची मुभा असून लस टोचून घेतल्याचे वैध प्रमाणपत्र लक्षात घ्यावे लागते. संशयास्पद व्यक्तीला जास्तीत जास्त पाच दिवसांपर्यंत विलग्नवासात ठेवता येते. परदेशात प्रवासाकरिता विशिष्ट अधिकाऱ्यांच्या सहीशिक्क्यानिशी दिलेले कॉलरा लस टोचून घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : आयुर्वेदात विषूचिकेमध्ये याचा समावेश होतो, विषूचिकेमध्ये सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे हा विशेष असतो. ह्या रोगामध्ये जुलाब व उलट्या होत असतात. शरीर भराभर अशक्त व कृश होत जात असते. विकार सौम्य असल्यास आघाड्याचे मूळ पाण्यामध्ये उगाळून पाजावे. कारल्याच्या रसातून तिळाचे तेल पाजावे. कोवळ्या मुळ्याचा काढा पिंपळीचे चूर्ण घालून द्यावा. विकार तीव्र असल्यास कफज किंवा पित्तज वांतीमध्ये सांगितल्याप्रमाणे वांतीचे औषध देऊन वांती करवावी. नंतर लंघन द्यावे आणि टाचांना खुरपी तापवून डाग द्यावे किंवा ओरपावे. बिब्बा, चिंच व कुड्याचे मूळ ह्यांच्या गोळ्या करून थोड्या थोड्या वेळाने देत जाव्यात. संजीवनी किंवा विषूचिकादी वटी द्यावी.

पटवर्धन, शुभदा अ.

संदर्भ : 1. Davidson, S. Macleod, J. Eds. Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

    2. Ghosh, B. N. Treatise on Hygiene and Public Health, Calcutta, 1959. 

    3. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.

    4. Vakil, R.J. Udwadia, F. E. Diagnosis and Management of Medical Emergencies, Delhi, 1975.