लुझीअड्स : पोर्तुगालचे राष्ट्रीय महाकाव्य. श्रेष्ठ पोर्तुगीज कवी è लुईज द कामाँइश (१५२४-८०) हा त्याचा कर्ता. ‘लुझीअड्स’ ह्या शब्दाचा अर्थ ‘लूझूचे पुत्र’ किंवा ‘पोर्तुगीज’ असा आहे (‘लुसितानिया’ हे पोर्तुगालचे लॅटिन नाव. लूझू हा त्याचा मिथ्यकथत्मक नायक आहे). ‘ओताव्हा रिमा’ ह्या वृत्तात लिहिलेल्या ह्या महाकाव्याची एकूण पद्यसंस्था १,१०२ असून ती दहा सर्गांत विभागण्यात आली आहे.

वास्को द गामाचे जलपर्यटन आणि त्याचे भारतात आगमन ह्या विषयाच्या चौकटीत पोर्तुगालच्या एकूण इतिहासातील उज्ज्वल क्षण कवीने ह्या महाकाव्यात जिवंतपणे चित्रित केलेले आहेत. ख्रिस्ती धर्माच्या शत्रूंवर पोर्तुगालने मिळविलेले विजय वर्णिताना कवीचा दिसून येणारा अभिनिवेश लक्षणीय आहे. वास्को द गामाची व्यक्तीरेखा ह्या काव्याच्या केंद्रस्थानी असली, तरी कोणतीही विशिष्ट व्यक्ती नव्हे, तर पोर्तुगाल हे संपूर्ण राष्ट्र ह्या महाकाव्याचे नायक आहे. लुझीअड्स हे ख्रिस्ती महाकाव्यही म्हणता येईल. परंतु पेगन मिथ्यकथांच्या जगाचे रंगही येथे ठळकपणे दिसून येतात.

ह्या महाकाव्याचे रिचर्ड फॅन्शॉकृत इंग्रजी भाषांतर १६५५ मध्ये प्रसिद्ध झाले. जे. डी. एम्. फोर्ड ह्याने लुझीअड्सची मूळ पोर्तुगीज संहिता इंग्रजी टीपांसह प्रसिद्ध केली (१९४६).

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)