शास्त्री (भट्टाचार्य), शिवनाथ : (३१ जानेवारी १८४७– ३० सप्टेंबर १९१९). बंगाली लेखक व ⇨ ब्राह्मो समाजाचे एक नेते. माजिलपूर (जि. चोवीस परगणा) येथे एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबात जन्म. संस्कृत विषयातील एम. ‍ए. तसेच १९६९ साली ब्राह्म धर्माची दीक्षा. ⇨ केशवचंद्र सेन यांच्याशी मतभेद होऊन शिवनाथांनी ‘साधारण ब्राह्मो समाज’ स्थापन केला (१८८१).

शिवनाथ शास्त्रींनी काव्य लिहून साहित्यक्षेत्रात प्रवेश केला. मेजबऊ (म. शी. मधली सून, १८७९), जुगांतर (१८९५) व नयनतारा या तीन कादंबऱ्या तसेच आत्मचरित (१९१८) आणि हिमाद्रिकुसुम (काव्य), रामतनु लाहिडी ओ तत्कालीन बंगसमाज (इतिहास) ही त्यांची पुस्तके उल्लेखनीय होत.

सनातनी हिंदू धर्माचा त्याग करून ब्राह्म धर्माचा स्वीकार करताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांना घरातून हाकलून देण्यात आले व त्यामुळे खडतर हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या आत्मचरित्रात उमटले आहे.

शिवानथ शास्त्री यांच्या कादंबऱ्या सामाजिक प्रबोधनपर असून त्यातील स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया शरत्‌चंद्र चतर्जींच्या नायिकांच्या पूर्वसूरी ठरतात. मेजबऊजुगांतर या कादंबऱ्यातून इंग्रजी शिक्षणाने धास्तावलेल्या तत्कालीन कर्मठ व पारंपरिक कौटुंबिक सामाजिक जीवनाचे चित्रण केलेले आहे. रवींद्रनाथ टागोरांनी जुगांतर कादंबरीची प्रशंसा केली होती. सोमप्रकाश या नियतकालिकाचे शिवनाथ शास्त्री हे संपादक होते.

सेन, सुकुमार (बं.) जोशी, श्री. बा. (म.)