फ्र्‌वासार, झां : (सु. १३३७ – सु. १४०४). विखात फ्रेंच इतिवृत्तकार. उत्तर फ्रान्समधील व्हालेन्सिएंझ शहरी जन्म. त्यांच्या मातापित्यांसंबंधी, तसेच त्याच्या पूर्वजीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. १३६१ मध्ये तो इंग्लंडला आला इंग्लंडचा राजा तिसरा एडवर्ड ह्यांची पत्नी फिलिपा हिचा आश्रय त्याला मिळाला. १३६९ मध्ये राणीचा मृत्यू होईपर्यंत फ्र्‌वासार तिच्या सेवेत होता. ह्या काळात निरनिराळ्या निमित्तांनी स्कॉटलंड, बोर्दो, मिलान, फेरारा, बोलोन्या, रोम अशा विविध स्थळांचा प्रवास त्याला घडला. राणीच्या निधनानंतर तो व्हालेन्सिएंझ येथे परतला. त्यानंतर त्याला जे आश्रयदाते लाभले, त्यात ब्राबांटचा ड्यूक वेन्सेसलॉस आणि ब्लावाचा काऊंट गाय द शातीयाँ ह्याचा समावेश होता. ब्लावाच्या काऊंटने फ्र्‌वासारला स्वतःचा खाजगी ‘चॅप्लेन’ तसेच शीमे येथील ‘कॅनन’ अशी धार्मिक अधिकारपदे दिलेली होती. १३८९ नंतर फ्रवासारचे वास्तव्य सामान्यतः व्हालेन्सिएंझ आणि शीमे येथेच होते. त्याच्या मृत्यूचे नेमके वर्ष आणि स्थळ सांगता येत नाही. तथापि सु. १४०४ पर्यंत तो हयात असावा, असे दर्शविणारी काही प्रमाणे मिळतात. शीमे येथे त्याचे दफन करण्यात आले. अशी एक आख्यायिका आहे परंतु यासही आधार मिळत नाही.

‘क्रॉनिकल्स ऑफ फ्रान्स, इंग्लंड, स्कॉटलंड अँड स्पेन’ (इं. शी.) ह्या फ्र्‌वासारकृत विख्यात इतिवृत्ताचे एकूण चार भाग असून त्यांत पश्चिम यूरोपातील १३२५ ते १४०० पर्यंतच्या घटनांचा–मुख्यतः इंग्लंड आणि फ्रान्स ह्यांच्यात घडून आलेल्या ⇨ शतवार्षिक युद्धाच्या (१३३७-१४५३) पहिल्या पन्नास वर्षांचा-इतिहास आलेला आहे. आपल्या पहिल्या भागाच्या लेखनासाठी (लेखन १३७१ च्या आधी) झां ल बेल (मृ. १३७०) ह्या बेल्जियन इतिवृत्तकाराच्या ले व्ह्रॅ कॉनिक (१३२६-६१) ह्या इतिवृत्ताचा बराच आधार फ्र्‌वासारने घेतला होता परंतु ह्या भागावर नंतर दोनदा संस्कार करून त्याने तो विस्तृत केला त्यात स्वतःची बरीच भर घातली. ह्या इतिवृत्ताचा दुसरा भाग १३८७ किंवा ८८ मध्ये आणि तिसरा १३९० मध्ये त्याने पूर्ण केला. चवथ्या भागाचे लेखन त्याने केव्हा संपवले हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी त्यात १४०० पर्यंतच्या घटना आलेल्या असल्याने त्या वर्षाच्या अखेरपर्यंत वा त्यानंतर काही वर्षांनी पूर्ण झाला असावा.

आपल्या इतिवृत्तलेखनासाठी फ्र्‌वासारने आपल्या प्रवासाचा शक्य तितका उपयोग करून घेतला. आपणास सत्य सांगावयाचे आहे, ह्याची जाणीव ठेवून संबंधित घटना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या, त्यांच्या मुलाखती, अस्सल दस्तऐवज अशी साधने त्याने ह्या इतिवृत्तासाठी वापरली. मुख्यतः शतवार्षिक युद्धासंबंधीचा एक उपयुक्त इतिहासग्रंथ म्हणून आजही ह्या इतिवृत्ताचे महत्त्व आहे. तथापि ह्या इतिवृत्तलेखनाकडे पाहण्याचा फ्र्‌वासारचा दृष्टिकोण मात्र मर्यादित स्वरूपाचा होता. मध्ययुगीन सरंजामशाहीच्या चौकटीतील उमरावांची शूरोदार परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हे त्याचे उद्दिष्ट होते. ह्या उमरावांचे लष्करी पराक्रम आणि साहसे ह्यांत त्याल रस होता परंतु समाजाच्या अन्य कोणत्याही घटकाविषयी त्याला स्वारस्य नव्हते. उदा., वॅट टायलर ह्या इंग्लंडमधील शेतकऱ्यांच्या पुढाऱ्याने केलेल्या बंडाचा उल्लेख फ्र्‌वासार केवळ कोरड्या कर्तव्यबुद्धीने करतो. चवदाव्या शतकातील उमरावी जीवनशैलीचे दर्शन मात्र ह्या इतिहावृत्तातून घडते. फ्र्‌वासारची लेखनशैली प्रभावी आणि चित्रमय आहे.

त्याने काही कविता आणि एक रोमान्सही लिहिलेला आहे.

संदर्भ : 1. Coulton, G. C. The Chronicle of European Chivalry, London, 1930.

2. Shears, F. S. Froissart : Chronicler and poet, Oxford.1930.

कुलकर्णी, अ. र.