रिबैरु, आकिलीनु : (१३ सप्टेंबर १८८५−२७ मे १९६३). श्रेष्ठ पोर्तुगीज कादंबरीकार. जन्म कार्रॅगाल द ताबोझा, वैरा आल्ता येथे. तो वैद्यकशास्त्राचा पदवीधर होता. क्रांतीकारक विचार आणि कृत्ये ह्यांमुळे ह्या लेखकाला १९०८ ते १९३२ ह्या कालखंडात अनेकवार देशाबाहेर राहावे लागले. ह्या विजनवासाचा बराच काळ त्याने पॅरीसमध्ये घालविला. झ्यार्दी दश तॉर्मँताश (१९१३, इं. शी. गार्डन ऑफ टेपेस्ट्स) ही त्याची पहिली साहित्यकृती. प्रादेशिक कथांचा हा संग्रह आहे. रिबैरूच्या ह्या पहिल्याच साहित्यकृतीतूनही त्याच्यातील प्रतिभावंताच्या पूर्वखुणा दिसून येतात.
रिबेरूच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्यांत व्हीआ सिनुऑझा (१९१६, इं. शी. सिन्यूअस वे), तॅर्रांश दू दॅमु (१९१८, इं. शी. डेव्हिल्स लँड), आन्दांउ फाव्नुश पेलुश बॉश्किश (१९२६, इं. शी. फॉन्स वॉक इन द वूडस) आणि आर्कांझ्यु नेग्रु (१९४७, हं. शी. ब्लॅक आर्केजल) ह्यांचा समावेश होतो.
‘सिन्यूअस वे’ ही रिबैरुची सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणता येईल. ह्या मनोविश्लेषणात्मक कादंबरीत त्याचे सूक्ष्म निरीक्षण आणि समर्थ लेखनशैली पाहावयास मिळते. ‘डेव्हिल्स लँड’ आणि ‘फॉन्स वॉक इन द वूडस’ ह्या कादंबऱ्यांत प्रादेशिक व्यक्तिरेखांचे प्रभावी चित्रण आढळते. ‘ब्लॅक आर्केजल’ ही त्याची कादंबरी आत्मचरित्रात्मक आहे.
प्रादेशिकता आणि समृद्ध भाषाशैली ही त्याच्या लेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. तसेच पोर्तुगीज समाजाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील दंभ, पिळवणूक आणि जुलूमशाही ह्यांवर त्याने त्याच्या साहित्यातून टीका केली आहे.
पोर्तुगीज अकॅडमीवर त्याची १९५८ साली निवड झाली होती. लिस्बन येथे तो निधन पावला.
रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)