रॉस, सर रॉनल्ड : (१३ मे १८५७−१६ सप्टेंबर १९३२). ब्रिटिश वैद्य व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. ⇨हिवतापास (मलेरियास) कारणीभूत असणारे परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणारे सजीव) ॲनॉफेलीस प्रजातीतील डासांच्या जठरात वाढून त्यांच्या लाला ग्रंथीतून चाव्याद्वारे मानवी रक्तात शिरतात या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल त्यांना १९०२ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

रॉस यांचा जन्म भारतातील अलमोडा येथे झाला. त्यांचे वडील सैन्यामध्ये अधिकारी होते. वयाच्या आठव्या वर्षांपासून शिक्षणाकरिता त्यांना इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले. १८७४−७९ या काळात लंडन येथील सेंट बार्थालोम्यू हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर त्यांनी पुढील दोन वर्षे जहाजावरील वैद्य म्हणून नोकरी करून बराच सागरी प्रवास केला. १८८१ मध्ये ते भारतातील वैद्यकीय सेवेत नोकरीस लागले. १८८९ मध्ये इंग्लंडमध्ये रजेवर गेले असताना त्यांनी सार्वजनिक आरोग्याची पदविका मिळविली व नव्यानेच प्रस्थापित झालेल्या सूक्ष्मजंतूविज्ञानाच्या अभ्यासक्रमास उपस्थित राहिले. १८९२ पासून त्यांनी हिवतापाच्या अभ्यासात लक्ष घातले. १८९४ मध्ये त्यांचा ⇨सर पॅट्रिक मॅन्सन यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाखाली रॉस यांच्या हिवतापावरील संशोधनात भर पडली. मॅन्सन यांनी हिवतापासंबंधी पुढील दोन प्रमुख गोष्टी रॉस यांच्या नजरेस आणल्या : (१) हिवतापाच्या रुग्णाच्या रक्तामध्ये सी. एल्. ए. लाव्हरा यांनी शोधून काढलेले काळे रंगद्रव्य परजीवी असतात आणि (२) डास हिवतापाचे रोगवाहक आहेत हा मॅन्सन यांचा स्वतःचा सिद्धांत याशिवाय रॉस भारतात परतल्यानंतरही दोघांचा सतत पत्रव्यवहार चालूच होता.

रॉस यांच्या पुढे दोन मुख्य प्रश्न होते : (१) डासांच्या अनेक प्रकारांपैकी कोणता प्रकार रोगवाहक आहे? आणि (२) असंख्य परजीवींपैकी नेमका कोणता रोगोत्पादक आहे? यांपैकी २० ऑगस्ट १८९७ रोजी त्यांना ॲनॉफेलीस डास हे रोगवाहक असल्याचे आढळले. त्यानंतर काही बंदिस्त पक्ष्यांवर त्यांनी प्रयोग केले व रोगी पक्ष्यांमधील रोग डासांच्या चाव्यामुळे सरळ निरोगी पक्ष्यांत फैलावतो हे दाखविले. त्यांनी पक्ष्यांच्या हिवतापाशी संबंधित असलेल्या डासामधील परजीवीच्या जीवनचक्राचाही शोध लावला. १८९८ मध्ये मॅन्सन यांनी रॉस यांच्या कार्याचा वृत्तांत ब्रिटिश मेडिकल ॲसोसिएशनच्या एडिंबरो येथील बैठकीत मांडला. त्याच वर्षांच्या अखेरीस जी. बी. ग्रास्सी आणि त्यांचे इटालियन सहकारी यांनी मानवी हिवतापाच्या परजीवीचे ॲनॉफेलीस डासातील जीवनचक्र असेच असते हे दाखविले. या कार्याच्या श्रेयासंबंधी निर्माण झालेला कटू वाद पुढे रॉस यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यावर बराचसा थांबला.

रॉस यांनी १८९९ मध्ये नोकरीचा राजिनामा दिला व ते इंग्लंडमध्ये राहावयास गेले. लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेत १९१२ पर्यंत काम केल्यानंतर त्यांनी लंडन येथे वैद्यकीय सल्लागर म्हणून व्यवसायास सुरुवात केली. या काळात डासांच्या नियंणाच्या समस्येवर त्यांनी बराच वेळ खर्च केला व अनेक उष्ण कटिबंधीय देशांना याबाबत सल्ला दिला.

रॉस यांना प्रारंभीच्या काळात साहित्याची (विशेषतः कविता व नाट्य लेखनाची) अतिशय आवड होती आणि १८८३−१९२० या काळात त्यांचे साहित्यविषयक पंधरा ग्रंथ प्रसिद्ध झाले. यांशिवाय त्यांना गणिताचीही आवड होती व या विषयावरही त्यांची सात पुस्तके १९०१−२१ या काळात प्रसिद्ध झाली. हिवतापाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आखण्याच्या दृष्टीने त्यांनी कित्येक ग्रंथ, पुस्तिका इ. लिहिल्या. मॉस्किटो थ्रिगेडस अँड हाऊ टू आँर्गनाइझ देम (१९०२) व द प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया (१९१०) हे त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. सायन्स प्रोग्रेस व ॲनल्स ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या नियतकालिकांचे ते संपादक होते.

इ. स. १९०१ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. पहिल्या महायुद्धात त्यांनी शाही लष्करी वैद्यकीय दलात काम केले. ९१११ मध्ये के. सी. वी. व १९१८ मध्ये के. सी. एन्. जी. हे सन्मान त्यांना मिळाले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.