निसर्गसुंदर गढवाल

गढवाल : उत्तर प्रदेश राज्यातील वायव्येकडील कुमाऊँ भागातील पहाडी प्रदेश. उत्तर काशी, चमोली, टेहरी गढवाल आणि गढवाल ह्या सध्याच्या जिल्ह्यांचा तिबेट सरहद्दीपर्यंत पसरलेला प्रदेश पूर्वी गढवाल संस्थानचा भाग होता. १८१५ मधील नेपाळी युद्धात ब्रिटिशांनी टेहरी गढवालशिवाय सर्व भाग घेतला. १९४९ मध्ये राहिलेले संस्थानही भारतात विलीन झाले. [ → टेहरी गढवाल संस्थान]. हिमालयाची नंदादेवी, कामेट, त्रिशूळ, केदारनाथ, बद्रीनाथ, दूनगिरी आदी अनेक शिखरे या भागात असून गंगा, यमुना आणि इतर कित्येक नद्यांची उगमस्थाने येथेच आहेत. घनदाट जंगल, हिंस्र पशू, विषम हवामान, अवघड पहाडी प्रदेश यांमुळे हा भाग नेहमी मागासलेलाच राहिला. बद्रीनाथ, केदारनाथ, जोशीमठ, देवप्रयाग, गंगोत्री इ. अनेक तीर्थक्षेत्रांमुळे त्याचप्रमाणे तिबेटशी असलेल्या व्यापारामुळे या भागास महत्त्व राहिले. गढवाल चित्रशैली, गढवाली लोकनृत्ये, गढवाली बोली आणि गढवाली वस्त्रे यांनी मात्र भारतीय जीवनांत चिरंतन नाव मिळविले आहे.

शाह, र. रू.