पॉल व्हर्लेअनव्हर्लेअन, पॉल : (३० मार्च १८४४-८ जानेवारी १८९६). फ्रेंच भावकवी. मेट्स येथे जन्म. त्याचे वडील सेनाधिकारी होते. त्याच्या आईने त्याला खूप लाडात वाढविले होते. पॅरिसमध्ये त्याचे शिक्षण झाले. त्यानंतर एका विमा कंपनीत तो कारकून म्हणून नोकरीला लागला. विद्यार्थिदशेतच तो कविता करीत होता. नोकरीच्या काळात पॅरिसमधल्या ‘ल पार्नास’ ह्या साहित्य संप्रदायातील प्रमुख कवींशी त्याचा परिचय झाला. ‘ल पार्नास काँतँपॉरँ’ (१८६६) ह्या समकालीन कवींच्या काव्यसंग्रहात व्हर्लेअनच्या आठ कविता समाविष्ट आहेत. ‘ले पोॲम सात्युर्नियां’ हा त्याचा पहिला काव्यसंग्रह (१८६६). यातील कवितांवर पार्‍नॅसिअन रूपवादाचा प्रभाव जाणवतो. ⇨शार्ल बोदलेअर (१८२१-६७) आणि ⇨लकाँत द लील (१८१८-९४) ह्यांचेही काही संस्कार ह्या कवितांवर दिसतात. एलिझा ह्या त्याच्या नात्यातील एका मुलीबद्दलच्या उत्कट प्रेमाची वेदना ह्या कवितांतून प्रकट झालेली आहे. फॅत गालांत (१८६९) ह्या त्याच्या नंतरच्या काव्यसंग्रहातील कवितांवर व्हातो आणि निकोलस लांक्रे (१६९०-१७४३) ह्या फ्रेंच चित्रकारांच्या चित्रकृतींचा प्रभाव आहे. रंगच्छटांचा प्रत्यय देणारी नाजूक शब्दकळा व चित्रसदृश रचना, ही या कवितांची वैशिष्ट्ये. विशिष्ट प्रकारच्या इटालियन सुखात्मिकांतील (कोम्मेदिआ देल्लार्ते) व्यक्तिरेखा आणि प्रसंग ह्यांच्या आवाहकतेचे तंत्र वापरून आपल्या व्यक्तिगत भावनांना अवगुंठित करण्याचे कौशल्यही ह्या कवितांतून प्रत्ययास येते. चित्रकलादी ललित कला आणि साहित्य ह्यांच्या एकात्मतेचा परिणामकारक आविष्कार व्हर्लेअनने साधला. मातील्द मॉत या मुलीशी व्हर्लेअनने प्रेमविवाह केला (१८७०). या प्रेमसंबंधावर व्हर्लेअनने काही सुंदर कविताही लिहिल्या. थोर फ्रेंच कवी ⇨आर्त्यूर रँबो (१८५४-८९) ह्याच्याशी त्याची १८७१ मध्ये मैत्री झाली. रँबो व्हर्लेअनच्या घरीच राहू लागला. ह्यातून त्याची आयुष्यातली गुंतागुंत सुरू झाली. नोकरी, घर, आपली पत्नी आणि छोटा मुलगा ह्यांचा त्याग करून तो रँबोसह मुशाफिरीला निघाला. इंग्लंड आणि बेल्जियममध्ये ते भटकले. उनाड आयुष्य जगले. मैत्री असली, तरी त्यांची भांडणेही होत. अशाच एका भांडणात व्हर्लेअनने रँबोवर गोळी झाडली आणि त्याला जखमी केले. त्याबद्दल त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास घडला. ह्याच काळात ‘रॉमांस सां पारॉल’ (१८७४ इं. शी. सॉंग्ज विदाउट वडर्स) हा त्याचा काव्यसंग्रह त्याच्या मित्राने प्रसिद्ध केला. निसर्गदृश्ये, पश्चात्ताप, परित्यक्त पत्नीची निर्भर्त्सना असे विषय त्यातील कवितांत आहेत. तसेच आरंभीच्या काही कवितांतून प्रत्ययास येणारे विशुद्ध संगीत विलोभनीय आहे. छंदोरचनेचे काही प्रयोगही ह्या काव्यसंग्रहात आढळतात.

तुरुंगात असताना व्हर्लेअनच्या वृत्तीत पालट झाला. निष्ठावंत रोमन कॅथलिक म्हणून जगण्याचा त्याने निश्चय केला. ‘साजॅस्स’ (१८८०, इं. शी. विज्डम) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट गणल्या गेलेल्या काव्यसंग्रहातून त्याच्या पश्चात्तापदग्ध मनाचा उत्कट आविष्कार दिसून येतो.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर व्हर्लेअनने रँबोची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्याला झिडकारले. पुढे इंग्लंड आणि फ्रान्समध्ये कुठे कुठे शिक्षक म्हणून त्याने काम केले. शेती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपल्या पत्नीशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी धडपडला परंतु तेही जमले नाही. १८८३ मध्ये त्याच्या एका आवडत्या विद्यार्थ्याचे निधन झाले. १८८६ मध्ये त्याची आई मरण पावली. निराश अवस्थेत तो पुन्हा आपले व्यसनी, अधःपतित जीवन जगू लागला. पोटासाठी तो लेखन करीत होता पण त्यात पूर्वीचे सामर्थ्य नव्हते. पॅरिसमध्ये तो निधन पावला.

तुरुंगात असताना ‘आर पोएतीक’ हे त्याने लिहिलेले काव्य १८८२ मध्ये प्रसिद्ध झाले आणि तरुण प्रतीकवादी कवींना ते प्रेरक ठरले. जादीस ए नागॅर (१८८४, इं. शी. यस्टरइयर अँड यस्टरडे), आमूर (१८८८), पारालॅलमां (१८८९) हे त्याचे अन्य काही काव्यसंग्रह. ⇨काँफेसियाँ, नॉत ओतोबियोग्राफीक (१८९५) ह्या आत्मचरित्रात्मक लेखनात रँबोची भेट होईपर्यंतच्या काळातील आपल्या आठवणी त्याने सांगितल्या आहेत. व्हर्लेअन हा ⇨स्तेफान मालार्मे (१८४२-९८) ह्याच्याप्रमाणेच फ्रेंच प्रतीकवादाचा प्रमुख प्रतिनिधी होता. तसेच विशुद्ध भावकविता लिहिणारा कवी म्हणून व्हर्लेअनचे फ्रेंच साहित्यातील स्थान अढळ आहे. कवितेच्या शब्दांतून त्याने संगीत उमटविले. ते साधण्यासाठी फ्रेंच भाषेच्या अंत:शक्तींचा त्याने सहजप्रेरणेने घ्यावा तसा शोध घेतला आणि त्या भाषेतील संगीत त्याला गवसले.

संदर्भ : 1. Adam, Antoine, The Art of Paul Verlaine, New York, 1966.

            2. Delahaye, Emest, Verlaine, 1919.

            3. Nadal, Octave, Paul Verlaine, 1961.

कुलकर्णी, अ. र.