सत्यनारायण शास्त्री, वेदुल : (२२ मार्च १९००- ? १९७६). तेलुगू साहित्यिक. त्यांचे मूळ गाव भद्राचलम् पण नंतर खम्मम् जिल्ह्यात दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांनी उभय भाषा प्रवीण पदवी मिळविली. संस्कृत, बंगाली व कन्नड या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आंध्र विदयापीठात त्यांचे उच्च शिक्षण झाले. ते तेलुगू पंडित होते. अनेक माध्यमिक विदयालयांत त्यांनी शिक्षक म्हणून नोकऱ्या केल्या. कावली कॉलेजात त्यांनी अध्यापन केले, तेथेच त्यांचे वास्तव्य होते.

त्यांनी विविध प्रकारांत विपुल लिखाण केले. त्यांच्या प्रमुख साहित्य-कृतींमध्ये जवाहर भारती, कावली, दीपावलीमुक्तज हरी या काव्यसंगहांचा अंतर्भाव होतो. अपराधिनी, धर्मपलादू, रंगमहाल या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. वेसविमाब्बुलू हा कथासंगहही त्यांच्या नावावर आहे. मुलांसाठी त्यांनी सोप्या भाषेत तेलुगूमध्ये महाभारत लिहिले. राणा प्रताप हे त्यांचे ऐतिहासिक नाटक, तर समकालीन वास्तवाचे दर्शन घडविणारे कॉलेजगर्ल हे त्यांचे सामाजिक नाटक प्रसिद्ध आहे. भासाच्या संस्कृत नाटकांची त्यांनी तेलुगूत भाषांतरे केली. तसेच रवींद्रनाथ टागोरांच्या चोखेर बाली या कादंबरीचेही त्यांनी तेलुगूमध्ये भाषांतर केले.

सत्यनारायण शास्त्री हे स्वच्छंदतावादी वृत्तीचे प्रमुख कवी होत. तेलुगूतील स्वच्छंदतावादी काव्य-प्रवाहाला नवे वळण व दिशा देणाऱ्या प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते. काव्यनिर्मितीच्या प्रारंभीच्या उमेदवारीच्या काळात ते श्रीपाद कृष्णमूर्ती शास्त्री या आंध्रच्या राजकवींचे विदयार्थी होते. त्यांच्या काव्यात संमिश्र भावभावनांची रेलचेल आढळते. निर्भरशील प्रणयभावनांचे चित्रण करणारा कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी आपल्या स्वच्छंदतावादी कवितेतून उच्च कोटीच्या सात्त्विक प्रणयभावनेचे चित्रण करून उदात्तीकरण केले. दीपावली (१९४०) ह्या त्यांच्या भाव-कवितांच्या संग्रहात भाषेच्या अनुपम सौंदर्याबरोबरच, अंतःकरण हेलावून सोडणाऱ्या हळव्या भावविवशतेचा प्रत्यय येतो. सूक्ष्म गुंतागुंतीचे विचार व भावभावना साध्या पण सुडौल प्रवाही शैलीतून व्यक्त करण्याची हातोटी त्यांना साधली होती. त्यांची गीते म्हणजे त्यांच्या दृष्टीने भोवतालच्या क्षुद्र व स्वार्थी जगापासून सुटका करून घेऊन, सौंदर्य व कल्पना यांच्या विश्वात रमण्याचे उत्कृष्ट साधन होते. त्यांच्या काव्यातून समृद्ध प्रतिमा, काव्यात्मचारूता, शिल्पसदृश सौष्ठवपूर्ण रचना व भारदस्तपणा या गुणांचा प्रत्यय येतो. त्यांना ‘ गौतमी कोकिल ’ (गौतमी वा गोदावरी नदी-तीरावरचा कोकिळ) हे मानाभिधान देण्यात आले. आंध्र प्रदेश साहित्य अकादमीचे ते मानद सदस्य (१९६७) होते.

इनामदार, श्री. दे.