माक्स म्यूलर

म्यूलर, माक्स : (६ डिसेंबर १८२३–२८ ऑक्टोबर १९००) कर्तृत्त्वसंपन्न मानवतावादी जर्मन प्राच्यविद्यापंडीत. देसौ (पूर्व जर्मनी) येथे तो जन्मला. १८४१–४३ मध्ये लाइपसिक विद्यापीठात संस्कृतचा आणि भाषाशास्त्राचा त्याने अभ्यास केला. १८४३ मध्ये त्याने पीएच्‌. डी मिळविली. लाइपसिक येथे ऋग्वेदाचा पुसट परिचय त्याला झाला. १८४४ मध्ये बर्लिन विद्यापीठात एक वर्षपर्यंत फ्रांट्‌स बोपकडे संस्कृतचा आणि शेलिंगकडे तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्याने केला. १८४५–४६ मध्ये फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठात ब्यूर्‌नुफच्या हाताखाली त्याने संस्कृतचा अभ्यास केला. वेदाभ्यासाचे महत्त्व ब्यूर्‌नुफने म्यूलरच्या मनावर बिंबवले व सायणभाष्यायह ऋग्वेदाची आवृत्ती तयार करण्याची त्याला प्रेरणा दिली. स्वतःजवळील हस्तलिखित सामग्रीही त्याच्या स्वाधीन केली. तेवीस वर्षे वयाच्या म्यूलरने या वेदविषयक संशोधनाला वाहून घ्यावयाचे निश्चित केले. अधिक हस्तलिखितांचा अभ्यास करण्यासाठी तो लंडनला गेला. ध्येयपूर्तीसाठी परिस्थितीशी त्याला झगडावे लागले. त्याचा मित्र बनसेन यांच्या प्रयत्नांमुळे ईस्ट इंडिया कंपनीने सभाष्य ऋग्वेदाच्या प्रकाशनाची आर्थिक जबाबदारी स्वीकारली. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मुद्रणालयात देवनागरी लिपीत सायणभाष्यसह ऋग्वेदसंहिता छापून घेण्यासाठी १८४८ मध्ये तो ऑक्सफर्डला आला. या आवृत्तीचा पहिला भाग १८४८ मध्ये आणि शेवटचा सहावा भाग १८७३ प्रकाशित झाला. शेवटचे काही भाग तयार करण्याच्या कामी जर्मन पंडित आउफ्रेश्टचे साहाय्य त्याला लाभले.

त्याला १८५० मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापनाची संधी मिळाली आणि लवकरच तो उपप्राध्यापक झाला. १८५४ मध्ये आधुनिक भाषांचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. १८६० मध्ये त्या विद्यापीठात संस्कृतचा प्राध्यापक होण्याची त्याची आकांशा सफल झाली नाही. पुढे १८६८ मध्ये तुलनात्मक भाषाशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा त्याच्यासाठी निर्माण करण्यात आली. भाषाशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयांवर त्याने व्याख्याने दिली. इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या विद्यार्थांना तो शिकवीत असे. 

१८७३ मध्ये ऋग्वेद भाष्याची संपूर्ण आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर ऑक्सफर्डमधील त्याच्या जीवनाचे दुसरे पर्व सुरू झाले. या काळात तो ब्रिटन सोडून अन्य देशात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्याने आखलेली ‘सेक्रेड बुक्स ऑफ ईस्ट’ ही निवडक प्राचीन पौर्वात्य ग्रंथांच्या इंग्रजी अनुवादाची योजना विचारात घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याची नेमणूक पुढे चालू ठेवली. जगातील निवडक विद्वानांचे सहकार्य मिळवून महत्त्वाच्या ग्रंथांच्या इंग्रजी अनुवाद पन्नास खंडांत प्रकाशित करण्याची ऐतिहासिक कामगिरी १८७९ ते १९०४ या काळात त्याने पार पाडली (पन्नासावा सुचिपासूनचा हयातीनंतर प्रसिद्ध झाला). या ग्रंथमालेने संस्कृत, प्राकृत, पाला, अवेस्ता, पर्शियन, अरबी, चिनी या भाषांतील संशोधनाचा पाया घातला.

त्याची अन्य निवडक ग्रंथरचना अशी : एन्शंट संस्कृत लिटरेचर (१८५९), लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लँग्वेज (दोन भाग, १८६१, १८६४), चिप्स फ्रॉम ए जर्मन वर्कशॉप (चार भाग, १८६७, १८७५), इंट्रोडक्शन टू सायन्स रिलिजन (१८०३) बायॉग्राफीज ऑफ वर्डस्‌ (१८८८), गिफोर्ड लेक्चर्स (चार भाग, १८८८–१८९२), सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसफी.

माक्स म्यूलरचे महत्त्व केवळ प्राच्यविद्येचा पंडित म्हणून नाही. भारताचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रेमी व मानवतावादी ही त्याची भूमिका आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. वेद, दर्शन, धर्मशास्त्र, साहित्य इ. विविध अंगांचे संस्कृत वाङ्‍मय अभ्यासल्यामुळे त्याच्या मनात भारताची आणि त्यात रहाणाऱ्या सोज्वळ, सात्त्विक आणि धार्मिक प्रवृत्तीच्या भारतीयांची विशिष्ट प्रतिमा उभी राहिली होती. भारतातील समकालीन जीवन पाहिल्यानंतर आपल्या मनात साठविलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी भारताला भेट देण्याची चालून आलेली संधीही त्याने घेतली नाही. भारतातील-विशेषतः बंगालमधील-थोर पुरुषांशी त्याचा पत्रव्यवहार चालू असे. धर्माने ख्रिस्ती असला, तरी त्याच्या ठिकाणी सांप्रदायिकता नव्हती. त्याची उच्च आणि उदात्त विचारसरणी त्याच्या जीवनात सदैव प्रतिबिंबित झालेली असे.

जर्मनी आणि भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने जर्मन सरकारने भारतात ठिकठिकाणी माक्स म्यूलर भवने निर्माण केली आहेत. भारताविषयी आणि भारतीय विद्येविषयी प्रेमाची भावना असलेल्या माक्स म्यूलरचे नाव या भवनांशी निगडीत करण्यात आले आहे ही अत्यंत उचित अशी घटना आहे. ऑक्सफर्ड येथे तो निधन पावला. 

काशीकर, चिं. ग.