हॉटेंटॉट : सांस्कृतिक दृष्ट्या अवकलनीय (डिफरेन्शिएबल) विभागीय जमातींना दिलेली जातिपद (जेनेरिक टर्म) संज्ञा. यातहॉटेंटॉट ह्या प्रमुख जमातीसह कोराना व नामा या पशुपालक जमातींचा अंतर्भाव होतो. त्यांची वस्ती प्रामुख्याने नैर्ऋत्य आफ्रिकेत युरोपियनांच्या वसाहतीत किंवा अधिकृत राखीव प्रदेशात आढळते. त्यात ओर्लाम म्हणजे केप हॉटेंटॉटपैकी काही संकर जमातीही होत्या. शारीरिक दृष्ट्या मूळहॉटेंटॉट हे बुशमनसारखे दिसतात पण बुशमनपेक्षा ते उंच असून त्यांचे मस्तक मोठे असते. हॉटेंटॉटची पारंपरिक अर्थव्यवस्था आणि सामाजिक संघटना यांत कालमानानुसार आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी ते एक पूर्णतः भटकी जमात असून पशुपालन, शिकार व जंगलातील फळे,मुळे, मध गोळा करून उदरनिर्वाह करीत असत. अद्यापि त्यांच्यातीलकाही कुटुंबे भटके जीवन व्यतीत करीत असून पशुपालन हाच त्यांचाप्रमुख व्यवसाय आहे मात्र सांप्रत बहुसंख्य हॉटेंटॉट हे स्थायिक झालेअसून मोलमजुरी करतात. त्यांनी ग्रामीण भागातील युरोपियन लोकांची जीवनपद्धती अनुसरली आहे. शिवाय त्यांपैकी अनेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे तथापि त्यांची पंचायत समिती असून तिच्या प्रमुखाचे सामाजिक व्यवहारावर नियंत्रण असते.

 

भाषा : हॉटेंटॉट ही नामा, कीरा व इतर चौदा किंवा पंधराउपभाषांना दिलेली यूरोपीय संज्ञा होय. त्यांपैकी नामा ही महत्त्वाची भाषा होय. हॉटेंटॉट भाषेत ए, इ, आय् , ओ व यू हे पाच स्वर असून पी, टी, के, एस्, एक्स, आर्, एम् आदी व्यंजने आहेत. हॉटेंटॉट भाषेची लक्षणीय गुणवैशिष्ट्ये म्हणजे अन्तःश्वास वर्णाचे (क्लिक) अस्तित्व आणि शब्दसंग्रहाची अंशतः एकावयव प्रकृती असून हेल (टोन) याचे अस्तित्व होय. अन्तःश्वास वर्ण हे दंत्य, तालव्य, मूर्धन्य (सेरेब्रल) व पार्श्विक असतात. हे अन्तःश्वास वर्ण हॉटेंटॉट भाषेत ठळकपणे आढळतात. त्यांमध्ये शब्दसामर्थ्य आहे. लिंग अनुप्रत्ययाने दर्शविले जाते किंवा नेमक्या शब्दांनी व्यक्त केले जाते. या भाषेत एकवचनी, द्विवचनी व बहुवचनी नामरूपे असून विशेषणे नामापासून बनविलेली असतात. सांख्यिकीय दशमान पद्धतीचा वापर ‘दिर्सा’ असा केलेला आढळतो. हॉटेंटॉट भाषेतील शब्दोच्चार मधुर असून पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी लिंगभेदा-साठी एकवचनी, द्विवचनी व बहुवचनी अनुप्रत्ययांक (सफिक्स) रूपे वापरलेली आढळतात.

 

भागवत, दुर्गा