मानस शास्त्रीय पद्धति : मानसशास्त्राचा उगम तत्त्वज्ञानातून झालेला असला, तरी त्याच्या विकासावर अनेक अन्य शास्त्रांचा प्रभाव पडला व मानसशास्त्राने त्या त्या शास्त्रांच्या अभ्यासपद्धती उचलून घेतल्या. किंबहुना वैज्ञानिक दृष्टीकोन व विज्ञानाच्या पद्धतीचा स्वीकार केल्यामुळेच मानसशास्त्राचा बहुंअंगी विकास शक्य झाला. मानसशास्त्राच्या प्रमुख पद्धती पुढीलप्रमाणे आहेत :

आराम पद्धती (आर्मचेअर मेथड) : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तत्त्वज्ञानाचा केवळ एक भाग म्हणून मानसशास्त्राकडे पाहिले जात असे. आत्म्यासंबंधी किंवा मनासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, अशी कल्पना ह्या काळात दृढ होती. त्यामुळेच मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी तत्त्वज्ञानात्मक अभ्यासपद्धतीखेरीज दुसऱ्या काही पद्धतींचा वापर करता येईल, ही कल्पनाही कोणाला शिवली नव्हती. ह्या काळात मानसशास्त्रीय अभ्यास प्रामुख्याने आराम पद्धतीने केला जात असे. आराम पद्धतीचे सर्वसाधारण स्वरूप पुढीलप्रमाणे सांगता येईल : जीवनात विविध प्रकारचे अनुभव मनुष्याला प्रत्यही येत असतात. निरनिराळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगांच्या अनुरोधाने मनुष्याचा अनेक व्यक्तींशी संबंध येतो. त्यातून त्याचे अनुभव समृद्ध होतात. अशा सर्व अनुभवांचा साकल्याने व पद्धतशीर विचार केला, तर मानवी स्वभावाची व व्यवहाराची यथार्थ कल्पना येऊन मानसशास्त्रीय ज्ञान परिपूर्ण होऊ शकते. अशा प्रकारे आराम पद्धती म्हणजे थोडक्यात विचार-विमर्शन पद्धती होय. मानसशास्त्राच्या प्रारंभ काळात ह्याच पद्धतीने मानसशास्त्रीय माहिती संकलित केली गेली व मनुष्यस्वभावासंबंधी आडाखे बांधले गेले. ह्यातील काही आडाखे शास्त्रीय कसोटीला उतरणारे असले, तरी प्रस्तुत पद्धती निखळ ‘शास्त्रीय’ आहे असे म्हणता येत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावी निरीक्षणदोष संभवतात व त्यामुळेच निरनिराळ्या अभ्यासकांचे कित्येक घटनांच्या बाबतीत एकमत होऊ शकत नाही. प्रत्यक्ष निरीक्षणाचा अभाव व कल्पनेची स्वरता ह्या दोषांमुळे प्रस्तुत पद्धती अशास्त्रीय ठरते.

कथा-पद्धती (ॲनेक्डोट्ल मेथड) : मानसशास्त्रीय ज्ञानाच्या विकासासाठी वास्तव घटनांचे दाखले आवश्यक वाटू लागले होते पण पद्धतशीर अन्वेषण केले गेले नव्हते तेव्हा कथा-पद्धतीचा उपयोग करण्यात येत असे. कोणीतरी पाहिलेल्या अथवा ऐकलेल्या गोष्टी कर्णोपकर्णी तत्त्ववेत्त्यांपर्यंत येत व अशा दंतकथांच्या आधारे मानवी स्वभावासंबंधी किंवा पशुवर्तनाविषयी सर्वव्याप्ती सिद्धांतांची रचना करण्याचे प्रयत्न होत. हेच कथा-पद्धतीचे सर्वसाधारण स्वरूप होय.

कथेच्या स्वरूपाची निवेदने वर्तनविषयक वस्तुस्थितीवर आधारलेली असली, तरी बहुधा ती एकांगी व अपूर्ण असतात. निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक कलानुसार काही गोष्टींची नोंद घेतली जाते, तर काही गोष्टींकडे अजाणतेपणी किंवा हेतुपुरःसरही दुर्लक्ष केले जाते. शिवाय निरीक्षण व त्याची नोंद ह्यात थोडा मध्यंतर लोटला असेल, तर साहजिकच स्मृतिदोष उत्पन्न होतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही, की अशी निरीक्षणे फार थोड्या किंवा एखाद्याच अपवादात्मक उदाहरणावर आधारलेली असतात. त्यावरून सर्वसामान्य अनुमाने काढणे चूक होय.

तुलनात्मक मानसशास्त्राचा विकास घडवून आणण्याचे सुरुवातीचे प्रयत्न कथा-पद्धतीवर आधारलेले होते व म्हणूनच शास्त्रदृष्ट्या त्यांचा काही उपयोग नव्हता. कथा-पद्धतीत निरीक्षणांची अर्थसंगती लावणे फार कठीण असते. ह्या संबंधात ⇨ लॉइड मॉर्गन (१८५२-१९३६) याने सुचविलेले मार्गदर्शक तत्त्व दुर्लक्षिले गेले तर कसा अनर्थ होतो, ह्याचे ठळक उदाहरण हेर व्हॉन ऑस्टेनने पाळलेल्या ‘क्लेव्हर हॅन्स’ नावाच्या घोड्यासंबंधी होय. ऑस्टेनने त्याला अंकगणिताच्या प्रक्रिया, महिन्याचा दिनांक सांगणे इ. गोष्टी शिकविल्या होत्या. काही मानसशास्त्रज्ञांनी व प्राणिशास्त्रज्ञांनी त्याची परीक्षा घेतली. समोरचा पाय आवश्यक तितके वेळा जमिनीवर आपटून तो उत्तर देई. ह्यातील रहस्य शास्त्रज्ञांच्या लक्षात आले नाही. घोड्याला त्याच्या बुद्धिमत्तेचे प्रशस्तिपत्र देण्यात आले पण नंतर थोड्याच दिवसांनी फन्ग्स्ट यांनी केलेल्या परीक्षणावरून असे उघडकीस आले, की धन्याच्या सूक्ष्म हालचालींवरून तो घोडा उत्तराचा अचूक अंदाज घेत असे. स्वंयप्रज्ञेने त्याला उत्तरे मुळीच देता येत नव्हती. कथा-पद्धतीतील ह्या दोषांमुळेच तिच्यावर विसंबून राहता येत नाही.


नैसर्गिक परिस्थितीमधील निरीक्षण : व्यक्तीच्या बाह्य वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक निरीक्षण व नैसर्गिक परिस्थितीतील निरीक्षण अशा दोन पद्धतींचा वापर करता येतो. या दोहोंपैकी प्रायोगिक निरीक्षणपद्धती अधिक श्रेयस्कर खरी परंतु अफवा कशा पसरतात, पोरकेपणाचा मुलाच्या सर्वांगीण विकासावर कसा परिणाम होतो अशांसारखे कित्येक प्रश्न नैसर्गिक निरीक्षणानेच हाताळले जाऊ शकतात कारण वर्तनविकासावर प्रभाव पाडणाऱ्या काही घटकांचे प्रयोगशाळेत नियंत्रण करता येत नाही. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेत निर्माण होणाऱ्या कृत्रिमतेमुळे अशा प्रश्नांची अचूक उत्तरे प्रायोगिक निरीक्षणाने मिळू शकत नाहीत. समाजात स्वाभाविकपणे जे वर्तन निर्माण होते, त्याचा अभ्यास सामाजिक संदर्भात होणेच इष्ट आहे.

बालवर्तन, पशुवर्तन आणि काही सामाजिक घडामोडी ह्यांच्या अभ्यासासाठी नैसर्गिक निरीक्षण पद्धती फार सोयीची आहे. प्रस्तुत पद्धतीचा वापर करावयाचा म्हणजे निरीक्षकाच्या अंगी बरेच कौशल्य असावयास हवे. एक तर कोणत्या गोष्टींचे निरीक्षण करावयाचे ह्याची त्याला स्पष्ट कल्पना असावयास हवी. त्याची वृत्ती पूर्वग्रहमुक्त असली पाहिजे कारण पूर्वग्रह असले तर अपनिरीक्षणाचे किंवा अ-निरीक्षणाचे दोष संभवतात. ह्यासाठी निरीक्षणाचा अभ्यास असावयास हवा तसेच निरीक्षकाला निरीक्षण विषयात अभिरुचीही असावयास हवी आणि त्या विषयाचे मर्म कळण्याइतकी त्याच्या बुद्धीची झेपही असणे आवश्यक आहे. यथार्थ निरीक्षण होण्यासाठी ज्ञानेंद्रिये तर संस्कारक्षम हवीतच पण त्याचबरोबर वृत्तीचा समतोलही हवा. अचूक निरीक्षणासाठी छाया-चित्रण, ध्वनिलेखन इ. तंत्रांचा उपयोग करता येतो. त्यामुळे वर्तनाचे टिकावू दाखले तयार होतात व सवडीने त्यांचे विश्लेषण करता येते.

निरीक्षण करणाऱ्याने घटनांची नोंद ताबडतोब करणे अगत्याचे आहे. एरवी स्मरणावर विसंबून राहण्याने काही घटनांची नोंद करण्याचे राहून जाते व नोंदीत चुकाही संभवतात. निरीक्षणाचे विश्लेषण करताना सामान्यतः केवळ वस्तुस्थितीचे वर्णन केले जावे कोणत्याही मानसिक घडमोडीचा हेत्वारोप केला जाऊ नये. वर्तनविषयक ‘का’ व ‘कसे’ ह्यांची उत्तरे केवळ निरीक्षणाने देता येत नाहीत हे निरीक्षकाने विसरू नये. ही सर्व पथ्ये पाळली तरच अनेक निरीक्षणांच्या आधारे वर्तनविषयक सामान्यनियम प्रस्थापित करता येतात.

प्रायोगिक पद्धती : निरनिराळ्या परिस्थितींना अनुसरून सजीवाचे वर्तन कसे बदलते हा मानसशास्त्राचा अभ्यासविषय होय. अशा अभ्यासाची सर्वांत महत्त्वाची पद्धती म्हणजे प्रायोगिक पद्धती होय. प्रयोग म्हणजे नियंत्रित परिस्थितीतील निरीक्षण. नियंत्रण व अचूक मापन ही प्रयोगाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. नैसर्गिक परिसरातील निरीक्षणाला प्रायोगिक पद्धती पूरक ठरते. ‘विशिष्ट परिस्थितीत कोणते वर्तन निष्पन्न होईल’, अशा स्वरूपाचा प्रश्न सामान्यतः प्रयोगकर्त्याच्या डोळ्यासमोर असतो तसेच कधीकधी एखाद्या वर्तनविशेषासंबंधी सुचणाऱ्या अभ्युपगमाचे परीक्षण करण्यासीठीही प्रयोगांची योजना केली जाते.

मानसशास्त्रीय प्रयोगात (१) उद्दीपक परिस्थिती, (२) व्यक्ती वा जीव आणि (३) प्रतिक्रिया ह्या तीन घटकांचे परस्परसंबंध प्रस्थापित करावयाचे असतात. वर्तन उद्दीपित करणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला उद्दीपक म्हणतात. उद्दीपक बाह्य किंवा आंतरिक, स्थूल किंवा सूक्ष्म, भाषिक किंवा क्रियात्मक असू शकतात. प्रयोगाची मांडणी करताना प्रयोगकर्ता एका उद्दीपक परिस्थितीची निवड करून तिच्यात पद्धतशीर बदल करतो व त्यांचा वर्तनावर कसा परिणाम होतो ह्याचे निरीक्षण करतो. ह्या उद्दीपकाला स्वयंचल किंवा स्वतंत्र परिवर्त्य म्हणतात. अशा एका उद्दीपक परिस्थितीच्या परिणामांचे परीक्षण केले जात असताना इतर परिस्थिती पूर्णतः स्थिर ठेवली जाते किंवा त्यांची परिवर्तने मापनीय केली जातात किंवा त्या परिवर्त्यांचे उच्चाटन केले जाते. त्यांना नियंत्रित परिवर्त्ये म्हणतात.


प्रयोगव्यक्ती म्हणून कोणाची निवड करावयाची ह्यासंबंधीचा निर्णय प्रश्नाच्या स्वरूपाला अनुसरून केला जातो. अनेक व्यक्तींवर एखादा प्रयोग करावयाचा असला म्हणजे प्रायोगिक समस्येशी संबंधित अशा सर्व महत्त्वाच्या बाबतीत प्रयोगव्यक्तीचे समतुल्य समूह असावे लागतात. उदा., ‘अ’ जीवनसत्त्वाचा निशादृष्टीच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो अशी समस्या असेल तर वय, बुद्धी व दृष्टीविषयक कार्यक्षमतेच्या बाबतीत प्रयोगाच्या प्रारंभी सर्व प्रयोगव्यक्तींचे दोन समतुल्य समूह असणे अपरिहार्यच असते. ही समतुल्यता तीन प्रकारे प्राप्त करता येते : (अ) प्रयोगासाठी काही व्यक्ती निश्चित करून त्यांचे यदृच्छेने किंवा नाणेफेक करून दोन गट करावयाचे, (ब) या निश्चित केलेल्या सर्व व्यक्तींचे संबंधित गुणावर मापन करून त्यातून मध्यमूल्य व प्रमाण विचलन सारखे असेल असे दोन गट करावयाचे किंवा दोन समूह असे निवडावयाचे की एका समूहातील प्रत्येक व्यक्तीला समतुल्य व्यक्ती दुसऱ्या समूहात असेल आणि (क) नंतर एका गटास ‘अ’ जीवनसत्त्व देऊन व दुसऱ्या गटास ते न देऊन येणाऱ्या परिणामांचा तुलनात्मक विचार करता येईल.

प्रयोगाला प्रारंभ करताना प्रश्नाचे स्वरूप शक्य तितके स्पष्ट असावे तसेच प्रयोगात भाग घेणाऱ्या सर्वांची मानसिक स्थिती योग्य त्या सूचनांनी काटेकोरपणे नियंत्रित करता आली पाहिजे. प्रयोगव्यक्तीची मनःस्थिती व त्याचे प्रेरण नीट नियंत्रित नसेल, तर निष्कर्ष अचूक येऊ शकणार नाहीत.

 विशिष्ट पूर्वगामी परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांना आश्रित वा अवलंबी परिवर्त्य म्हणतात. प्रतिक्रिया स्थूल किंवा सूक्ष्म, आंतरिक किंवा बाह्य, भाषिक किंवा कारक असून प्रयोगात त्यांचे योग्य कसोट्यांना अनुसरून मापन केले जाते. वारंवार प्रयोग केल्यानंतर एकाच प्रकारचे परिणाम आढळले, तरच त्यांचा कार्यकारणसंबंध जोडता येतो.

प्रायोगिक पद्धतीने अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळालेली आहेत. ⇨ मानसभौतिकी पूर्णतः प्रयोगसिद्ध आहे. पठन व स्मरणविषयक नियमांचे उपपादन प्रयोगांच्या आधारे करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रात निरनिराळ्या कार्य-परिस्थिती व कार्यकौशल्य ह्यांचे संबंध प्रयोगात्मक संशोधनानेच प्रस्थापित केले गेले आहेत. वर्तनविषयक ‘का’ व ‘कसे’ ह्या प्रश्नांची उत्तरे प्रयोगांनी बऱ्याच अंशी मिळतात. तरीही प्रयोगात्मक पद्धतीचा वापर मर्यादित प्रमाणातच होऊ शकतो. कारण कित्येक समस्यांच्या बाबतीत प्रयोग करणे सर्वथा अशक्य असते तसेच काही बाबतीत प्रयोगशाळेतील परिस्थितीमुळे कृत्रिमता निर्माण होते. शिवाय काटेकोर नियंत्रण ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी व्यक्तीच्या अप्रगट वृत्तींवर सर्वस्वी नियंत्रण ठेवता येत नाही. ह्याचसाठी प्रयोगाबरोबर संख्यात्मक विश्लेषम पद्धतीचा वापर अपरिहार्य होय. [→ प्रयोग प्रायोगिक मानसशास्त्र].

चिकित्सा पद्धती : मानसशास्त्रात केवळ सर्वसामान्य वर्तनाचाच नव्हे, तर वर्तनविकृतींचाही अभ्यास केला जातो. चिकित्सा पद्धतीचे अनेक प्रकार आहेत. त्यांचा थोडक्यात परामर्श येथे घेण्यात आला आहे.

व्यक्तीतिहास पद्धती (केसहिस्टरी मेथड) : वर्तनविषयक विकृतींचा अभ्यास करण्याची ही एक पद्धती होय. विशिष्ट विकृतीची कारणपरंपरा जाणून घेण्याच्या हेतूने व्यक्तींच्या पूर्वेतिहासाची माहिती ह्या पद्धतीने मिळविली जाते. अतिलालन, हेळसांड किंवा त्यजन, घरच्या वातावरणातील असुरक्षितता, आईवडिलांमध्ये परस्परांबद्दलच्या आस्थेचा अभाव, मुलांना शिस्त लावण्यासंबंधीच्या अवास्तव कल्पना, व्यक्तीच्या व्यावसायिक अडचणी, सामाजिक किंवा वैयक्तित संघर्ष अशा अनेक कारणांनी मनुष्यवर्तनात विकृती निर्माण होऊ शकतात. व्यक्तीच्या विकृतीची चिकित्सा करण्यासाठी व्यक्तीतिहासाची माहिती मिळविणे त्यामुळेच अगत्याचे असते. ही माहिती मिळविण्यासाठी अनेकांचे सहकार्य आवश्यक आहे. ह्या दृष्टीने मानसचिकित्सक मानसिक रोग्याची किंवा विकृताची मुलाखत घेऊन त्याच्या आशाआकांक्षा, अपेक्षा, सामाजिक संबंधातील अडचणी, त्याचे भयगंड इत्यादींची माहिती मिळवितो. त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींकडूनही त्याच्याबद्दल शक्य तितकी माहिती मिळवितो. ह्यासाठी त्याचे आईवडील, शेजारी, मित्र व परिचित, शिक्षक किंवा व्यवसायातील त्याचे वरिष्ठाधिकारी ह्यांची मुलाखत घेतली जाते. थोडक्यात व्यक्तीसंबंधी सर्व माहिती एकत्र करण्याचा मानसचिकित्सकाचा प्रयत्न असतो. ही माहिती मिळविण्यात सामाजिक कार्यकर्त्यांचीही मदत घेतली जाते. ह्या सर्व गोष्टींबरोबरच विकृताची वैद्यकीय तपासणीही केली जाते तसेच बौद्धिक आणि व्यक्तीमत्त्वविषयक चाचण्याही घेतल्या जातात. चाचण्यांमुळे विकृतीचे स्वरूप लक्षात येते व व्यक्तीतिहासाच्या पुनर्रचनेमुळे विकृतीच्या कारणांचा अंदाज घेता येऊन मार्गदर्शनाची दिशा ठरविता येते.


व्यक्तीतिहास पद्धतीने अनेकदा यशस्वी चिकित्सा करण्यात आलेली असली, तरी प्रस्तुत पद्धती संपूर्णतः विश्वसनीय किंवा यथार्थ म्हणता येत नाही. कारण इतिहास गोळा करणाऱ्याला इतरांच्या निवेदनावर विसंबून राहावे लागते व त्यांच्या खरेखोटेपणाची ग्वाही तर दिली जाऊ शकत नाही. प्रस्तुत पद्धतीचे यश मानसशास्त्रज्ञाच्या निःपक्षतेवर, त्याच्या सखोल अंतर्दृष्टीवर व तारतम्यावर अवलंबून आहे. तरीही इतर कोणत्याही योग्य पद्धतीच्या अभावी प्रस्तुत पद्धतीचा वापर अपरिहार्य ठरतो. योग्य रीतीने उपयोगात आणल्यास ही पद्धती मोलाची ठरते. शिवाय या पद्धतीच्या उपयोगाने सामान्यीकरणे रचता येत नाहीत. मात्र अमुक घटनेच्या मागे काय कारण असण्याचा संभव आहे त्याचा शोध घेता येतो. [→ मनोविश्लेषण मानसचिकित्सा].

विकास-पद्धती (डेव्हलपमेंटल मेथड): मनुष्याचे वर्तन व मनोव्यापार गतिशील व विकासशील असतात. त्यांच्या विकासप्रक्रियेचे विवरण करण्याच्या हेतूने विकासपद्धतीचा उपयोग करण्यात येतो. जन्मपूर्वावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत भिन्नभिन्न वयोमान पातळीवर व्यक्तीविकासाचा अभ्यास करणे हे प्रस्तुत पद्धतीचे उद्दीष्ट होय. विकासाचे वंशविकासात्मक आणि व्यक्तिविकासात्मक असे दोन दृष्टीकोन आहेत. वर्तनाच्या विकासक्रमासंबंधीचे प्रश्न वंशविकासात्मक असतात, तर विशिष्ट वर्तनाचा विकास कसकसा होत जातो ह्याविषयीचे प्रश्न व्यक्तिविकासात्मक असतात. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रयोगांची योजना करता येतेच असे नाही, शिवाय प्रयोग केला जाण्याची इष्टानिष्टताही ठरवावी लागते. उदा., कोणत्या परिस्थितीत विकृतींना अथवा गुन्हेगारीला पोषक असतात, असा प्रश्न उपस्थित झाला म्हणून मानसशास्त्रज्ञ कोणाही व्यक्तीला प्रयोगाखातर अनिष्ट परिस्थितीत ठेवू शकणार नाही. विशिष्ट वर्तनाचा विकास कोणत्या परिस्थितीत कसकसा होतो ह्याचे पद्धतशीर निरीक्षण तो करील. ह्या दृष्टीने प्रस्तुत पद्धती नैसर्गिक निरीक्षणासारखी आहे. फरक केवळ दृष्टीकोनाचा आहे.

विकासप्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. विकासावर परिणाम करणाऱ्या आंतरिक व बाह्य, वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्व कारक घटकांचे योग्य निरीक्षण करता आले तरच खऱ्या अर्थाने विकासाचा अभ्यास होऊ शकतो. निरीक्षण अचूक होण्यासाठी निरीक्षकाच्या मनश्चक्षूसमोर निश्चित प्रश्न व त्यासंबंधीचे अभ्युपगम असले पाहिजेत. एरवी कशाचे निरीक्षण करावयाचे हेच नीट कळत नाही. विकासप्रक्रिया बहुमुखी असते. विकासाच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून त्यांचा अन्योन्यसंबंध प्रस्थापित करता येणे बरेच अवघड आहे. तरीही विकासासंबंधी अभ्यास करण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पद्धतीचे फार महत्त्व आहे. [→ विकास मानसशास्त्र विकासात्मक मानसशास्त्र].

अंतर्निरीक्षण पद्धती (इंट्रॉस्पेक्शन मेथड): मानसशास्त्राच्या अभ्यासाची प्रयोगात्मक आत्मनिरीक्षण पद्धती ⇨ व्हिल्हेम व्हुंटने पुरस्कृत केली. बोधावस्थ प्रक्रियांच्या अभ्यासाला हीच एक उपलब्ध पद्धती आहे, असा त्याचा विश्वास होता. स्वतःचे विचार, भावना इत्यादींबद्दल आपण नेहमी जी निवेदने करतो ती अंतर्निरीक्षणाचीच उदाहरणे होत.

अंतर्निरीक्षण हा अंतमुर्ख अवलोकनाचा प्रकार आहे. मनाने अंतर्मुख होऊन स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची ही पद्धती होय. मनाच्या अभ्यासाचे हेच प्रमुख साधन आहे. मानसिक अवस्थांचे आकलन प्रत्येकाला त्याच्या बोधावस्थेमुळेच होणे शक्य आहे. बोधावस्थ मनाचा ओघ आंतरिक घडामोडींकडे वळविला म्हणजे त्या घडामोडींचे निरीक्षण करता येते व त्याचे स्वरूप कळू शकते. हेच अंतर्निरीक्षण होय.

व्यवहारात आपण पुष्कळदा अंतर्निरीक्षण करीत असलो, तरी सामान्य व्यक्तीकडून एरवी केले जाणारे अंतर्निरीक्षण आणि प्रयोगात्मक परिस्थितीत प्रशिक्षित व्यक्तीकडून केले जाणारे अंतर्निरीक्षण ह्यांत बराच फरक आहे. व्हुंटने अंतर्निरीक्षण पद्धतीची शिफारस करताना हा फरक लक्षात घेतला होता. प्रयोगात्मक परिस्थिती काटेकोरपणे नियंत्रित केली जात असे व प्रयोगव्यक्तींना अंतर्निरीक्षणाचे खास प्रशिक्षण देण्यात येई. निरीक्षणाकर्त्याला नक्की कशाचे निरीक्षण करावयाचे ह्याची स्पष्ट कल्पनाच नसली तर त्याचे निरीक्षण एकांगी होणे साहजिक आहे. काही गोष्टी त्याच्या निरीक्षणातून सुटणेही शक्य आहे. त्यामुळेच अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर करताना कशाचे निरीक्षण करावयाचे ह्यासंबंधी नीट सूचना दिल्या जाणे आवश्यक असते. कोणत्याही घटनेला अनुलक्षून अंतर्निरीक्षण करताना त्या घटनेशी संबंधित असलेल्या सर्व अंगांचे अचूक निरीक्षण करण्याची काळजी घेतली गेली, तरच अंतर्निरीक्षण यशस्वी होऊ शकते. अशा अंतर्निरीक्षणाने कित्येक मानसिक अवस्थांचे व घडामोडींचे स्वरूप प्रकाशात येते. अंतर्निरीक्षण ही मानसशास्त्राच्या अभ्यासाची वैशिष्ट्यपूर्ण पद्धती होय परंतु प्रस्तुत पद्धतीवर जे अनेक आक्षेप घेतले गेले आहेत, त्यांचा पुढे थोडक्यात विचार करण्यात आला आहे.


(१) डॉ. मॉड्स्‌ले (१८३५-१९१८) ह्यांनी प्रस्तुत पद्धतीवर जे आक्षेप घेतले आहेत त्यातला पहिला आक्षेप हा की अंतर्निरीक्षण वस्तुतः अशक्य आहे. कारण मनाने स्वतःच्याच घडोमोडींचे निरीक्षण करायचे, तर निरीक्षण करताना ते स्थिर असावयास हवे आणि ते स्थिर असेल तर निरीक्षणाला घडोमोडीच शिल्लक रहात नाहीत.

प्रस्तुत आक्षेप क्षणिक टिकणाऱ्या मानसिक प्रक्रियांच्या बाबतीत खरा असला, तरी वेदने, संवेदने इत्यादींचे निरीक्षण आपण करतो तेव्हा त्या गोष्टी नाहीशा होत नाहीत. दाढदुखीवर लक्ष केंद्रित केले म्हणून ती दुखायची थांबत नाही. उच्च स्वरूपाच्या मानसिक क्रियांचे (इच्छा, संकल्प, संवेग) निरीक्षण त्या क्रिया चालू असताना करता येते व नंतर स्मरणानेही त्यांचे प्रत्यावहन होते. (२) दुसरा आक्षेप असा, ती अंतर्निरीक्षण शक्य आहे असे मानले, तरी त्यामुळे प्राप्त होणारी माहिती व्यक्तिगत असते, तिच्यावरून सर्वसामान्य नियम प्रस्थापित करता येत नाहीत. ह्या आक्षेपाला असे उत्तर देता येईल, की निरनिराळ्या व्यक्तींच्या अंतर्निरीक्षणांची तुलना करून सामान्य नियम काढता येतील. शिवाय इतर वस्तुनिष्ठ पद्धतींचा वापर करून अंतर्निरीक्षणाचा पडताळा पाहणेही सहज शक्य आहे. (३) अंतर्निरीक्षणाच्या व्यक्तिगत स्वरूपाला अनुसरून असाही एक आक्षेप घेतला जातो, की अशा निरीक्षणाच्या खरेखोटेपणाचे परीक्षण करणे अशक्य आहे. ह्यांवर उत्तर असे, की योग्य प्रशिक्षणाने पूर्वग्रह टाळता येऊ शकतात व निःपक्षतेची भूमिका आत्मसात करता येते. तसेच अनेकांच्या अंतर्निरीक्षणांच्या तुलनेने विश्वसनीय माहिती गोळा करता येते. (४) अंतर्निरीक्षणांच्या मर्यादित उपयोगासंबंधीचा चौथा आक्षेप असून मानसिक जीवन बऱ्याच अंशी अंतर्निरीक्षणांच्या कक्षेबाहेरचे असते, असा त्याचा इत्यर्थ आहे. हा आक्षेप खरा असला, तरी त्यामुळे प्रस्तुत पद्धती टाकावू ठरत नाही, त्यामुळे इतर वस्तुनिष्ठ पद्धतींच्या बरोबरीने अंतर्निरीक्षण पद्धतीचा उपयोग करण्यास प्रत्यवाय असू नये. (५) अंतर्निरीक्षणाचे कौशल्य संपादन करणाऱ्या लोकांच्या अंतर्निरीक्षण-पक्षात एकवाक्यता आढळत नाही असा आणखी एक आक्षेप आहे. वस्तुतः मानसिक अवस्थांच्या स्वरूपासंबंधी जी जाणीव निरीक्षकांना होते तिच्या बाबतीत चांगलीच एकवाक्यता आढळते. ह्या अवस्थांच्या स्पष्टीकरणार्थ जे अभ्युपगम सांगितले जातात त्यासंबंधात मतभेद असले तरी तो दोष प्रस्तुत पद्धतीचा आहे असे म्हणता येणार नाही.

अंतर्निरीक्षण कला अवघड आहे ही खरी अडचण आहे. मानसिक अवस्था अस्थिर व सतत बदलणाऱ्या असतात. मानसिक प्रक्षुब्धावस्थांचा अभ्यास त्या अवस्थांच्या पश्चात् स्मरणानेच होऊ शकतो. मानसिक अवस्था नित्य परिचयाच्या असल्यामुळेच दुर्लक्षित होऊ शकतात हेही खरे, त्यामुळेच त्यांच्या बिनचूक निरीक्षणासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अवधान केंद्रित करणे, अंतर्निरीक्षणाचा सतत अभ्यास असणे, पुनःपुन्हा निरीक्षण करणे, पूर्वग्रह बाजूला ठेवणे इ. गोष्टींच्या बरोबर वस्तुनिष्ठ पद्धतींचा यथायोग्य उपयोग करण्यात आला तर आत्मनिरीक्षणाने मोलाची माहिती प्राप्त होऊ शकते, ह्यात शंका नाही. काही मानसशास्त्रज्ञांनी ‘अशास्त्रीय’ पणाचा शिक्का प्रस्तुत पद्धतीवर मारला असला, तरी कित्येक घटनांचे परीक्षण करावयास प्रस्तुत पद्धतीखेरीज दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे आजच्या मानसशास्त्राच्या दृष्टीनेही अंतर्निरीक्षणाची अपरिहार्यता निर्विवाद सिद्ध होते.

 सांख्यिकीय पद्धती : प्रतिदर्शन (सँपलिंग) : काही सामाजिक प्रश्नांचा संबंध विशिष्ट गटांशी असेल, परंतु सामान्यतः समाजशास्त्रीय वा मानसशास्त्रीय संशोधानातून ज्या घटनांचे व नियमांचे उपपादन केले जाते त्या घटना व ते नियम एका विस्तृत लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे असतात. अशा संशोधनासाठीच प्रतिदर्शनाची आवश्यकता असते. प्रतिदर्शन म्हणजे प्रातिनिधिक गटावर केले जाणारे निरीक्षण. एका संपूर्ण लोकसंख्येला लागू पडणारी तत्त्वे किंवा विशिष्ट घटना शोधून काढण्याच्या दृष्टीने अभ्यास करावयाचा म्हणजे सर्वप्रथम आवश्यक गोष्ट प्रातिनिधिक गटाची निवड ही होय. ही निवड करण्याच्या दोन पद्धती आहेत :

 (१) यदृच्छ (रँडम) प्रतिदर्शन : जेव्हा लोकसंख्येचा प्रत्येक घटक संशोधनात्मक अभ्यासासाठी निवडला जाण्याची सारखीच शक्यता असते तेव्हा ह्या पद्धतीला यदृच्छ प्रतिदर्शन म्हणतात. ह्यासाठी संबंधित लोकसंख्येतील प्रत्येकाचे नाव वेगळ्या कार्डावर नोंदविले जाते. नंतर सर्व कार्डे पत्त्यासारखी नीट पिसली जातात व मग ठराविक संख्येच्या अंतराने एक एक कार्ड उचलले जाते. ह्या कार्डावरील नावांनी प्रातिनिधिक गट तयार होतो. मानसशास्त्रीय अन्वेषणात यदृच्छ प्रतिदर्शनाच्या अटी नेहमी पाळल्या जातातच असे नाही. कारण अन्वेषण ज्या लोकसंख्येशी निगडित असते ती अत्यंत मोठी, वैविध्यपूर्ण व भौगोलिक दृष्ट्या विस्तृत प्रदेशात विखुरलेली असते.


(२) स्तरित (स्ट्रॅटिफाइड) प्रतिदर्शन : ह्या पद्धतीत एकूण लोकसंख्येचे संशोधनाशी निगडित असलेल्या वैशिष्ट्याला अनुसरून परस्परभिन्न विभागांत वर्गीकरण करण्यात येते व नंतर प्रत्येक वर्गातून यदृच्छ प्रतिदर्शन पद्धतीने प्रातिनिधिक गट निवडला जातो. एकूण लोकसंख्येशी त्या विशिष्ट विभागाचे जे प्रमाण असते त्याच प्रमाणात त्या विभागातून प्रातिनिधिक गटाची निवड होते. शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय संशोधनात ह्या पद्धतीचाच वापर बहुधा केला जातो. प्रतिदर्शनाने निवडलेला गट जितका प्रातिनिधिक असेल तितके त्या गटारील संशोधन अचूकपणे त्या लोकसमूहाला लागू पडणारे राहील.

मुलाखत व प्रश्नावली : वैयक्तिक किंवा सामाजिक अशा दोन्ही स्वरूपाच्या प्रश्नांना अनुसरून प्रस्तुत पद्धतींचा वापर केला जातो. प्रश्नावलींचा व्यक्तिमत्त्व मापनासाठी केला जाणारा उपयोग वैयक्तिक स्वरूपाचा होय. संख्यात्मक पद्धतीचा प्रकार ह्या दृष्टीने आपल्याला येथे सामाजिक प्रश्न अभिप्रेत आहेत. ग्राहक-संशोधनासंबंधीचे किंवा लोकमतासंबंधीचे प्रश्न सामाजिक स्वरूपाचे असतात व अशा प्रश्नांच्या अभ्यासासाठी मुलाखत व प्रश्नावली पद्धतींचा उपयोग करण्यात येतो.

प्रश्नावली टपालाने लोकांकडे पाठवून त्यांच्याकडून उत्तरे मिळविणे कमी खर्चाचे असते परंतु पुष्कळ लोक प्रश्नावलीची उत्तरे भरून पाठवीत नाहीत असा अनुभव येतो. शिवाय ज्यांच्याकडून उत्तरे येतात त्यांची मते लोकसंख्येची प्रातिनिधिक आहेत असे समजणे धार्ष्ट्याचेच ठरते. त्यामुळे प्रश्नावलीचा उपयोग फार मर्यादित प्रमाणातच होऊ शकतो.

मुलाखत पद्धतीत प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते. मुलाखतीचे दोन प्रकार संभवतात.

(१) साचेबंद (स्ट्रक्चर्ड) मुलाखत : अशा मुलाखतीत ठराविक साच्याचे प्रश्न असतात. मुलाखत घेणारा निरनिराळ्या लोकांना ठराविक प्रश्न विचारतो व त्यांच्या उत्तरांची नोंद करीत असतो. अशा मुलाखतीचे यश अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मुलाखत घेणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न असले पाहिजे. प्रथमदर्शनीच लोकांचा ग्रह अनुकूल होईल व प्रश्नांची उत्तरे देण्याच्या त्यांच्या वृत्ती चाळविल्या जातील असे कौशल्य मुलाखत घेणाऱ्याजवळ असावे लागते. प्रश्न स्पष्ट व निःसंदिग्ध असावे लागतात. ग्राहकसंशोधन करताना अमुक वस्तू लोकांना का आवडते हे शोधून काढण्याची जिज्ञासा संशोधकाला असते. तदनुसार अनेक पर्यायी कारणांचा विचार करून सूक्ष्म प्रश्न तयार केले, तरच विश्वसनीय माहिती हाती लागू शकते. शिवाय प्रश्न सूचक किंवा पूर्वग्रहपरिपोषक असता कामा नये. तसेच लोकांचा अहंभाव दुखावेल किंवा त्यांचे आर्थिक, बौद्धिक किंवा सामाजिक न्यून उघड होईल असे प्रश्न असू नयेत. अशी अनेक पथ्ये सांभाळून प्रातिनिधिक गटाकडून मुलाखतीच्या द्वारे माहिती काढण्यात आली तरच ती विश्वसनीय ठरते व संशोधनाचे प्रामाण्य वाढते.

(२) मुक्त (ओपन-एंडेड) मुलाखत :अशा मुलाखतीत प्रश्नांचे स्वरूप ठराविक ठशाचे नसते. मुलाखत घेणारा व्यक्तीला आपली मते व आपल्या आवडी व्यक्त करावयास उत्तेजित करतो. ह्या पद्धतीत मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करावयास व्यक्तीला संधी मिळते पण अशा मुलाखतीच्या नोंदीचा अर्थ लावणे बरेच कठीण असते. कारण ह्या नोंदी बहुधा मुलाखतीच्या नंतर स्मरणाने लिहून काढल्या जातात. नोंदीतून उत्तरे देणाऱ्याच्या वृत्तींचे पुरेसे वर्णन असेल तरच ती सार्थ ठरते.


मतगणना (ओपिनियन पोल्स) :विशिष्ट लोकसंख्येच्या अभिवृत्ती व तिची मूल्ये शोधून काढण्याची ही पद्धती आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठीही प्रस्तुत पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. बहुतेक मतगणना अभ्यासात एकाच प्रश्नाचा उपयोग केला जातो किंवा एखाद्या सूचीतील पर्यायांना व्यक्तीला क्रमांक द्यायचे असतात.

विशिष्ट लोकसंख्येतून प्रतिदर्शन पद्धतीने प्रातिनिधिक गटाची निवड करण्यात येते व ह्या गटाची मतगणना नंतर केली जाते. उदा., आपल्या देशातील मतदार ही लोकसंख्या असेल, तर यदृच्छ प्रतिदर्शन, स्तरित प्रतिदर्शन किंवा क्षेत्रसंबंधी प्रतिदर्शनाने प्रातिनिधिक गट निवडता येतात व नंतर त्यांचा कल कोणीकडे आहे ह्यांचा अंदाज मतगणनेने घेता येतो. मतगणना प्रत्यक्ष भेटीवर किंवा मुलाखतीवर आधारित असते. क्षेत्रसंबंधी (एरिया) प्रतिदर्शन फार खर्चाचे असते व त्यामुळे त्याचा फार क्वचित उपयोग केला जातो.

मतगणनेने अनेक प्रश्नांच्या बाबतीत मार्गदर्शन होऊ शकते किंवा लोकमताचा कल कोणीकडे झुकत आहे, ह्याचा बराचसा अचूक अंदाज घेता येतो हे खरे असले, तरी मतगणनेत अनेक अडचणी संभवतात. एक तर कोणत्याही पद्धतीचा उपयोग केला तरी संपूर्णतः प्रातिनिधिक गट मिळविणे अतिशय कठीण असते. निवडणुकीसारख्या प्रसंगीएकाच प्रश्नाने मत वळत असले, तरी इतर गोष्टींच्या बाबतीत अशा प्रकारे मत खरोखर व्यक्त होते किंवा नाही हे सांगणे कठीण जाते. कित्येकांकडून निर्भीडपणे मत व्यक्त केले जात नाही त्याचप्रमाणे कित्येकांना विचारलेल्या प्रश्नाचा नीटसा अर्थबोध होत नाही. अशा अनेक अडचणी टाळता येण्यासाठी प्रश्नांचे स्वरूप निःसंदिग्ध व स्पष्ट असले पाहिजे. तसेच त्या प्रश्नांनी उपस्थित केलेला विषय लोकांना परिचित असायला हवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही, की आपले उत्तर ‘गुप्त’ राहील अशी खात्री लोकांना वाटली पाहिजे. ह्या गोष्टींची दक्षता घेण्यात आली, तर मतगणनेने लोकमताचे चांगले ज्ञान होते.

मानसशास्त्रात विविध उद्दिष्टांसाठी मानसिक कसोट्यांचा विकास झाला असून त्यांचा सर्रास वापर केला जातो. उदा., मानसचिकित्सेत विकृतीच्या निदानासाठी, व्यक्तिमत्त्व ठरविण्यासाठी, बुद्धिमापनासाठी इत्यादी. तथापि त्यांना काटेकोर अर्थाने ‘मानसशास्त्रीय पद्धती’ म्हणता येणार नाही. [→ मानसिक कसोट्या].

संदर्भ : 1. Edwards, A. L. Experimental Design in Psychological Research, New York, 1968.

             2. Ferguson, G. A. Statistical Analysis in Psychology and Education, London, 1959.

             3. Hays, W. L. Statistics for Psychologists, New York, 1964.   

             4. Lewis, D. J. Scientific Principles of Psychology, Englewood Cliffs, 1963.

             5. Plutchik, R. Foundations of Experi mental Research, New York, 1968.

             6. Zimmy, G. H. Method   in Experimental Psychology, New York, 1962.

पंडित. र. वि.