दान्ताश, झ्यूलिउ : (१९ मे १८७६–? १९६२). पोर्तुगीज नाटककार आणि कादंबरीकार. तो लागुश आल्गार्व्ही येथे जन्मला. दान्ताश व्यवसायाने डॉक्टर होता. लिस्बनच्या विज्ञान अकादमीचा तो सदस्यही होता. नाटककार–कादंबरीकार म्हणून तो विशेष प्रसिद्ध असला, तरी आपल्या साहित्यसेवेचा आरंभ त्याने काव्यलेखनाने केला. नादा (१८९९, इं. शी. नथिंग) ह्या नावाने त्याच्या कविता संगृहीत केलेल्या आहेत. अ सैआ दुश कार्दीआइश (१९०२, इं. शी. द कार्डिनल्स सपर) ह्या त्याच्या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. १९६८ पर्यंत त्याच्या एकूण ५० आवृत्या निघाल्या. ख्रिस्ती घर्मोपदेशकांच्या ब्रह्मचर्यावर ह्या नाट्यकृतीत टीका केलेली आहे. ऊं सॅरांउ नश लारांझ्यैराश् (१९०४, इं. शी. अन ईव्हनिंग इन द ऑरिंज ग्रोव्ह), पासु द व्हैरुश (१९०३, इं शी. पॅलेस ऑफ व्हैरुश) ही त्याची अन्य उल्लेखनीय नाटके. अ सॅव्हॅरा (१९०१, इं. शी. द सिव्हीअर) ही त्याची ऐतिहासिक कादंबरी. विसाव्या शतकाच्या पहिल्या पादात स्वच्छंदतावादी दृष्टिकोनातून इतिहासात रस घेण्याची जी प्रवृत्ती पोर्तुगीज साहित्यात प्रकटली, तिचा दान्ताश हा एक उल्लेखनीय प्रतिनिधी. सखोल जीवनदर्शनाच्या संदर्भात मात्र त्याच्या साहित्यकृती काहीशा उण्या वाटतात. लिस्बन येथे तो निधन पावला.

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं) कुलकर्णी, अ. र. (म.)

Close Menu
Skip to content