बॅर्नार्दिश, पाद्रि मानुयॅल : (१६४४-१७१०). पोर्तुगीज धर्मोपदेशक. उत्कृष्ट वक्ता आणि नीतिवादी लेखक म्हणून प्रसिद्ध. त्याचा जन्म लिस्बनमध्ये झाला. कोईंब्रा विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि कॅनन लॉ हे विषय घेऊन तो पदवीधर झाला. नॉव्हा फ्लॉरॅश्ता (५ खंड १७०६–२८) हा त्याचा प्रमुख ग्रंथ. आध्यात्मिक-नैतिक विषयांच्या निरूपणास वाहिलेला हा ग्रंथ पोर्तुगीज साहित्यातील एक श्रेष्ठ गद्यकृती म्हणून मान्यता पावलेला आहे. त्याच्या सॅमोंइश (१७११, इं. शी. सर्मन्स) मधून पार्तुगीज भाषेची संपन्नता व लालित्य ह्यांचा प्रत्यय येतो. यॅझॅर्सीसिउश येश्पिरितुआइश इ मेदितासाँइश (१६८९, इ. शी. स्पिरिच्यूअल एक्झरसाइजेस अँड मेडिटेशन्स) व लूज इ कालोर(१६९६, इं.शी. लाइट अँड हीट) हे त्याचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ होत. शैलीकार पोर्तुगीज गद्यलेखकांत त्याची गणना केली जाते. लिस्बन येथे तो निधन पावला.

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इ.) कुलकर्णी, अ.र. (म.)