बोव्हार, सीमॉनद : (९ जानेवारी १९०८ – ). फ्रेंच कादंबरीकर्त्री. पॅरिसमध्ये जन्मली. सॉर्‌बॉन विद्यापीठातून,१९२९ साली, तत्त्वज्ञानाची पदवी प्राप्त केल्यानंतर विविध महाविद्यालयांतून बरीच वर्षे तिने तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. तथापि १९४३ साली अध्यापनव्यवसाय सोडून देऊन तिने सर्वस्वी लेखनाला वाहून घेतले. अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव तिच्या लेखनातून प्रत्ययास येतो. लॅव्हिते (१९४३, इं.भा. शी केम टू स्टे, १९४९) ही तिची पहिली कादंबरी. त्यानंतर ल साँ देझोत्र (१९४५, इं. भा. द ब्लड ऑफ अदर्स, १९४८), तू ले झॉम साँ मॉर्‌तॅल (१९४७, इं. शी. ऑल मेन आर मॉर्टल), ले माँदारँ (१९५४, इं. शी. द मँडरिन्स) ह्यांसारख्या अन्य कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. द ब्लड ऑफ अदर्स ह्या कादंबरीत समाजातील प्रत्येक व्यक्ती अन्य व्यक्तींबाबत कशी जबाबदार असते हे दाखविले आहे, तर ‘ऑल मेन आर मॉर्टल’ ह्या कादंबरीत मृत्यूच्या शापातून सुटका झालेला माणूस जगाची उन्नती करू शकेल किंवा काय, ही समस्या हाताळली आहे. ले माँदारँ ह्या कादंबरीस १९५४ साली गाँकूर पारितोषिक देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड घडामोडींमुळे फ्रान्सच्या व इतर देशांच्या सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक जीवनात घडत आलेल्या क्रांतिकारक व मूलभूत बदलाचे ह्या कादंबरीत चित्रण केलेले आहे.

बोव्हारने लिहिलेल्या तात्त्विक ग्रंथांत पुर युन मॉराल द लाँबिग्युइते (१९४७, इं. भा. द एथिक्स ऑफ अँबिग्यूइटी, १९४८) आणि ल दझिॲम सॅक्स (१९४९, इं. भा. द सेकंड सेक्स, १९५३) ह्यांचा समावेश होतो. द एथिक्स ऑफ अँबिग्यूइटीमध्ये अस्तित्ववादात अनुस्यूत असलेला नीतिविचार मांडलेला आहे. पुरुषप्रधान जगात, पुरुषी मूल्यांच्या चौकटीत स्त्रीला राहावे लागते तिला स्वतःच्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे स्त्रीला अवघड जाते, अशा आशयाचे विचार द सेकंड सेक्समध्ये बोव्हारने व्यक्त केले आहेत. मेम्वार द्युन ज्यन फी राँज्ये (१९५८, इं. भा. मेम्वार्स ऑफ ए ड्यूटिफुल डॉटर, १९५९), ला फॉर्स द लाज (१९६०, इं. भा. द प्राइम ऑफ लाइफ, १९६२), ला फॉर्स दे शोझ (१९६३, इं. भा. फोर्स ऑफ सर्कमस्टन्स, १९६५), आणि युन मॉर त्रॅ दूस (१९६४, इं. भा. ए व्हेरी ईझी डेथ, १९६६) ह्या तिच्या आत्मचरित्रपर ग्रंथांतून फ्रान्समधील बौद्धिक जीवनाचा, सु. तीस वर्षांचा इतिहास आलेला आहे.

बोव्हारच्या लेखनातून तिचे तर्कशुद्ध विचार, तिचा प्रांजळपणा आणि जिवनाला उत्कटपणे सामोरे जाण्याची तिची वृत्ती ह्यांचा प्रत्यय येतो.

विख्यात अस्तित्ववादी विचारवंत ⇨झां पॉल सार्त्र ह्याच्याशी तिची गाढ मैत्री होती परस्परांचे साथी म्हणून सार्त्र आणि बोव्हार जगले. विवाहातून निर्माण होणाऱ्या पति-पत्नी ह्या पारंपरिक नात्यापलीकडील हे संबंध होते आणि सार्त्रचे निधन होईपर्यंत त्यांचे हे सहजीवन टिकून राहिले.

टोणगावकर, विजया.