कोक्तो, झां : (५ जुलै १८८९–११ ऑक्टोबर १९६३). फ्रेंच कवी आणि लेखक. त्याचा जन्म पॅरिसजवळ मेझाँ लाफीत येथे झाला. कवितेबरोबरच कादंबरी आणि नाटक हे साहित्यप्रकारही त्याने समर्थपणे हाताळले. तसेच चित्रपट, बॅले, रंगभूमी, संगीत ह्यांसारख्या कलाक्षेत्रांतही आपल्या मौलिक आणि चतुरस्त्र प्रतिभेचा ठसा उमटविला. आपॉलिनेर, प्रुस्त, स्ट्राव्हिन्सकी, द्याग्यिल्येफ, पिकासो ह्यांसारख्या साहित्य, संगीत, नृत्य, चित्रकला इ. क्षेत्रात वावरणाऱ्या प्रतिभावंतांचा निकट सहवासही त्याला लाभला. पहिल्या महायुद्धात रुग्णवाहिकांच्या पथकात त्याने काम केले. रादीगे हा तरुण फ्रेंच कादंबरीकार त्याचा अत्यंत जवळचा मित्र. त्याच्या अकाली निधनानंतर कोक्तोला काही काळ अफूचे व्यसन लागले होते. झाक मारीतँ ह्या फ्रेंच तत्त्वज्ञाच्या प्रभावाने रोमन कॅथलिक पंथाचा तो कट्टर पुरस्कर्ता बनला. धर्म आणि कलास्वातंत्र्य ह्यांत विरोध नाही, हे सिद्ध करण्याचा त्याने मनापासून प्रयत्न केला. ह्या संदर्भात मारीतँबरोबर त्याने केलेला दीर्घ पत्रव्यवहार महत्त्वाचा आहे. ऐंशी दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा यशस्वी प्रयोगही त्याने केला. विविध प्रवृत्तींचा आणि अनेकांगी सर्जनशीलतेचा प्रत्यय त्याच्या जीवनातून आणि कर्तृत्वातून येतो.

 कोक्तो, झां

Le Cap de Bonne-Esperance (१९१९), Plainchant (१९२३), Opera (१९२५-२७), Mythologie (१९३४), Poesies (१९४८) हे त्याचे काही वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह, कोक्तोमधील कवी आमरण जिवंत होता. इतकेच नव्हे, तर त्याच्या प्रतिभेच्या अनेकांगी आविष्कारातून त्याच्यातील कवीच पुनःपुन्हा प्रकट झाल्यासारखा वाटतो. त्याच्या कादंबऱ्याही काव्यात्मच आहेत. Le potomak (१९१९) ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतर त्याने Le Grand Ecart ( १९२३, इं.भा. द ग्रँड एकार्ट, १९२५), Thomas I‘ Imposteur (१९२३, इं. भा. टॉमस द इंपॉस्टर, १९२५), Les Enfants terribles (१९२९), ह्यांसारख्या कादंबऱ्या लिहिल्या. Les Enfants … ह्या विशेष प्रसिद्ध कादंबरीत पौगंडावस्थेतील मुलांचे अत्यंत प्रभावी चित्रण त्याने केले आहे. ह्या कादंबरी एका सबंध पिढीला भारून टाकले होते. १९५० मध्ये ह्या कादंबरीवर प्रभावी चित्रपट त्याने निर्माण केला. Parade (१९१९), Le Boeuf sur le toit (१९२०, इं. शी. नथिंग डुइंग बार), Les Maries de la Tour Eiffel (१९२४) हे त्याने लिहिलेले काही बॅले. Orphe (१९२७), Antigone (१९२८), La Machine Infernale (१९३४, इं. भा. द इन्फर्नल मशिन, १९३६) आणि Les Chevaliers de la Table Ronde (१९३७), इं. भा. द नाइट्स ऑफ द राउंड टेबल, १९६३) ह्यांसारख्या आपल्या नाट्यकृतींतून त्याने प्राचीन आणि मध्ययुगीन मिथ्यकथांना नवे रूप देण्याचा प्रयत्न केला. Les parents terribles (१९३८, इं. भा. इंटिमेट रिलेशन्स, १९५१) हे त्याचे ईडिपसच्या कथेवर आधारलेले विख्यात नाटक मनोविश्लेषणात्मक आहे. १९४८ मध्ये त्यावर चित्रपट काढण्यात आला. Le sang d’un poete (१९३२, इं. शी. द ब्लड ऑफ अ पोएट), L’ eternel retour (१९४४, इं.शी. इटर्नल रिटर्न) आणि Le belle et la bete (१९४५, इं. शी. ब्यूटी अँड द बीस्ट) ह्या त्याच्या चित्रपटांनी त्याला फ्रान्सबाहेरही लौकिक मिळवून दिला. त्याची प्रयोगशीलता त्याच्या चित्रपटांतूनही दिसून येते. ‘ब्यूटी अँड द बीस्ट’ मध्ये तर एक परीकथा त्याने अतिवास्तवादी पद्धतीने हाताळली आहे.

रॉयल बेल्जियन अकादमीची सदस्या असलेली विख्यात फ्रेंच लेखिका सीदोनी गाब्रीएल कोलेत हिच्या निधनानंतर (१९५४) तिच्या जागी, त्या अकादमीवर कोक्तोला घेण्यात आले. १९५५ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची नेमणूक झाली. १९५६ मध्ये तो इंग्लंडला गेला. तेथे असताना ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन त्याचा सन्मान केला.

एका मित्राच्या निधनाचा धक्का बसून हृदयविकाराच्या झटक्याने तो मीयी येथे निधन पावला.

संदर्भ : 1. Crosland, Margaret, Jean Cocteau, New York, 1956.

2. Dubourg, Pierre Dramaturgie de Jean Cocteau, Paris, 1954.

3. Fowlie, Wallace, Jean Cocteau : The History of a Poet’s Age, Bloomington, Ind.,1966.

टोणगावकर, विजया