सारोत, नाताले : (१८ जुलै १९००–१९ ऑक्टोबर १९९९). फ्रेंच कादंबरीकार आणि निबंधलेखिका. जन्म रशियातील इव्हॅनोव्हा येथे. ती दोन वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आईने तिला प्रथम जिनीव्हा आणि नंतर पॅरिसला नेले. अधूनमधून ती रशियाला भेट देत असली, तरी तिचे वास्तव्य मुख्यतः पॅरिसमध्येच असे आणि फ्रेंच ही तिची मातृभाषा होती. ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९२१) आणि पॅरिस विद्यापीठात (सॉरबॉन) तिने कायद्याचे शिक्षण घेतले. १९२५ मध्ये पॅरिस विद्यापीठातून ती पदवीधर झाली. १९२६ ते १९४२ पर्यंत तिने वकिलीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर पूर्णतः लेखनाला वाहून घेतले.

नाताले सारोतदुसऱ्या महायुद्घानंतर यूरोपमध्ये अगतिकतेची आणि हताशतेची भावना अधिकाधिक तीव्र होत गेली. तिचे पडसाद अपरिहार्यपणे साहित्यक्षेत्रातही उमटले आणि साहित्यमूल्ये, साहित्यतंत्र, साहित्यभाषा ह्यांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली. अभिव्यक्तीच्या नव्या माध्यमांचा शोध साहित्यिक घेऊ लागले. त्यातूनच नव-कादंबरीचा जन्म झाला. सारोत ह्या नव-कादंबरीची केवळ प्रमुख प्रतिनिधीच नव्हती, तर आद्यप्रवर्तकही होती. त्रॉपिझ्म (१९३८ इं. भा. ट्रॉपीझम्स, १९६३) हे तिचे पहिले पुस्तक. मध्यमवर्गीय जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगांची शब्दचित्रे तिने त्यात उभी केली आहेत. व्यक्तींच्या मानसिकतेचे तपशीलवार चित्रण करण्याची तिची प्रवृत्ती त्यांतून प्रत्ययास येते. १९४८ साली पॉत्रॅ दँ अँकॉन्यु (इं. भा. पोर्ट्रेट ऑफ ए मॅन अन्नोन, १९५८) ही तिची कादंबरी प्रसिद्घ झाली. ह्या कादंबरीला विख्यात फ्रेंच साहित्यिक आणि विचारवंत ⇨ झां-पॉल सार्त्र ह्याने प्रस्तावना लिहिली होती. सार्त्रने ह्या कादंबरीचे वर्णन ‘अँटी-नॉव्हेल’ (प्रतिकादंबरी) असे केले होते. लॅर द सुप्साँ (१९५६ इं. भा. द एज ऑफ सस्पिशन, १९६३) ह्या आपल्या निबंधातून तिने आपली पारंपरिक कादंबरीविरोधी भूमिका मांडली आणि स्वतःची कादंबरीलेखनाविषयीची भूमिकाही स्पष्ट केली. माणसांच्या वृत्तींच्या आणि कृतींच्या मुळाशी काही आवेगांचे चलनवलन असते. परस्परांविषयीचे आकर्षण आणि परस्परांचे प्रतिसारण ह्यांचा प्रत्यावर्ती खेळ, असे त्याचे स्वरूप असते. मत्सर, प्रेम, द्वेष अशा भावनांचा आधारस्तर ह्या खेळातून घडतो. आपल्याला जवळजवळ अव्यक्तच असणाऱ्या ह्या खेळांचे भान ठेवून व्यक्तींच्या क्रिया-प्रतिक्रिया कादंबरीकाराला मांडता आल्या पाहिजेत.पॉत्रॅ दँ अँकॉन्युमध्ये एक बाप आणि त्याची मुलगी त्यांच्या नातेसंबंधातले संशयाचे वातावरण, परस्परांबद्दलच्या त्यांच्या वृत्ती आणि क्रिया-प्रतिक्रिया ह्यांचे तिने केलेले चित्रण वरील भूमिकेच्या प्रकाशात पाहता येते. ल प्लानतारीयुम (१९५९ इं. भा. द प्लॅनेटरिअम, १९६०), द गोल्डन फ्रुट्स (१९६३ इं. भा. १९६४) ह्या तिच्या काही अन्य कादंबऱ्या. चाइल्डहूड (१९८३ इं. भा. १९८४) ह्या नावाने आत्मचरित्रात्मक लेखनही तिने केले आहे.

पॅरिस येथे ती निधन पावली.

कुलकर्णी, अ. र.