जाम्म, फ्रांसी : (२ डिसेंबर १८६८–१ नोव्हेंबर १९३८). फ्रेंच कवी. तूर्ने (ऑट-पिरेनीज ) येथे जन्मला. शिक्षण पो आणि बॉर्दो येथे झाले. एका वकिलाचा कारकून म्हणून काही काळ काम केले. त्यानंतरचे बहुतेक आयुष्य आस्पारेन येथे घालविले.

द् लांजेल्यूस द् लोब आ लांजेल्यूस द् स्वार, १८८८–१८९७  (१८९८, इं. शी. फ्रॉम द मॉर्निंग अँजेलस टू द ईव्हनिंग अँजेलस) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ल दय दे प्रिमव्हॅर (१९०१, इं. शी. द मॉर्निंग ऑफ द प्रिमरोझिस), क्लॅरियॅर दां ल् सियॅल, १९०२–१९०६ (१९०६, इं. शी. ग्लेड्स इन द स्काय) आणि ले ज्यॉर्जीक क्रेतियॅन्न  (१९११, इं. शी. द क्रिश्चन जॉर्जीस) असे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. जाम्मने आपल्या कवितेतून निर्सगाची आणि खेडूतांच्या दैनंदिन जीवनाची रम्य चित्रे निरागस साधेपणाने रेखाटलेली आहेत. कधी कधी ही निरागसता जाणीवपूर्वक जोपासलेली आढळते. १९०६ मध्ये रोमन कॅथलिक पंथाचा त्याने स्वीकार केला. त्यानंतरच्या त्याच्या कवितेत धार्मिकतेचा सूर अधिकाधिक उत्कटपणे उमटत गेलेला आढळतो. ‘नात्युरिझ्म’ या निसर्गप्रेमी काव्यसंप्रदायात तो काही काळ होता. आस्पारेन येथे तो निधन पावला.

 टोणगावकर, विजया