गुहावासी प्राणि : गुहेतील परिस्थितीची प्रामुख्याने दिसून येणारी दोन महत्त्वाची लक्षणे म्हणजे प्रकाशाचा अभाव आणि गुहेत सगळीकडे दिसून येणारा तापमानाचा जवळजवळ सारखेपणा ही होत. सामान्यतः गुहेत अतिशय आर्द्रता असते आणि तिचे प्रमाणदेखील एकसारखेच असते, परंतु कधीकधी ते वाढते (उदा., पाऊस पडल्यावर) अगर कमी होते. गुहेत राहणाऱ्या प्राण्यांची ही परिस्थिती उघड्यावर राहणाऱ्या प्राण्यांच्या परिस्थितीपेक्षा भिन्न पण काही बाबतींत तरी अनुकूल असते. पण अन्नाच्या तुटवड्यामुळे गुहेतील प्राणिजीवन समृद्ध होऊ शकत नाही. हिरव्या वनस्पती काळोखात जगू शकत नाहीत म्हणून गुहांत वाढणाऱ्या कवकांचाच (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींचाच) अन्न म्हणून उपयोग केला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फार खोलावर नसलेल्या गुहांत जमिनीवरील वृक्षांची मुळे घुसतात आणि त्यामुळे अन्नाच्या पुरवठ्यात भर पडते. पाण्याचे लहानमोठे ओघ पुष्कळदा गुहांतून वाहत असतात आणि त्या पाण्याबरोबर खाद्य पदार्थ वाहून येतात. गुहेच्या प्रवेशद्वाराच्या लगेच आतला भाग सरळ उभा खाली गेलेला असला, तर सगळे डबर घसरून गुहेत पडते. अशा गुहांत प्राणी मुबलक असतात. पण ज्या गुहांच्या प्रवेशद्वारापासून आत चढ असतो त्या गुहांत प्राण्यांचे वैपुल्य दिसून येत नाही.

वर्गीकरण : गुहावासी प्राण्यांचे दोन वर्ग पडतात : (१) गुहेत अल्पकाळ राहणारे प्राणी आणि (२) गुहेतच कायम राहणारे प्राणी. 

(१) अल्पकालिक प्राणी : गुहेत अल्पकाळ राहणाऱ्या प्राण्यांमध्ये गुहेतील जीवनाकरिता विशेष अनुकूलने झालेली नसतात. गुहेच्या अंतर्व्यवस्थेच्या दृष्टीने या वर्गातील प्राणी महत्त्वाचे होत, कारण ते गुहेत खाद्य पदार्थ आणतात. बहुतेक सर्व गुहांमध्ये वटवाघुळे भरपूर आढळतात. ती दिवसा विश्रांतीकरिता गुहेत राहतात आणि रात्री भक्ष्य मिळविण्याकरिता गुहेबाहेर जातात. समशीतोष्ण प्रदेशात पुष्कळ वटवाघुळे गुहांत शीतसुप्ती घेतात. वटवाघुळांची विष्ठा व त्यांची मृत शरीरे अन्न म्हणून उपयोगी पडतात. गुहेत पडलेल्या विष्ठेवर कवक, शैवाक (दगडफूल), बुरशी इ. कनिष्ठ प्रतीच्या वनस्पती वाढतात आणि कित्येक प्रकारचे कीटक त्या खातात.

दक्षिण अमेरिका आणि त्रिनिदाद बेटावर राहणारा ‘तैल पक्षी’ (स्टीॲटॉर्निस कॅरिपेन्सिस ) गुहांत राहतो आणि अन्न मिळविण्याकरिता तिन्हीसांजेच्या वेळी बाहेर जातो. हा पक्षी गुहेतील खडकांच्या कंगोऱ्यावर किंवा खडकांतील बिळात घरटे बांधतो. याच्या शरीरात साठविलेल्या तेलाकरिता या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यावरील गुहांत कॉलोकेलिया  वंशाचा ⇨ दुर्बल पक्षी (स्वीफ्ट) घरटे बांधतो. या पक्ष्यांचे मोठमोठाले थवे अतिशय काळोख असलेल्या गुहांच्या अगदी आतल्या भागात घरटी बांधतात.

(२) गुहेत कायम राहणारे प्राणी : या प्राण्यांमध्ये अनुकूलने झालेली असतात. शरीरात आधीपासून असणाऱ्या संरचनांत फेरबदल होणे किंवा त्यांचा अपकर्ष (ऱ्हास) होणे अशा स्वरूपाची ही अनुकूलने असतात. प्रकाशाच्या अभावामुळे शरीरातील रंजकद्रव्याचा ऱ्हास होतो. डोळ्यांचे निरनिराळे भाग क्रियाहीन होतात अथवा डोळ्यांचा आकार सामान्य आकारापेक्षा लहान होतो किंवा त्यांच्यावर त्वचा अथवा इतर ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचे समूह) वाढतात अथवा ते पूर्णपणे लुप्त (नाहीसे) होतात. अंधत्वामुळे झालेली हानी स्पर्शेंद्रियांच्या आणि घ्राणेंद्रियांच्या अधिक कार्यक्षमतेमुळे अंशतः भरून निघते. अन्नाच्या कमतरतेमुळे पचनेंद्रियात बरेच परिवर्तन होते. शरीर सडपातळ व हातपाय आणि इतर उपांगे बारीक होतात.

गुहेत कायमचे वास्तव्य करणारे प्राणी पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणारे) आणि अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणारे) असे दोन्ही प्रकारचे असतात, पण तुलनेने पृष्ठवंशी प्राण्यांपेक्षा अपृष्ठवंशी प्राणीच पुष्कळ असतात. 

आ. १. गुहेत राहणारा अपकृष्ट सॅलॅमँडर, टिप्लोमॉल्गी रॅथबूनाय. हा रंगहीन असून याला डोळे नसतात.

गुहेत कायम राहणारे पक्षी मुळीच नाहीत. काही घुबडे दिवसा केवळ आश्रयासाठी गुहेत येतात. मागे उल्लेख केलेले दुर्बल आणि तैल पक्षी गुहेत फक्त घरटीच बांधतात. सरीसृपांपैकी (सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी) एकही प्राणी गुहेत कायमचा अथवा अल्पकाळ राहणारा नाही. 

उभयचरांविषयी सांगावयाचे तर आंधळे बेडूक आणि भेक आढळत नाहीत, यावरून हे प्राणी गुहावासी नसावेत. गुहावासी ⇨सॅलॅमँडर  मात्र आढळतात. नैर्ऋत्य मिझोरीमध्ये आढळणाऱ्या ट्रिफ्लोट्रायटन स्पेलिअस  या सॅलॅमँडरचे डोळे डिंभावस्थेत (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्व अवस्थेत) चांगले असतात, पण प्रौढावस्थेत त्यांचा अपकर्ष होतो. टिप्लोमॉल्गी रॅथबूनाय  हा सॅलॅमँडर टेक्ससमधील गुहांतल्या नद्यांत आढळतो. याला प्रौढावस्थेतही क्लोम (पाण्यातील ऑक्सिजनाचा उपयोग करणारी श्वसनेंद्रिये, कल्ले) असतात. त्वचा रंगहीन असते. डोळे अपकृष्ट असून त्वचेने झाकलेले असल्यामुळे कार्यक्षम नसतात. शरीर अतिशय काटकुळे आणि पाय लांब, कृश व दुबळे असतात. प्रोटियन्स अँग्विनस  हा डाल्मेशियातील गुहांमधील पाण्यात राहणारा ⇨न्यूट  आंधळा असतो. याचे सर्व शरीर पांढरे असते, पण त्यावर क्वचित फिक्कट गुलाबी छटा दिसून येते. क्लोमांचा रंग लाल असतो, पण तो क्लोमांतील रक्ताचा रंग असतो. हा न्यूट प्रकाशात ठेवल्यावर त्याचा रंग काळा होतो.


आ. २. गुहेत राहणारा मासा, अँब्लिऑप्सीस स्पेलिअस. याला डोळे नसतात व त्याच्या सबंध डोक्यावर स्पर्श-पिंडिका असतात.

गुहेतील कायम रहिवाश्यांमध्ये माशांची बरीच मोठी संख्या असल्याचे दिसून येते. पेनसिल्व्हेनियामधील काही गुहांत ग्रोनियस नायग्रिलॅब्रिस  हा ⇨ मार्जारमीन  आढळतो. तो अंशतः आंधळा असतो. माशांपैकी केंटकीमधील मॅमथ गुहेतल्या स्टिक्स नदीत आढळणारा ५ सेंमी. लांबीचा अँब्लिऑप्सीस स्पेलिअस  हा मासा प्रसिद्ध आहे. हा आंधळा असून त्याच्या सबंध डोक्यावर, विशेषतः मुस्कट आणि ओठ यांवर अनेक स्पर्श-पिंडिका (ज्यांच्यामुळे पदार्थांचे अस्तित्व जाणवते असे लहान उंचवटे) असतात. या पिंडिका अंशतः स्वादेंद्रियाचेही (ज्यांच्यामुळे चव समजते त्या इंद्रियांचेही) कार्य करतात असा समज आहे. स्पर्शेंद्रियामुळे पाण्यात उठणारी कंपनेसुद्धा याला जाणवतात. उजेडापासून दूर जाण्याची प्रवृत्ती असते. अँब्लिऑप्सिडी कुलातील आणखी काही मासेदेखील गुहावासी आहेत, पण इतर काही जाती जमिनीवरील खळगे व प्रवाह यांत राहणाऱ्या आहेत. क्यूबातील स्टिगिकोला  आणि ल्युसिफ्यूगा  हे गुहावासी मासे विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत, कारण ते ज्या ब्राट्युलिडी कुलातले आहेत त्या कुलातील इतर सर्व मासे समुद्रात राहणारे आहेत.

पुष्कळ अपृष्ठवंशी प्राणी गुहांत कायम राहणारे आहेत आणि पृष्ठवंशी प्राण्यात सर्वसाधारणपणे जी अनुकूलने आढळतात तीच अनुकूलने यांच्यातही आढळतात. रंगद्रव्यांचा ऱ्हास, संपूर्ण अथवा आंशिक अंधत्व आणि आंधळेपणाची भरपाई करण्याकरिता शृंगिका (सांधे असणारे डोक्यावरील लांब स्पर्शेंद्रिय) व इतर उपांगे यांच्या लांबीत होणारी अतिशय वाढ अथवा लांब स्पर्श-रोमांची (ज्यांच्यामुळे स्पर्शज्ञान होते अशा केसांची) उत्पत्ती ही अनुकूलने सर्रास आढळतात. गुहावासी प्राण्यांत रासायनिक संवेदांगांचा (रसायनामुळे उत्तेजित होणाऱ्या ज्ञानेंद्रियांचा) जास्त विकास झालेला असतो. अपृष्ठवंशी प्राणी सामान्यतः ॲनेलिडा, क्रस्टेशिया, मीरिॲपोडा, इन्सेक्टा, मॉलस्का इ. प्राण्यांच्या गटांतील असतात.

अमेरिकेतील गुहांतून आढळणारा ओरिओनेक्टिस पेल्युसिडस  हा ⇨चिमोरा  इतका पारदर्शक असतो की, त्याच्या सावलीवरूनच फक्त त्याचा पत्ता लागतो. याचे शरीर कृश असून तो आंधळा, बहिरा आणि रंगहीन असतो. जलचर आणि भूचर असे दोन्ही प्रकारचे अँफिपॉड आणि आयसोपॉड प्राणी मुबलक असतात. आंधळे चिमोरे यांच्यावर उदरनिर्वाह करतात. पतंग, गोम, कोळी, किडी, मीरिॲपॉड प्राणी, मुद्‌गल (भुंगेरा), अनेक प्रकारच्या माश्या, लहान गोगलगाई इ. प्राणी गुहांत पुष्कळ असतात. दक्षिण यूरोपातील गुहांमध्ये नाकतोडे पुष्कळदा आढळतात. आंधळ्या मुद्‌गलात डोळ्याचे अथवा दृक्‌तंत्रिकांचे (डोळ्याला जाणाऱ्या मज्जातंतूंचे) अवशेष मुळीच आढळत नाहीत. दृष्टीच्या उणिवेची भरपाई पुष्कळदा स्पर्शेंद्रिये जास्त तीक्ष्ण बनण्यात होते. पुष्कळ गुहावासी कीटकांच्या शृंगिका अतिशय लांब असतात (उदा., काही नाकतोडे) अथवा त्यांचे पाय लांब असून त्यांवर स्पर्श-रोम असतात. गुहेतील अतिशय आर्द्रतेमुळे पुष्कळ गुहावासी कीटकांचे श्वसन त्वचेमधून होते व श्वासनलिका अतिशय बारीक होतात. या प्राण्यांची त्वचा अतिशय पातळ असते आणि ते जर वाऱ्याच्या प्रवाहात सापडले, तर शुष्कनामुळे (वाळण्यामुळे) मरतात.

पुरातन गुहांमधील प्राणिसमूह दीर्घ काळ अलग पडल्यामुळे त्या गुहांत पुष्कळदा स्थानिक जाती निर्माण झाल्या आहेत. डाल्मेशियात असणाऱ्या अनेक गुहांपैकी प्रत्येकीत मुद्‌गलांची एक स्वतंत्र जात आढळते.

आसामचा चुनखडक असलेला प्रदेश वगळला, तर भारतात कोठेही गुहा नाहीत. आसाममध्ये चेरापुंजी आणि सिजू या भागांत काही गुहा आहेत, पण यूरोप व उत्तर अमेरिका यांत आढळणाऱ्या प्राचीन मोठ्या गुहांशी त्यांची तुलना होऊ शकणार नाही. आसामातील गुहांपैकी गारो टेकड्यांमध्ये असलेली सिजू गुहा हीच काय ती भारतातील सगळ्यात मोठी गुहा होय. सिजू गुहेमध्ये प्राण्यांच्या सु. शंभर सव्वाशे जाती आढळतात. या सर्वांची बारकाईने तपासणी केल्यावर थोड्या प्राण्यांतच (काही क्रस्टेशियन प्राण्यांत व एका जातीच्या गोगलगाईत) काही अनुकूलने झालेली आढळली. बहुसंख्य प्राणी गुहेबाहेर राहणाऱ्या प्राण्यांसारखेच असल्याचे दिसून आले. तपासणी करणाऱ्या शास्त्रज्ञांनी यावरून असा निष्कर्ष काढला की, सिजू गुहा अलीकडच्या काळातच तयार झालेली गुहा असल्यामुळे तिच्यात राहणाऱ्या प्राण्यांत अनुकूलने दिसून येण्यास बराच कालावधी जावा लागेल.  

  

जोशी, मीनाक्षी