ला ब्ऱ्यूयेअर, झां द : (१६ ऑगस्ट १६४५ – १० मे १६९६). फ्रेंच नीतिवादी आणि उपरोधकार. पॅरिसमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला. आर्लेआं येथे त्याने कायद्याचे शिक्षण घेतले परंतु वकिलीचा व्यवसाय कधीही केला नाही. १६८४ साली. प्रँस द कोंदे (प्रिन्स द कोंदे) ह्याचा नातू द्यूक द् बूर्‌बाँ ह्याचा शिक्षक म्हणून त्याला नेमण्यात आले. त्या निमित्ताने फ्रान्समधील ह्या विख्यात सरदारघराण्याशी त्याचा संबंध आला. आपले उर्वरित आयुष्य त्याने ह्याच घराण्याच्या आश्रयाने काढले. त्याची ख्याती अधिष्ठित आहे, ती त्याच्या ले काराक्‍तॅर द् तेओफ्रास्त त्राद्युई द्यु ग्रॅक आव्हॅक काराक्‍तॅर  ए ले मर्स द् स सिॲक्ल ह्या ग्रंथावर (१६८८, मराठी शिर्षकार्थ, तेओफ्रास्तच्या स्वभावचित्रांचा मूळ ग्रीक भाषेतून अनुवाद व वर्तमान रीतिरिवाज आणि स्वभावचित्रे). प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञ थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२-२८७) ह्याच्या ‘कॅरॅक्टर्स’ (इं. अर्थ) ह्या ग्रंथाच्या स्वतःच केलेल्या मुक्तानुवादात, स्वतःची भर घालण्याच्या उद्देशाने ला ब्ऱ्यूयेअरने आपला ग्रंथ लिहावयास सुरुवात केली आणि नंतरच्या आवृत्त्यांत ही भर तो अधिकाधिक घालीत गेला. ला ब्र्युयेअरच्या ह्या ग्रंथाला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आणि त्याच्या हयातीतच ह्या ग्रंथाच्या आठ आवृत्त्या निघाल्या. अखेरची आवृत्ती १६९४ मध्ये निघाली. 

 ला ब्र्युयेअरच्या ह्या स्वभावचित्रांना मिळालेल्या लोकप्रियतेत त्यांच्या वाङ्‌मयीन गुणांचा भाग होताच परंतु वेधक, चित्रमय आणि उपरोधप्रचुर शैलीत रंगविलेली ही स्वभावचित्रे वाचताना तत्कालीन वाचकांना त्या वेळच्या ख्यातनाम व्यक्तींचे चेहरेमोहरे त्यांतून दिसत होते (ह्या व्यक्तींची खरी नावे मात्र ला ब्ऱ्यूयेअरने आपल्या ह्या ग्रंथात दिलेली नव्हती). प्रँस द कोंदेच्या घराण्याशी संबंध आल्यामुळे राजदरबारातील आणि एकूणच उच्च स्तरावरील समाजजीवनाचे अतिशय जवळून निरीक्षण करण्याची संधी त्याला मिळाली होती आणि तिचा उपयोग ही स्वभावचित्रे लिहिताना त्याने चातुर्याने आणि कल्पकतेने करून घेतला. त्याची स्वतंत्र प्रतिभा, संवेदनशीलता आणि अंतर्भेदक सूक्ष्म निरीक्षणशक्ती ह्यांचा प्रभाव प्रत्यय त्याचा हा ग्रंथ वाचताना येतो. बड्या घराण्यातील लोकांचे दुरभिमान, त्यांची आत्मसंतुष्ट वृत्ती, त्यांना असलेला बाह्य देखाव्याचा हव्यास, खऱ्या गुणवत्तेचा आणि मूल्यांचा त्यांच्यापाशी असलेला अभाव, समाजात वर येऊ पाहणाऱ्या नवश्रीमंतांशी द्रव्याच्या अभावी त्यांना करावी लागणारी तडजोड, त्यांची निष्क्रियता असे अनेक दोष त्याने दाखविले आहेत. तथापि नवश्रीमंतांपाशी नसलेली माणुसकी आणि सरदारदिकांचे मूर्ख अनुकरण करण्याची त्यांची धडपड ह्यांचेही मार्मिक चित्रण त्याने केले. वरच्या वर्गातील स्त्रिया आपल्या उपजत बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग न करता, केवळ वेषभूषेतील छानछोकी व हलक्याफुलक्या करमणुकीचे प्रकार ह्यांच्याच मागे कशा लागतात, हेही त्याने सखेद नमूद केले आहे. चौदाव्या लूईच्या वैभवशाली राजवटीत सामान्य खेडुतांची मात्र दैन्यावस्था होती, ही बाबही ला ब्र्युयेअरच्या निरीक्षणातून अर्थातच सुटलेली नाही. ही त्याची सामाजिक जाणीवही महत्त्वपूर्ण आहे. पुढे होणाऱ्या क्रांतीचे सूचनही त्याच्या काही विचारांतून होत असल्यामुळे त्याचे क्रांतदर्शित्वही मानावे लागते. 

 साहित्यविषयक मार्मिक विचारही त्याने मांडले आहेत. आपल्या मनाचा कौल त्याने प्राचीन ग्रीक-लॅटिन साहित्याच्या आणि अभिजाततावादी वाङ्‌मयीन दृष्टीच्या बाजूने दिलेला आहे. ला ब्ऱ्यूयेअरच्या ल काराक्‍‌तॅरचा इंग्रजी अनुवाद हेन्री व्हान लाउन ह्यांनीही केला आहे (१९२९). 

 फ्रेंच अकादमीने १६९६ साली त्याला सदस्यत्व देऊन त्याचा बहुमान केला. 

 व्हर्साय येथे तो निधन पावला.

 संदर्भ : Gosse, Edmund, Three French Moralists, 1918. 

 टोणगावकर, विजया