लैंगिक द्विरूपता : पृथ्वीवर आढळणाऱ्या विविध जातींच्या प्राण्यांचे निरीक्षण केले असता आपणास असे आढळते की, पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) व अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये नर हा मादीपेक्षा खूपच निराळा दिसतो. नराचा रंग वेगळा असून त्याला विशिष्ट अवयव असतात. असे अवयव मादी प्राण्यांत नसतात. अपृष्ठवंशी प्राण्यांत सर्वसाधारणपणे मादी नरापेक्षा आकारमानाने मोठी असते. पृष्ठवंशी प्राण्यांत नर मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो परंतु याला काही अपवाद आहेत. अशा तऱ्हेने बाह्य लक्षणांतील द्विरूपता अशी संज्ञा आहे. प्राण्यांत लैंगिक द्विरूपता निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. उदा., शारीरिक गुणधर्म, जनुकांचा [गुणसुत्रांमध्ये असणाऱ्या आनुवंशिक घटकांचा ⟶ जीन] प्रभाव, हॉर्मोनांचा (उत्तेजक अंतःस्त्रावांचा) प्रभाव, भोवतालची परिस्थिती इत्यादी. काही प्राण्यांत लैंगिक द्विरूपता फक्त प्रजोत्पादन काळात निर्माण होते. या काळानंतर ही लक्षणे नष्ट झाल्यावर अशी लक्षणे निर्माण होतात. काही प्राण्यांत ही लक्षणे कायम राहतात, तर काहींत प्रजोत्पादन काळापुरतीच दिसून येतात. ही लक्षणे बाह्य स्वरूपाची असल्याने शरीरात युग्मके (जननकोशिका म्हणजेच जननपेशी) निर्माण करून ती कार्यक्षम करण्याचे कार्य ही लक्षणे करीत नाहीत परंतु प्रजोत्पादन काळात नर व मादी यांना परस्पराकडे आकर्षित करण्याचे कार्य ही लक्षणे निश्चितपणे करतात. मनुष्यात स्त्री व पुरुष यांच्यात लैंगिक द्विरूपता आढळते. शरीरावरील चरबीची वाढ, स्तनांची वाढ, शरीरावरील विशिष्ट ठिकाणी केस उगविणे, मिशा, दाढी, कातडीचा रंग, वास, आवाज इ. बाबतींत स्त्री-पुरुषांत भेद आढळतात. वरीलपैकी अनेक लक्षणे शरीरातील अंतःस्त्रावी ग्रंथींनी (सरळ रक्तात अंतःस्त्राव सोडणाऱ्या वाहिनीविहीन ग्रंथीनी) उत्पन्न केलेल्या हॉर्मोनांच्या प्रभावाने निर्माण होतात. 

अपृष्ठवंशी व पृष्ठवंशी प्राण्यांत आढळून येणाऱ्या लैंगिक द्विरूपतेची थोडक्यात माहिती खाली दिली आहे. 

अपृष्ठवंशी प्राणी : ट्रिमॅटोडा (चापट कृमी) वर्गातील शिस्टोसोमा या जातीचा प्राणी काही पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरातील रक्तात परजीवी (दुसऱ्या उपजीविका करणारा) प्राणी म्हणून रहातो [⟶ खंडितकायी कृमिरोग]. नर ८ ते १६ मिमी. लांब असून त्याच्या शरीराचा अधर (खालचा) भाग  वळलेला असतो. त्यामुळे हा भाग एखाद्या पन्हाळीसारखा दिसतो. या भागात नरापेक्षा जास्त लांब असलेली, परंतु शरीराची जाडी कमी असलेली मादी राहते. तिच्या शरीराचा पुढील व मागील भाग या पन्हाळीच्या बाहेर असतो. कोळ्यामध्ये मादी आकारमानाने नरापेक्षा मोठी असते. नर कोळ्याचा पादमृश (स्पर्श करण्याकरिता किंवा भक्ष्य पकडण्याकरिता उपयोगी पडणारे उपांग) हा शरीरावरील इतर पायांसरखा दिसत असला, तरी त्याचे कार्य वेगळे असते. नर व मादीच्या मीलनाच्या वेळी हा पादमृश लैंगिक प्रवेशी अंग (मैथुनाकरिता उपयोगी पडणारे इंद्रिय) म्हणून पुं-युग्मके (शुक्राणू) मादीच्या शरीरात सोड्याचे कार्य करतो. 

अशा प्रकारची रचना मृदुकाय प्राण्यांच्या संघातील (मॉलस्कातील) आर्गोनॉट या प्राण्यांत आढळते. नराच्या डोक्यावर अनेक वाहू असतात. त्यांपैकी एक बाहू पुं-युग्मके मादीच्या शरीरात सोडतो. इतर बाहू भक्ष्य पकडण्याचे कार्य करतात. 

निरनिराळ्या जातींच्या कीटकांतही बाह्य लक्षणांवरून, शरीराच्या रंगावरून अगर विशिष्ट नर व मादी यांत फरक करता येतो. 

पृष्ठवंशी प्राणी : या प्राण्यांत लैंगिक द्विरूपता अनेक वेळा प्रकर्षाने दिसून येते. या प्राण्यांच्या निरनिराळ्या वर्गात आढळून येणारी उदाहरणे खाली दिली आहेत. 

(१) मासे : काही जातींच्या नर माशांत विणीच्या हंगामात कातडीवर विशिष्ट रंग उत्पन्न होतो. यामुळे मादी नराकडे आकर्षित होते. झिफोफोरस हेलरी या जातीच्या नर माशाची शेपटी तलवारीसारखी लांब असते [⟶ असिपुच्छ मासा]. नराच्या प्रजोत्पादक ग्रंथीने निर्माण केलेल्या हॉर्मोनाच्या प्रभावामुळे शेपटीचे आकारमान मोठे होते. 

(२) उभयचर : (जमिनीवर व पाण्यातही राहणारे प्राणी). नर बेडूक मादीपेक्षा आकारमानाने लहान असतो. प्रजोत्पादन काळात नराच्या पुढील पायाचा अंगठा खूप जाड व काळा बनतो. हॉर्मोनाच्या प्रभावामुळे अंगठ्याने आकारमान मोठे होते. जर नराच्या शरीरातील जनन ग्रंथी अकार्यक्षम केल्या, तर हॉर्मोनाचे स्त्रवण होत नाही व हॉर्मोन नसल्यामुळे नराच्या पायाचा अंगठा मोठा होत नाही परंतु अशा नराच्या शरीरात जर टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन टोचले तर अंगठ्याच्या आकारमानात व रंगात बदल घडून येतो. 

(३) सरीसृप : (सरपटणारे प्राणी). स्युडेमिस सिक्रप्टा ट्रुस्टी किंवा स्लायडर टर्टल या जातीच्या कासवात नराच्या पायावरील मधले बोट आणि नखी मैथुनक्रियेसाठी विशिष्ट रीतीने वाढलेली असतात. हॉर्मोनाच्या प्रभावामुळे हा बदल घडून येतो. 

 

(४) पक्षी वर्ग : अनेक जातींच्या पक्ष्यांमध्ये प्रजोत्पादन काळात चोच व शरीरावरील पिसांचे रंग बदलतात, असे आढळले आहे. चोचीचा रंग बदामी, काळा, लाल, पिवळा, नारिंगी असा आढळून येतो. हा रंगबदल हॉर्मोनांच्या प्रभावामुळे होतो. 

इंग्लिश चिमणीतील (पॅसर डोमेस्टिकस) नर व मादी पक्ष्यांच्या चोची विणीच्या हंगामात काळ्या कुळकुळीत दिसतात. इतर वेळी चोचींचा रंग तपकिरी असतो. या पक्ष्यांच्या जनन ग्रंथी काढून टाकल्या, तर चोचींचा रंग फिकट हस्तिदंती होतो परंतु अशा पक्ष्यांच्या शरीरात जर अँड्रोजेन हे हॉर्मोन टोचले, तर त्यांचया चोची काळ्या होतात. प्रजनन ग्रंथी अँड्रोजेन निर्माण करतात. 

स्टर्नस व्हलगॅरिस या पक्ष्यात विणीच्या हंगामात नर व मादी यांच्या चोची गडद नारिंगी बनतात. इतर वेळी त्या काळ्या दिसतात. या पक्ष्यांतही अँड्रोजेन हॉर्मोन चोचीचा रंग बदलण्यास कारणीभूत होते, असे आढळले आहे. 

कोकिळ पक्ष्यात नराचा रंग काळा कुळकुळीत असतो. त्याची चोच पिवळट हिरवी व डोळे लाल असतात. मादीचा रंग पिंगट असून त्यावर काळे पांढरे ठिपके असतात. नर हा कुऽऽऊ, कुऽऽऊ असा आवाज काढतो, तर मादी किक्, किक् असा आवाज काढते. 

कोंबड्यांमध्ये मादी आकारमानाने लहान असते. नर आकारमानाने मोठा असून त्याच्या डोक्यावर मांसल तुरा असतो. त्याच्या शेपटीची पिसे रंगीबीरंगी व लांब असतात. कोंबडा खूप जोराने ओरडू शकतो. 

मोर पक्ष्यात नराला डोक्यावर तुरा आणि शेपटीकडे खूप लांब, रंगीबेरंगी व आकर्षक पिसे असतात. ही पिसे फाकवून नर ऐटबाजपणे पिसारा उघडून नृत्य करतो व मादीला आकर्षित करतो. मादीला (लांडोरीला) शेपटीचा पिसारा नसतो व डोकीवर तुराही नसतो. 

घराजवळ नेहमी आढळणाऱ्या चिमण्यांतही लैंगिक द्विरूपता आढळते. नराच्या डोक्यावरील व छातीवरील पिसे काळसर असतात, तर मादी फिकट तपकिरी रंगाची असते. 


(५) सस्तन प्राणी : अनेक जातींच्या सस्तन प्राण्यांत लैंगिक द्विरूपता आढळते. सिंहाच्या मानेवर ऐटबाज आयाळ असते, तर सिंहिणीला आयाळ नसते. नर सांबराच्या डोक्यावर मजबूत व तीक्ष्ण शिंगे असतात, तर मादीला शिंगे नसतात. व्हर्जिनिया डियर या जातीच्या मृगात फक्त नराला शिंगे असतात. 

सील व जलचर प्राण्यात नर आकारमानाने खूप मोठा व रंगाने काळा असतो. मादी आकारमानाने खूप लहान व पांढऱ्या रंगाची असते. नर हत्तीला सुळे असतात, तर मादीला नसतात. बैलाला मानेवर वशिंड असते, तर गाईला नसते. मनुष्यातही पुरुषाला दाढीमिशा असतात, तर स्त्रीला त्या नसतात.

अलीकडील संशोधन : लैंगिक द्विरूपता जनुकांच्या व हॉर्मोनांच्या प्रभावामुळे किंवा भोवतालच्या परिस्थितीमुळे निर्माण होते परंतु लैंगिक द्विरूपता ही केवळ शारिरिक बाह्य गुणधर्मांवरून ठरविता येत नाही. जे.डी. लिगॉन (१९६८), एल्.ए. जॅक्सन (१९७०) व एल्. किलहॅम (१९७०) यांच्या मताप्रमाणे भोवतालच्या परिस्थितीत मिळणाऱ्या अन्नाची योग्य विभागणी नर व मादी आपल्या वर्तनात लैंगिक द्विरूपता दाखवितात. उदा. डेंड्रोकोपस या नावाचे पक्षी एकत्र रहात असले, तरी नर व मादी वेगवेगळ्या प्रकारेच अन्न ग्रहण करून परस्परांना जगण्याची संधी देतात. काही पक्ष्यांच्या गळ्यात कूजित्र (श्वासनालाच्या तळाशी असलेले स्वरयंत्र) असते कूजित्राची वाढ व कार्य हॉर्मोनांच्या नियंत्रणाखाली असते. नर बदकाचे कूजित्र असमरूप असले, तरी त्याची चांगली वाढ झालेली असते. मादी बदकाचे कूजित्र समरूप व लहान आकारमानाचे असते. बदकाच्या भ्रूणाच्या शरीरातून प्रजनन ग्रंथी काढून टाकली, तर भ्रूणाचे बदकात रूपांतर होताना कूजित्र असमरूप व मोठे होते. मादीच्या शरीरातील जनन ग्रंथींनी तयार केलेल्या स्टेरॉइडाच्या प्रभावाने कूजित्र समरूप व लहान होते. नर आणि मादी बदके वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. ही एक प्रकारची लैंगिक द्विरूपता आहे. 

लैंगिक द्विरूपता व भोवतलाची अस्थिर परिस्थिती यांचा परस्पर संबंध असावा असे आर्.ई.मॉरो (१९६०) यांचे मत आहे. त्यांच्या मते प्लोसिन बिव्हर फिंच या पक्ष्यात आणि टी. एच्. हॅमिल्टन व आर्. एच्. बार्ट (१९६२) यांच्या मते पॅरूलिड वार्ब्‌ लर या पक्ष्यात वरील प्रकारचा संबंध प्रकर्षाने जाणवतो. प्लोसिअस जातीचे कोरड्या, शुष्कप्रदेशात राहणारे आफ्रिकेतील पक्षी ज्या वेळी विणीचा हंगाम नसेल, त्या वेळी त्यांचया पिसांचा रंग फिकट असतो. त्या वेळी ते समूहाने राहतात परंतु विणीच्या हंगामात नर व मादी यांच्या शरीरावरील पिसे वेगेवगळ्या भडक रंगाची बनून लैंगिक द्विरूपता दिसून येते. यामुळे नर-मादीच्या जोड्या जमून येतात. जे. आर्. जेहल (१९७०) या शास्त्रज्ञांनी वरील निरीक्षणाला दुजोरा दिला आहे.

वनस्पतींमधील लैंगिक द्विरूपता : बहुतांश फुलझाडांत एकाच फुलात दोन्ही केसरदले असतात आणि ती पराग व किंजमंडले निर्माण करतात [⟶ फूल]. किंजमंडलात बीजके विकसित होतात. उभयलिंगी प्राण्यांप्रमाणे या वनस्पतींच्या बाबतीत लैंगिक द्विरूपतेचा प्रश्नच येत नाही. काही जातींत मात्र केसरपुष्पे (पुं-पुष्पे) व किंजपुष्पे उद्‌भवू शकते. काही जातीत दोन्ही प्रकारची फुले एकाच वनस्पतीवर असतात व त्यामुळे अशा जाती एकत्रलिंग पण द्विरूपी असतात. उदा., मक्यामध्ये पुं-पुष्पबंध (फुलोरा) शेंड्यावर परिमंजरी या प्रकारचा, तर स्त्री-पुष्पबंध पानांच्या बगलेत व मोठ्या छदांनी वेढलेल्या स्थूलकणिश प्रकारचा असतो [⟶मका]. लाल भोपळा, दोडका, घोसाळे, ओक, हिकरी, बीच व बर्च ही झाडेही एकत्रलिंगी व द्विरूपी आहेत. काही जातीत दोन प्रकारची फुले निरनिराळ्या झाडांवर असतात आणि त्यामुळे त्या विभक्तलिंगी व द्विरूपी असतात. खजूर, जायफळ, पपई, हेंप, बॉक्स, विलो व पॉप्लर ही याची काही उदाहरणे आहेत. लाँबर्डी पॉप्लरमध्ये फक्त पुं-पुष्पे आढळतात व त्यामुळे त्याची शाकीय अभिवृद्धी (खोड, फांदी यांसारख्या अवयवांपासून केलेली वृद्धी) अनिवार्य असते.

पहा : उभयलिंगता लिंग. 

संदर्भ : 1. Hyman, L. H. The Inveriebrates, 5 Vols.,  New York, 194059.

           2. Person, P. The World of Insects, New York, 1959.

           3. Wilson, E. O. Sociobiology : The New Synthesis, Cambridge, Mass, 1975.

रानडे, द. र.