मारो, क्लेमां : (१४९६? –सप्टेंबर १५४४). प्रबोधनकालातील एक श्रेष्ठ फ्रेंच कवी. जन्म काऑर येथे. आंगूलेमची डचेस मार्गरेत (पुढे ही नाव्हारची राणी झाली) हिच्या दरबारी त्याला आश्रय मिळाला होता. त्याचे वडील झां मारो हे पहिल्या फ्रान्सिसच्या पदरी होते. आपल्या वडिलांच्या निधनानंतर मारो पहिल्या फ्रान्सिसच्या सेवेत रुजू झाला.

मारो हा प्रॉटेस्टंट पंथाचा असावा, असा संशय आल्यामुळे त्याला १५२६ मध्ये अल्पकाळ तुरुंगात रहावे लागले होते. तुरुंगातील वास्तव्यामुळे ‘इन्‌फेर्नो’ (इं. शी.) हे काव्य त्याला स्फुरले. ‘न्याय’ ह्या विषयावरील हे एक उपरोधप्रचुर रूपक होय. १५२७ मध्ये तुरुंगरक्षकावर हल्ला करून एका कैद्याची सुटका केल्याच्या आरोपावरून मारोला पुन्हा तुरुंगवास घडला परंतु राजकृपेने त्याची सुटका झाली. १५३२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ॲडॉलेसन्स ऑफ फ्लेमां’ (इं. शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहामुळे श्रेष्ठ कवी म्हणून त्याला मान्यता मिळाली. १५३४ मध्ये रोमन कॅथलिक पंथीयांच्या भावना दुखविणारी काही पत्रके फ्रान्सच्या प्रमुख शहरांतून लावली गेली. परिणामतः फ्रान्समध्ये प्रॉटेस्टंट पंथीयांचा छळ सुरू झाला. हे वातावरण लक्षात घेऊन मारो नाव्हारची राणी मार्गरेत हिच्या आश्रयास आला. तेथेही राहणे अवघड झाल्यानंतर तो इटलीत, फेरारा येथे तेथील डचेसच्या दरबारी आला. पुढे प्रॉटेस्टंटविरोधी वातावरण निवळल्यानंतर (१५३६) तो फ्रान्समध्ये परत आला. ख्रिस्ती पवित्र स्तोत्रांचा (साम्‌स) छंदोबद्ध फ्रेंच अनुवाद करण्याचे काम त्याने हाती घेतले. ह्या अनुवादाची (ह्यात एकूण तीस स्तोत्रांचा अनुवाद अंतर्भूत) पहिली आवृत्ती १५३९ मध्ये प्रसिद्ध झाली. असे अनुवाद तो पुढेही करीत राहिला. तथापि पॅरिसमधील सॉरबॉन येथील धार्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रमुख केंद्राने ह्या अनुवादित स्तोत्रांना विरोध केल्यानंतर मारोला पुन्हा परागंदा व्हावे लागले. ह्या खेपेस तो जिनीव्हा येथे गेला. तेथे ल्यूथरप्रणीत विचारसरणीचा फेंच धर्मशास्त्रवेत्ता आणि धर्मसुधारक जॉन कॅल्व्हिन ह्याचे पाठबळ मारोला मिळाले. ख्रिस्ती पवित्र स्तोत्रांच्या मारोने केलेल्या आणखी वीस अनुवादांची एक आवृतीही निघाली (१५४३). परंतु पुढे कॅल्‌व्हिनबरोबरचे त्याचे संबंधही दुरावले आणि तो सॅव्हॉय येथे आला तेथून इटलीस गेला. तूरिन येथे त्याचे निधन झाले.

मारो हा प्रॉटेस्टंट नसला, तरी तो स्वतंत्र विचारांचा माणूस होता आणि धार्मिक वादविवादांत त्याला स्वारस्य नव्हते. प्रॉटेस्टंट पंथीयाबद्दल त्याला काही सहानुभूती होती. हे मात्र दिसून येते.

विलापिका, चतुरोक्ती (एपिग्रॅम), एक्‌लॉग ह्यांसारखे प्राचीन ग्रीकरोमन काव्यप्रकार त्याने फ्रेंच कवितेत आणले. स्त्रांबोत्तोसारखा इटालियन कविताप्रकारही त्याने समर्थपणे हाताळला. तसेच पीत्रार्कन घाटाची सुनीते लिहिणाऱ्या अगदी आरंभीच्या फ्रेंच कवींपैकी तो एक होय. ह्यांखेरीज काही उत्कृष्ट पत्ररूप कविताही त्याने लिहील्या. विविध छंदांवरील त्याचे प्रभुत्व त्याच्या कवितेतून प्रत्ययास येते. मध्ययुगीन साहित्याबद्दल त्याला प्रेम होते. रोमाँ द ला रोझ ह्या काव्याचे, तसेच फ्रांस्वा व्हीयाँसारख्या मध्ययुगीन कवीच्या कवितांचे संपादन त्याने आस्थेने केले होते. ब्‍लांसोसारख्या मध्ययुगीन काव्यप्रकाराचे त्याने पुनरुज्‍जीवन केले (स्त्रीदेहाचे तपशीलवार वर्णन हे ब्‍लांसोचे एक लक्षणीय वैशिष्ट्य) त्याला मोठी लोकप्रियता प्राप्त करून दिली. तथापि मारोमधला उपरोधकार हा अत्यंत प्रभावी होता. त्याच्या कवितांतील उपरोध सूक्ष्म आणि वैविध्यपूर्ण असा आहे.

कुलकर्णी, अ. र.