मोतक : (अ) नर, (आ) मादी.

मोतक : हा भारतातील सर्वांत कमी वजनाचा मासा आहे. याचे वजन फक्त ०·०८ ग्रॅम इतके आहे. याचे शास्त्रीय नाव होराइक्थीस सेठनाय हे आहे. हा होराइक्थिडी या कुळात मोडतो. या माशाचा शोध १९३८ साली लागला व याचे शास्त्रीय नाव सुंदरलाल होरा व एस्. बी. सेठना या दोन भारतीय शास्त्रज्ञांच्या गौरवार्थ दिले गेले. याच्या शरीररचनेत इतर माशांत न आढळणारी काही वैशिष्ट्ये आहेत. नरात जननभुजा (गोनोपोडियम) नावाचा गुदपरातील तीन अरांपासून (काट्यांपासून) झालेला खूप जटिल असा विशिष्ट अवयव असतो. तसेच नराचे वीर्य शुक्राणुधर नावाच्या मुद्‍गलासारख्या आकाराच्या वीर्य-नलिकेत भरलेले असते व ते मादीच्या योनीत जननभुजेतून सोडले जाते. नंतर शुक्राणुधरातील शुक्राणू बाहेर पडतात. अशी रचना इतर माशांत आढळत नाही. गॅम्ब्युझिया, गपी, मॉली, असिपुच्छ मासा या मध्य अमेरिकेतल्या माशांत मात्र अशा प्रकारचे पण साध्या स्वरूपाचे अवयव अस्तित्वात आहेत वर वर्णिलेला वैशिष्ट्यपूर्ण शुक्राणुधर मात्र या माशांत आढळत नाही.

मोतक या माशाला काही ठिकाणी ‘अनू’ तर काही ठिकाणी ‘अनुमोतक’ असेही म्हणतात. हा काडीसारखा छोटा मासा पाण्यावर तरंगतो व मचूळ पाण्यात खाड्यांच्या कडेला असणाऱ्या संथ पाण्यातल्या शेवाळात लपलेला आढळतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच हा आढळला आहे. सभोवार तंतू असलेली पम आकाराने गोल अशी अंडी तो घालतो. मादी अंडी घालत असतानाच ती फलित होतात. अंड्यांतून पिले बाहेर येताच सूक्ष्मजीव किंवा प्लवक (पाण्यावर तरंगणारे सूक्ष्मजीव) खाऊ लागतात. यांचे प्रजनन वर्षभर होत असते. पूर्ण वाढ झालेले मोतक डासांचे डिंभही (अळ्याही) खातात.

कुलकर्णी, चं. वि.