बुकाज्य, बारबॉझा द्यू : (१५ सप्टेंबर १७६५-२१ डिसेंबर १८०५). श्रेष्ठ पोर्तुगीज कवी. जन्म सितूबल येथे. वयाच्या पंधराव्या वर्षीच सैन्यात दाखल झाला त्यानंतर दोन वर्षांनी नाविक दलात शिरला. १७८६ पासून तो गोव्यात होता. जुगारात झालेल्या कर्जाची फेड टाळण्यासाठी तो गोव्याहून मकावला पळून आला. तेथील प्रशासकांनी त्याला संरक्षण दिले. १७९० मध्ये तो पोर्तुगालला आला आणि काव्यलेखनाकडे वळला. श्रेष्ठ कवी म्हणून लवकरच त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. रीमश (इं. शी. ऱ्हाइम्स ३ खंड १७९१, १७९९, १८०४) हा त्याचा उल्लेखनीय काव्यसंग्रह. त्याने रचलेली अनेक सुंदर सुनीते आणि अन्य काव्यरचना त्यात अंतर्भूत आहेत.

सुनीताबरोबरच विलापिका, उपरोधिका, ओड असे विविध काव्यप्रकार बुकाज्यने समर्थपणे हाताळले. बुकाज्यच्या कवितेचे रूप नवअभिजाततावादी काव्यभूमिकेशी नाते सांगणारे असले, तरी त्याची उत्कट आत्मपरता स्वच्छंदतावादाला जवळची असल्यामुळे पोर्तुगीज कवितेतील स्वच्छंदतावादाचा अग्रदूत म्हणून तो ओळखला जातो. ऑव्हिड, व्हर्जिल ह्यांच्यासारख्या श्रेष्ठ लॅटिन कवींची काही काव्यरचना बुकाज्यने पोर्तुगीजमध्ये अनुवादिली. काही फ्रेंच साहित्यही त्याने पोर्तुगीजमध्ये आणले.

पाव्हॉरॉझा इलुझांउ द इतॅर्निदाद (१७९७ इं. शी. फ्राइटफुल इलूझन ऑफ द इटर्निटी) ह्या त्याच्या उपरोधिकेमुळे धर्मन्यायपीठाने (इंक्विझिशन) बुकाज्यला पाखंडी आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा पुरस्कर्ता ठरवून काही काळ तुरुंगात टाकले होते. लिस्बन येथे तो निधन पावला.

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)