ऊद मांजर : स्तनिवर्गाच्या मांसाहारी-गणातील मुस्टेलिडी कुलातला प्राणी. हा लुट्रा वंशाचा असून याचे शास्त्रीय नाव लुट्रा पर्स्पिसिलेटा आहे. बरेच लोक याला पाणमांजर म्हणतात. हा भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आणि भारताबाहेर ब्रम्हदेश, इंडोचायना आणि मलायात आढळतो.

याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो. उदाची लांबी (डोके व धड) ६५–७५ सेंमी., शेपूट ४०–४५ सेंमी. आणि वजन ७–११ किग्रॅ. असते.

ऊद मांजर

मूळ सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी वायव्य भारतातील वाळवंट, मध्य भारतातील शुष्क प्रदेश आणि महाराष्ट्र या भागांतही तो राहू शकतो कारण या प्रदेशांच्या हवापाण्याशी त्याचे अनुकूलन झालेले असते. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर हा राहतो. याचे मुख्य भक्ष्य मासे, परंतु ते मिळाले नाहीत तर सहज पकडून खाता येतील असे कोणतेही प्राणी त्याला चालतात. खाड्या, नदीमुखे वगैरे ठिकाणी हा भक्ष्य शोधीत असतो. मध्य भारताच्या शुष्क प्रदेशातील तळी, ओढे वगैरे आटल्यावर ऊद मांजरे जंगलात शिरतात आणि शिकार करून पोट भरतात. पाण्यात आणि जमिनीवर ते सारख्याच सहजतेने राहतात.

यांच्या प्रजोत्पादनाच्या काळाविषयी किंवा त्या काळातील यांच्या वर्तनाविषयी काहीही माहिती नाही. वर्षाच्या सुरुवातीच्या काळात पिल्ले जन्मल्याचे आढळते.

ऊद मांजराची आणखी एक जाती आहे, तिचे शास्त्रीय नाव लुट्रा लुट्रा  असे आहे. भारतात ही जाती फक्त काश्मीर, हिमालय पर्वत आसाम आणि दक्षिण भारतात आढळते.

कर्वे. ज. नी.