राजतरंगिणि : काश्मीरचा संस्कृतात लिहिलेला पद्यबध्द इतिहास. त्याचा कर्ता ⇨कल्हण (बारावे शतक). राजतरंगिणी –म्हणजे राजांची नदी, प्रवाह किंवा परंपरा–असे यथार्थ नाव कल्हणाने आपल्या ह्या ग्रंथाला दिले आहे.

राजतरंगिणीचे एकूण आठ तरंग असून श्लोकसंख्या ७,००० आहे. कलियुगाचा प्रारंभ इ. स. पू. ३१०२ मध्ये होतो, असे परंपरेने मानले जाते. तेव्हापासूनच्या काश्मीरच्या निरनिराळ्या राजांची आणि राजवंशांची माहिती देण्याचा कल्हणाचा प्रयत्न आहे.

हा इतिहास लिहिताना कल्हणाने पूर्वीच्या अकरा इतिहासकारांचे ऋण ग्रंथारंभी मान्य केले आहे. त्याचप्रमाणे सुव्रताची राजकथा, क्षेमेंद्राची नृपावलि, नीलमतपुराण, हेलाराजाची पार्थिषाषलि, पद्ममिहिर व छविल्लाकर यांचे इतिहासविषयक ग्रंथ यांचा कल्हण हवाला देतो. शिवाय जुनी कागदपत्रे, नाणी, राजांची दानपत्रे, ताम्रपट, प्रशस्तिपट्ट शिलालेख इ. इतिहाससाधनांचा मागोवा घेतल्याचेही तो नमूद करतो.

शास्त्रीय इतिहासलेखनाला आवश्यक असलेली वरील साधने जरी कल्हणाने हाताळली असली, तरी हा ऐतिहासिक पुरावा त्याने नीट पारखून घेतलेला नाही. लोकपरंपरा व दंतकथा यांवर तो अवलंबून राहतो. तसेच शकुन, यातुविद्या, चेटूक, भूतबाधा यांच्यावर त्याचा फार विश्वास आहे. यामुळे प्राचीन इतिहासाबद्दल तो अनेक गफलती करतो. तोरमाण व मिहिरकुल हे हूण राजे तो गोनर्द राजाच्या वंशातच घुसहून देतो. ते दोघे पितापुत्र होते असे इतिहासात आपण मानतो, परंतु कल्हण त्यांच्या काळामध्ये ७०० वर्षांचे अंतर दाखवितो. हुष्क, जुष्क व कनष्कि यांना इतिहासात कुशाण राजे म्हटले आहे, पण कल्हण त्यांना काश्मीर राजवंशातलेच मानतो. शिवाय, त्यांचा हा क्रम इतिहासमान्य क्रमापेक्षा बरोबर उलटा देतो.

सातव्या शतकापासूनच्या घटनांची कल्हणाने दिलेली हकिगत मात्र पुष्कळच विश्वनसनीय वाटते. तत्कालीन काश्मीरातील अस्थिर राजकीय परिस्थितीचे त्याने केलेले सडेतोड चित्रण तर अजोड आहे. काश्मीरी जनतेची सुखलोलुपता आणि आळस, राजकीय पुढाऱ्‍यांच्या ठिकाणी असलेला स्वामिभक्तीचा अभाव, बेशिस्त व भित्र्या सैनिकांचा पळपुटेपणा आणि जमीनदारांचा निर्दयपणा वगैरे गोष्टी कल्हण अभ्यासूपणे मांडतो.

इतिहासकार कल्हणापेक्षा कवी कल्हणच अनेकदा जास्त आकर्षक वाटतो. इतिहासकथनात त्याच्या कविप्रतिभेला विशेष संधी मिळत नाही पण जेव्हा तो एखाद्या घटनेच्या वर्णनाकडे वळतो तेव्हा काव्यालंकार, सुभाषिते व काव्यमय भाषा यांचा वर्षाव करून तो बाणभट्टाची आठवण करून देतो. उदा., ‘‘संसारी जीवाला लाभलेले शरीर म्हणजे एक तकलादू चिलखत असते व ते दोन बळकट खिळ्यांनी त्याला जखडून ठेवते. ते खिळे म्हणजे, ‘मी ’ व ‘माझे’.’’

कोपरकर, द. गं.