व्हीन्यी, आल्फ्रेद व्हीक्तॉर द : (२७ मार्च १७९७–१७ सप्टेंबर १८६३). स्वच्छंदतावादी फ्रेंच कवी, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार. जन्म फ्रान्समधील लोश ह्या शहरी. वडील ⇨ युरोपीय सप्तवार्षिक युद्धात लढलेले होते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या काळात ह्या राजनिष्ठ कुटुंबाला दुःस्थिती प्राप्त झाली होती व्हीन्यीचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. फ्रान्समध्ये बूरबॉं राजघराण्याचे पुनरागमन झाल्यावर (१८१४) व्हीन्यीने शाही सैन्यात प्रवेश करून पुढे तो कॅप्टन झाला. ही नोकरी त्याने १८२७ मध्ये सोडली.

आल्फ्रेद व्हीक्तॉर द व्हीन्यीपॅरिसमध्ये शिकत असताना त्याने काही शोकात्मिका लिहून नंतर त्या फाडून टाकल्या. ‘ल्‌ बाल’ ही त्याची पहिली कविता (१८२०). १८२२ साली प्रकाशित झालेल्या पोॲम या त्याच्या कवितासंग्रहाची परिवर्धित आवृत्ती १८२६ मध्ये पोॲम आंतीक ए मॉदेर्न (इं. शी. एन्शंट अँड मॉडर्न पोएट्री) या नावाने प्रसिद्ध झाली. त्यातील कवितांना चांगला प्रतिसाद मिळाला होता परंतु जीवनातील अनेक अनुभवांमुळे त्याचे मन नैराश्यग्रस्त होत गेले. १८२५ मध्ये लिडिआ बनबेरी या इंग्रज युवतीशी त्याचा विवाह झाला तथापि विवाहनंतर ती सतत आजारी असल्यामुळे त्याला तिची सेवा करीत रहावे लागले आणि ती त्याने तिचा मृत्यू होईपर्यंत निष्ठेने केली. दरम्यान फ्रेंच रंगभूमीवरील एक अभिनेत्री मारी डॉर्व्हल हिच्या प्रेमात तो पडला परंतु ह्या प्रेमसंबंधांची परिणतीही वैफल्यजनक ठरली.

जीवनाकडे पाहण्याचा त्याचा नैराश्यवादी दृष्टिकोण त्याच्या कवितांतून प्रत्ययास येतो. ह्या जगात थोर माणसे एकाकी पाडली जातात भयंकर नैसर्गिक आपत्ती येऊन कित्येक माणसे नष्ट होतात हे सर्व कुणीएक शक्ती अविरत करीत असते, अशी कल्पना त्याने पहिल्या संग्रहातील कवितांतून मांडली आहे. ‘ला मॉर द्यू लू’ ह्या कवितेत जनावरे जर न रडता आपल्या वाट्याला आलेले दुःख भोगतात, तर माणसाने तसे का करू नये, असा प्रश्न केला आहे. बायबल हा त्याच्या काव्यविषयाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत होय. बायबलशी निगडित अशी अनेक प्रतीकेही त्याने आपल्या कवितेसाठी योजिलेली आहेत. व्हीन्यीला तात्त्विक, वैचारिक स्वरूपाची कविता लिहावयाची होती. ‘महाकाव्यात्म वा नाट्यात्म घाटात तात्त्विक विचार सादर करणारी रचना म्हणजे कविता’ असे त्याचे प्रतिपादन होते. त्यामुळे त्याला स्वच्छंदतावाद्यांमधील वैचारिक कवी मानले जाते. मात्र त्याच्या विचाराभिव्यक्तीत एक प्रकारची चित्रात्मकता होती. प्रतिभावंतांवर होणाऱ्या अन्यायाची तीव्र बोचक भावना त्याच्या मनात खोलवर होती आणि स्तेलो (१८३२) ह्या त्याच्या कथासंग्रहातील तीन कथांचा हाच विषय आहे.

शेक्सपिअरची नाटके करणारी एक नाटकमंडळी १८२७मध्ये पॅरिसला आली होती. तिचे नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर व्हीन्यीने शेक्सपिअरच्या काही नाटकांची फ्रेंच रूपांतरे केली (रोमिओ अँड ज्यूलिएट, १८२८ ऑथेल्लो, १८२९ आणि मर्चंट ऑफ व्हेनिस, १८३०). ला. मारेशाल दांक्र (१८३१), कीत पुर ला पर (१८३३, इं. शी. ए नॅरो एस्केप) आणि शोतेताँ (१८३५) ही त्याची स्वतंत्र नाटके. यांतील ला मारेशाल दांक्र हे एक ऐतिहासिक नाटक असून तेराव्या लूईला राजसत्ता मिळेपर्यंतच्या घटना त्यात दाखविलेल्या आहेत. कीत पुर ला पर या नाटकात अडचणीत आलेली एक डचेस त्या अडचणीतून कशी बचावते आणि तिचा सन्मान कसा अबाधित राहतो, हे दाखविले आहे. शोतेताँ हे त्याचे सर्वोत्कृष्ट नाटक. शोतेताँ (इंग्रजी चॅटरटन) या नावाच्या कवीच्या जीवनाची ही शोकात्मिका आहे. व्यापारी वृत्तीच्या कठोर स्वार्थी माणसांच्या जगात प्रतिभावंताची प्राणांन्तिक कोंडी कशी होते, हे या नाटकात प्रभावीपणे दाखविलेले आहे. ह्या नाटकातील किटीची भूमिका व्हीन्यीची प्रेयसी मारी डॉर्व्हल हिने केली होती. किंबहुना तिच्यासाठीच त्याने हे नाटक लिहिल्याचे म्हटले आहे.

सँ मार (इं. भा. द स्पायडर अँड द फ्लाय, १९२५) ही व्हीन्यीची ऐतिहासिक कादंबरी (१८२६). फ्रेंच भाषेतील ऐतिहासिक कादंबरीच्या इतिहासात तिला महत्त्वाचे स्थान आहे. ह्या कादंबरीतून त्याच्या प्रभावी निवेदनशैलीचा प्रत्यय येतो.

व्हीन्यीच्या सॅर्व्हित्यूद ए ग्रांदर मिलितॅर (१८३५, इं. भा. द मिलिटरी नेसेसिटी, १९५३ द मिलिटरी कंडिशन, १९६४) या संग्रहात तीन कथा असून त्यांतून त्याचा निराशावाद पुन्हा जाणवतो. सैनिकाची प्रतिष्ठा आणि त्याला सोसावे लागणारे दुःख हा या कथांचा विषय.

व्हीन्यीचे जीवन १८३५ नंतरच्या काळात एकाकीच होत गेले. १८३७ साली त्याची आई मरण पावली. ह्याच वर्षी मारी डॉर्व्हल हिच्याबरोबरचे त्याचे संबंध तुटले. त्यानंतर रंगभूमीसाठी त्याने काहीही लिहिले नाही. ह्या काळात त्याने पत्रव्यवहार व दैनंदिन टिपणे ह्या स्वरूपाचे लेखन केले. त्याच्या संकल्पित लेखनाचे खर्डे बहुधा अपूर्णच राहत. त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या जुर्नाल दं पोयॅतमध्ये (१८६७) हे लेखन अंतर्भूत आहे. ह्या काळातील काही कविता मात्र ले देस्तिने ह्या त्याच्या मरणशेत्तर प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहात आहेत. १८४५ साली फ्रेंच अकादमीवर त्याची नियुक्ती झाली. १८६२मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर लवकरच पॅरिसमध्ये त्याचेही निधन झाले.

व्हीन्यीचे लेखन फारसे नाही आणि त्याच्या हयातीत त्याला फारशी कीर्तीही लाभली नाही. तथापि नंतरच्या पिढ्यांत त्याच्या प्रतिभेने प्रभावित झालेले ⇨ शार्ल बोदलेअर, ⇨ आंरी द रेन्ये, ⇨ आंद्रे ब्रताँ यांसारखे नामवंत साहित्यिक झाले.संदर्भ : 1. Baldensperage, F. Alfred de Vigny, Paris, 1925.               2. Doolittle, James, Alfred de Vigny, 1933.               3. Underwood, Eugene Taylor, Bhueprint for and lvory Tower Vigny and Sainte-Beuve, 1956.             4. Whitridge, Arnold, Alfred de Vigny, 1982. 

कुलकर्णी, अ. र.