रामकृष्णकवि, मानवल्लि: (१८७५ – १९५७). प्रख्यात तेलुगू संशोधक, संस्कृत व द्राविडी भाषांचे पंडित व कवी. मद्रासच्या नुंगंबाकम् या उपनगरात जन्म. मद्रास येथील विद्यापीठात तेलुगू व संस्कृत घेऊन ते एम्. ए. झाले. काही काळ माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरी केली. वनपर्ती येथे त्यांनी ग्रंथप्रकाशन चिटणीस म्हणून सु. बारा वर्षे नोकरी केली. नंतर काही वर्षे मद्रासच्या हस्तलिखितसंग्रहालयातही त्यांनी काम केले. हस्तलिखितांचे संकलन, संपादन, परिशीलन करण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. सुमारे ६ वर्षे त्यांनी मद्रास विद्यापीठात प्रसिद्ध ‘मेकेन्झी रेकॉर्ड्‍स’चे संपादन व परिशीलन केले. शेवटी त्यांनी तिरूपती प्राच्यविद्यासंस्थेत संस्कृतचे प्रपाठक म्हणून काम केले. रामकृष्णकवी यांना दक्षिणेतील चारही भाषा उत्तम रीतीने अवगत होत्या. प्राचीन ग्रंथपरिशोधन व शब्दार्थांचा स्वरूपनिर्णय यांबाबतीत त्यांचा हात धरणारे तेव्हाच्या मद्रास इलाख्यात तरी कोणी नव्हते. ज्या ग्रंथाचे केवळ उल्लेख इतरत्र कोठे कोठे होते किंवा ज्यांच्या प्रती मुळीच उपलब्ध नव्हत्या, असे अनेक संस्कृत-तेलुगू ग्रंथ त्यांनी शोधून काढून शास्त्रीय पद्धतीने संपादित केले. त्यांनी ‘दक्षिण भारत संस्कृत ग्रंथमाला’ सुरू केली व त्यात दंडीची अवन्तिसुन्दरीकथा, चतुर्भाणि, भोजाचा शृंगारप्रकाश, दिङ्‍नागाचे कुंदमाला नाटक, विज्जिकेचे कौमुदीमहोत्सव नाटक, वत्सराजचरितम् इ. अनेक संस्कृत ग्रंथ क्रमशः प्रसिद्ध केले. ‘विस्मृतकबुलु’ नावाची आणखी एक ग्रंथमाला सुरू करून त्यांनी अनेक तेलुगू ग्रंथांचे शास्त्रीय व निर्दोष संपादन-प्रकाशन केले. नन्नेचोडाचे कुमारसंभवम् (१९०८, १९१४), वल्लभरायाचे क्रीडामिराममु (१९०९), भैरवकवीचे श्रीरंगमाहात्म्यमु (१९१२), सिंगन्नाचे सकलनीतिसम्मतमु (१९२४) इ. अनेक ग्रंथांच्या प्रकाशनाचे खडतर काम त्यांनी केले.

‘गायकवाड ओरिएंटल सीरिज’मध्ये भरताच्या नाट्यशास्त्राचे अभिनव भारती टीकेसह तीन भागांत प्रकाशन करून त्यांनी संपादनक्षेत्रात एक मोठाच विक्रम केला. त्यांचा दुसरा अमोल ग्रंथ म्हणजे नाट्यशास्त्रीय सांकेतिक पदांचे विवरण करणारा भरतकोश हा होय. आंध्र प्रदेशात ग्रंथसंपादनाच्या व चिकित्सक आवृत्त्या तयार करण्याच्या कामाचा श्रीगणेशा रामकृष्णकवींनीच केला. याशिवाय त्यांनी काही स्वतंत्र काव्यांचीही रचना केली आहे. उदा., मृगावती (१९००), वसंतविलासमु, पाटलीपुत्रकम्, कलिंगसेना (१९१३) इत्यादी. सर्व दाक्षिणात्य भाषांतील प्राचीन ग्रंथांचे संकलन–संशोधन–संपादन–प्रकाशन करणारे रामकृष्णकवी हे एकमेव नाव आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

लाळे, प्र. ग.