पचन तंत्र : (पचनसंख्या). पचन तंत्र अन्नपचनाचे कार्य करते. प्रस्तुत नोंदीत प्रथमतः मानवेतर प्राण्यांच्या व नंतर मानवाच्या पचन तंत्रासंबंधी विवरण केले आहे. प्राणी वनस्पतिज किंवा प्राणिज अन्न घेत असल्याने त्याचे स्वरूप जटिल (गुंतागुंतीचे, क्लिष्ट) असते. म्हणजेच शरीरास ते अन्न जसेच्या तसे निरनिराळ्या कार्यासाठी वापरता येत नाही. अन्नावर काही प्रक्रिया केल्या जाऊन ते शरीरास वापरण्यास सुलभ केले जाते, ह्यालाच अन्नपचन म्हणतात.

अन्न घेणे काही काळ ते साठवून ठेवणे त्याचे बारीक तुकडे करणे, ते घुसळून एकत्रित करणे, त्यावर एंडाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त द्रव्यांची) क्रिया घडवून आणणे-म्हणजेच अन्नाचे यांत्रिक व रासायनिक पचन करणे पचन झालेल्या अन्नाचे अभिशोषण करणे (शरीरातील घटकात सामावून घेणे) आणि पाण्याचा अंश काही प्रमाणात शोषून घेऊन नको असलेला व न पचलेला भाग बाहेर टाकणे [ ⟶ उत्सर्जन] ह्या सर्व क्रियांचा समावेश व्यापक अर्थाने अन्नपचन ह्या संज्ञेत होतो. ह्या क्रियांसाठी प्राण्यात पचन तंत्र आवश्यक असते.

मानवेतर प्राण्यांतील पचन तंत्र 

बहुतेक प्रगत अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) व सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत मुखाने सुरू होणारे व गुदद्वाराने शरीराबाहेर उघडणारे लांब, वलयांकित, नलिकाकार पचन तंत्र असते पण प्रोटोझोआ, पोरिफेरा व सीलेंटरेटा ह्या प्राणिसंघांत पचन तंत्र असे नसते.

आ. १. अमीबा : (१) अन्नरिक्तिका.स्थूलमानाने पचन तंत्राचे मुख-मुखीय गुहा (पोकळी), ग्रसनी (घसा, ग्रसिका, जठर व आंत्र (आतडे) असे भाग पडतात. आंत्राचे लघ्वांत्र (लहान आतडे) व बृहदांत्र (मोठे आतडे) असे मुख्य दोन भाग केले जातात. बृहदांत्र  गुदद्वाराने बाहेर उघडते. मुखाने आत घेतलेल्या अन्नाचे मुखीय गुहेतील दात, जीभ ह्यांच्या साहाय्याने तुकडे करणे, चर्वण करणे, एकत्रित घास तयार करणे इ. प्रकारे यांत्रिक पचन केले जाते. ग्रसनीतून घास ग्रसिकेत व तिथून जठरात जातो. जठर जाड, मांसल भित्तीची पिशवी असल्याने त्यात काही काळ अन्न साठविले जाते. तसेच त्याचे घुसळून एकत्रित करून यांत्रिक पचन केले जाते व एंझाइमांकरवी थोडे रासायनिक पचनही जठरात होते. लघ्वांत्रात तेवढी गरज नसल्याने अन्नाचे फार थोडे यांत्रिक पचन होते. येथे विशेषतः रासायनिक पचन पूर्ण होते व अन्नाचे अभिशोषण होते. बृहदांत्रात मैला शरीराबाहेर टाकण्यापूर्वी साठवून ठेवला जातो व त्यातील बरेचसे पाणी शरीरात परत शोषून घेतले जाऊन तो गुदद्वारावाटे बाहेर टाकला जातो. जठर व आंत्र ह्यांतील अन्न क्रमसंकोचाने पुढेपुढे ढकलले जाते.

आ. २. पॅरामिशियम : (१) मुखीय खाच, (२) ग्रसिका, (३) अन्नरिक्तिका.पचन तंत्राशी दोन प्रकारच्या ग्रंथी संबंधित असतात. लाला ग्रंथी, यकृत व अग्निपिंड ह्या ग्रंथी शरीरात अन्यत्र (पचन तंत्रात नसून इतरत्र) असून नलिकांनी पचन तंत्राशी जोडलेल्या असतात तर जठर ग्रंथी, आंत्र ग्रंथी पचन तंत्राच्या त्या त्या भागातील भित्तीत असतात. ह्या दोन्ही प्रकारच्या ग्रंथींपासून निर्माण होणाऱ्या स्रावांनी निरनिराळ्या प्रकारे अन्नपचनास मदत होते. (सविस्तर माहितीसाठी याच नोंदीतील ‘मानवी पचन तंत्र’ या शीर्षकाखालील वर्णन तसेच ‘चयापचय’ ही स्वतंत्र नोंद पहावी).

आ. ३. स्पंजाच्या देहभित्तीचा काही भाग : (१) कोॲनोसाइट, (२) अरीय नालाचा काही भाग.

प्रोटोझोआ संघात अन्नपचनासाठी अन्नरिक्तिका (अन्नकणाभोवतील द्रवयुक्त जागा) असतात (आ.१) पॅरामिशियमामध्ये (आ. २) मुखीय खाच व ग्रसिका या निश्चित मागांतून अन्न आत घेऊन अनेक अन्नरिक्तिका तयार केल्या जात असल्या, तरी पचन तंत्र असे नसते. या प्राण्यांत कोशिकाद्रव्यापासून (पेशीतील जटिल रासायनिक संघटन असलेल्या द्रव्यापासून) निर्माण झालेल्या पाचकरसांनी अंतःकोशिका (कोशिकेच्या आत होणारे) स्वरूपाचे पचन होते व उरलेले त्याज्य पदार्थ वेळोवेळी बाहेर टाकले जातात. त्यांचात (पोरिफेरा संघ) अरीय नालाच्या (त्रिज्यीय मार्गाच्या) अस्तरात असणाऱ्या कोॲनोसाइटामध्ये (गळपट्टीसारखा भाग असणाऱ्या कशाभिकायुत-जीवद्रव्याच्या दोऱ्यासारख्या विस्तारांनी युक्त असलेल्या-कोशिकेमध्ये कॉलर सेलमध्ये) अन्नाचे अंतःकोशिकी पचन होते (आ. ३). हायड्रा, समुद्रपुष्प इ. सीलेंटेरेटांत मुख शरीरामध्ये जठरवाहिनीगुहिकेत (आ.४) उघडते. ह्या प्राण्यांत गुद नसते. त्यामुळे अन्नपदार्थ मुखातून पाण्याबरोवर आत घेतले जातात व नको असलेले पदार्थ मुखा वाटेच बाहेर टाकले जातात. जठरवाहिनीगुहिकेस विशिष्ट कोशिकांचे अस्तर असल्याने पचन त्या कोशिकांच्या आत (अतःकोशिकी) व गुहेत (को शि का बा ह्य ) अशा दोन्ही प्रकारांनी होते.


आ. ४. हायड्र्याची जठरवाहिनीगुहिका : (१) मुख, (२) जठरवाहिनीगुहिका.आ. ५. यकृत पर्णाभकृमीचे पचन तंत्र : (१) ग्रसनी, (२) ग्रसिका, (३) शाखायुक्त आंत्र.प्लॅटिहेल्मिंथिस आणि इतर प्रगत अपृष्ठवंशीयांत पचन तंत्र असते. यकृत पर्णाभकृमी ह्या परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) पृथुकृमींत (चपट्या कृमींत) आंत्र शाखायुक्त असून शरीरभर पोहोचलेले असते (आ. ५)  तर पट्टकृमीत पचन तंत्राचा पूर्ण अभाव असतो. गांडूळातील पचन तंत्र सरळ असून अन्न साठवून ठेवण्यासाठी अन्नपुट व अन्नाच्या यांत्रिक पचनासाठी पेषणी असते (आ. ६). आर्थ्रोपोडा संघातील खेकडा, शेवंडा इ. प्राण्यांत कॅल्शियमाच्या लवणांनी युक्त) दात असलेली पेषणी असते तर झुरळ, नाकतोडे इ. कीटकांत अन्नपुट, पेषणी व मध्यांत्रास (जठरास) जो ड ले ले सहा ते आठ अंघनाल (पिशवी सारखे एका टोकाला बंद असलेले मा र्ग) अ स ता त (आ. ७). ए का य नो ड र्मा टा सं घा ती ल ⇨तारामीन हा कालवासारख्या प्रा ण्या चा (मॉ ल स्का सं घा च्या शिं पा धा री व र्गा ती ल द्वि पु टी प्राण्याचा) अन्न म्हणून वापर करताना जठराचे बहिर्वलन (आतील बाजू बाहेर काढणे) करून पचन झालेले अन्न जठरानेच परत शरीरात घेतो.

आ. ६. गांडूळाचे सरळ पचन तंत्र : (१) मुख, (२) ग्रसनी, (३) ग्रसिका, (४) अन्नपुट, (५) पेषणी, (६) आंत्र, (७) गुदद्वार.

निरनिराळ्या पृष्ठवंशी प्राणिवर्गात आहारसवयीनुसार (शाकाहारी, मांसाहारी वगैरे) काही बदल आढळत असले, तरी पचन तंत्राची एकूण रचना सारखीच असते. सुरुवातीस वर्णन केल्याप्रमाणेच त्याचे निरनिराळे भाग पडतात.

आ. ७. झुरळाचे पचन तंत्र : (१) अन्नपुट, (२) पेषणी, (३) मध्यांत्रास जोडलेले अंधनाल, (४) मध्यांत्र.मुख मुखीय गुहिकेत उघडते. सायक्लोस्टेम वर्गात मुख गोलाकार असून ज ब डे नसतात. बाकीच्या सर्व पृष्ठवंशीयांत जबडे असतात. मुखीय गु हि के च्या संबंधात जबडे व त्यांवरील दात आणि त्यांचे प्र का र, जी भ इत्यादींचा अभ्यास केला जातो [ ⟶ दात  जीभ]. सरीसृपांत ( स र प ट णा ऱ्या प्राण्यांत) व मुख्यत्वे स्तनी प्राण्यांत मुखाच्या भोवती का ही से जा ड ओठ असतात. च र णा ऱ्या प्राण्यांत ओठ परिग्राही (पकडण्यासाठी उ प यो गी असलेले) असतात. पक्ष्यात जबड्यांच्या हाडावर शृंगीभवनाने (केराटीन या प्रथिनाच्या साहाय्याने कठीण होणाच्या क्रियेने) चोच तयार होते. तिचा उपयोग भराभर अन्न वेचण्यास सामान्यतः केला जातो. मुख आणि मुखीय गुहिकेचा भूचर प्राण्यात आवाजनिर्मितीस आणि विशेषतः मानवात बोलण्यास फार उपयोग होतो.

आ. ८. शार्क माशाचे पचन तंत्र : (१) मुख, (२) ग्रसिका, (३) जठर, (४) आंत्र, (५) सर्पिल वली, (६) गुदांत्र ग्रंथी, (७) गुदांत्र, (८) अवस्कर.मुखीय गुहिकेमागे ग्रसनी किंवा घसा हा भाग असतो आणि तो श्वसन तंत्रास व पचन तंत्राच्या ग्रसिकेस स्वतंत्रपणे जोडलेला असतो. ग्रसिका ही नळीसारखीअसून अन्न ग्रसनीतून जठरात पाठविण्यास मदत करते. ग्रसिकेपासून गुदापर्यंत असणाऱ्या नलिकेस खऱ्या अर्थाने आंत्र म्हटले जाते. ग्रीवा (मान) नसलेल्या प्राण्यांत [ उदा., मासे (आ. ८), उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे प्राणी) इ.] असते. मान असलेल्या प्राण्यांत ती लांब असते. स्तनी प्राण्यांत ग्रसिका मध्यपटल (छातीची पोकळी व उदराची पोकळी यांना विभागणारे दाबयुक्त पटल) भेदून जठरास जाऊन मिळते. पक्ष्यामध्ये (आ. ९) ग्रसिकेच्या खालच्या टोकाशी अन्नपुट नावाचा अंधवर्ध (पिशवीसारखी एका टोकास बंद असलेली वाढ) असून त्यात अन्न साठविले जाते.


आ.९. कोंबडीचे पचन तंत्र : (१) चोच, (२) ग्रसिका, (३) अन्नपुट, (४) ग्रंथिल जठर, (५) पेषणी, (६) लवांत्र, (७) बृहदांत्र, (८) अवस्कर द्वार, (९) अग्निपिंड, (१०) यकृत.जठर हा एक लांबट पिशवीसारखा भाग असून त्याची भित्ती स्नायुमय व जाड असते. जठरात ग्रसिका उघडते व जठर लघ्वांत्रात अघडते. मासे, सरीसृप वगैरे प्राण्यांत जठर साधे, लांबट पिशवीसारखे इंग्रजी J अक्षराच्या किंवा अन्य काही आकारांचे असते. काही माशांत (उदा., पर्च, मॅकेरेल, स्कँबर इ.) जठरनिर्गमद्वाराशी अंधनाल जोडलेले असतात (आ. १०). 

आ.११. रोमंथी प्रायांचे जठर : (१) ग्रसिका, (२) रोमंथिका, (३) जालिका, (४) तृतीय आमाशय (भंजिका), (५) जठाशय, (६) ग्रहणी, (७)रवंथ करण्यापूर्वी गिळलेल्या अन्नाचा मार्ग, (८) रवंथ केल्यानंतर पुन्हा गिळलेल्या अन्नाचा मार्ग, (तुटक रेषा – आंतले ७ व ८ मार्ग). पक्ष्यात जठराचे दोन भाग पडतात : ग्रंथिल जठर व पेषणी (आ. ९). पेषणीची भित्ती स्नायुमय व जाड असून तिच्या आतील बाजूस शृंगी द्रव्याचा (शिंगांच्या द्रव्यासारख्या कठीण द्रव्याचा) थर असतो. पेषणीत लहान लहान दगडही असतात. गाय, शेळी, मृग, जिराफ इ. रोमंथी (रवंथ करणाऱ्या) प्राण्यांत जठराची सर्वांत अधिक वाढ झालेली असते. त्याचे संरचना व कार्य ह्या दृष्टीने रोमंथिका, जालिका, तृतीय आमाशय (भंजिका) व जठराशय असे चार वेगवेगळे भाग असतात [ (आय ११) ⟶ रवंथ करणे]. उंटाच्या जठरात पाण्याच्या (पाणी असलेल्या) कोशिका असतात. त्यांत साठविलेल्या पाण्यावर तो वाळवंटात पाणी न पिताही दीर्घकाल राहू शकतो असे मानले जाते, तथापि त्यास शास्त्रीय आधार नाही. पाणघोड्यात व देवमाशात जठर अनेक कप्प्यांत विभागलेले असते, तर सायक्लोस्टोमांमध्ये व कायमीरा मत्स्यात जठर असे नसतेच.

आंत्र हा पचन तंत्राचा सर्वांत अधिक लांबीचा भाग होय. सर्वसाधारणपणे आकारमानाने लहान व मोठ्या असणाऱ्या प्राण्यांत आंत्र हे अनुक्रमे कमी व जास्त लांबीचे असते. तसेच ते शाकाहारी प्राण्यात लांब व मांसाहारी प्राण्यात काहीसे आखूड असते.

लघ्वांत्राचे निरनिराळ्या प्राण्यांत दोन किंवा तीन भाग पडत असले, तरी ज्या भागात जठर उघडते आणि यकृत व अग्निपंड ह्या ग्रंथीच्या नलिका उघडतात त्या आंत्राच्या पहिल्या भागास ग्रहणी म्हणतात. शार्क (मुशी) ह्या माशात लघ्वांत्राचा अभिशोषण-पृष्टभाग सर्पिल वलीने म्हणजे घडीने (आ.८), तर स्तनी प्राण्यांत तो रसांकुरांनी (आंत्राच्या पोकळीत बोटासारख्या घुसलेल्या व ज्यांच्या तळाशी स्रावी ग्रंथींची तोंडे आहेत अशा अंकुरांनी) कितीतरी पटींनी वाढविला जातो.

आ. १२. सशाच्या पचन तंत्राचा काही भाग : (१) लध्वांत्र, (२) अंधनाल, (३) आंत्रपुच्छ, (४) बृहदांत्र, (५) गुदात्र, (६) गुदव्दार.

लघ्वांत्राच्या मानाने बृहदांत्र खूपच आखूड असते. तसेच स्तनी प्राणी वगळता इतर प्राण्यांतही ते अगदी आखूड असते आणि लघ्वांत्रा पासून सुस्पष्टही (स्वतंत्र किंवा नेमके असे दाखविता येण्या सारखे) असत ना ही. काही मत्स्य, उभयचर, सरीसृप व पक्षी यांत बृहदांत्र अवस्करात (ज्यात गुद, जननवाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा समाइक कोष्ठात) उ घ ड ते, तर अ स्थि मी न व स्त नी प्राण्यांत ते गुदद्वाराने स्वतंत्रपणे शरीराबाहेर उ घ ड ते. उ पा स्थि मी नां त (ज्यांचा सांगाडा मऊ, लवचिक पण क ठी ण अशा उपास्थींचा-कूर्चांचा – ब न ले ला अ स तो अशा माशांत) गुदांत्र ग्रंथी (आ. ८) तर काही सरीसृप व पक्ष्यांत (आ.९) अंधनाल बृहदांत्राशी जोडलेले असतात. स्तनी वर्गातील घोडा, ससा (आ. १२) इ. प्राण्यांत बृहदांत्राशी जोडलेला अंधनाल हा भाग आकाराने मोठा असून त्यास काहीसे लांब आंत्रपुच्छ (ॲफेंडिक्स) जोडलेले असते. माणसात आंत्रपुच्छ केवळ अवशेषांग म्हणून असते.

परांजपे, स. य. गोखले, कुसुम कवें, ज. नी.


मानवी पचन तंत्र 

अन्नाचे चर्वण, गिलन, पचन आणि अभिशोषण या क्रिया करणारी सर्व इंद्रिये आणि अन्नातील निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकणारी इंद्रिये एवढ्यांचा समावेश पचन तंत्रात होतो. मानवी शरीर अनेक प्रकारच्या कोशिकांपासून बनलेले असल्यामुळे त्याचे कार्य व रचना दोन्ही जटिल आहेत. अन्नातील आवश्यक पदार्थ या कोशिकांपर्यंत पोहोचल्यास त्यांचे कार्य व्यवस्थित चालते. अन्नातील कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि लिपिडे किंवा वसा (स्निग्ध पदार्थ) हे घटक ते सेवन करतेवेळी जटिल संयुगांच्या स्वरूपात असतात. त्यांचे विघटन करून त्यांपासून अतिसूक्ष्म रेणू तयार करणे, द्रवस्वरूपातील हे रेणू आतड्याच्या श्लेष्मास्तरातून (सर्वांत आतील बुळबुळीत थरातून) रक्तात मिसळविणे व त्याच स्वरूपात ते निरनिराळ्या कोशिकांप्रत पोहोचविणे या सर्व क्रिया म्हणजेच ‘पचन’ होय. अविद्राव्य जटिल अन्नपदार्थापासून सूक्ष्म व अभिशोषणयोग्य अन्नकण बनविणे म्हणजेच पचन अशी सुटसुटीत व्याख्याही  करता येते. पचन तंत्राचे दोन प्रमुख भाग पडतात : (१) पचननलिका किंवा पचनमार्ग, (२) पचन क्रियेला* साहाय्यभूत इंद्रिये.

पचनमार्ग : तोंडापासून गुदद्वारापर्यंतच्या सु. ९ मी. लांबीच्या नळीवजा अन्नमार्गाला पचनमार्ग म्हणतात. वरून खाली त्याचे पुढील पोटभाग आहेत.

मुख : जीभ, दात व लाला ग्रंथींचा समावेश यात होतो [ ⟶ मुख जीभ दात लाला ग्रंथि]. पचनास आवश्यक अशी चर्वणक्रिया येथे होते.

प्रसनी व ग्रसिका : चर्वण झालेले अन्न जठरापर्यंत पोहोचविणारा भाग. या ठिकाणी गिळण्याची क्रिया प्रामुख्याने होते [ ⟶ ग्रसनी ग्रसिका].

जठर : पिशवीसारख्या या भागात चर्वण झालेले अन्न सर्वसाधारणपणे ३ ते ४ १/२ तासांपर्यंत थोपवले जाते. या ठिकाणी जठरभित्तीच्या जोरदार क्रमसंकोचामुळे अन्न घुसळणे, द्रवीकरण आणि जठररसात मिसळणे या क्रिया होतात [ ⟶ जठर].

लघ्वांत्र : यात ग्रहणी, रिक्तांत्र व शेषांत्र या तीन भागांचा समावेश होतो. जठरातील पचनक्रिया संपल्यानंतर जो आमरस (अर्धवट पचलेल्या अन्नापासून तयार होणारा लोण्यासारखा पातळसर पदार्थ) त या र हो तो तो लघ्वांत्रात गे ल्या नं त र पुढील पचनक्रियेस सु रु वा त होते [ ⟶ आंत्र अभिशोषण ग्रहणी].

आ. १३. मानवी पचनमार्ग : (१) मुख, (२) लाल ग्रंथी, (३) ग्रसनी, (४) ग्रसिका, (५) जठर, (६) अग्निपिंड, (७) यकृत, (८) पित्ताशय, (९) ग्रहणी, (१०) रिक्तांत्र, (११) शेषांत्र, (१२) आंत्रपुच्छ, (१३) आरोही बृहदांत्र, (१४) अनुप्रस्थ बृहदांत्र, (१५) अवरोही बृदांत्र, (१६) अवग्रहाकृती बृहदांत्र, (१७) गुदांत्र.

बृहदांत्र : शारीरिक रचनेप्रमाणे उदरगुहेतील मो ठ्या आतड्याचे आरोही, अनुप्रस्थ (आडवा) आ णि अवरोही असे तीन भाग असून त्यापुढील श्रोणिगुहेतील (ओटीपोटातील पोकळीतील) भा गा स अवग्रहाकृती (इंग्रजी S अक्षराच्या आकाराचे) बृहदांत्र म्हणतात. हा भाग आणि गुदद्वार यांच्या दरम्यान असलेल्या भागाला गुदांत्र म्ह ण ता त. अन्नाचे लघ्वांत्रात पचन व अभिशोषण झाल्यानंतर उ र ले ला मिश्र अवशेष मो ठ्या आतड्यात शिरतो. या अवशेषातून हवे तेवढे पाणी व विद्युत् विच्छेद्य (विद्युत् प्रवाहामुळे ज्यांचे घटक अलग होतात असे) पदार्थ बृहदांत्रात अभिशोषिले जातात व शेवटी नको असलेला भाग मल स्वरूपात गुदद्वारातून बाहेर टाकला जातो [⟶  गुदद्वार व गु दां त्र मलोत्सर्ग].

पचनक्रियेस साहाय्यभूत इंद्रिये : यामध्ये ⇨ जीभ, ⇨ दात, ⇨ लाला ग्रंथी, ⇨ यकृत, ⇨अग्निपिंड आणि ⇨ पर्युदर यांचा समावेश होतो. 

भ्रूणविज्ञान : (भ्रूणाची निर्मिती व त्याचा विकास यांचा अभ्यास करणारे शास्त्र). अंडाच्या निषेचनानंतर (फलनानंतर) एककोशिकात्मक भ्रूण तयार होतो आणि त्याची कोशिकाविभाजनामुळे वाढ होते, या विभाजनामुळे भ्रूणाचा आकार गोल व चपटा बनतो, विभाजन सतत व त्वरेने चालू राहिल्यामुळे या तबकडीसारख्या भ्रूणात कोशिकांचे एकावर एक असे तीन थर तयार होतात. या थरांना बाह्यस्तर, मध्यस्तर व अंतःस्तर अशी नावे आहेत. प्रत्येक थरातील कोशिकांचे स्वरूप आणि कार्य भिन्न असते आणि संबंध शरीर या तीन थरांतील कोशिकांपासून बनते [ ⟶ भ्रूणविज्ञान].


आ.१४. भ्रूणातील पचन तंत्राच्या वाढीचे आरंभीचे टप्पे : (अ) १६ दिवसानंतर : (१) पीतककोश, (२) भावी अग्रांत्र, (३) अपरापोषिका (४) (आ) १८ दिवसानंतर : (१) अग्रांत्र, (२) पश्र्चांत्र, (३) भावी मुख, (४) भावी अवटू ग्रंथी, (५) भावी फुफ्फुस, (६) भावी यकृत, (७) पीतककोश (इ) २५ दिवसानंतर : (१) डोके, (२) फुफ्पुस, (३) यकृत, (४) पीतककोश, (५) अवस्कर (उत्सर्गमार्ग) (ई) ३२ दिवसानंतर : (१) पीतककोशांचा उरलेला भाग, (२) मुख, (३) जठर, (४) फुफ्फुस, (५)यकृत, (६) नाळ, (७) आतडी , (८) गुदपथ.

पचन तंत्राचा पुष्कळसा भाग अंतःस्तरापासून बनतो. त्याचा सुरुवातीचा व शेवटचा भाग बाह्यस्तरापासून आणि त्याचा आधाराचा व पोषणाचा भाग मध्यस्तरापासून तयार होतात. प्रथम सपाट असलेल्या अंतःस्तरापासून नंतर जो नलिकावजा भाग तयार होतो, त्याला अंतःस्तरीय नलिका म्हणतात. या नलिकेचे तीन प्रमुख भाग असून पुढच्यास अग्रांत्र, मधल्यास मध्यांत्र आणि मागच्यास पश्चांत्र म्हणतात. अग्रांत्राच्या पुढील टोकावरचा नलिकेचा भाग बाह्यस्तराशी चिकटलेला असतो, तसाच तिचा पश्चांत्राच्या टोकाचा भागही बाह्यस्तराशी चिकटलेला असतो. हे दोन्ही टोकाकडील भाग जेव्हा मोकळे होतात तेव्हा आंत्रमार्गाची दोन मोकळी तोंडे ‘मुख’ आणि ‘गुदद्वार’ तयार होतात व त्याचा बाह्य परिसराशी कायमचा संबंध प्रस्थापित होतो. अग्रांत्राच्या टोकावर ज्या ठिकाणी बाह्यस्तर आणि अंतःस्तर एकमेकांस चिकटतात त्या ठिकाणी जो खोलगट भाग असतो, त्याला मुखपथ म्हणतात व त्यापासूनच मुख तयार होते. असाच खळगा पश्चांत्राच्या टोकावरही असतो व त्याला गुदपथ म्हणतात व त्यापासून गुदद्वार तयार होते. यामुळे मुख आणि गुदद्वार यांची आतील आवरणे बाह्यस्तरीय कोशिकांपासून बनतात. यामुळेच दात, जिभेचा पुढील २/३ भाग आणि लाला ग्रंथी बाह्यस्तरापासून तयार होतात.

भ्रूणाच्या पीतककोशाच्या (पोषक द्रव्ययुक्त कोशाच्या) अंतःस्तराच्या अंतःर्वलनाची सुरुवात, म्हणजेच आंत्रमार्ग तयार करण्याची सुरूवात, भ्रूणवस्तेच्या सोळाव्या दिवशी दिसू लागते. अठराव्या दिवशी अग्रांत्र आणि पश्चांत्राची चांगली वाढ झाल्याचे दिसते. पुढच्या भागात भावी ⇨ अवटू ग्रंथी, श्वसनमार्ग आणि यकृत चांची ‘आद्यांगे’ दिसू लागतात. पंचविसाव्या दिवशी आंत्रमार्गाचा बहुतेक सर्व खालचा पृष्ठभाग बंदिस्त होतो व तो एका मोठ्या छिद्रातून संकोचित पीतककोशाशी जोडलेला असतो. बत्तीसाव्या दिवशी आंत्रमार्गाची लांबी ५ मिमी. असून त्याचे प्रमुख पोटभाग ओळखता येतात (आ. १४).

भ्रूणमुखाच्या तळभागात मुखपथ व अग्रांत्र यांतील निरनिराळी आद्यांगे मिळून जीभ तयार होते आणि तिचा पुढचा २/३ भाग बाह्यस्तरापासून व मागचा १/३ भाग अंतःस्तरापासून तयार होतो. हे दोन्ही भाग जेथे जुळतात त्या ठिकाणी V आकाराची रेषा दिसते. ही निरनिराळी आद्यांगे एकमेकांस जुळून भावी जीभ तयार होण्याची सर्व तयारी भ्रूणावस्थेच्या दुसऱ्या महिन्याच्या शेवटास पूर्ण झालेली दिसते.

ग्रसनीच्या खालील आंत्रमार्ग फारच अल्प काळ साध्या नलिकेसारखा असतो. भ्रूणावस्थेच्या दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीसच विभेदीकरणास (श्रम विभागणीकरिता इंद्रियाच्या संरचनेत होणाऱ्या रूपांतरणास) सुरुवात होते व त्या ठिकाणी भावी जठर बनते त्या ठिकाणी रुंदी वाढून फुगवटा येतो. याशिवाय भावी लघ्वांत्र भागाची लांबी वाढते. या वाढलेल्या भागाचा एक वळसा नाभीमध्ये शिरतो. नलिकेचा शेवटचा भाग रूंद बनून तेथे जी रुंदट पोकळी बनते तिला अवस्कर किंवा उत्सर्गमार्ग म्हणतात. भ्रूणाच्या वृक्कापासून (मूत्रपिंडापासून) निघणाऱ्या मध्यवृक्कीय नलिका उत्सर्गमार्गास येऊन मिळतात. भ्रूणाच्या जठरभागाची विशेषेकरून पुढील पृष्ठभागाची रुंदी झापाट्याने वाढते. यामुळे या भागाचे आवर्तन होते आणि फुगीर भाग डावी कडे वळतो. या असमान वाढीमुळे जठराला पुढच्या बाजूला लांब व गोलाकार कडा तयार होते व मागील बाजूस आखूड अर्धचंद्राकृती कडा तयार होते. या कडांना अनुक्रमे जठराच्या दीर्घवक्र व लघु वक्र कडा म्हणतात. जठर असे डावीकडे वळल्यानंतर त्याखालील नलिकेचा जो भाग उजवीकडे वळल्या सारखा राहतो, तो अर्धचंद्राकृती नलिकेसारखाच राहतो व त्यापासून भावी ग्रहणी बनते.

जठराचा भावी आकार तयार झाल्यानंतर लघ्वांत्राचा वळसा परिपीडन होऊन बराच लांब होतो. भ्रूणावस्थेचा दहाव्या आठवड्यात लघ्वांत्र नाभीतून काढले जाऊन त्याची भावी जागा व्यापते. बृहदांत्राची वाढ मंद असते व त्याचे उदरगुहेतील तीन प्रमुख भागही गर्भावधी कालाच्या अर्ध्यानंतर स्पष्ट होऊ लागतात. सस्तन प्राण्यांत उत्सर्ग मार्गाचे दोन विभाग भ्रूणवस्थेत लवकरच दिसतात आणि त्यांना पचनमार्गासंबंधी व मूत्र-जननसंबंधी विभाग म्हणतात. इतर पृष्ठवंशी प्राण्यांत मोठे आतडे, मूत्रवाहिनी व जननवाहिनी या सर्वांना एकच उत्सर्गमार्ग असतो.

भ्रूणावस्थेच्या सहाव्या आठवड्यात मध्यस्तराची वाढ होऊन पचननलिकेच्या मांसल भित्ती व श्लेष्मकलास्तर (बुळबुळीत पटलाचे अस्तर) तयार होतात. मूळ मध्यस्तरापासून बाह्यावरण तयार होते. नलिकेच्या आतील भागातील ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाची) तिच्या बाह्य भागातील उतकापेक्षा झपाट्याने वाढ होत असल्यामुळे श्लेष्मकला व तिच्यावरील थराला अनेक घड्या पडतात आठव्या आठवड्यात अनेक रसांकुर तयार होतात व त्यामुळे आंत्रमार्गाचा अभिशोषणक्षम पृष्ठभाग पुष्कळच वाढतो. मूळ अंतःस्तरापासून अगदी पृष्ठभागावर उभ्या, उंच कोशिकांची एकच रांग असलेला थर बनतो आणि या कोशिकांपासून श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) व हायड्रोक्लोरिक अम्ल यांसारखे जीवरासायनिक पदार्थ स्रवतात. याशिवाय त्या अभिशोषणक्षम असून अन्नातील पचनक्रिया पूर्ण झालेले रेणू अभिशोषित करून रक्तात मिसळविण्यास मदत करतात.

आ.१५. जठर व त्याच्यालगतची आद्यांगे : (१) जठर, (२) यकृत व पित्ताशयाचे आद्यांग, (३) अभ्युदरीय अग्नि-पिंड आद्यांग, (४) ग्रहणी , (५) पृष्ठीय अग्निपिंड, (६) प्लिहेचे (पानथरीचे) आद्यांग.

अंतःस्तरीय नलिकेच्या तळभागात भावी जठराच्या खालीच भावी यकृताचे आद्यांग भ्रूणवस्थेच्या चौथ्या आठवड्यात दिसू लागते. ज्या ठिकाणी हे आद्यांग असते तो भाग आंत्रमार्गाशी जोडलेलाच राहून त्यापासून भावी समाईक पित्तनलिका बनते. आद्यांगाची वाढ सुरू झाल्यानंतर त्याचे पाच विभाग होतात व प्रत्येक विभाग एका यकृतनलिकेने समाईक पित्तनलिकेशी जोडलेला असतो. याच आद्यांगाच्या आणखी एका प्रवर्धापासून (वाढीपासून) पित्ताशय व पित्ताशयनलिका बनतात. यकृताची वाढ एवढी झपाट्याने  होते की, त्याच्यापेक्षा अगोदर कार्यान्वित झालेल्या हृदयापेक्षा त्याचा आकार सातव्या आठवड्यातच मोठा होतो. अंतःस्तरीय नलिकेच्या दोन बांजूस दोन प्रवर्धासारखी आद्यांगे निघून त्यांपासून अग्निपिंड तयार होते. काही काळ ही प्रवर्धे स्वतंत्र वाढतात, परंतु नंतर एकमेकांस जोडली जातात व भावी अग्निपिंड तयार होतो. पूर्ण वाढलेल्या अग्निपिंडातही दोन खंड स्पष्ट दिसतात. या दोन प्रवर्धाना पृष्ठीय आणि अभ्युदरीय अशी नावे आहेत (आ. १५). अभ्युदरीय प्रवर्धाचा आंत्रनलिकेशी संबंध कायम राहतो. त्या ठिकाणी अग्निपिंडनलिका तयार होते. अग्निपिंडाची आद्यांगे नेहमी दुपटीने वाढतात आणि म्हणून त्यांची खंडाग्रे व नलिकाही दुपटीनेच वाढतात. या नलिकाद्वारे अग्निपिंडस्त्राव गोळा केला जाऊन अग्निपिंडनलिकेतून ग्रहणीत येतो. पृष्ठीय प्रवर्धात काही कोशिकापुंजांची वेगळी वाढ होऊन त्यापासून लांगरहान्स द्वीपके (पी. लांगरहान्स या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारी द्वीपके) नावाचे विशिष्ट ऊतक बनते. अग्निपिंडाचा अंतःस्रावी (रक्तात सरळ मिसळणारा स्राव स्रवणारा) भाग ही द्वीपके असून त्यांपासून ⇨ इन्शुलीनग्लुकागॉन ही ⇨ हॉर्मोने स्रवतात.


पचन तंत्र कार्यान्वित होण्याची तयारी : मूल जन्मण्यापूर्वीच पचन तंत्र कार्यक्षम होण्याची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झालेली असते. गर्भावस्थेच्या पहिल्या आठवड्यानंतर यकृत ग्लायकोजेनाचा साठा करू लागते. अस्थिमज्जेचे (लांब हाडातील मध्यवर्ती पोकळ्यांतील संयोजी – जोडणाऱ्या-तंतुमय ऊतकाचे) कार्य उशीरा सुरू होत असल्यामुळे यकृत अस्थिकोशिका उत्पादनाचेही कार्य करते. अग्निपिंडातील प्रथिनाच्या अपघटनास (लहान रेणुंमध्ये तुकडे पाडण्यास) मदत करणारा अग्निपिंडरस  गर्भकालाच्या शेवटी शेवटी तयार होऊ लागतो. अग्निपिंडाचे अंतःस्रावी कार्य (हॉर्मोन-उत्पादन) मात्र या अगोदरच सुरू झालेले असते. गर्भकालाच्या चौथ्या ते पाचव्या महिन्यात गिळण्याची क्रिया व जठरांत्रमार्गाची हालचाल सुरू होते. भ्रूणवस्थेच्या वृद्धीबरोबरच आंत्रमार्गाची हालचाल सुरू होते. भ्रूणवस्थेच्या वृद्धीबरोबरच आंत्रमार्गाची हालचाल, क्रमसंकोच वगैरे अधिक जोरदार बनते. गर्भ ज्या उल्बद्रवात [⟶ उल्ब] तरंगत असतो, त्यातील काही द्रव तोंडाने गिळला जाऊन त्यातील काही भाग आतड्यातून अभि शोषिला जात असावा. आंत्रमार्गातील झडून पडलेल्या कोशिका, गिळलेला उल्बद्रव, आंत्र ग्रंथीचा स्राव व इतर काही पदार्थ मिळून आंत्रमार्गात साचलेले टाकाऊ पदार्थ म्हणजेच ‘प्रथम विष्टा’ (जन्मानंतर पहिल्याच मलोत्सर्जनात बाहेर पडणारा मल) असते. जन्मापूर्वी संपूर्ण पचन तंत्र अकार्यक्षमच असते.

पचनक्रिया : पचन तंत्राच्या मुख, जठर, लघ्वांत्र आणि बृहदांत्र या चार मार्गांत प्रामुख्याने पचनक्रिया होते.

मुख: पचन तंत्राचे मुख हे सुरुवातीचे द्वार असून त्यात अन्नाचे चर्वण प्रामुख्याने होते. त्याशिवाय लाला ग्रंथींचा स्राव (लाल) येथेच मिसळत असल्यामुळे अन्नाचा गिळण्यास सुलभ असा घास बनतो. लाळेत जी एंझाइमे असतात ती अन्नातील कार्बोहायड्रेट घटकांच्या विघटनास सुरुवात करतात. अन्नातील पॉलिसॅकॅराइडांपासून डेक्स्ट्रीन व माल्टोज ही मोनोसॅकॅराइडे या एंझाइमांच्या क्रियेमुळे तयार होतात [ ⟶ कार्बोहायड्रेट]. सेवन केलेल्या मिश्र अन्नातील एकूण कार्बोहायड्रेटांपैकी ४०%  भाग जेवणानंतर एका तासात अपघटित होतो. लाळमिश्रित गिळलेला घास जठरात उतरल्यानंतर घासात तेथील अम्ल पूर्णपणे भिनेपर्यंत लाळेचे कार्य तेथेही चालूच असते.

जठर: हा पचन तंत्राचा सर्वांत अधिक फुगीर भाग असून त्याची धारणक्षमता सु. ९५० घ. सेंमी. असते. त्याचा सर्वसाधारण आकार इंग्रजी J अक्षरासारखा असून तो व्यक्तिशः निरनिराळा व त्यामधील साठ्याप्रमाणे बदलतो. जठरभित्ती अरेखित (ज्यावर उभ्या रेषा नाहीत अशा अनैच्छिक) स्नायूंच्या उभ्या गोलाकार आणि तिरप्या रचलेल्या स्नायुकोशिकांच्या बनलेल्या असल्यामुळे त्यांची हालचाल अन्न घुसळून घुसळून जठररसात मिसळविते. जठराच्या आतील भागाचे अस्तर जाडसर श्लेष्मकरेचे बनलेले असते. जठर जेव्हा रिकामे असते तेव्हा या श्लेष्मकलास्तरावर अनेक छोट्या छोट्या वळ्या पडलेल्या असतात. वळ्यांच्या उंच भागावर लहान लहान खड्डे असतात व त्यांना जठर खळगे म्हणतात. या प्रत्येक खळग्यात एक जठर ग्रंथीचे तोंड असते. जठराच्या निरनिराळ्या भागांत जठर ग्रंथी निरनिराळ्या प्रकारच्या असतात : (१) अम्लस्रावी, (२) एंझाइमजनक आणि (३) श्लेष्मास्रावी (आ. १६). हायड्रोक्लोरिक अम्ल, पेप्सीन आणि श्लेष्मा या त्यांच्या स्राव मिश्रणापासून जठररस तयार होतो. यांशिवाय जठररसात इतरही काही पदार्थ असतात. हायड्रोक्लेरिक अम्ल पेप्सिनाच्या प्रथिनावरील योग्य क्रियेस मदत करते. जठर-लायपेज नावाचे आणखी एक एंझाइम लोणी व अंड्याच्या पीतकातिल वसा भागाच्या पचनास मदत करते. जठररसाचे उत्पादन अहोरात्र चालूच असते व चोवीस तासांत २ ते ३ लि. जठररस तयार होतो. या उत्पादनावर तंत्रिकांचे (मज्जांचे) व रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण असते.

आ. १६. जठरबुध्नातील जठर ग्रंथी (सुक्ष्म रचना) : (१) श्र्लेष्मास्रावी कोशिका, (२) एंझाइमजनक कोशिका, (३) अम्लस्रावी कोशिका.

अन्नसेवन करावयास लागताच जठररसाचे उत्पादन वाढते. उत्पादनाचे तीन टप्पे असून त्यांना अनुक्रमे मस्तिष्क टप्पा, जठर टप्पा आणि आंत्र टप्पा अशी नावे आहेत. अन्नाचे दर्शन, अन्नाचा सुवास आणि आवडत्या अन्नपदार्थांचा विचार या गोष्टी मेंदूवरील ⇨ प्रतिक्षेपी क्रियांपासून जठररस उत्पादन वाढवतात व म्हणून या टप्प्याला मस्तिष्क टप्पा म्हणतात. या उत्पादनावर रा ग, भीती, काळजी आदी भावना परिणाम करतात. अन्नातील काही प्रकार जठरनिर्गमकोटर भागातील जठर ग्रंथींना चेतावणी देऊन गॅस्ट्रिन नावाचे हॉर्मोन उत्पन्न करतात. हे हॉर्मोन रक्तातून जठराच्या इतर भागातील जठर ग्रंथींना पोहोचताच त्यांचा स्राव वाढतो. या दुसऱ्या टप्प्याला जठर टप्पा म्हणतात. जठरातील अ र्ध व ट प च ले ली प्रथिने ते थी ल श्लेष्मकलास्तरातील ग्रंथीपासून आंत्रगॅस्ट्रिन नावाचे हॉर्मोन तयार करतात. हे हॉर्मोन रक्तप्रवाहातून जठर ग्रंथींपर्यंत पोहोचून त्यांचे उत्पादन वाढविते. या ति स ऱ्या टप्प्याला आंत्र टप्पा म्हणतात.

जठरातील पचनक्रिया चालू असताना अन्नापासून जो सारखी दृढता असलेला अर्धद्रव पदार्थ तयार होतो, त्याला ‘आमरस’ (काइम) म्हणतात. हा आमरस ग्रहणीत जठरद्वारा क पा टा तू न (झडपेतून) थोड्या थोड्या प्रमाणात सोडला जातो. एका वेळी  सेवन केलेल्या अन्नाचे पचन करून पुन्हा पूर्ण रिकामे होण्यास जठरास सर्वसाधारणपणे सहा तास लागतात. अन्नप्रकार व भावनिक परिस्थिती यांचा या कालावर परिणाम होतो. कार्बोहायड्रेटे प्रथिनांपेक्षा अधिक लवकर ग्रहणीत उतरतात, तर वसायुक्त पदार्थांना सर्वांत जास्त वेळ लागतो. भीती, राग यांसारख्या भावना कधीकधी हा काल चोवीस तासांपर्यंत वाढवितात.

लघ्वांत्र : लघ्वांत्रात सर्वांत महत्त्वाच्या पचनक्रिया होतात व तेथेच बहुतेक सर्व अन्नाचे अभिशोषणाही होते. जठरातून आमरस जसजसा खाली ग्रहणी व लघ्वांत्रात उतरतो तसतसे त्याचे अग्निपिंडरस, पित्त आणि आंत्ररस यांच्याबरोबर मिश्रण बनते. अग्निपिंडरसात ट्रिप्सीन, कायमोट्रिप्सीन आणि कार्‌बॉक्सिपेप्टिडेज ही प्रथिन-विच्छेदक ऐंझाइमे असतात. यांशिवाय त्यात अग्निपिंड-अमिलेज नावाचे लाळेतील टायलीन एंझाइमासारखी क्रियाशीलता असणारे कार्बोहायड्रेटांचे जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे पाडण्याच्या क्रियेने) माल्टोज बनविणारे एंझाइमही असते व ते अधिक क्रियाशील असते. माल्टेज नावाचे आणखी एक एंझाइम माल्टोजाचे ग्लुकोजात रूपांतर करते.

आंत्ररसात प्रथिने, कार्बोहायड्रेटे आणि वसा या तिन्ही प्रमुख अन्नघटकांवर विच्छेदक क्रिया करणारी असतात. यांशिवाय एंटरोकायनेज नावाचे त्यामधील एंझाइम अग्निपिंडरसातील निष्क्रिय ट्रिप्सिनोजेनापासून क्रियाशील ट्रिप्सीन बनविण्याचेच कार्य करते. आंत्ररसाचे उत्पादन आंत्रभित्तीवरील आमरसाचा यांत्रिक परिणाम तसेच त्यामघील काही रासायनिक पदार्थ यांवर अवलंबून असते. आंत्रश्लेष्मकलेतून एंटरोक्रिनीन नावाचे हॉर्मोन स्रवत असावे व तेही या उत्पादनास चेतावणी देत असावे. ग्रहणीतील आमरसातच यकृतात तयार होणारे पित्त येऊन मिळते. वसा-विच्छेदक एंझाइमांच्या क्रियेकरिता पित्त हा एक अत्यावश्यक पदार्थ असतो.

लघ्वांत्राची अवकाशिका (वेज) आंत्रमार्गाच्या इतर भागापेक्षा लहान असते म्हणून त्यास लहान आतडे म्हटले असले, तरी ते सु. ६.६ मी. लांब असते. त्याच्या श्लेष्मकलास्तरावर असंख्य वळ्या पडलेल्या असतात आणि त्यामुळे त्याचा अभिशोषणक्षम पृष्ठभाग सु. ९.३ चौ. मी. एवढा बनतो. लघ्वांत्राची वेटोळी क्रमसंकोचामुळे सतत चालू असते.


आ.१७. शेषांत्र-उंडुक झडप : (अ) झडप बंद-सर्व पदार्थ शेषांत्रात (आ) झडप उघडी-पदार्थ उंडुकात उतरताना (इ) झडप बंद-पदार्थ परत शेषांत्रत जात नाही.

बृहदांत्र : लघ्वांत्रातून अन्न बृहदांत्राच्या सुरुवातीच्या ज्या भागात शिरते, त्याला उंडुक म्हणतात. ही दोन्ही म्हणचे लघ्वांत्र् व उंडुक जेथे जुळतात त्या ठिकाणी झडपेसारखी स्नायुरचना असते व तिला शेषांत्रउंडुक झडप म्हणतात. या झडपेमुळे एकदा उंडुकात उतरलेले अन्न परत लघ्वांत्रात जाऊ शकत नाही (आ. १७). सेवन केलेल्या अन्नाचा जो भाग उंडुकात येतो, त्यावरील पचनक्रिया पूर्ण झालेल्या असतात. बृहदांत्राच्या श्लेष्मास्तरातील ग्रंथीचा स्राव श्लेष्माच असतो आणि त्यात एंझाइमे वगैरे पदार्थ नसतात. हा स्त्राव काहीसा घट्ट असतो व तो त्याच्या मिश्रणामुळे उरलेले अन्न बुळबुळीत करतो. वा स्रावामुळे श्लेष्मास्तरास इजा होण्यापासून संरक्षणही मिळते. बृहदांत्रात आलेले बहुतेक सर्वच अन्नभाग त्याज्य असतात. तरीदेखील त्यांमधील पुष्कळसे पाणी व लवणे बृहदांत्राच्या सुरुवातीच्या भागातच अभिशोषिली जातात. या कार्याकरिता योग्य अशीच बृहदांत्राची रचना असते. त्याचा उजवा भाग अभिशोषणास मदत करणारा असून त्यातून सोडियमाचे पुनरभिशोषण होते, तर त्याच्या पोकळीत पोटॅशियम व बायकार्बोनेटे स्रवली जातात. सु. ४००-५०० मिलि. पाणी तेथे अभिशोषिले जाते. बृहदांत्राचे हे कार्य फार महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे शरीराचे जलसंतुलन योग्य ठेवले जाते. बृहदांत्राची अभिशोषणक्षमता थेट गुदांत्रापर्यंत असते व म्हणून या मार्गाने म्हणचे गुदद्वारातून बस्तीद्वारे लवणयुक्त द्रव्ये, औषधे आणि ग्लुकोजही देता येते. बृहदांत्रात आलेल्या अन्नातील टाकाऊ पदार्थ जवळजवळ ३६ तास त्यात राहतात व त्या भागात नेहमी असणाऱ्या सूक्ष्मजंतूच्या क्रियेमुळे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड आणि मिथेन हे वायू तयार होतात. शेवटी मलोत्सर्जनातून टाकाऊ पदार्थांपासून मल बाहेर टाकला जातो.

पचनक्रियेतील पचन तंत्राच्या आवश्यक हालचाली : अन्न पचनाकरिता तसेच ते योग्य वेळी खाली सरकण्याकरिता अनेक प्रकारच्या हालचालींची गरज असते. तोंडात अन्नाचा घास घेताच तेथील संवेदनाशील तंत्रिका अग्रांमार्फत, जिभेवरील रुचिकलिकांमार्फत (कळीच्या आकाराच्या संरचनेमधील रुचीचे आकलन होणाऱ्या खास तंत्रिकांमार्फत) आणि त्याही अगोदर नाकातील गंधक्षेत्राकडून तो खाण्यास योग्य आहे किंवा नाही हे मेंदूतील संबंधित भागांना समजते आणि खाण्यास योग्य असल्यासच चर्वणाच्या व गिळण्याच्या क्रिया चालू होतात. याच वेळी लाला ग्रंथीना चेतना मिळून अधिक लाळ तोंडात येते. चर्वणक्रिया ऐच्छिक व प्रतिक्षेपी दोन्ही प्रकारची असते. अन्न दाताखाली आले की, चर्वण सुरू करण्याकरिता (वरच्या व खालच्या जबड्यांतील) दात इच्छेनुरूप एकमेकांजवळ येतात परंतु अन्न दाबताना जो दाब पडतो त्यामुळे प्रतिक्षेपी क्रियेने खालचा जबडा खाली जाऊन तोंड उघडते. अशी उघडझाप जोपर्यंत चावण्यासारखा पदार्थ तोंडात आहे तोपर्यंत चालू असते. चर्वण झालेला लाळमिश्रणामुळे काहीसा बुळबुळीत बनलेला घास मुखातून ग्रसनीत, ग्रसनीतून ग्रसिकेत आणि ग्रसिकेतून जठरात उतरतो. या संपूर्ण हालचालींना गिळण्याची क्रिया म्हणतात. या क्रियेचे संपूर्ण वर्णन ‘ग्रसनी’ या नोदीत दिले आहे. [ ⟶ ग्रसनी].

पचनक्रियेचा सारांश 

शरीरभाग 

स्त्राव 

एंझाइम 

अन्नघटक 

पतन प्रमाण 

पचनजन्य पदार्थ 

मुख 

लाळ 

टायलीन  

माल्टेज 

कार्बोहायड्रेट  

माल्टोज 

स्वल्प 

अतिस्वल्प 

डेक्स्ट्रीन व माल्टोज  

ग्लुकोज 

जठर 

जठररस 

पेप्सीन  

लायपेज 

प्रथिने  

पायसीकृत वसा 

अपूर्ण 

अतिस्वल्प 

प्रोटिओजेस व पेप्टोन  

वसाम्ले व ग्लिसरॉल 

लघ्वांत्र 

अग्निपिंड रस 

ट्रिप्सीन 

प्रथिने 

 

जवळजवळ पूर्ण 

पेप्टाइडे व ॲमिनो अम्ले 

कायमोट्रिप्सीन

प्रोटिओजेस 

}

” “

 

पॉलिपेप्टाइडे 

स्टिऑप्सीन

वसा 

 

वसाम्ले व ग्लिसरॉल

ॲमिलॉप्सीन

कार्बोहायड्रेटे

 

माल्टोज

माल्टेज

माल्टोज

 

ग्लुकोज

लॅक्टेज

लॅक्टोज 

 

ग्लुकोज व गॅलॅक्टोज 

इन्वर्टेज

सुक्रोज 

 

ग्लुकोज व फ्रुक्टोज 

इरेप्सीन

पॉलिपेप्टाइडे 

}

ॲमिनो अम्ले

 

पेप्टाइडे

 

आंत्ररस 

इरेप्सीन 

पॉलिपेप्टाइडे 

}

” 

” 

 

पेप्टाइडे 

ॲमिलेज 

कार्बोहायड्रेटे 

 

” 

डेक्स्ट्रिने व माल्टोज 

लायपेज 

वसा 

 

वसाम्ले व कनिष्ठ ग्लिसराइडे 

माल्टेज 

माल्टोज

 

पूर्ण 

ग्लुकोज 

लॅक्टेज 

लॅक्टोज 

 

पूर्ण 

ग्लुकोज व फ्रुक्टोज 

इन्वर्टेज 

सुक्रोज 

 

बहुधा पूर्ण 

ग्लुकोज व फ्रुक्टोज 

न्यूक्लिनेजे 

न्यूक्लिइक अम्ले 

 

” 

मोनोनूक्लिओटाइडे 

नूक्लिओटाइडेजे 

मोनोनूक्लिओटाइडे 

 

नूक्लिओसाइडे व फॉस्फोरिक अम्ल 

एंटरोकायनेज

 

ट्रिप्सिनोजेनपासून क्रियाशील ट्रिप्सीन बनविते. 

 

पित्त

पित्तलवणे वसेच्या पायसीकरणास आवश्यक असतात. 

[ पायसीकरणास – एकमेकांत मिसळणाऱ्या दोन द्रवांचे विशिष्ट प्रकारचे (कलिलीय) मिश्रण करणे ].


गिळलेले अन्न जसजसे जठरात उतरते तसतसे त्याच्या भित्तीतील स्नायू लांबतात आणि भित्ती शिथिल पडून त्यांचे आकारमान वाढते. अशा प्रकारे जठराची धारणक्षमता वाढून अधिक अन्नास जागा होते. जठर क्रमसंकोच आणि ग्रसिका क्रमसंकोच यांचा परस्परांशी संबंध नसतो. सुरुवातीस जठर क्रमसंकोचाची हालचाल संपूर्ण जठरात होत नाही. ही हालचाल फक्त जठरकाय भागात [ ⟶ जठर] सुरू होऊन जठरनिर्गमद्वाराकडे जाते. साधारणपणे दर मिनिटास तीन क्रमसंकोच तरंग उत्पन्न होतात व ते वर्तुळाकार स्नायुतंतूच्या आकुंचनापासून उत्पन्न होतात. पचनक्रिया जशी चालू असते तसे क्रमसंकोच तरंग जठराच्या जठरागम भागातून व त्यानंतर ग्रसिगाद्वाराजवळ उत्पन्न होतात व संपूर्ण जठरभर पसरतात. या हालचालीमुळे जठररस अन्नात चांगला मिसळला जातो, प्रथिनावरील पचनक्रियेस सुरुवात होते आणि अन्नाचे सूक्ष्म कण तयार होण्यास मदत होते. जठर क्रमसंकोचावर रासायनिक व तंत्रिकाजन्य असे दोन्ही प्रकारचे नियंत्रण असते. क्रमसंकोचामुळे जठरभित्तीचे आकुंचन वाढते व जठरदाबात वाढ होते आणि ही वाढ जेव्हा ग्रहणीदाबापेक्षा अधिक होते तेव्हा अन्न ग्रहणीत उतरते. कोणत्याही कारणाने जठर क्रमसंकोच कमी झाल्यास ते रिकामे होण्यास विलंब लागतो. ग्रहणीची आकुंचने अधिक जोरदार झाल्यासही जठर लवकर रिकामे होत नाही. जठराच्या हालचालीवर ग्रहणी श्लेष्मकलास्तरातून स्रवणारे एंटरोगॅस्ट्रोन नावाचे हॉर्मोनही परिणाम करते. ग्रहणीत आमरस उतरून ती फुगू लागताच हॉर्मोनाचे स्रवण होऊ लागून ते रक्तातून जठरभित्तीची हालचाल कमी करते आणि जेव्हा ग्रहणी रिकामी होऊ लागते तेव्हा रक्तातील एंटरोगॅस्ट्रोनाची पातळी कमी होते व जठराची हालचाल जोरदार होते.

आ.१८. लघ्वांत्राच्या हालचाली : (अ) खंडीभवन (आ) क्रमसंकोच : (१) अन्नाचा घास.

लघ्वांत्राच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात :  (१) खंडीभवन छोटे छोटे खंड तयार (होणे), (२) क्रमसंकोच आणि (३) दोलन हालचाल (आ. १८ मध्ये यांपैकी पहिल्या दोन हालचाली दाखविल्या आहेत). खंडीभवन आतड्याच्या शांत भागात एकाएकीच सुरू होते. वर्तुळाकार संकोचने जागजागी उत्पन्न होऊन छोटे छोटे खंड पडल्याचे दिसते. संकोचनाच्या जागी शैथिल्य आणि शैथिल्याच्या जागी संकोचन उत्पन्न होतात. ही एकांतरित (एकाआड एक होणारी) क्रिया सबंध आतड्यातून दर मिनिटास सहा ते दहा वेळा पुनरावर्तित होते. या हालचालीमुळे अन्न खाली ढकलण्यात मदत होत नाही, मात्र तीमुळे आंत्ररस अन्नात मिसळण्यास आणि पाचित अन्न अभिशोषणक्षम पृष्ठभागाच्या अधिक सान्निघ्यात आणण्यास मदत होते. लघ्वांत्राचा क्रमसंकोच ही हालचाल जठर आणि ग्रसिकेतील हालचालीसारखीच असते व तीमघ्ये अन्नाच्या काही भागाच्या लगेच मागे असलेले वर्तुळाकार स्नायू आकुंचन पावतात व तो भाग पुढे ढकलला जातो. जेथे तो  भाग यावयाचा तो आंत्रभाग शिथिल पडून अन्न समावून घेतो. लघ्वांत्राचे क्रमसंकोच दोन प्रकारचे असतात. (१) मंद : २ सेंमी. दर मिनिटास आणि (२) जलद : २ ते २५ सेंमी. दर मिनिटास. खंडीभवन व क्रमसंकोच या दोन प्रकाराच्या हालचालींमुळे आणि लघ्वांत्राची वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचना, विशेषेकरून उदरगुहेतील आंत्रबंधामुळे लोंबकळणे, यांमुळे तिसऱ्या प्रकारच्या म्हणचे दोलन हालचाली सुरू होतात व त्यांमुळे आंत्ररस उत्तम प्रकारे मिसळला जातो. क्रमसंकोच लघ्वांत्राच्या वरच्या भागात जेवढे जोरदार असतात तेवढे खालच्या भागात नसतात. क्रमसंकोच तरंग जेव्हा शेषांत्रउंडुक झडपेजवळ पोहोचतात तेव्हा तो भाग शिथिल पडतो व अन्न मोठ्या आतड्यात ढकलले जाते. ढकललेले अन्न पुन्हा शेषांत्रात परत येऊ नये म्हणून झडपेचे आकुंचन होते.

बृहदांत्राच्या हालचाली दोन प्रकारच्या असतात : (१) प्रचालक (आतील पदार्थ पुढे ढकलणाऱ्या) व (२) अप्रचालक. सर्वसाधारणपणे बृहदांत्राच्या हालचाली कमीच असतात. त्या घुसळण्यास आणि पाण्याच्या अभिशोषणास मदत करणाऱ्या असतात. २४ तासांतून अनेक वेळा बहुतकरून अन्न सेवनानंतर किंवा मलोत्सर्जनाच्या वेळी बृहतांत्राच्या आडव्या भागातून जोरदार आकुंचने उत्पन्न होतात व ती अवरोङी बृहदांत्राकडे जातात. या आकुंचनामुळे  त्यातील सर्व पदार्थ श्रोणीगुहेतील व अवग्रहाकृती बृहदांत्रात ढकलली जातात आणि मल विसर्जनाची क्रिया सुरू होईपर्यंत तेथे साठवले जातात.

आ.१९. रसांकुराची रचना : (१) रोहिणी, (२)नीला, (३) लसीकावाहिनी, (४) केशवाहिन्या, (५) कोशिका

अन्नाचे अभिशोषण : सेवन केलेल्या अन्नाचा बराचसा भाग पचनानंतर लघ्वांत्रात अभिशोषिला जातो. काही औषधी पदार्थाचे अभिशोषण मुखातही होते. पाणी, लवणे, ग्लुकोज आणि अल्कोहॉल ज ठ रा ती ल श्लेष्मकलास्तरातून अ भि शो षि त होतात. पाचित अन्नातील बहुतांश भाग अभिशोषण क र ण्या स यो ग्य अ शी श्लेष्मकलास्तरांची र च ना लघ्वांत्रात असते. त्याची सर्वसाधारणपणे ६.६ ते ७.५ मी. लांबी या कार्यास म द त च करते व सेवन केलेल्या एकूण अन्नापैकी जवळजवळ ९०% भाग ल ध्वां त्रा त अभिशोषिला जा तो. ल घ्वां त्रा ती ल अभिशोषण सक्रिय असते. म्हणजे ही क्रिया कोशिकांच्या ऊर्जेवर अवलंबून असून केवळ पदार्थाच्या सं ह ती  व र (प्रमाणावर) अवलंबून नसते.

अन्नपचनानंतर तयार  हो णा रे अंतिम प दा र्थ म्ह ण चे ॲमिनो अम्ले, साधी शर्करा, ग्लिसरॉल वगैरे आंत्रमार्गाच्या अवकाशिकेतून शरीरात शिरण्याचे दोन मार्ग आहेत : (१) केशवाहिन्यातून प्रवेशिका नीलेद्वारे यकृतात जाणे व (२) पायसिकांद्वारे (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ म्हणजे लसीका आणि पायसीभूत वसा यांचे दुधासारखे मिश्रण –पयोरस-वाहून नेणाऱ्या आंत्रमार्गातील वाहिन्यांद्वारे)लसीका महावाहिनीतून डाव्या अधोजत्रू नीलेत (गळ्याच्या कॉलरच्या हाडाच्या खालील नीलेत) जाणे. लघ्वांत्राच्या श्लेष्मकलास्तरात अगणित रसांकुर आहेत व तेच अभिशोषणाचे कार्य करतात. प्रत्येक रसांकुर हा पृष्ठभागावर आलेला छोटासा उंचवटा असून त्याच्या मध्यभागात एक रोहिणिका, एक नीलिका, केशवाहिन्यांचे (सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे) जाळे व एक पायसिका असते (आ. १९). नीलिका मिळून छोट्या नीला बनतात व त्या प्रवेशिका नीलेमार्फत रक्त यकृतात नेतात. पायसिकेपासून छोट्या लसीकावाहिन्या व त्यांपासून लसीका महावाहिनी बनते व त्यांमधून पयोरस वाहून नेला जातो.

रसांकुरातील केशवाहिन्यांतील रक्त आणि आंत्रमार्गातील पाचित अन्न अगदी एकमेकांजवळ आणली जातात. खंडीभवनामुले रसांकुरातील रक्तप्रवाहाचे व लसीकाप्रवाहाचे प्रमाण वाढते व अभिशोषणाचा वेगही वाढतो. रसांकुराच्या विशिष्ट रचनेमुळे आतड्याच्या एकूण अभिशोषणक्षम पृष्ठभाग अनेक पटींनी वाढतो. याशिवाय आतड्याची लांबी बरीच असल्यामुळे अभिशोषणाला पुरेसा वेळ मिळतो. अभि शोषण हे विसरण (रेणू एकमेकांत मिसळण्याची क्रिया), ⇨ तर्षण व निस्यंदन (गालन क्रिया) यांसारख्या भौतिक तत्त्वांवरच अवलंबून नसते. आंत्रमार्गाच्या अधिस्तरातील कोशिकांमध्ये विवेचक शक्तीही असते. तीमुळे कोणते पदार्थ अभिशोषणाकरिता निवडावयाचे व कोणते नाही हे ठरते. म्हणजेच अभिशोषण सक्रिय असून विवेचक स्वरूपाचे असते. उदा., सोडियम क्लोराइड (मीठ) सहज अभिशोषिले जाते, तर सोडियम सल्फेट दुर्लक्षिले जाते. अधिस्तर कोशिकांतील विशिष्ट एंझाइमे या प्रकाराच्या विवेचक अभिशोषणास मदत करीत असावीत.


कार्बोहायड्रेटांचेअभिशोषण : अन्नातील कार्बोहायड्रेट घटकाच्या पचनापासून साधी मोनोसॅकॅराइडे, ग्लुकोज, फ्रुक्टोज, मॅनोज, गॅलॅक्टोज वगैरे तयार होतात. या सर्व शर्करा प्रवेशिका नीलेतून यकृतात नेल्या जातात. जवळजवळ १४ मोनोसॅकॅराइडे असून प्रत्येकाच्या अभिशोषणाचा वेग निरनिराळा असतो. ग्लुकोज व गॅलॅक्टोज हे फ्रुक्टोज व मॅनोज यांपेक्षा अधिक वेगाने अभिशोषिली जातात. आंत्र अधिस्तरातील अभिशोषण दोन्ही प्रकारचे म्हणजे निष्क्रिय व सक्रिय स्वरूपाचे असते. सक्रिय भाग हेक्झोकायनेज नावाच्या एंझाइमामुळे होणाऱ्या फॉस्फोरिलीकरण क्रियेच्या (फॉस्फोरिल PO गटाचा समावेश करण्याच्या क्रियेच्या) परिणामामुळे या शर्करांचे ग्लुकोज किंवा गॅलॅक्टोज फॉस्फेट बनत असावे. प्रवेशिका नीलेतील रक्तात मात्र शर्करा फॉस्फेट स्वरूपात न आढळता मुक्त स्वरूपातच आढळतात. यावरून अधिस्तर कोशिकांतून रक्तात शिरण्यापूर्वीच शर्करांचे विफॉस्फोरिलीकरण होत असावे.

प्रथिनांचे अभिशोषण : अन्नातील प्रथिन घटकापासून पचनानंतर ॲमिनो अम्ले तयार होतात व सर्वसाधारणपणे ती तशीच अभिशोषिली जातात. ॲमिनो अम्ले प्रवेशिका नीलेतून यकृत रुधिराभिसरणात येतात. त्यांचे अभिशोषण निष्क्रिय व सक्रिय अशा दोन्ही स्वरूपांचे असते. L – ॲमिनो अम्ले ही    D-ॲमिनो अम्लांपेक्षा [ ⟶ ॲमिनो अम्ले] अधिक जलद अभिशोषिली जातात. आंत्रमार्गाच्या लघ्वांत्र भागातील अधिस्तर कोशिकांमध्ये ॲमिनो अम्ले संचय करण्याची शक्ती असावी कारण त्यांच्या परिसरापेक्षा त्यांच्यामध्ये ती नऊ पटींनी अधिक आढळतात. या संचयात L – टायरोसीन, L – ट्रिप्टोफेन आणि L-फिनील-अलॅनीन ही अमिनो अम्ले आढळली आहेत.

संबंध प्रथिन रेणूही लघ्वांत्र श्लेष्मकलास्तरातून सरळ अभिशोषिले जात असावेत परंतु ही कृती फक्त काही व्यक्तींत आणि तीही विशिष्ट प्रसंगीच अमलात येत असावी. याचे निश्चित कारण अजून समजलेले नाही. कोशिका प्रथिन रेणूचे चूषण (ओढून घेऊन शोषण करणे) करीत असाव्यात असे एक मत आहे. ऊतक फायंब्रिनोजेन, थायरो- ग्लोब्युलीन व कोंबडीच्या अंड्यातील श्वेतक (अल्ब्युमीन) ही प्रथिने रेणू स्वरूपात जशीच्या तशी अभिशोषिली जातात. अशा प्रथिनांचे मोठ्या आकारमानाचे रेणू प्रतिजनोत्पादक असतात. म्हणजेच ती शरीरात प्रतिपिंडे तयार करतात (सूक्ष्मजंतू, त्यांची विषे वा इतर पदार्थांचा म्हणजेच प्रतिजनांचा शरीरात प्रवेश झाल्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्या रक्तद्रवात तयार होणाऱ्या विशिष्ट पदार्थांना प्रतिपिंडे म्हणतात). काही व्यक्तींमध्ये बाहेरून येणारी प्रथिने (प्रतिजन) आणि शरीरातील प्रतिपिंडे यांच्या विक्रियेमुळे दमा, त्वचा उत्स्फोट (पुरळ) इ. लक्षणे उद्‌भवतात व अशा व्यक्ती प्रथिनांना अधिहर्षताक्षम असतात [ ⟶ ॲलर्जी] व त्या प्रथिन रेणूंचे सरळ अभिशोषण करू शकत असाव्यात.

वसेचे अभिशोषण : अन्नातील वसा घटकाचे लायपेज एंझाइमाच्या क्रियेमुळे जलीय विच्छेदन होते आणि ग्लिसरॉल व वसाम्ले तयार होतात. या क्रियेकरिता पित्त लवणे आवश्यक असतात. ही प्रक्रिया नेहमी पूर्ण न होता काही वसा भाग तसाच राहतो व त्याला ‘उदासीन वसा’ म्हणतात. या उदासीन भागातील अतिसूक्ष्म कणांचा व्यास जर ०.५ मायक्रॉनपेक्षा (१ मायक्रॉन = ०.००१ मिमी.) कमी असेल, तर जसेच्या तसे अभिशोषिले जातात. हे सूक्ष्मकण विखुरण्याकरिता पित्त लवणे मदत करतात. ग्लिसरॉल जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारे) असल्यामुळे चटकन अभिशोषिले जाते. वसाम्ले व पित्त लवणे मिळून जे जटिल संयुग बनते ते श्लेष्मकलास्तराच्या कोशिकांच्या वसाभ (स्निग्ध पदार्थसदृश) भित्तीतून सरळ अभिशोषिले जाते. श्लेष्मकलास्तरातील लायपेज नावाचे एंझाइम वसाम्ले व ग्लिसरॉल यांच्या पुनर्मिश्रणापासून ट्रायग्लिसरॉइडे बनविण्यास मदत करते व ती लसीका सूक्ष्मवाहिन्या ⟶ पायसिका ⟶ लसीका महावाहिनी ⟶ अधोजत्रू नीला या मार्गाने रक्तप्रवाहात मिसळतात.

इतर काही पदार्थांचे अभिशोषण : प्राणीज वसेतील कोलेस्टेरॉल हा घटक लहान आतड्याच्या वरच्या भागातून अभिशोषिला जातो. वनस्पतिज वसेत कोलेस्टेरॉल नसते. शरीराच्या सर्व ऊतक कोशिकांत कोलेस्टेरॉल असते. कोंबडीच्या अंड्यातील पिवळ्या भागात आणि तंत्रिका ऊतकात त्याचे प्रमाण अधिक असते. अन्नातील एकूण वसा भागापैकी ९५% भाग अभिशोषित होतो, तर एकूण कोलेस्टेरॉलापैकी फक्त ४०% ते ६०% भागच अभिशोषित होतो, तर एकूण कोलेस्टेरॉल पायसिकांतून वाहून नेण्यापूर्वी श्लेष्मकलास्तर कोशिकांतच त्याचे ⇨ एस्टरीकरण होते. अरगोस्टेरॉल या वनस्पतिज स्टेरॉलाखेरीज इतर स्टेरॉलांचे अभिशोषण होत नाही आणि अरगोस्टेरॉलाचे किरणीयनाने [भेदक किरण्यांच्या उपयोगाने ⟶ किरणोत्सर्ग] ड जीवनसत्त्वामध्ये रूपांतर झाल्यानंतरच हे अभिशोषण होते. अ आणि ड जीवनसत्त्वामध्ये रूपांतर झाल्यानंतरच हे अभिशोषण होते. अ आणि ड जीवनसत्त्वे वसेबरोबरच अभिशोषिली जातात. के जीवनसत्त्व फक्त पित्त लवण बरोबर असल्या सच अभिशोषित होते. आंत्रमार्गात पित्त नसेल, तर के जीवनसत्त्व अभिशोषिले जात नाही व परिणामी रक्तातील प्रोथ्राँबिनाची पातळी कमी होऊन रक्तक्लथन काळ (रक्त गोठण्यास लागणारा वेळ) वादतो आणि रक्तस्राव प्रवृत्ती वाढते. पाणी व लवणे रसांकुरावरील कोशिकांतून अभिशोषित होतात आणि तेथून नीलिका, नीला व प्रवेशिका नीला या मार्गाने यकृतात जातात. तज्ञांच्या मते लवणांचे अभिशोषण विवेचक स्वरूपाचे व सक्रिय असावे.


आ.२०. अभिशोषित अन्नाचे परिवहन : (१)लसीका महावाहीनी मानेत नीलेस मिळते, (२) ह्रदय, (३) लसीका महावाहिनी, (४) जठर, (५) प्लीहा, (६) अग्निपिंड, (७) अवरोही बृहदांत्र, (८) लघ्वात्र, (९) आरोही बृहदांत्र, (१०) यकृत.विकार : अन्नसेवन आणि द्रवपान या मानवाच्या शरीर वाढीकरिता लागणाऱ्या आवश्यक गरजा आहेत. मानवाचे पचन तंत्र त्याच्या जीवनाकरिताच आवश्यक असते. या तंत्राच्या सुरुवातीच्या भागात म्हणजे मुखात बारीकसारीक फरक ओळखण्याची जबरदस्त शक्ती असून त्याच्या शेवटच्या भागात टाकाऊ पदार्थ वेळोवेळी व पद्धतशीर रीतीने बाहेर टाकण्याची रचना आहे. या दोन टोकांच्या मधील पचन तंत्राच्या निरनिराळ्या भागांवर अनेका,  प्रतिक्षेपी क्रियांचे नियंत्रण असते व या क्रिया तंत्रिकांच्या टोकाशी उत्पन्न होणाऱ्या रासायनिक पदार्थावर अवलंबून असतात. या सर्व क्रियांमुळे अन्नघटाकांचे एंझाइमे, हॉर्मोने, विद्युत् विच्छेद्य पदार्थ, पायसीकारके यांबरोबर योग्य मिश्रण होते. या पदार्थाच्या आंतरक्रिया म्हणजेच अन्नाचे पचन व अभिशोषण होय.

मुख व ग्रसनीचे विकार : पचन तंत्राचा हा भाग गंध, रुची, चर्वण आणि गिलन यांच्याशी संबंधित असतो. वाढत्या वयोमानाबरोबरच या क्रियांसंबंधीचा अनुभवही वाढत जातो. गंध किंवा रुची संवेदना योग्य अशा तयार न झाल्यास या भागाला विकृती होण्याचा संभव असतो. अती उष्ण किंवा अती थंड पदार्थातील फरक न जाणवल्यास या भागाच्या श्लेष्मकलास्तरास इजा होण्याचा संभव असतो. विषारी पदार्थ चव न समजल्यामुळे तसेच गिळले जाण्याची शक्यता याच कारणामुळे उद्‌भवते. ⇨ खंडतालू, ⇨खंडोष्ठ यांसारखे काही जन्मजात विकार गिळण्याच्या क्रियेत अडथळा आणतात. दोन्ही जबड्यांतील दात एकमेकांवर नीट न बसल्यामुळे चर्वण दोष उत्पन्न होतात. कधीकधी लाला ग्रंथींपैकी एक किंवा दोन पूर्णपणे अविकसित राहन लाळेच्या उत्पादनातच कमतरता येते व तिच्या रचनेतही दोष उत्पन्न होतात. चर्वणाकरिता लागणाऱ्या स्नायूंचे दोष चर्वणक्रियेत बिघाड उत्पन्न करतात.

मुख बाह्य परिसराशी सतत निगडित असल्यामुळे तसेज चुंबन, कुटुंबातील जेवणाची व पाणी पिण्याची भांडी तीच असणे इ. कारणांमुळे बाह्य सूक्ष्मजंतू त्यात सहज शिरून जंतूंने संक्रामण होते आणि तोंड व घशातील श्लेष्मकलास्तरावर गंभीर दुष्परिणाम होतात. क्षय आणि उपदंशाचे (गरमीचे) सूक्ष्मजंतू या भागावर निरनिराळे दुष्परिणाम करतात. अपपोषण, सार्वदेहिक अशक्तता, अस्वच्छता इ. कारणे ‘खात-मुख’ (हिरड्यांच्या कडांना दाहयुक्त सूज येणे, वेदना, मुखदुर्गंधी वगैरे लक्षणे असलेला रोग) यासारख्या विशिष्ट सूक्ष्मजंतुजन्य विकृती उत्पन्न करतात. काही त्वचारोगांच्या उत्स्फोटक अवस्थांमध्ये मुखातील श्लेष्मकला -स्तरावरही दुष्परिणाम होतात. पोषणज विकृतीत क जीवनसत्त्व न्यूनताजन्य, हिरड्यांतील रक्तस्राव, मारक पांडुरोगातील (ॲनिमियातील) गुळगुळीत लाल जीभ, निॲसीन न्यूनताजन्य लालभडक जीभ इत्यादींचा समावेश होतो.

अन्नातील काही विषारी पदार्थ मुख-ग्रसनी भागावर अती हानिकारक परिणाम करतात. कुंपीजंतू विषबाधेमुळे [ कुपीरूपी जंतूपासून –क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम-उत्पन्न होणाऱ्या अन्नविषबाधेमुळे ⟶ अन्नविषबाधा ]. मेंदूतील नवव्या, दहाव्या आणि बाराव्या मस्तिष्क तंत्रिकांच्या केंद्रकांवर परिणाम होऊन गिळण्याच्या क्रियेत अडथळा येऊन गिळणे व श्वसन या दोन क्रियांमधील प्राकृतिक (सर्वसामान्य) सुसूत्रतेत बिघाड उत्पन्न होतो. अतिधूम्रपान, पान-तंबाखू खाणे, दाहक पदार्थ, अती गरम किंवा अती थंड पदार्थाचे सेवन मुखातील श्लेष्म. कलास्तरास हानिकारक असतात. काही सार्वदेहिक विकृतीत मुखातून रक्तस्राव होणे, श्लेष्मकलास्तरावर व्रण पडणे व त्यावर जंतू संक्रामण होणे ही लक्षणे आढळतात. कण कोशिकान्यूनत्व (श्वेतकोशिकांचे रक्तातील नेहमीचे प्रमाण अतिशय कमी आढळणारी, विशेषेकरून कण कोशिकांचा संपूर्ण अभाव असणारी विकृती) या विकृतीत तोंडात व्रण पडतात व त्यात जंतु-संक्रामण होऊन ते लवकर बरे होत नाहीत. दात, जीभ, लाला ग्रंथी इत्यादींचे रोग पचन तंत्राच्या या भागावर परिणाम करतात [ ⟶ ग्रसनी जीभ दात लाला ग्रंथि].

ग्रसिका: मुख-ग्रसनीपेक्षा ग्रसिका हा भाग कमी संवेदनशील असल्यामुळे आणि तो फक्त वरून येणारे पदार्थ जठरापर्यंत पोहोचविण्याचे प्रमुख कार्य करीत असल्यामुळे कष्टगिलन नावाची विकृती या भागात उद्‌भवू शकते. गिळल्या जाणाऱ्या पदार्थामुळे ग्रसिकेच्या श्लेष्मकलास्तरास इजा होण्याचा संभवही असतो [ ⟶ ग्रसिका].

जठर व ग्रहणी : जठर आणी त्याखालचा लघ्वांत्राचा भाग म्हणचे ग्रहणी या पचन तंत्राच्या भागांचे श्लेष्मकलास्तर सतत जठररसाच्या संपर्कात असते व म्हणून या भागात व्रण तयार होण्याचा नेहमी धोका असतो. श्लेष्मकलास्तराच्या अगदी पृष्ठस्थ थरालाच जर अशा प्रकाराची इजा झाली, तर तिला पृष्ठस्थ तीव्र व्रण किंवा अपक्षरण म्हणतात परंतु जेव्हा श्लेष्मकलास्तर, अधःश्लेष्मकलास्तर आणि स्नायुभित्ती या तिन्ही थरांना ग्रासणारी विकृती उत्पन्न होऊन चिरकारी (दीर्घकालीन) शोथ (दाहयुक्त सूज) होतो देव्हा त्यास ⇨ पचनज व्रण म्हणतात. जठराच्या श्लेष्मकलास्तरशोधाला जठरशोथ म्हणतात. ग्रहणीमध्ये पचनज व्रणाशिवाय इतर प्रमुख विकार सहसा आढळत नाहीत परंतु हा भाग अग्निपिंड आणि पित्तमार्ग यांच्या जवळच असल्यामुळे त्यांच्या विकृती त्यावर दुष्परिणाम करतात. ग्रहणीमध्येच उद्‌भवणारा कर्करोग सहसा आढळत नाही. मात्र कधीकधी मोडासारखी साधी अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी) आढळतात. जंत, पट्टकृमी, अंकुशकृमी ग्रहणीच्या श्लेष्मकलास्तरास पुष्कळ वेळा खोचले गेलेले आढळतात. अग्निपिंडशोथामध्ये कधीकथी ग्रहणी भित्तीत व्रण उत्पन्न होण्याचा आणि रक्तस्राव होण्याचा संभव असतो. [ ⟶ अंकुशकृमि रोग अग्निपिंड जठरांत्र मार्ग जंत पट्टकृमि].


लघ्वांत्र व आंत्रपुच्छ : लघ्वांत्रात आढळणाऱ्या जन्मजात विकृतींमध्ये मेकेल अंधवर्ध (जे. एफ्. मेकेल ज्युनिअर या जर्मन शरीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) या विकृतीचे प्रमाण अधिक असते. शेषांत्र आणि उंडुक हे भाग ज्या ठिकाणी मिळतात त्यापासून ७०-८० सेंमी. अंतरावर शेषांत्राच्या आंत्रबंधाच्या विरुद्ध कडेपासून निघाणारा हा अंधवर्ध बेंबीकडे गेलेला असतो. भ्रूणावस्थेतील पीतककोशाचा न बुजलेला भाग म्हणजेच हा अंधवर्ध असतो. पुष्कळ वेळा तो. लक्षणाहीन असतो परंतु कधीकधी त्यात शोथ किंवा रक्तस्राव होण्याची शक्यता असते, कारण त्याच्या श्लेष्मकलास्तरात जठर ग्रंथी किंवा अग्निपिंड ऊतक असण्याचा संभव असतो. याच कारणामुळे या अंघवर्धातही पचनज व्रण होण्याची शक्यता असते. कधीकधी सबंध लघ्वांत्रात ‘बहुविध अंधवर्ध’ आढळतात. या विकृतीत श्लेष्मकलास्तराच्या किंवा बाह्य लसीका-कलास्तराच्या छोट्या छोट्या पिशव्या आढळतात. ही विकृतीही जन्मजात असून बहुधा लक्षणाहीन असते. क्वचितच एखाद्या पिशवीत शोथ उत्पन्न होतो. मात्र या पिशव्यांतून असंख्य सूक्ष्मजंत सहज वाढू शकतात, कारण त्या आपोआप रिकाम्या होत नाहीत. हे सूक्ष्मजंतू शरीराला आवश्यक अशा पोषक पदार्थाचे भक्षण करतात व त्यामुळे अपअभिशोषणजन्य विकृती उद्‌भवतात. लघ्वांत्राच्या इतर काही विकृतींचे वर्णन इतरत्र दिले आहे [ ⟶ आंत्रज्वर आंद्रपुच्छशोथ आंत्ररोध आंत्रशूल आंत्रांत्रनिवेश जठरांत्र मार्ग].

बृहदांत्र : पचन तंत्राच्या या भागाचे प्रमुख कार्य म्हणजे त्यात येणाऱ्या जलमिश्रित उरलेल्या अन्नपदार्थातील पुष्कळसे पाणी अभिशोषित करून उरलेला घट्ट मल योग्य व नियंत्रित रीत्या शरीराबाहेर टाकणे हे होय. बृहदात्रांच्या या कार्यातील तसेच त्याच्या हालचालीतील बिघाड काही विकृती उत्पन्न करतात. कधीकधी ‘अच्छिद्री गुदद्वार’ नावाची विकृती भ्रूणवाढीतील दोषामुळे जन्मजात उत्पन्न होते. अशा वेळी शस्त्रक्रिया करून गुदद्वार मोकळे करावे लागते. हिर्शस्र्पुंग रोग (हॅरोल्ड हिर्शस्प्रुंग या डॅनिश शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) या जन्मजात विकृतीत तंत्रिका आवेगात [ ⟶ तंत्रिका तंत्र] बिघाड झाल्यामुळे काही भागात क्रमसंकोच हालचाली पोहोचतच नाहीत. गुदांत्र व अवग्रहाकृती बृहदांत्र अती अरुंद राहतात आणि त्यावरील बृहदांत्राचा भाग मल वरून खाली ढकलण्याच्या जोरदार प्रयत्नामुळे आकाराने फार मोठा होतो. यावरून या रोगाला ‘महाबृहदांत्र’ असेही म्हणतात. यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय असतो.

पाश्चिमात्य देशांतून पन्नाशीच्या वरील लोकांमध्ये बृहदांत्राचे अंधवर्ध जवळजवळ ३०% लोकांत आढळतात. याउलट पौर्वात्य देशांतून ही विकृती अत्यल्प प्रमाणात आढळते. यावरून ती आहारप्रकारा वर अवलंबून असावी. निरनिराळे सूक्ष्मजंतू, व्हायरस व परोपजीवी बृहदांत्रशोथास कारणीभूत होतात. एका प्रकारच्या बृहदांत्रशोथात श्लेष्मकलास्तरावर काहीही परिणाम न होता फक्त स्नायुभित्ती आणि अधःश्लेष्मकलास्तराची जाडी बरीच वाढते. या प्रकाराला बी. बी. क्रॉन या अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून क्रॉन रोग म्हणतात. बृहदांत्राची अर्बुदे साधी किंवा कर्करोगाची असू शकतात. पाश्चात्त्य देशांतून बृहदांत्राच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळते, तर पौर्वात्य देशांतून जठर कर्करोग अधिक आढळतो. मलोत्सर्जन क्रियेसंबंधीचे रोग पाश्चात्त्या देशांतून अधिक आढळतात. आहारप्रकार, व्यायाम किंवा मलोत्सर्जनाची इच्छा दाबून धरण्याच्या सामाजिक बंधनामुळे निर्माण झालेली प्रवृत्ती या गोष्टी या फरकास कारणीभूत असाव्यात की नाही हे नक्की सांगता येत नाही. पाश्चिमात्यांमध्ये लहान वयापासूनच गुदद्वार आणि मलोत्सर्जन यांसंबंधी त्रास होत असतात. प्रसूतीच्या वेळी नीट काळजी न घेतल्यामुळे श्रोणिगुहेच्या तळभागाच्या आधारांना (स्नायू वगैरे) इजा पोहोचून गुदांत्र, मूत्राशय किंवा गर्भाशय आपापली नेहमीची जागा सोडून खाली सरकतात. या विकृतीला त्या त्या अवयवाचे ‘स्खलन’ असे म्हणतात. उदा., ‘गुदांत्र स्खलन’ ही विकृती लहान मुलांमध्ये अशक्तपणा आणणाऱ्या आजारानंतर, कांजिण्या, डांग्या खोकला यांसारख्या काही आजारानंतर, हेल्मिंय कृमींमुळे किंवा शौचास सतत कुंथून बसावे लागल्यामुळे उद्‍‌भवते [ ⟶ आमांश जठरांत्र मार्ग गुदद्वार व गुदांत्र].

ढमडेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं. हेगिष्टे, म. द.

संदर्भ : 1. Allan, F. D. Essentials of Human Embryology, New York, 1960.

    2. Brobeck. J. R., Ed. Physiological Basis of Medical Practice, New Delhi, 1975.

    3. Davidson, S. Macleed J., Eds. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

    4. Elliot, A. Zoology, London, 1964.

    5. Hickman, C.P. Integrated Principles of Zoology, Saint Louis, 1966.

    6. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.

    7. Storer. T. I. Usinger. R. L. General Zoology, Tokyo, 1957.

    8. Warwich, R. Williams, P. L., Eds. Gray’s Anatomy. Edinburgh, 1973.

    9. Weisz, P. P. The Science of Zoology, New York, 1966.