तॉर्गा, मिगेल : (? १९०७ – ) पोर्तुगीज कवी, कथाकार आणि नाटककार. सांऊँ मार्तीन्यू दा आंता येथे जन्मला. कोईंब्रा विद्यापीठातून वैद्यकाची पदवी घेतल्यानंतर वैद्यकाचा व्यवसाय करीत असतानाच त्याने विविध प्रकारचे लेखन केले. प्रेझेंसा (१९२७–४०, इं. शी. प्रेझेन्स) ह्या नियतकालिकाचा तो संचालक होता. विसाव्या शतकाच्या मध्यास फ्रॉइड, बेर्गसाँ आदींच्या प्रभावातून साहित्यनिर्मिती करणारा एक संप्रदाय पोर्तुगीज साहित्यात उदयास आला होता. प्रेझेंसा हे ह्या संप्रदायाचे मुखपत्र.

अँग्झायटी ह्या इंग्रजी शीर्षकार्थाचा त्याचा पहिला काव्यसंग्रह १९२८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतरच्या त्रिबूतु या काव्यसंग्रहात (१९३१, इं. शी. ट्रिब्यूट) त्याच्या उत्कट धर्मभावनेचे दर्शन घडते. लिबॅर्तासांउ (१९४४, इं. शी. लिबरेशन) ह्या काव्यसंग्रहातील ग्रामीण जीवनचित्रणात बायबलमधील अनेक प्रतीकांचा त्याने वापर केला. बीशुश (१९४०, इं. शी. वर्म्‌स) आणि उश कान्तुश द मोन्तान्या (१९४१, इं. शी. टेल्स ऑफ द माउंटन) हे त्याचे काही कथासंग्रह. त्यांतून ईशान्य पोर्तुगालमधील प्रादेशिक जीवन त्याने चित्रित केले आहे. तॅर्रा फीर्मि (१९४१, इं. शी. द. फर्म अर्थ) व मार (१९४१, इं. शी. द. सी) ही त्याची उल्लेखनीय नाटके. अ क्रिआसांउ दू मून्दु (१९३७–३९, इं. शी. क्रिएशन ऑफ द वर्ल्ड) ही आत्मचरित्रपर कादंबरी आणि आठ खंडातील त्याची रोजनिशीही (डायरीओ, १९४१–५९) उल्लेखनीय आहे. माणसाच्या मूलभूत सत्प्रवृत्तीवर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्या एका धर्मप्रवण मनाचे दर्शन तीतून घडते.

प्रभावी, पृथगात्म  वाङ्‌मयीन शैली आणि मानवी जीवनाच्या मूलाशयाला स्पर्श करणारे विषय आणि मनोविश्लेषण ही त्याच्या लेखनाची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. आधुनिक पोर्तुगीज साहित्यात त्याला मानाचे स्थान आहे.

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं) गोखले, शशिकांत (म.)

Close Menu
Skip to content