नंदि तिम्मन्ना : (सोळावे शतक). प्रख्यात तेलुगू कवी. हा कृष्णदेवराय (कार. १५०६—३०) याच्या दरबारातील अष्टदिग्गजांपैकी एक कवी होय. पेद्दनाच्या खालोखाल त्याला महत्त्व आहे. तिम्मांबा व सिंगनामात्य हे त्याचे माता-पिता. त्याला ‘मुक्‍कु तिम्मना’ आणि ‘अरणमु तिम्मना’ अशी दोन अर्थपूर्ण नावे आहेत. ‘मुक्‍कु’ म्हणजे नासिका. ‘चंपकपुष्पाने स्वतःभोवती भ्रमरांचा गुंजारव होत नाही म्हणून कठोर तपस्या केली. तिचे फल म्हणून चाफेकळीला सुंदर स्त्रीच्या नासिकेचे रूप प्राप्त झाले आणि तिच्या दोन्ही बाजूंना नेत्रांच्या रूपाने भ्रमरयुग्म येऊन बसले’, अशी रम्य कल्पना तिम्मन्ना (ना) ने एका पद्यात मांडली. तिच्यावरूनच त्याचे हे नाव पडले. कवी म्हणून राजसभेत आणि राणी चित्रांबा हिच्या माहेरच्या ‘अरणमु’ (हुंडा) बरोबर भेट म्हणून आलेला असल्यामुळे त्याला अंतःपुरातही मान होता.

पारिजातापहरण ही त्याची एकमेव काव्यरचना मनुचरित्राहून लहान, पण गुणाने तितक्याच तोलाची आहे. हे एक श्रेष्ठ प्रबंधकाव्य (महाकाव्य) असून त्यात पाच आश्वास आहेत. संस्कृत हरिवंशातून घेतलेल्या कथानकाला त्याने कल्पनारम्य जोड दिली आहे. एकदा चित्रांबा आणि कृष्णदेवराय यांच्यात केवळ गैरसमजाने कलह निर्माण झाला. तेव्हा दोघांची पुन्हा मनमिळवणी करण्याच्या अप्रत्यक्ष हेतूने, सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांच्यातील अशाच प्रसंगावर हे शृंगाररसप्रधान काव्य तिम्मन्नाने लिहिले. यातील सत्यभामेचा स्त्रीसुलभ राग आणि प्रियकर श्रीकृष्णाचे आर्जवी सांत्वन यांचे वर्णन कवीने मोठ्या बहारीने केले आहे. या काव्याच्या शेवटी सत्यभामेने नारदाला श्रीकृष्णाचे दान करून टाकल्यामुळे त्याला दास्य पतकरावे लागले आणि नारदाच्या वीणेपासून मालेपर्यंत सर्वच वस्तूंचा भार उचलावा लागला, या वर्णनातील नाट्यात्मता, विनोद आणि कल्पकता ही वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. आशयाप्रमाणेच अभिव्यक्तीचे सौंदर्यही या काव्यात आढळते. नासिकेविषयीच्या वर वर्णन केलेल्या कल्पनेसारख्याच कितीतरी काव्यात्म कल्पना लालित्यपूर्ण, मृदू व नादमधूर शैलीत कवीने व्यक्त केल्या आहेत. ‘मुक्‍कु तिम्मन्नार्यु मद्‌दु पल्‌कु’ (म्हणजे नासिकायुकेत तिम्मन्नाची मधुर वाणी) या शब्दांत समीक्षकांनी त्याच्या मृदुमधुर शैलीचे वर्णन केले आहे. अष्टदिग्गजांपैकी भट्टमूर्तीने तर नासिकेबद्दलच्या त्याच्या कल्पनेचे अनुकरण करून ती आपल्या काव्यातही समाविष्ट केली.

टिळक, व्यं. द.