कार्ल स्नोइलस्क्यू

स्नोइलस्क्यू , कार्ल : ( ८ सप्टेंबर १८४१—१९ मे १९०३ ). स्वीडिश कवी. जन्म स्टॉकहोम येथे. शिक्षण अप्साला विद्यापीठात. आरंभीच्या सांकेतिक काव्य-रचनेच्या साच्यातून बाहेर पडून तो एक स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून विकसित झाला. १८६४ मध्ये स्पेन आणि इटली ह्या देशांचा त्याने केलेला दौरा ह्या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरला. Dikter ( १८६९, इं. शी. पोएम्स ’ ) ह्या त्याच्या कविता-संग्रहाने स्वीडिश वाचकवर्गाला आकृष्ट केले. ह्या कवितांमधील जोमदार लयबद्धता आणि इंद्रिय-निष्ठता ( सेन्शुअसनेस ) ह्यांची मोहिनी त्याच्यावर पडली. पोएम्स च्या प्रसिद्धीनंतर त्याने राजनैतिक सेवेत प्रवेश केला विवाह केला काव्यलेखन थांबवले आणि तो स्वीडिश उमरावाचे जीवन जगू लागला तथापि १८७९ मध्ये तो पुन्हा काव्यलेखनाकडे वळला. आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेऊन त्याने अन्य स्त्रीशी विवाह केला, तसेच राजनैतिक सेवेतूनही स्वतःला मुक्त करून घेतले. १८८३ मध्ये त्याचा ‘ पोएम्स ’ हा नवा काव्यसंग्रह बाहेर पडला. त्यातील कवितेने घेतलेले वळण वेगळे होते. सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाशी थेट संवाद साधण्याची त्याची आकांक्षा ह्या कवितेतून दिसत होती. श्रमिक वर्गाला उद्देशून लिहिलेल्या ह्या संग्रहातील कवितांच्या रूपाने त्याने एक प्रकारे आपल्या उमरावी मानसिकतेचा त्याग केला होता तथापि ह्या संग्रहापेक्षाही Svenska bilder (१८८६) ह्या त्याच्या काव्यसंग्रहाला अधिक व्यापक असा लोकप्रतिसाद मिळाला. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय नेतृत्व ह्यांचा गौरव त्यातील कवितांतून प्रत्ययास येतो. त्याच्या कवितांतून प्रकट झालेली इतिहासदृष्टी आज काहीशी भाबडी वाटली, तरी त्याने रंगविलेली ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे प्रभावी ठरलेली आहेत.

स्टॉकहोम येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.

Close Menu
Skip to content