क्षेत्रय्या : (सु. १६००–६०). कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ ?पदम् रचनाकार. त्यांचे मूळ नाव वरदय्या असे होते. क्षेत्रघ्न, क्षेत्रज्ञ, क्षेत्रियुलूया नावांनीही ते प्रसिद्ध होते. कृष्णा जिल्ह्यातील (आंध्र प्रदेश) मूव्वा (मोव्वा) या गावी एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तंजावरचा राजा विजयराघव नायक (कार. १६६०–१६७३) याच्या राजसभेत त्यांना मानाचे स्थान होते.

काव्यकलेला संगीताची अभिनव जोड देऊन दोहोंचे माधुर्य आणि सामर्थ्य वाढविणारे तीन भक्तकवी होऊन गेले : अन्नमाचार्य, क्षेत्रय्या आणि ⇨ त्यागराज. या तिघांनी कर्नाटक संगीतास विकसित अवस्था प्राप्त करून दिली. [→ संगीत, कर्नाटक].

क्षेत्रय्या यांनी तेलुगू, संस्कृत या भाषा आणि साहित्यशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे संगीत, कूचिपूडी नृत्य आणि अभिनय या कलाही त्यांना चांगल्या अवगत होत्या. अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केल्यामुळे ‘क्षेत्रय्या’ हे नाव त्यांना पडले, असावे असे म्हटले जाते.पदम् रचनेचा जनक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

क्षेत्रय्या यांनी अठरा देवतांना उद्देशून चाळीस रागांत चार सहस्रांहून अधिक पदम् (पदे) लिहिली. ती मुख्यत: तेलुगू भाषेत असून त्यांपैकी केवळ चारशेच पदम् उपलब्ध आहेत. त्यांतील बहुतेक पदम् रचना ह्या ग्रामदैवत मूव्वा गोपालदेव आणि कांचीपुरम् येथील दैवत श्रीवरदराजस्वामी यांना उद्देशून आहेत, तर काही विजयराघव नायक यांच्यावर रचली आहेत. याशिवायकालक्षेपम् ‘साठी (दक्षिण भारतातील कीर्तन सदृश प्रकार) कथाकाव्येही त्यांनी रचली आहेत.

क्षेत्रय्या यांची रचना मधुराभक्तिपर आहे. परमात्मा आणि जीवात्मा यांच्यात नायक-नायिकाचे नाते कल्पून केलेल्या त्यांच्या रचनेत साहजिकच शृंगाररसयुक्त भक्तिप्रधानता आहे. काहीवेळा त्यांच्या पदांतील भावना अत्युत्कट प्रकटल्यामुळे कुठे कुठे शृंगाररस परमोत्कृष्ट झाला आहे.काही टीकाकारांनी त्यांच्या काही पदांवर अश्लीलतेचा आरोप केलाआहे तथापि उत्कट प्रेमाराधनात मीलनेच्छा अस्वाभाविक नसल्यामुळे शृंगारातिरेक समर्थनीय म्हणता येईल. त्यांच्या पदांचे गायन नृत्याभिनयांसह तत्कालीन देवदासींकडून होत असे. त्यांच्या पदम्मधून त्यांच्या प्राचीन संस्कृतीविषयीच्या जाणकारीचा स्पष्ट पुरावा मिळतो. भक्तकवी अन्नमा-चार्यांच्या पदांत शृंगाररसास इतके महत्त्व दिलेले दिसत नाही तथापि त्यांची रचना त्या दृष्टीने अधिक सरस आहे.

जयदेवाच्या ⇨ अष्टपदी रचनेशी क्षेत्रय्या यांच्या त्रिपदाची तुलना केली जाते. त्रिपदरचना ही अधिक नृत्यानुकूल आहे. संगीताची जोड असल्यामुळे त्यांच्या पदांत कोमलता आणि माधुर्य हे गुण सहजगत्या उतरलेआहेत. संस्कृतमधील विख्यात कवी ⇨ जगन्नाथपंडित आणि क्षेत्रय्याहे समकालीन होते. जगन्नाथाच्या रसगंगाधरातील नायक-नायिकाची लक्षणे क्षेत्रय्या यांच्या रचनेच्या आधारेच सांगितली असावीत, असे दिसते. सुब्बराम दीक्षितर यांच्या संगीत-संप्रदाय-प्रदर्शिनी या ग्रंथामुळे क्षेत्रय्या यांच्या पदरचनेकडे रसिकांचे लक्ष वेधले गेले. सर्वार्थसार या ग्रंथात आणि भानुदत्तकृत शृंगाररसमंजरी या साहित्यशास्त्रीय ग्रंथात क्षेत्रय्यांच्या पदांची उदाहरणे दिली आहेत.

टिळक, व्यं. द.