व्हिसेंत, झ्यील : (१४७१ ?–१५३७ ?). पोर्तुगीज नाटककार व कवी. त्याची जन्मतारीख, जन्मस्थळ (गिमाराइश किंवा बैरा), शिक्षण, व्यवसाय (तो सोनार असावा) इ. चरित्रात्मक तपशील निश्चितपणॆ ज्ञात नाहीत. व्हिसेंत राजकवी व दरबारी नाटककार होता. ७ जून १५०२ रोजी लिस्बनच्या राजदरबारात गुराख्याच्या वेशभूषेत त्याने आपल्या Monologo do Vaqueiro (इं. शी. द हर्डसमन्स) ह्या नाट्यात्म एकभाषिताचा पहिला प्रयोग सादर केला. त्याच्या एकूण ४४ नाटकांपैकी ११ स्पॅनिशमध्ये, १६ पोर्तुगीजमध्ये, तर उरलेली १७ स्पॅनिश-पोर्तुगीज अशा मिश्र भाषेत आहेत. धार्मिक रूपके, मेंढपाळाच्या ग्रामीण जीवनावरील नाटके, सरदारांच्या वीरगाथा, सामाजिक तसेच गंभीर व प्रहसनात्मक नाटके अशी विविधता त्याच्या नाट्यरचनेत आढळते. आख्तु द आल्मा (१५१८ ? इं. शी. द सोल्स जर्नी) हे त्याचे धार्मिक रूपकात्मक नाटक. तत्कालीन धर्माधिकाऱ्यांच्या नीतिभ्रष्टतेवर उपरोधप्रचुर टीका त्याने Auto de la barca do inferno (१५१६, इं. शी. द शिप ऑफ हेल). Auto de la barca do purgatorio (१५१८, इं. शी. द शिप ऑफ पर्गेटरी), Auto de la barca de la gloria (१५१९, इं.शी. द शिप ऑफ हेवन) ह्या नाट्यत्रयीतून केली आहे. शौर्यगाथांवर आधारित दोन मनोरंजनपर नाटके त्याने स्पॅनिशमध्ये लिहिली. त्याच्या भावकाव्यात्मक शैलीचे सामर्थ्य गोपपरंपरेवर आधारलेल्या Tragicomedia da Serra da Estrella या शोकसुखात्मिकेतून प्रत्ययास येते. त्याची बव्हंशी नाटके पद्यात आहेत. त्यांत लोकगीतेही आढळतात त्याच्या नाटकांत संगीत व नृत्य यांचाही अंतर्भाव असे. Farsa de Ines Pereira (१५२३, इं.शी. प्ले ऑफ इनेश पेरैरा) ही त्याची सर्वश्रेष्ठ नाट्यकृती व्यक्तिप्रधान सुखात्मिका आहे. फ्लॉरॅश्ता द यँगानुश (१५२३, इं.शी. फॉरेस्ट ऑफ डिसीट) ही त्याची अखेरची नाट्यकृती. व्हिसेंतची Auto da festa (१५२५, इं.शी. फेस्टीव्हल प्ले) ही नाट्यकृती वगळता त्याच्या इतर सर्व नाट्यकृती त्याचा मोठा मुलगा लुईस ह्याने Copliacao ह्या नावाने १५६२ मध्ये प्रकाशित केल्या.

पोर्तुगाल रंगभूमीचा जनक म्हणून व्हिसेंतचा गौरव करण्यात येतो. रंगभूमीवर नट, नाटककार, दिग्दर्शक अशी विविध प्रकारची कामगिरी त्याने पार पाडली. उपरोध व सहजस्फूर्त भावगेयता ही त्याच्या नाट्यकृतींची लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

वॅव्हारा येथे त्याचे निधन झाले.                                 

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) पोळ, मनीषा (म.)