मोल्येर

मोल्येर : (१५ जानेवारी १६२२–२७ फेब्रुवारी १६७३). श्रेष्ठ फ्रेंच नाटककार. मूळ नाव झां बातीस्त पोक्लां. मोल्येर हे त्याने रंगभूमीसाठी घेतलेले नाव. मोल्येरचा जन्म पॅरिस शहरी झाला. त्याच्या वडीलांचे नाव झां पोक्लां असे होते. फ्रान्सच्या राजघराण्यासाठी ते फर्निचर पुरवीत. कॉलेज द क्लेरमाँ ह्या पॅरिसच्या प्रसिद्ध जेझुइट शिक्षणसंस्थेत त्याच्या वडिलांनी त्याला उत्तम शिक्षण दिले. पुढे त्याने कायद्याचा अभ्यासही केला, असे म्हटले जाते. आपल्या पुत्राने आपलाच व्यवसाय पुढे चालवावा, अशी मोल्येरच्या वडिलांची इच्छा होती परंतु मोल्येरला त्याच्या बालपणापासूनच रंगभूमीची ओढ होती आणि ह्याच कलाक्षेत्राला त्याने १६४३ पासून वाहून घेतले. त्यानंतरची तीस वर्षे नट, नाटककार आणि नाट्यव्यवस्थापक अशा नात्यांनी त्याने रंगभूमीची अविरत सेवा केली. मृत्यूच्या दिवशी, आजारी असतानाही ल् मालाद इमाजिनॅर (प्रथम प्रयोग १६७३, इं. शी. ‘इमॅजिनरी इन्‌व्हॅलिड’) ह्या त्यानेच लिहिलेल्या नाटकाच्या चौथ्या प्रयोगात तो काम करीत होता. रंगभूमीवरच तो कोसळला. पॅरिसमधील त्याच्या निवासस्थानी त्याला आणण्यात आले. तेथे तो निधन पावला. नटाचा पेशा तत्कालीन फ्रान्समध्ये प्रतिष्ठित मानला जात नसल्यामुळे मृत्यूनंतरचे ख्रिस्ती धर्मविधी मोल्येरला नाकारण्यात आले होते. फ्रान्सचा राजा चौदावा लूई ह्याने हस्तक्षेप केल्यानंतर मोल्येरचा दफनविधी २१ फेब्रुवारी १६७३ रोजी सूर्यास्तानंतर आणि कोणत्याही धार्मिक विधीवाचून करू दिला गेला.

ला जालुझी द्यु बार्बुय्ये (लेखनकाळ १६४५–५०, इं. शी. ‘द जेलसी ऑफ बार्बुय्य’ प्रथम प्रयोग १७६०) आणि ल मेदसँ व्हॉलां (लेखनकाळ १६४५–५०, इं. शी. ‘द फ्लाइंग डॉक्टर’ प्रथम प्रयोग १७६९) हे मोल्येरच्या अगदी आरंभीच्या, प्रहसनात्मक नाट्यलेखनाचे दोन नमुने. त्यानंतर त्याने ३१ नाटके लिहिली. उपर्युक्त ल् मालाद इमाजिनॅर ही मोल्येरची अखेरची नाट्यकृती. त्याच्या विशेष उल्लेखनीय नाट्यकृती अशा : लेतुर्दी (१६५३, इं. शी. ‘द ब्लंडरर ऑर द मिसहॅप्स’), ‘दि ॲमरस क्वॉरल’(१६५६, इं. शी.), ले प्रेसियझ रिदिक्यूल (१६५९, इं. शी. ‘द ॲफेक्टेड लेडीज’), ‘स्गानारेल ऑर द इमॅजिनरी ककोल्ड’ (१६६०), दाँ गार्सी द नाव्हार (१६६१, इं. शी. ‘डॉन गार्सिया ऑफ नाव्हारे ऑर द जेलस प्रिन्स’), लेकॉल दे मारी (१६६१, इं. शी. ‘द स्कूल फॉर हजबंड्स’), ले फाश (१६६२, इं. शी. ‘द बोअर्स’), लेकॉल दे फाम (१६६२, इं. शी. ‘द स्कूल फॉर वाइव्ह्‌ज’), क्रितिक द लेकॉल दे फाम (१६६३, इं. शी. ‘द स्कूल फॉर वाइव्ह्‌ज क्रिटिसाइज्ड’), ल मारियाज फॉर्से (१६६४, इं. शी. ‘द फोर्स्ड मॅरिज’), ल प्रँसेस देलीद (१६६४, इं. शी. ‘द प्रिन्सेस ऑफ एलिद’), तार्त्यूफ (१६६४, इं. शी. ‘तार्तूफ ऑर द इंपोस्टर’), दाँ ज्यूआं (१६६५, इं. शी. ‘डॉन वॉन ऑर द फीस्ट विथ द स्टॅच्यू’), ‘लव्ह इज द बेस्ट डॉक्टर’ (१६६५ इं. शी.), लमिझांत्रॉप (१६६६, इं. शी. ‘द मिसँथ्रोप’), ‘द डॉक्टर इन स्पाइट ऑफ हिमसेल्फ’ (१९६६ इं. शी.), लाव्हार (१६६८, इं. शी. ‘द मायझर’), ले फाम साव्हांत (१६७२, इं. शी. ‘द लर्नेड लेडीज’) व ‘द इमॅजिनरी इन्‌व्हॅलिड’ (१६७३).

मोल्येरची बहुतेक सर्व नाटके म्हणजे सुखात्मिकाच होत. स्वतःच्या सर्जनशीलतेच्या पूर्ण आविष्कारास वाव देईल आणि तत्कालीन रंगभूमीच्या चौकटीत फ्रेंच प्रेक्षकांना पूर्णपणे खूष करू शकेल, असा वैशिष्ट्यपूर्ण, व्यक्तिरेखाप्रधान सुखात्मिकेचा एक नवा साचा त्याने निर्माण केला. मोल्येरपूर्वीची फ्रेंच सुखात्मिका इटालियन धर्तीची होती. तीत मुखवटे असत आणि त्यांत चालीरीतींना विशेष महत्त्व असे. त्यांतील व्यक्तिरेखा जिवंत नसत आणि त्यांत मानवी समस्यांचे सूक्ष्म चित्रण करण्याची प्रवृत्तीही प्रत्ययाला येत नसे. मोल्येरने ही कोंडी फोडली. सुखात्मिका यशस्वी होण्यासाठी जे उत्फुल्ल, खळाळते वातावरण निर्माण करण्याची ताकद लागते ती मोल्येरजवळ विलक्षण प्रमाणात आहे. असे वातावरण व मजेशीर व्यक्ती यांची एक गुंतागुंतीची जाणीव तो सहज निर्माण करतो. अनेक ठिकाणी तो जीवनाच्या गंभीर अंगांना स्पर्श करतो. विविध व्यक्तीरेखा उभ्या करून, मोल्येर जीवनातील समस्यांकडे पाहतो तेव्हा त्याच्या विनोदात उथळपणा नाही याची प्रचीती येते. गुंतागुंतीची संविधानरचना, अतिरंजित प्रसंग व आक्रस्ताळी पात्रे यांच्या मर्यादा ओलांडून त्याची नाटके मानवी जीवनातील शाश्वत अंगांना व मूल्यांना भिडतात. जीवनातील दुःखद आणि भीषण घडामोडींनीही त्याचा मानवावरील विश्वास तसेच त्याचा आशावाद कोमेजत नाही. मानवी जीवनातील उथळपणा, ढोंग, पोकळ प्रतिष्ठा, कृत्रिमता यांचे मार्मिक विडंबन करण्याची एकही संधी तो सोडत नाही पण एकाही संधीचा गैरफायदा तो नाटककार म्हणून किंवा निव्वळ माणूस म्हणूनही घेत नाही.

मोल्येर हा यूरोपीय साहित्यातील अभिजाततावादी परंपरेतील आहे. स्थळ, काल आणि कृती ह्यांची एकात्मता, बुद्धीने नियंत्रित झालेला भावनांचा समतोल खेळ, व्यक्तिरेखा रंगविताना त्यांचा एक नमुना करण्याकडे कल, लेखनातील तांत्रिक सफाई यांसारखी अभिजाततावादाची वैशिष्ट्ये मोल्येरमध्ये ठळकपणे आढळतात.  

ग्रीकांपासून फ्रेचांनी आत्मसात केलेला बुद्धी आणि बौद्धिकता यांविषयीचा पूर्ण आदर, लॅटीन परंपरेतून फ्रेंच संस्कृतीत झिरपलेली प्रमाणबद्धता व शिस्त मोल्येरमध्ये आहे. मोल्येर नुसता श्रेष्ठ नाटककार नव्हे, तर फ्रेंचांचा राष्ट्रीय साहित्यिक मानला जातो तो यामुळेच. 

चौदाव्या लूईच्या कारकीर्दीतील उच्च व मध्यम वर्गीयांच्या प्रत्यक्ष जीवनातील समस्यांना मोल्येरने हात घातला. सामान्य नोकरचाकरांची पात्रेही त्याने हळुवारपणे रंगविली. राजे आणि राण्या यांच्या कथांभोवती पिंगा घालणारे साहित्य मोल्येरमुळे सामान्य माणसांचे झाले. त्याच्या नाट्यकृतींचा प्रभाव सर्व यूरोपात पडला. यूरोपीय नाटककारांच्या पुढील पिढ्यांतील अनेकांवर मोल्येरने आपला विलक्षण प्रभाव पाडला.

मराठीत मोल्येरच्या प्रहसनांची रूपांतरे झाली आहेत. हरिभाऊ आपटे यांचे मारून मुटकून वैद्यबुवा हरिश्चंद्र आनंद तालचेरकरकृत रावबहादूर पर्वत्या गोविंद बल्लाळ देवल यांनी संशयकल्लोळ हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाटक लिहिताना, मोल्येरच्या स्गानारेल ह्या नाटकाचा आधार घेतला होता. आचार्य अत्रे यांचे कवडीचुंबक हे गाजलेले नाटक मोल्येरच्याच लाव्हार ह्या नाटकाचे यशस्वी मराठी रूपांतर होय.

संदर्भ : 1. Chapman, P. A. The Spirit of Moliere: An Interpretation, 1940.

             2. Gossman, Lionel, Man and Masks : A Study of Molier, Baltimore,1963.

             3. Howarth, W. D. Merlin, Thomas J. Moliere: Stage and study, Oxford, 1973.

             4. Hubert, Judd D. Moliere and the Comedy of the Intellect, 1962 reprint, 1974.

             5. Lewis, D. B. Wyndham, Moliere: The Comic Mask, 1959.

             6. Matthew, Brander, Moliere: His Life and His Works, 1930.

             7. McBride, Robert, The Sceptical Vision of Moliere, 1976.

             8. Palmer, J. L. Moliere: His Life and Works, 1930.

             9. Tilley, Arthur, Moliere, 1921 reprint, 1968.

कुलकर्णी, अनिरुद्ध