व्हरहारेन, एमील : (२१ मे १८५५ – २७ नोव्हेंबर १९१६). श्रेष्ठ बेल्जियन कवी. फ्रेंचमध्ये कवितालेखन. जन्म सँत अमां लेझ-प्वर्स येथे. शिक्षण ब्रूसेल्स, गेंट आणि लूव्हँ येथे. लूव्हँ येथे त्याने कायद्याची पदवी घेतली. तथापि वकिली व्यवसायापेक्षा काव्यलेखनाकडे ओढ असल्यामुळे त्याने स्वत:ला कवितेलाच वाहून घेतले. ‘ले फ्लामांद’ हा त्याचा पहिला कवितासंग्रह (१८८३). त्यातील अनेक कवितांतून त्याने कृषिजीवनाची वास्तवचित्रे सशब्द केली. कृषिजीवनावरील काही फ्लेमिश चित्रकारांच्या चित्रकृतींचा प्रभावही त्यांच्यावर जाणवतो. ‘ले म्बान’ (१८८६), ‘ले स्वार’ (१८८७), ‘ले फ्लांबो न्वार’ (१८९०) आणि ‘ले कांपाग्न्य आल्युसिने’ (१८९३) हे त्याचे नंतरचे काही काव्यसंग्रह होत. त्याच्या नावावर तिसांहून अधिक काव्यसंग्रह आहेत.

गंभीर आजाराची काही वर्षे गेल्यानंतर सु. १८९२ पासून तो सामाजिक प्रश्नांचा विचार करू लागला. विश्वबंधुत्वावर आधारलेल्या भविष्यकालीन जगाचे आशादायक चित्र त्याच्या डोळ्यांसमोर होते. तथापि पहिल्या महायुद्धात जर्मनीने बेल्जियमवर केलेल्या आक्रमणानंतर ही आशा धुळीला मिळाली. युद्धावर कडवट टीका करणाऱ्या कविता त्याने लिहिल्या आहेत. यंत्रयुगामुळे उभी राहणारी मोठी औद्योगिक शहरे आणि हळुहळू नष्ट होत जाणारा ग्रामीण भाग ह्यांचे प्रभावी चित्रण त्याच्या काही कवितांतून आढळते. ‘ले व्हील तांता क्ल्युलॅर’ (१८९५) मधील काव्यरचना ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ‘ला म्युल्तिप्ल स्प्लांदर’ (१९६०) सारख्या काव्यसंग्रहातील कवितांतून मात्र मानवाच्या अंत:शक्तीवरील श्रद्धा व्यक्त केलेली दिसून येते.

व्हरहारेनच्या काही कविता पत्नीप्रेमाने प्रेरित झालेल्या आहेत. ‘लेझर क्लॅर’ (१८९६), ‘लेझर घुस्वार’ (१९११) असे काही काव्यसंग्रह त्या दृष्टीने निर्देशनीय आहेत.

त्याने काही पद्यनाटकेही लिहिली. ‘लेझोब’ (१८९८, इं. भा. द डॉन, १८९८), ‘ल् क्लुआत्र’ (१९००, इं. भा. द क्लॉइस्टर, १९१५), ‘येलॅन द् स्पार्त’ (१९१२, इं. भा. हेलन ऑफ स्पार्टा, १९१६) ह्यांचा त्यांत अंतर्भाव होतो.

व्हरहारेनच्या काव्याभिव्यक्तीतून जोश आणि जोम प्रत्ययास येतात. त्याच्या भाषेत एक प्रकारचा अनघडपणा आणि लवचीकता आहे. त्याने फ्रेंच भाषेत आपले काव्यलेखन केले, तरी त्या भाषेत त्याने आणलेला जोम आणि चैतन्य ‘जर्मानिक’ होते, असे म्हटले जाते. प्रगतीची आकांक्षा, मानवी बंधुत्व, श्रमिक वर्गाची मुक्ती यांसारख्या जाणिवांतून व्यक्त होणारे मानवी चैतन्य आणि आपल्या पत्नीविषयीच्या कोमल प्रेमभावना, हे त्याच्या कवितेचे प्रमुख विषय होत. भौतिक जगावर मानवी बुद्धिमत्तेने मिळविलेल्या विजय आणि औद्योगिक युगाचे कधीकधी भेदक वाटणारे सौंदर्यही त्याच्या कवितेचा विषय झालेले आहे. रूआन येथे एका अपघातात तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.